आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article In RASIK By Prashant Pawar About Backword Society

खेळकरी-पैलवान! (पालांवरच्या गोष्टी)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्यांचं जगणं हे अंगावर येणारं...संस्कृतीच्या ज्या पायरीवर आपण उभे आहोत, तिथून हजारो पाय-या खाली असलेलं आणि तेदेखील ज्या लातूर जिल्ह्याने राज्याला दोन मुख्यमंत्री दिले, त्यांच्यापासून हाकेच्या अंतरावरचं... अवघ्या १५ वर्षांपूर्वी या समाजाचं भेदक वास्तव काय होतं आणि रचनात्मक कार्यामुळे आज हा समाज कुठवर पोहोचलाय, त्याची ही मालिका...
१४ वर्षांची अनिता गेल्या दोन दिवसांपासून प्रसूतिवेदनांनी तळमळत होती. तिच्या जीवघेण्या किंकाळ्यांनी पालावरची प्रत्येक झोपडी शहारत होती. सुईण म्हणून ओळखल्या जाणा-या पालावरच्या प्रत्येक बाईने अनिताची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू केले. काहींनी तिच्या पोटावर लाथा मारून पाहिल्या होत्या, तर कुणी पायाने पोटातले बाळ पुढे सरकवण्याचा प्रयत्न करत होत्या. काहींनी तर योनिमार्गात हात घालून बाळाला पुढे ओढून घ्यायचा प्रयत्नही करून पाहिला होता. सगळ्याच सुईणींनी शेवटी हार मानली. गेल्या दोन दिवसांच्या या वेदनांनी आणि अति रक्तस्रावामुळे अनिताच्या अंगात काहीच त्राण उरलं नव्हतं. दोन दिवस तिच्या पोटात अन्नाचा कण गेला नव्हता. अनिता खरोखरच मरणपंथाला लागली होती, परंतु कोणीही तिला दवाखान्यात घेऊन जाण्यास तयार नव्हता. त्यांच्या जातपंचायतीचा तसा कडक नियमच होता. परजातीच्या माणसाचा स्पर्श झाला की अंग विटाळतं, अशी या समाजाची धारणा होती. एक वेळ ती मेली तरी चालेल, तिच्या नव-याचे दुसरीशी लग्न लावून देऊ; पण दवाखान्यात मात्र न्यायचे नाही, अशी कठोर भूमिका जातपंचायतीने घेतली होती.

सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक नरसिंग झरे यांना मात्र अनिताची ही जीवघेणी अवस्था पाहवत नव्हती. अनिता त्यांची विद्यार्थिनी होती. अनिताचं बाळंतपण दवाखान्यात सुरळीत पार पडलं तर सगळ्या वस्तीच्या दृष्टीने तो मोठा चमत्कार ठरला असता. या निमित्ताने समाजाला वैद्यकशास्त्राची ओळख झाली असती. बराच वेळ वाद झाल्यानंतर अखेर नरसिंगने त्याच वस्तीतल्या समंजस सखुबाईंच्या मदतीने जातपंचायतीला राजी केले. अनिता मरणारच, अशी पंचायतीला खात्री होती. त्यामुळे जर ती दवाखान्यात मेलीच तर तिला तिकडेच कुठेतरी गाडून टाक, अशी नरसिंगला सक्त ताकीद जातपंचायतीने दिली. अनिताला लगेचच लातूरच्या जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास सात तास तिच्यावर शस्त्रक्रिया चालली. एकूण ७२ टाके घालावे लागले आणि नऊ बाटल्या रक्त लागले. सुईणींनी तिच्या पोटात हात घालून बाळ पुढे ओढून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे गर्भनलिका आणि मूत्रमार्ग यांचे वेढे बाळाच्या अंगाभोवती पडले होते. खूप गुंतागुंत झाली होती. अनिताच्या बाळाभोवती पडलेले हे वेढे अखेर सोडवण्यात आले आणि पहाटे दोन वाजता अनिता बाळंत झाली. तिला मुलगा झाला...

