आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुडत्या ट्रम्प यांचा पाय खोलात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकेकाळी चंद्रावर माणूस पाठविण्यापर्यंत प्रगती करणारी अमेरिका आता सार्वजनिक गृहकलहाच्या वाटेवर येऊन ठेपली आहे. ट्रम्प यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात माध्यमांनी आणि लोकशाहीवाद्यांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने अमेरिकेचे भवितव्य सांभाळण्यात अमेरिकेला यश आले असले तरी सामाजिक भवितव्य सुरक्षित राहील, असे ठामपणे म्हणता येत नाही.

जगभरातल्या माध्यमांचे लक्ष लागून असलेली अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आता अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. आठ नोव्हेंबरपर्यंत प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया जवळजवळ संपून नवा/नवी राष्ट्राध्यक्ष कोण असेल, याचे वेध सगळ्या जगाला लागलेले असतील. तसे ते प्रत्येक निवडणुकीच्या वेळत लागत असतात, परंतु या वेळी पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिलरी क्लिंटन या महिलेचा समावेश आहे. एरवी प्रगतीच्या गप्पा मारण्यात सदैव पुढे असणाऱ्या अमेरिकेने यापूर्वी कधीही महिलेला आपला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून दिलेले नाही. हिलरी क्लिंटन यांनी निवडणूक जिंकल्यास जगातल्या सर्वात बलाढ्य राष्ट्राची प्रमुख एक महिला असेल, ही बाब स्त्रीपुरुष समानतेचा आग्रह धरणाऱ्या पुरोगामी लोकांसाठी आणि स्त्रीवाद्यांसाठी निश्चितच सुखावह आहे. हा लेख प्रकाशित होईपर्यंत हिलरी क्लिंटन ही निवडणूक जिंकण्याच्या शक्यतेच्या बऱ्याच जवळ गेलेल्या असतील. त्यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांची ढासळत चाललेली प्रतिष्ठा हिलरींच्या विजयाचा मार्ग अधिक सोपा करीत आहे.

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात हिलरींना मिळणारे पाठबळ वाढत असले तरी, या वर्षाच्या सुरुवातीला रिपब्लिकन पक्षातर्फे नामांकन मिळविण्याऱ्या प्राथमिक सतरा उमेदवारांपैकी एक उमेदवार ट्रम्प होते. त्यांना कुणी फार गांभीर्याने घेईल असेही वाटत नव्हते. त्यांच्या सभेसाठी झालेली गर्दी ही चक्क पैसे देऊन जमा करण्यात आली होती. सभेला येण्यासाठी लोकांना पैसे देणे, हे भारतात जास्त विशेष मानले जात नसले, तरी अमेरिकन जनतेसाठी हे प्रकरण नवीन होते. ही प्रतिक्रिया अर्थात प्रारंभीची होती. जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी ट्रम्प यांच्या भाषणाला गर्दी होऊ लागली. या गर्दीत बहुतकरून भरणा होता तो अमेरिकतल्या बहुसंख्य गोऱ्या ख्रिश्चन लोकांचा. ट्रम्प यांच्या भाषणाचे मुद्दे मर्यादित असले तरी ते लोकप्रिय राजकारणाच्या दृष्टिकोनातून प्रभावी होते.

अमेरिकेने चीनबरोबर केलेले व्यापारी करार हे चीनच्या जास्त फायद्याचे आहेत, गेली आठ वर्षे अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष असलेले डेमोक्रॅटिक ओबामा अमेरिकेला दुबळे बनवित आहेत, आणि अमेरिकेला इस्लामी अतिरेक्यांपासून धोका असून त्यासाठी अतिरेक्यांविरुद्ध अमानवी पद्धतींचा अवलंब करून त्यांच्यासाठी छळछावण्या बनविल्या पाहिजेत, हे ट्रम्प यांच्या प्रचाराचे मुद्दे होते. याशिवाय अमेरिकेत येणारे मेक्सिकन निर्वासित अमेरिकेसाठी धोकादायक असून आपण निवडून आल्यास मेक्सिकन लोकांना रोखण्यासाठी मेक्सिको आणि अमेरिकेच्या दरम्यानच्या दोन हजार मैल सीमारेषेवर भव्य भिंत उभी करण्यात येईल. या भिंतीसाठी पैसे मेक्सिकोकडून घेण्यात येतील, असेही आश्वासन ट्रम्प यांनी दिले.

