आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यासमुनींची वचनपूर्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारत हा केवळ भारतीय संस्कृतीचा श्रेष्ठ वारसा सांगणारा, भारतीयांचा अभिमान सुखावणारा बृहद््ग्रंथ नव्हे, तर मानवी वृत्ती-प्रवृत्तींचे प्रच्छन्न दर्शन घडवणारे हे एक कालातीत महाकाव्य आहे. ते अजूनही कितीतरी अंगांनी अभ्यासता येते, कितीतरी कलाप्रकारांनी समजून घेता येते. पिढ्यान््पिढ्या जनमानसात रुजलेल्या या महाकाव्यातील सामाजिक आशय अधोरेखित करणारी ही विशेष लेखमाला.

भरतवंशातील विशेष अभिजाततेचे निरूपण प्रस्तुत इतिहासात असल्यामुळेच त्याला ‘महाभारत’ ही संज्ञा प्राप्त झाली आहे. महाभारताला कुणी काव्य, तर कुणी आख्यान असेही संबोधलेले आहे. या ग्रंथाची रचना करायला महर्षी व्यासांना तीन वर्षे लागली. अंगी प्रचंड सामर्थ्य असल्यामुळे नित्य शुचिर्भूत व जागरूक राहून चित्त स्थैर्याच्या बळावर त्यांनी हा संकल्प पुरा केला. हे आख्यान खरोखरच अद््भुत आहे. अर्जुनाचा (कुंती पुत्र) पणतू (अर्जुन-अभिमन्यू-परिक्षित-जनमेजय) जनमेजय राजा, सर्पसत्र करण्याच्या तयारीत आहे, हे जाणून महर्षी व्यास अचानक अवतीर्ण झाले. (व्यास व भीष्म हे एकाच पिढीतले) जनमेजय राजा अत्यंत आनंदित झाला. "आपले पूर्वज कौरव, पांडव इतके ज्ञानी व पुण्यवान असताना त्यांच्यात जीवघेणा कलह का झाला व तुमच्यासारखा पुण्यात्मा महर्षी जिवंत असताना हे व्यासमुने! ही लढाई झालीच कशी?' असा थेट प्रश्न जनमेजय राजाने व्यासमुनींना विचारला. त्या वेळी व्यासशिष्य वैशंपायन तिथे उपस्थित होते. महर्षी व्यासांनी ‘हे वैशंपायना! मी रचलेला ‘जय’ नावाचा इतिहास तू जाणतोसच. यज्ञकर्मात मध्यंतराच्या वेळात तू संपूर्ण कथा या राजास कथन कर.’ आणि "हे जनमेजया, विचित्रवीर्याच्या (शंतनू-सत्यवतीचा पुत्र) मृत्यूनंतर त्याच्या अंबिका व अंबालिका या तरुण राण्यांना पुत्रप्राप्ती करून देण्याची आज्ञा माझ्या मातेने (सत्यवती) मला केल्यामुळे राण्यांच्या उदरी धृतराष्ट्र व पांडू हे नियोग विधीने जन्माला आले. मी त्रिकालज्ञानी असलो तरी नियतीच्या अधिकाराविरुद्ध जाण्याचे सामर्थ्य माझ्याजवळही नाही.' एवढे बोलून व्यास अंतर्धान पावले. यापुढील सूत्रे अर्थातच व्यासांच्या चार शिष्यांपैकी (वैशंपायन, सुमंतु, जैमिनी, सौत्री) वैशंपायनांकडे आली. ‘हे भरतर्षभा! (म्हणजे भरतवंशीय जनमेजया) धर्म-अर्थ-काम-मोक्ष या चार पुरुषार्थांची प्राप्ती सर्वांनी करून घ्यावी म्हणून हा ग्रंथ व्यासांनी रचला. ‘जे जे इतरत्र आढळेल ते ते सर्व या ग्रंथात आहेच. जर या ग्रंथात काही आढळले नाही तर ते अस्तित्वातच नाही.’ (असे तू समज) अशी या ग्रंथाची महती आहे. व्यासोच्छिष्टम् जगत सर्वम्. सर्व साहित्य (वाङ‌्मय) व्यासांनी उष्टे केलेले आहे. ब्रह्मांडातील सर्व विषयांना त्यांनी स्पर्श केलेला, असा त्याचा अर्थ. या विधानाची प्रचिती घ्यावयाची तर एक लक्ष श्लोक असलेला हा ग्रंथ अभ्यासायला हवा. हा मूळ ग्रंथ संस्कृत भाषेत असला तरी भारतातल्या बहुतेक बोलीभाषेतही त्याची भाषांतरे उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात तर सतत ६० वर्षांहून अधिक काळ संशोधन करून अनेक विद्वानांनी ‘संशोधित’ (प्रक्षिप्त भाग वगळून) किंवा भांडारकर आवृत्ती उपलब्ध करून दिली आहे. महाभारतासंबंधी संशोधन आजही सुरू आहे. महाभारताचा काळ निश्चित करणे हे इतिहासातील एक मोठे आव्हान आहे. महाभारतात व्यासांनी ‘आकाशदर्शन’ घडविलेले आहे. भीष्मपर्वातील तिसऱ्या अध्यायात ‘अत्यंत भयानक असा धूमकेतू पुष्य नक्षत्र व्यापून राहिलेला आहे. आणि तो महाग्रह दोन्ही सैन्यांचे (कौरव-पांडव सैन्य समोरासमोर कुरुक्षेत्री जमले आहे.) भीषण अकल्याण करणार आहे. मघा नक्षत्रात मंगळ वक्री आहे. तसेच श्रवण नक्षत्रात बृहस्पती वक्री आहे. सूर्यपुत्र शनीकडून भग नक्षत्रावर (पूर्वा किंवा उत्तरा फाल्गुनी) आक्रमण होऊन त्याला पीडा होत आहे. शुक्र पूर्वाभाद्रपदा नक्षत्राला प्रदक्षिणा घालून शोभत आहे आणि परिघउपग्रहास उतरा भाद्रपदा नक्षत्रावर आक्रमण करण्याच्या बेतात आहे…