कसरतीचे खेळ दाखवून झाल्यानंतर शांताबाई आणि तिचा नवरा बाजीराव वस्तीवर परतण्यासाठी खच्चून भरलेल्या जीपमध्ये बसले. शांताबाईला मागच्या सीटवर कशीबशी जागा मिळाली, परंतु बाजीराव मागच्या फुटबोर्डवर जीपचा काठ धरून उभा होता. चिक्कार दारू प्यायल्यामुळे त्याचा सारखा तोल जात होता. खड्ड्या-खड्ड्यातून जीप गचके घेत चालली होती. एका मोठ्या खड्ड्यात जीपला जोरदार गचका बसला आणि बाजीराव बाहेर फेकला गेला. तो उडाला आणि त्याचं डोकं रस्त्याच्या कडेला एका मोठ्या दगडावर आपटलं. तो पार रक्तबंबाळ झाला. त्याला लगेच दवाखान्यात भरती केले. परंतु त्याअगोदरच तो मरण पावला होता. दवाखान्याच्या नियमाप्रमाणे त्याचे पोस्टमार्टेम झाले. ही गोष्ट अनसरवाड्याला गोपाळ समाजाच्या वस्तीवर कळली. सगळे पुरुष निलंग्याला रवाना झाले. पांढ-या कपड्यात गुंडाळलेले बाजीरावचे प्रेत दवाखान्याच्या पायरीवर ठेवले होते. परंतु कोणीही त्या प्रेताला हात लावायला तयार होत नव्हते. शांताबाई सगळ्यांच्या पाया पडू लागली आणि प्रेत दफन करण्याची विनंती करू लागली. परंतु त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. समाजाच्या मते, बाजीरावच्या प्रेताला डॉक्टरांनी म्हणजे परजातीच्या माणसांनी हात लावल्यामुळे जातीच्या दृष्टीने त्याचा मुडदा विटाळला होता. जातीचा दंड भरण्याची तयारी शांताबाईने दर्शवल्यानंतरही कुणाच्या काळजाला पाझर फुटत नव्हता. अखेर नरसिंग झरे आणि त्याच्या काही मित्रांनी मिळून बाजीरावचे प्रेत दूर नेऊन गाडले.

वीरगोपाळ समाजाला अंधश्रद्धेच्या या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी नरसिंग झरेने त्यांच्याच वस्तीवर पालावरची शाळा सुरू केली होती. मात्र वारंवार सांगूनही मुलं अतिशय अस्वच्छ आणि घाणेरडी राहायची. ते कधीही अंघोळ करायचे नाहीत. त्यांच्या अंगावर, मानेवर कायम मळाचा थर साचलेला असायचा. त्यांचे केस कायम पिंजारलेले आणि धुळीने माखलेले असायचे. अस्वच्छतेमुळे त्यांच्या डोक्यात कायम उवा असायच्या. अशा अस्वच्छतेमुळेच प्रत्येकाच्या अंगावर खरुज, गजकर्ण, नायटा अशा रोगांचे डाग उठलेले असायचे. गोपाळ समाजाच्या वस्तीवर शिकवून नरसिंगलाही आता बरेच महिने झाले होते. मुलांना शिकवता शिकवता तो वस्तीसाठीही अनेक सकारात्मक कामं करू लागला होता. वस्तीने आपल्याला स्वीकारले आहे, या जाणिवेपोटी एकदा नरसिंगने एक धाडसी निर्णय घ्यायचे ठरवले. घरातून तो कात्री आणि वस्तरा घेऊनच निघाला. वस्तीवर पोहोचल्या पोहोचल्या सगळ्या अस्वच्छ मुलांना घेऊन तो विहिरीवर गेला. जवळपास २०-२५ मुलांची त्याने डोकी भादरली आणि डोक्याचा तुळतुळीत गोटा करून टाकला. विहिरीचे पाणी काढून त्याने प्रत्येक मुलाला साबणाने चांगले स्वच्छ घासले...
काम पूर्ण झाल्यानंतर नरसिंग आपल्या घराच्या दिशेने परतत असतानाच पाठीमागून गोपाळ समाजाचा एक मोठा जमाव हातात काठ्या आणि कुऱ्हाडी घेऊन जोरजोरात धावत येत असल्याचे नरसिंगला दिसले. स्वच्छ झालेली मुलं पाहून वस्तीवर मोठा भूकंप झाला होता. अस्वच्छपणा हे त्यांचे भीक मागण्याचे भांडवल होते आणि नरसिंगने त्यांच्या पोटापाण्याच्या साधनावरच घाला घातला होता. सगळी वस्ती बिथरली होती आणि नरसिंगला धडा शिकवायला निघाली होती.