थोडक्यात, सवंग लोकप्रियतेच्या राजकारणातले नेते भीतीचा आणि दुस्वासाचा जो जो बागुलबुवा तयार करतात तो उभा करण्यात ट्रम्प यांना पूर्णतः यश आले. या घोषणा आणि ट्रम्प यांची एकूण आश्वासने ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या गोंडस वाक्यात व्यवस्थित गुंडाळण्यात आली. पाठोपाठ ट्रम्प यांचे झंझावाती प्रचार दौरे सुरू झाले. मग हे ट्रम्पमहाशय जिथे जिथे जातील, तिथे तिथे त्यांच्या चाहत्यांची गर्दी होऊ लागली. गर्दीतले बहुतांशी लोक हे वर्चस्ववादी गोरे लोक होते, जे मेक्सिकन निर्वासितांविरोधात, इस्लामिक अतिरेक्यांच्या विरोधात आणि पुरोगाम्यांच्या विरोधात विखारी घोषणा देत असत. याशिवाय सरसकट सगळ्याच विदेशी लोकांविरोधात, सरसकट सर्व मुस्लिमांविरोधात, आणि सरसकट सर्व पुरोगाम्यांविरोधात ही घोषणा देत असत. ट्रम्प यांच्या सभेला आलेल्या त्यांच्या चाहत्यांचा उन्माद इतका टोकाचा होता की, कित्येकदा सुरक्षारक्षकांना मध्यस्थी करावी लागे. ट्रम्प यांच्या सभेत त्यांना विरोध करणाऱ्या एखाद्या माणसाने घोषणा दिल्यास ट्रम्प स्वतः भाषण थांबवून त्या माणसाचा भर सभेत पाणउतारा करीत. याशिवाय असा विरोध करणाऱ्या लोकांना क्वचित ठिकाणी ट्रम्पसमर्थक मारहाणही करीत आणि अशी मारहाण होत असताना लोकांना शांततेचे आवाहन करण्याऐवजी ट्रम्प अजूनच उत्तेजन देत. या समोरासमोरच्या भांडणांव्यतिरिक्त सोशल मीडियामध्येही ट्रम्पसमर्थकांनी आपले आक्रमक धोरण व्यापक रीतीने राबवले. फेसबुकवर प्रसिद्ध झालेल्या दैनिकांच्या बातम्यांवर त्या बातमीच्या वार्ताहरास गलिच्छ शिव्या देणे, धमक्या देणे, ‘मेक्सिकोला निघून जा’ असे सांगणे ही काही महत्त्वाची लक्षणे, सर्व ट्रम्पसमर्थकांमध्ये सारखीच दिसून येत होती. एखाद्या महत्त्वाच्या मुद्याला उत्तर देता न आल्यास विषय भरकवटत नेऊन त्या मुद्याचे महत्त्व कमी होईल, असे बघणे किंवा मुळ मुद्दाच चर्चेतून निसटून जाईल, असे वागणे ही सार्वजनिक उपद्रवाची रणनीती ट्रम्पसमर्थकांनी व्यवस्थित राबवली ज्याचा उपयोग अर्थात हिलरी क्लिंटन यांच्या प्रचाराचा रोख कमी करण्यास झाला.

