आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमराठी रंगभूमीची चटकदार बात..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतलं अमराठी सांस्कृतिक विश्व विलक्षण मनोवेधक आहे. यात जागतिक दर्जाचे सिनेमे आहेत, जगभर गाजलेली नाटकं आहेत, संगीत आहे. या समृद्ध विश्वाचा एक भाग म्हणजे, मुंबईतील अमराठी रंगभूमी. या रंगभूमीवर होत असलेल्या नाटकांच्या परिक्षणांचा ‘रंगभूमीचे आंग्लरूप ः मुंबईतील अमराठी रंगभूमी’ हा संग्रह लोकवाङमय गृहातर्फे लवकरच प्रकाशित होत आहे. त्या निमित्ताने लेखकाचे हे मनोगत…

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे १९६९ ते १९७३ दरम्यान शालेय शिक्षण घेत असताना आमच्या घरी ‘महाराष्ट्र टाइम्स’ येत असे. त्यामुळे मला मुंबई-पुण्यातील सांस्कृतिक विश्वाची चांगली ओळख होती. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये ज्ञानेश्वर नाडकर्णी वगैरेंचे लेख येत असत. हा काळ समांतर रंगभूमीच्या वैभवाचा काळ होता. अशा नाटकांबद्दल वाचताना मनाला हुरहूर वाटायची. अशी नाटकं मला कधी बघायला मिळतील, हा प्रश्न सतत मनात असायचा. माझ्या मोठ्या भावाची, अशोक कोल्हेची पुण्याच्या सिंडिकेट बँकेत बदली झाली. उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याच्याकडे गेलो म्हणजे, जमतील तशी नाटकं बघून घेत असे.

खामगाव येथे नाटककार कोल्हटकरांच्या नावाचे एक ओपन एअर थिएटर होते. कोल्हटकर काही काळ खामगावला राहात होते. त्याच्या स्मरणार्थ हे थिएटर बांधले होते. मुंबई-पुण्याकडची लोकप्रिय नाटकं विदर्भाच्या दौऱ्यावर आली की, त्यांचे प्रयोग खामगांवला होत असत. यात मी ‘काचेचा चंद्र’, ‘हा स्वर्ग सात पावलांचा’, ‘हे फूल चंदनाचे’, ‘गाढवाचं लग्न’, ‘िवच्छा माझी पुरी करा’ वगैरे नाटकं बघितली होती. त्या वयाच्या प्रथेनुसार मी दादा कोंडके, डॉ. श्रीराम लागू, गणपत पाटील, दादू इंदूरीकर वगैरेंच्या स्वाक्षरी गोळया केल्या होत्या.

खामगावला बघितलेल्या नाटकांनी जरी मला त्या वयात आनंद दिला असला तरी, ही नाटकं म्हणजे दादरच्या छबिलदासमध्ये होणारी नाटकं नाहीत, याचं भान मला तेव्हासुद्धा होतं. शालेय शिक्षण संपल्यानंतर मला महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकण्याची संधी मिळाली. याचे सर्व श्रेय मोठ्या भावाला. हे वर्ष होते १९७३.

मी बघताबघता पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात मिसळून गेलो. येता-जाता बालगंधर्व रंगमंदिरात असलेल्या कलादालनातील कलाप्रदर्शनं बघणे हा महत्त्वाचा उद्योग झाला होता. मी त्या काळात तेंडुलकरांचे ‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’ वगैरे नाटकं; शंभू मित्रा यांनी दिग्दर्शित केलेले ‘कोंडी’; स्मिता पाटील व आशालता वाबगावकर यांच्या भूमिका असलेले ‘िछन्न’ सारखे नाटक; शाम बेनेगलांचे ‘अंकुर’, ‘िनशांत’ वगैरे समांतर चित्रपट; थिएटर अॅॅकॅडमीने सादर केलेले व डॉ. मोहन आगाशे, डॉ. विद्याधर वाटवे यांच्या भूमिका असलेले ‘खेळिया’ सारखी नाटकं बघत मोठा होत होतो. याच्या जोडीला अधूनमधून फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन सत्यजित राय यांचा ‘पथेर पांचाली’ व इतर चित्रपट बघणे वगैरे उद्योग होतेच.

मला बघताबघता पुण्यात सात वर्षे झाली होती. या काळात ‘महाराष्ट्र टाइम्स’चे वाचन नियमित सुरू होतेच. एव्हाना जोडीला ‘सकाळ’ आला होता, अफाट खपाचे डार्लिंग विकली ‘साप्ताहिक मनोहर’ आले होते. फर्ग्युसनच्या अगदी बाजूलाच ब्रिटिश कौन्सिल हे ग्रंथालय होते. तेथे मला दोन-तीन वर्षांनी ‘ऑफ-िपक अवर्स’ या गटातील सभासदत्व मिळाले. कॉलेजमध्ये वेळ मिळाला की किंवा मुद्दामहून वेळ काढून मी तेथे डोकावत असे. तेथेच मी ई. एम. फॉस्टरची ‘ए पॅसेज टु इंडिया’ ही माझ्या आयुष्यातील पहिलीवहिली इंग्रजी कादंबरी वाचली.

