आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसवत्या स्नेहबंधाच्या कविता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलत्या काळात आणि बदलत्या कुटुंबरचनेत अनेक नाती आता सांगण्यापुरती राहिली आहेत. व्यक्तीव्यक्तीतील हा दुरावा घातक आणि दु:खदायक आहे. वाढणारा विसंवाद जीवघेणा आहे. प्रत्ययाला येणारी अर्थहीनता वर्तमानाला जिव्हाळा नसणाऱ्या भविष्याकडे घेऊन जात आहे. सद्यकालीन भारतीय कवितेने नात्यातील हे ताण नेमकेपणाने चिमटीत पकडले आहेत.
मानवी नातेसंबंध ही संस्काराची केंद्रं असतात. आई वडील, आजी-आजोबा, बहीण-भाऊ, मुलगा-मुलगी या नात्यांनी घराचं घरपण उजळ होत असतं. चुलत, मामे, आत्ते, मानलेली अशीही नाती असतातच, त्याशिवाय मित्र असतात, शेजारी असतात, भावकीतले असतात. या सगळ्यांनी मिळून आपला गोतावळा तयार झालेला असतो. ही सगळीच नाती आपल्या जीवनाला अर्थपूर्णता प्रदान करत असतात. कोसळण्याच्या क्षणी आधाराला हीच माणसे धावत येतात. पराभवाच्या काळात हेच लोक आपल्या बाजूने भक्कमपणे उभे असतात. बदलत्या काळात आणि बदलत्या कुटुंबरचनेत अनेक नाती आता सांगण्यापुरती राहिली आहेत. नात्यानात्यांत वाढणाऱ्या दुराव्याने स्नेहबंधाचे वस्त्र उसवून टाकले आहे. नातेवाचक शब्द आपली ऊब हरवून बसले आहेत, अर्थहीन झाले आहेत. दूरच्या नात्यांविषयी ओल राहिलेली आढळत नाही. जवळची नातीही उपचारापुरती होऊन गेली आहेत.

व्यक्तीव्यक्तीतील हा दुरावा घातक आणि दु:खदायक आहे. वाढणारा विसंवाद जीवघेणा आहे. प्रत्ययाला येणारी अर्थहीनता वर्तमानाला जिव्हाळा नसणाऱ्या भविष्याकडे घेऊन जात आहे. सद्यकालीन भारतीय कवितेने नात्यातील हे ताण नेमकेपणाने चिमटीत पकडले आहेत. बदलत्या सामाजिक संरचनेची दिशा मूल्यऱ्हासाकडे आहे, याचे दिग्दर्शन भारतीय कवितेने केले आहे. कवीचा विश्वास असतो मानवी नात्यांवर, मांगल्यावर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सौंदर्यावर. कवीचे लेखन हा त्याचा जीवनशोधच असतो. या जीवनशोधाचे शब्दचित्र उसवत जाणाऱ्या स्नेहबंधाविषयीच्या कवितांमधून आपणास वाचायला मिळेल.

आजी
वेडपट होती, माझी आजी
तिच वेडेपण पिकलं मरणात
माझ्या कंजुष मामानं तिला ठेवलं, अडगळीच्या खोलीत गवतानं झाकून
सुकत गेली आजी, तडकली आणि बियाणं होऊन खिडकीबाहेर उडून गेली
एक बीज उगवलं आणि झाली माझी आई
येत राहिला, ऊन-वारा-पाऊस
आईच्या वेडेपणातून उगवून आलो मी
आता मी कसा जगू शकतो
कविता न लिहिता?
सोनेरी दातांच्या माकडांविषयी.
- के. सच्चिदानंदन (मल्याळम)

नाती
काही नाती समईसारखी तेवत राहातात
मंद उजेड देतात किंवा काही तुटल्या ताऱ्याप्रमाणं प्रकाशाची दीर्घ रेघ ओढून
अंधारात नेहमीसाठीच लुप्त होतात
तो जो आत्म्याचे नाते शोधण्यासाठी
जंगलात गेला, एकटा सिद्धार्थ होता,
नात्यांनी ज्यांना डंख दिला
त्यांना घरसुद्धा जंगलच वाटतं
आग होती तू म्हणालास,
चूल पेटली आहे मी म्हणाले,
नाही कोळसे जळत आहेत
चूल तर दाह सहन करत आहे
दूर बासरी वाजत आहे
तू म्हणालास, या सुरावटीत जादुई शक्ती आहे
मी म्हणाले, तिच्या काळजात घाव आहेत
ओठांनी स्पर्शताच, वेदना सजीव होत आहे.
 शरन मक्कड ( पंजाबी)