ऑगस्ट महिन्याच्या मध्यानंतर ही परिस्थिती मात्र बरीचशी बदलू लागली. ट्रम्प यांनी उद्योजक म्हणून केलेले कंपन्यांचे नुकसान, त्यांच्या व्यवहारातील खोटेपणा, त्यांच्या मालकीच्या कंपन्यांनी केलेली गिऱ्हाईकांची फसवणूक आणि लुबाडणूक अशा निरनिराळ्या बातम्या माध्यमांमधून येऊ लागल्या. सप्टेंबर संपेपर्यंत ट्रम्प यांनी अमेरिकन सरकारचे कर चुकविण्यासाठी शोधलेल्या निरनिराळ्या पळवाटा आणि त्यांनी सरकारची केलेली फसवणूक यासंबंधीच्या बातम्या झळकू लागल्या. यानंतर ट्रम्प यांचा प्रभाव अंशतः ओसरण्याची सुरुवात झाली. यात शेवटचा फटका बसला तो ट्रम्प यांच्या मित्रांशी केलेल्या एका खाजगी संभाषणाचा व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर. या व्हिडीओमध्ये ट्रम्प हे महिलांना भोगवस्तू मानून त्यांच्याविषयी अतिशय अर्वाच्य भाषेत संभाषण करताना ऐकू आले. या स्कँडलनंतर ट्रम्प यांच्या लोकप्रियतेचा पारा वेगाने खाली यायला सुरुवात झाली. इतका की, त्यांच्याच पक्षातल्या काही लोकांनी ट्रम्प यांचे समर्थन काढून घेतले, तर अनेकांनी त्यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, अशी मागणी केली. ट्रम्प यांचे एकूण वागणे आणि बोलणे पहाता अमेरिकेकडे असलेल्या अण्वस्त्रांचे बटन या संभाव्य राष्ट्राध्यक्षाकडे असेल याची कल्पनाही करवत नाही, असे सुरक्षाक्षेत्रातले काही जाणकार म्हणू लागले, तरीही ट्रम्प यांच्या चिथावणीखोर आणि कोपिष्ट वागणुकीत तसूभरही फरक पडला नाही. आपल्या हातातून अशी विजयश्री निसटून जात असताना पाहून मग ट्रम्प यांनी आपला शेवटचा रडीचा डाव गायला सुरुवात केली आहे. माध्यमे आपल्या विरोधात असून सतत आपल्या वाईटावर टपलेली आहेत, अमेरिकेची निवडणूक यंत्रणा भ्रष्ट असून एक व्यापक यंत्रणा आपल्याला मिळणारी मते फिरविण्याच्या मागे आहे, असे पराकोटीची प्रश्नचिन्हं निर्माण करणारे दावे करायला त्यांनी सुरुवात केली आहे. या दाव्यांमध्ये अर्थात कितपत तथ्य आहे, ते यथाकवकाश समोर येईलच, पण विश्वासर्हता गमाविल्यानंतर ट्रम्प यांच्या समर्थकांची संख्या कमी झाली आहे. समर्थकांचा आक्रस्ताळेपणा, उपद्रवमूल्य आणि हिंसक वागणे कमी झाले नसले तरी, प्रत्येक स्तरांतल्या लहानसहान घटकांनी ट्रम्प यांना मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याने, त्यांच्या विजयाची शक्यता हिलरींपेक्षा बरीच कमी आहे. आठ नोव्हेंबरच्या अंतिम मतदानानंतर हिलरींचे राष्ट्राध्यक्ष बनणे जवळजवळ पक्के झाले असले, तरी ट्रम्प यांच्या पराजयानंतर त्यांच्या भूमिकेत आणि वागण्याबोलण्यात सौहार्द वा सहानुभूती येण्याची कुठलीही शक्यता नाही. याहूनही मोठा प्रश्न आहे, तो त्यांच्या समर्थकांचा. या वर्चस्ववादी विचारांचे संक्रमित हिंसक लोक कसे वागतील, यावर आजतरी कुणी ठामपणे काही बोलू शकत नाही.

एकेकाळी चंद्रावर माणूस पाठविण्यापर्यंत प्रगती करणारी अमेरिका आता सार्वजनिक गृहकलहाच्या वाटेवर येऊन ठेपली आहे. ट्रम्प यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात माध्यमांनी आणि लोकशाहीवाद्यांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने अमेरिकेचे भवितव्य सांभाळण्यात अमेरिकेला यश आले असले तरी सामाजिक भवितव्य सुरक्षित राहील, असे ठामपणे म्हणता येत नाही. लोकशाहीत अंतिम निर्णय हा जनतेचा असतो, पण या निर्णयक्षमतेचे पालनपोषण आणि संगोपनाची जबाबदारी ही सर्वस्वी लोकशाहीचा चौथा खांब समजल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांची असते. या अटीतटीच्या लढाईत सत्ता चुकीच्या हातात जाण्यापासून रोखण्यात अमेरिकन माध्यमांना यश आले आहे. सर्वच देशातल्या माध्यमांना ते शक्य होतेच असे नाही.

rahulbaba@gmail.com
बातम्या आणखी आहेत...