नरसिंगला गाठून गोपाळ समाजाच्या जमावाने त्याच्यावर लाथा-काठ्यांनी प्रहार केला. त्याचं डोकं फुटलं, नाकाचा घोळाणा फुटला. गावातले इतर लोक मदतीला धावून येण्यापूर्वीच जमाव निघून गेला. दोन-चार दिवसांनी वस्तीने जातपंचायत लावली होती आणि नरसिंगला जातपंचायतीसमोर हजर राहण्यास सांगितले. इतका मार खाऊनही नरसिंग मागे हटला नव्हता. कीड पडली म्हणून त्याला ते रोपटं खुडायचं नव्हतं, तर फक्त किडीचा बंदोबस्त करायचा होता. जातपंचायतीसमोर नरसिंग मोठ्या हिमतीने उभा राहिला. रात्री उशिरापर्यंत पंचायत चालली. गोपाळ समाजाच्या अंतर्गत नियमात ढवळाढवळ केल्याबद्दल नरसिंगला दोषी ठरविण्यात आले आणि एकवीस रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

अंधश्रद्धेचा किती जबरदस्त विळखा वीर गोपाळ समाजाभोवती पडलेला आहे, हे सूचित करणा-या आणि अंगावर काटे आणणा-या दहा-पंधरा वर्षांपूर्वी निलंगा तालुक्यात अनसरवाडा या गावातील घडलेल्या या तीन घटना...
या अंधश्रद्धेपायी जी व्यक्ती समाजाच्या उत्थानासाठी स्वत:हून आली आहे, जी व्यक्ती रूढी-परंपरेच्या दलदलीतून समाजाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतेय, त्या व्यक्तीलादेखील या समाजाने सोडले नाही, यावरूनच समाजाची मानसिकता लक्षात येऊ शकते. नागर समाज आणि भटक्या जातीतला गोपाळ समाज यांच्यातलं सांस्कृतिक अंतर हे हजारो वर्षांचं होतं. नागरी आणि भटक्या संस्कृतीच्या उन्नयनाच्या टप्प्याचं होतं, जातीय अहंकाराचं होतं, आर्थिक होतं, सामाजिक होतं, दोन्ही समाजांनी परस्परांविषयी बाळगलेल्या पूर्वग्रहांचं हे अंतर होतं.
मूळचे गोकुळ नगरीचे म्हणजे द्वारकेचे असल्याचा गोपाळ समाजाचा दावा आहे. कसरतीचे आणि ताकदीचे खेळ करून दाखवतात, म्हणून गोपाळ समाजाला खेळकरी आणि पैलवान म्हणूनही ओळखले जाते. गावात खेळ करून दाखवण्यापूर्वी ढोलताशे वाजवायचे, पिपाणी वाजवायची, गर्दी जमवायची आणि मग अफाट ताकदीचे खेळ करून दाखवायचे. ही मंडळी अख्खा नांगर दातांवर उभा करून दाखवतात. लाकडाचा ओंडका दातावर उभा धरतात आणि तो हवेत तोलतात. मानेला दोरी बांधून जड दगड उचलतात. केसांनी ३०-४० किलो वजनाचा दगड उचलतात. लोखंडी सळईचे एक टोक दगडाला आणि दुसरे टोक आपल्या कंठाजवळ ठेवून मानेने ती सळई वाकवून दाखवतात. तान्ह्या मुलाची झोळी बांबूला बांधून तो बांबू कपाळावर उभा करतात. कमरेत मागे वाकून रोवलेली सुई डोळ्यांच्या पापण्यांनी उचलून दाखवतात. इतकेच नव्हे, तर पोतं भरलेली बैलगाडी अंगावरून जाऊ देतात... जिवावरचे कौशल्याचे आणि अफाट ताकदीचे खेळ करून दाखवणे, हा या वीरगोपाळ समाजाचा हातखंडा.