हळूहळू जाणवायला लागले होते, की पुण्यातील सांस्कृतिक विश्व आता माझी सांस्कृतिक भूक भागवू शकत नाही. १९७३ ते १९८०च्या दरम्यानच्या पुण्यात मुंबईच्या ‘प्रभात फिल्म सोसायटी’ सारखी जगभरचे अप्रतिम चित्रपट दाखवणारी संस्था नव्हती. पाश्चात्त्य रंगभूमीवरील दिग्गज नाटककारांची गाजलेली नाटकं बघायला मिळतील, असे पृथ्वी थिएटर नव्हते, एन.सी.पी.ए. नव्हते. मला पुणे सोडणे भाग होते.

सप्टेंबर १९८०मध्ये मी मुंबईकर झालो व लगेचच प्रभात फिल्म सोसायटीचा सभासद झालो. नोकरी लागल्यानंतरच्या पहिल्या रविवारी फोर्टमधील जुन्या पुस्तकांच्या बाजारात भटकत होतो. तेथे अमेरिकन नाटककार आर्थर मिलरचे ‘डेथ ऑफ ए सेल्समन’ मिळाले. आठवडाभरात एका नशेतच वाचून काढले. इंग्रजी नाटक वाचण्याचा माझा हा पहिलाच अनुभव होता. वाचून झाल्यावर एकदम सुन्न वाटले. हा अनुभव सर्वस्वी नवा होता. सुदैवाने पंधरा दिवसांत एन.सी.पी.ए.त या नाटकाचा प्रयोग बघायला मिळाला. दिग्दर्शन व प्रमुख भूमिका अलेक पदमसी यांची होती. नाटक संपल्यावर मी कितीतरी वेळ नरिमन पॉईंटच्या अंधारात स्वतःला शोधत होतो. माझ्यावर या नाटकाचा जबरदस्त प्रभाव पडला होता. त्या दिवसापासून मुंबईतील अमराठी रंगभूमी माझ्या भावविश्वाचा अविभाज्य भाग झाली. मी तेव्हापासून आतापर्यंत मुंबईत मंचीत झालेली जवळजवळ सर्व महत्त्वाची हिंदी, इंग्रजी (प्रसंगी गुजरातीसुद्धा) नाटकं बघितलेली आहेत.

१९९२च्या उन्हाळ्यात एका रविवारी ‘टाइम्स ऑफ इंडिया’त दिल्लीत सादर झालेल्या ‘तुम्हारी अमृता’ या नाटकावर लेख प्रकाशित झाला होता. मी तो वाचला व हे हिंदी, उर्दू नाटक बघायचे, असे ठरवले. मला या नाटकाचा प्रयोग लवकरच मुंबईत बघायला मिळाला. ‘तुम्हारी अमृता’चा नाट्यानुभव विलक्षण होता. मी हे सर्व ‘आपलं महानगर’चा संपादक निखिल वागळेला सांगत होतो. निखिलमधला पत्रकार अष्टौप्रहर जागा असतो. त्याने लगेच यावर लेख लिहून द्यायला सांगितले. तेव्हापासून मुंबईतील अमराठी रंगभूमीवरील नाटकं बघणे व त्यांचे परीक्षण करणे हे माझ्या अस्तित्वाशी निगडित झाले. म्हणून मी हे पुस्तक निखिलला सप्रेम अर्पण करत आहे.

मुंबईतील अमराठी रंगभूमी हे और जग आहे. याची एकदा चटक लागली की, मग दुसरे काही आवडत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, या रंगभूमीवर बव्हंशी जागतिक दर्जाची नाटकं सादर केली जातात. यात शेक्सपिअर, बर्नार्ड शॉ, हेन्री इब्सेन यांच्यासारखे दिग्गज नाटककार तर असतातच; शिवाय आधुनिक युरोपीय रंगभूमीवरील थोर नाटककारसुद्धा असतात. येथे प्रेक्षकांना ‘महाभारत’ सादर करणारा पीटर ब्रूक, अमेरिकन नाटककार जॉन पिलमेयर, रेगिनाल्ड रोझ, वुडी अॅलन; रशियन नाटककार एव्हगेनी श्वार्टस; ब्रिटिश नाटककार डेनीस केली, डंकन मॅकमिलन; इटालीयन नाटककार दारिओ फो; नॉर्वेजियन नाटककार जॉन ओलाव फॉसे अशा थोर नाटककारांच्या कलाकृती आस्वादता येतात. यांच्या जोडीला भारतीय रंगभूमीवरील थोर नाटककार बादल सरकार, गिरीश कर्नाड, मोहन राकेश, विजय तेंडुलकर व महेश एलकुंचवार यांची नाटकंसुद्धा सातत्याने सादर होत असतात. मुंबईतील अमराठी रंगभूमीचे अतिशय समृद्ध जग आहे. या रंगभूमीने मला वर्षानुवर्षे अपार आनंद दिला. त्याचाच एक भाग म्हणून हा निवडक परीक्षणांचा संग्रह. रसिकांना ही परीक्षणं आवडतील, असा विश्वास वाटतो.

पुस्तकाचे नाव :
रंगदेवतेचे आंग्लरूप :
मुंबईतील अमराठी रंगभूमी

लेखक : प्रा. अविनाश कोल्हे
प्रकाशक : लोकवाड्मय गृह
पुस्तकाची किंमत ः ~ २५०/-
पृष्ठसंख्या ः १५०
nashkohl@gmail.com

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...