टेलिफोनवरती वडिलांचा आवाज
टेलिफोनवर थरथरतो वडिलांचा आवाज
दिव्याच्या फडफडत्या ज्योतीप्रमाणं
दुरातून येतो त्यांचा आवाज
चिंता आणि काळजी लपवणारा.
टेलिफोनच्या तारातून प्रवास करणारा
या आधुनिक यंत्रावर तडफडणारा आवाज.
ताऱ्यांप्रमाणं चमचमणारा
मिचमिच करणारा आवाज
किती सुखद आहे
वडिलांना टेलिफोनवरती ऐकणं,
अगदी सुरुवातीला कसा पकडला असेल,
त्यांनी टेलिफोन?
कडकडणाऱ्या विजेसारखा वडिलांचा आवाज
कसा अंग चोरतोय, टेलिफोनवर!
तयार होत फुटून जाणाऱ्या फुग्यांप्रमाणं
आवाज वडिलांचा ओठातल्या ओठात.
पकडून ठेवला असेल त्यांनी
टेलिफोन दोन्ही हातांनी खूप वेळ
आपल्या मुलांशी, खूप दूरवरून
टेलिफोनवर बोलणारे वडील...
नीलेश रघुवंशी (हिंदी)

आजोबा
म्हातारं एका वेळी चार चार भाकरी खातं
म्हातारं येणाऱ्या जाणाऱ्याकडं डोळे फाडून बघतं
म्हातारं कामवालीसोबत गुलुगुलू बोलतं
म्हातारं मुद्दाम मळकट कपडे घालतं
म्हातारं रात्रभर कानात शिरून खोकत रहातं
म्हाताऱ्यानं घराचा नरक बनवलाय नरक
‘मेलो रे... मेलो रे...’ म्हणतं,
पण म्हातारं मरत नाही काही.
ऐकता ऐकता, शेवटी एकदाचे मरून
गेले आजोबा, खूप चांगले होते
गिरणीवरून दळण आणायचे
कामवालीकडून चांगलं काम करून घ्यायचे
साधेपणानं राहायचे, मुलांना खाऊ घालायचे
ते होते तोवर घराला कुलूप लावावं लागलं नाही, कधी म्हातारं माणूस असलं पाहिजे घरात,
घराला आशीर्वाद मिळत राहातात
ऐकण्यासाठी आता जिवंत नाहीयत आजोबा.
विनय विश्वास (हिंदी)

घर
घर घरच असतं
सगळ्या असुविधांसह.
जिथं आई असते
तुमची वाट पाहणारी
म्हातारी, थकलेल्या डोळ्यांची
भुकेनं आणि वेदनेनं त्रस्त
आपल्या मुलाची वाट पाहणारी आई.
घर घरच असतं,
आपल्या सगळ्या
दुःखांसह चिमण्यांनाही
ज्या दिवसभर अनंत आकाशात
उडत राहातात,
फिरत राहातात, इथे-तिथे
आणि संध्याकाळी परतून येतात
घरट्यात, फांदीवर
कारण घर घरच असतं
सगळ्या प्रकारे
एक सुखद आपुलकी
आणि जिव्हाळा घेऊन.
केदार कानन (मैथिली)

आईचा खोटेपणा
मुलींशी मैत्री करशील
तर कान कापले जातील -
ती म्हणाली, चूकक करशील
तर देव डोळे फोडील -
ती बोलली, जेवायला मागशील
तर पोट फुगेल -
सांगितलं तिनं
तुला विकत घेतलं होतं मी
सूपभर दाण्यांच्या बदल्यात -
म्हणायची ती कितीतरी खोटं,
आई तू बोलत राहायचीस, त्या दिवसात
आता का बोलत नाहीस
एकही खोटं वाक्य?
आता तू करत नाहीस
का कुठलीच चूक?
की आता गरज नाहीय,
मला कोणत्याही खोटेपणाची?
की मोठ्या माणसांना खोटं बोलणं
हे सरकारी काम आहे,
असं वाटतं तुला?
जसं बंद केलं आईचं दूध
तसं का बंद केलंस तू खोटं बोलणं?
कुठून मिळणार आहे, इतका खोटेपणा
तुझ्या या मुलाला, तुझ्याशिवाय?
ज्ञानक्कूतन (तमीळ)

drprithvirajtaur@gmail.com
बातम्या आणखी आहेत...