द्वारकेचे असल्यामुळे गाई-म्हशींचे तांडेच्या तांडे घेऊन त्यांना चरायला घेऊन जायचे, हा या समाजाचा एकेकाळचा मुख्य व्यवसाय. दह्या-दुधावर लोकांचा पिंड पोसलेला असल्यामुळे अंगात रगही तितकीच होती. त्यामुळे एकदा का गाईंना चरायला सोडले, की मग अंगातली रग जिरवण्यासाठी असे अचाट ताकदीचे खेळ खेळायचे. पुढे पुढे मुघलांच्या आक्रमणामुळे यांच्या तांड्यावर धाडी पडू लागल्या आणि मग जंगलखो-यातून, डोंगरद-यांमधून हा समाज भटकतच राहिला. मग पोट भरण्यासाठी हेच ताकदीचे खेळ त्यांना उपयोगी पडू लागले. आज या गावात तर उद्या त्या गावात जायचे, कसरतीचे खेळ करून दाखवायचे. हे सगळं करून दाखवल्यानंतर त्यांची गावाकडून अपेक्षा असायची ती भाकरीच्या तुकड्यांची. लहान मुलांना भीक जास्त मिळू शकते, म्हणून त्यांचे कुटुंब हे भलेमोठे असायचे. एकेका जोडप्याला किमान १०-१५ पोरं असायची. त्यातली चार-पाच मरायची आणि बाकीची जगायची. मुलांकडे बघून गावातल्या लोकांना दया यावी, म्हणून त्यांना कायम अस्वच्छ आणि घाणेरडे ठेवायचे. त्यांना कधीही अंघोळ घालायची नाही. आपल्या समाजातील बायकांकडे इतर लोकांची नजर जाऊ नये, म्हणून बायकांनी कधी अंघोळ करायची नाही. लहानपणापासून कधी अंघोळीची सवय नसल्यामुळे पुरुषांनीही गलिच्छच राहायचे. गलिच्छ राहण्याचे या समाजाने भांडवल केले होते. वस्तीवरची सगळी कुटुंबं रोज कसरतीचे खेळ दाखवायला वेगवेगेळ्या ठिकाणी जायची आणि संध्याकाळी मिळालेले भाकरीचे तुकडे एकत्र करून त्याची वाटणी करायचे. खाऊन उरलेले भाकरीचे तुकडे गोधड्यांवर वाळत ठेवायचे आणि मग वाळलेले तुकडे मडक्यात किंवा रांजणात भरून ठेवायचे. हीच त्यांची खरी संपत्ती होती.
गोपाळ समाजाच्या गवळी गोपाळ, भोरपी गोपाळ, वीरगोपाळ, भिल्ल गोपाळ अशा चार उपजाती आहेत. खेळ करून दाखवण्यासाठी हा समाज भटकत भटकत पार कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरातमध्येही कालांतराने स्थिरावला. महाराष्ट्रात प्रामुख्याने औरंगाबाद, सातपुडा, अहमदनगर, खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यात गोपाळ समाज वस्त्या करून राहतो.
दुस-या जातीतल्या लोकांशी जास्त संबंध ठेवायचे नाहीत. आपल्या समाजात, आपल्या पालांतच राहायचं. या समाजाची पालंदेखील कुठे तर गावाबाहेरच्या हागणदारीत. हागणदारी म्हणजे गावातले जुने पडके वाडे. जिथे मातीचे ढिगारे पडलेले असतात, रानटी झुडपं वाढलेली असतात, घुशींनी बिळं उकरलेली असतात आणि अशा जागेचा वापर गावकरी शौचालयासाठी करतात. अनसरवाड्याच्या याच हागणदारीत गोपाळ समाज वस्ती करून राहत होता. गावातली लोकं या समाजाला गोबाडा म्हणत. गोबाडा म्हणजे गावच्या बोलीभाषेत गलिच्छ, तिरस्कारयुक्त.
अशा या गोबाड्यांच्या वस्तीला दारूचे प्रचंड व्यसन. कसरतीचे खेळ करायचे आणि मिळालेल्या पैशांमध्ये नवसागर विकत घेऊन वस्तीवरच दारू तयार करायची. या समाजातील पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलेही दारू प्यायची. दारूशिवाय त्यांचे कुठलेही काम व्हायचे नाही. याशिवाय त्यांचा आणखी एक व्यवसाय म्हणजे शिकार... कावळा, मोर आणि कुत्रा सोडून मिळेल त्या प्राण्याची आणि पक्ष्यांची ते शिकार करायचे. अगदी उंदीर आणि घुशींचीसुद्धा... लहान लहान मुलं झाडांवर दगड फेकून खारुताईची शिकार करायचे आणि विस्तवावर भाजून खायचे.
क्रमश:
संदर्भ – अगेन्स्ट ऑल ऑड्स (प्रशांत आसलेकर)
shivaprash@gmail.com