ही वर्णने वाचताना अंतरिक्षातही महाभारतच घडत असावे, असे वाटते. पंचागकर्ते या वर्णनांवरून ठोकताळे बांधून, गणिते करून असे ‘आकाश’ नक्की कधी दिसू शकले असेल, याचा गणिताधारित तर्क करतात. काही अभ्यासकांनी तर महाभारताच्या युद्धाची तारीखही नक्की केली आहे. एखाद्या विद्वानाने या तारखेचे अॅफिडेव्हिट केले किंवा पेटंट घेतले, तरी मला आश्चर्य वाटणार नाही. मुद्दा असा की, असा अभ्यास करणारे महाभारत हे एक थोतांड, काल्पनिक काव्य आहे, असे मानत नाहीत. केवळ गणित करून विद्वान थांबलेले नाहीत, तर ‘महाभारत’ घडलेल्या जागांचे उत्खनन करून काही ठोस पुरावे सादर करण्यासाठी ते धडपडत असतात. असो.

आजही भारतातील प्रत्येक गावात महाभारतावर आधारित कथा, कीर्तने, व्याख्याने, चालू असतात. दूरदर्शन मालिका सुरू असतात. सिनेमे, नाटके, फार्स, संगीतिका, नृत्य नाटिका सुरू असतात. महाराष्ट्रात तर किमान चाळीस नाटकांचे कथा विषय हे महाभारतावर आधारित आहेत. देशभरातील वर्तमानपत्रात महाभारतातील दाखले, व्यक्तिरेखांचे उल्लेख वारंवार होत असतात. कुणाला भीष्मपितामह (लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे) म्हटले जाते. द्रोणाचार्यांच्या नावाने क्रीडा पुरस्कार दिले जातात. खेळाडूंना ‘अर्जुन’ अॅवॉर्ड देऊन गौरवले जाते. एकलव्याच्या नावाने शाळा-वसतिगृहे बांधली जातात. कपटी कारस्थाने करणाऱ्याला धृतराष्ट्र म्हटले जाते. त्यागाचे प्रतीक म्हणून गांधारीला गौरवले जाते. द्रौपदी वस्त्रहरण या कथेने आजही भारतभर अंगावर शहारे येतात. अभिमन्यूच्या चक्रव्यूहाची कथा आजही रोमांच उभे करते. कर्णजन्म, कृष्णजन्म, सत्यवती, कृपी, द्रौपदी, कृपाचार्य, द्रोणाचार्य, धृष्टद्युम्न यांचे अयोनिज जन्म. त्यांचा अर्थ लावणे एका सामाजिक अभ्यासाचा विषय बनतो. पांडवांचा राजसूय यज्ञ आजच्या सत्ताधाऱ्यांना (दिल्ली-भाजपा कार्यालयात) करावासा वाटतो. ‘अर्थस्य पुरुषो दास’; ‘इंद्राय स्वाहा-तक्षकाय स्वाहा!’ ‘राजा कालस्य कारणम’ इ. महाभारतातील चिरकाल वचनांचा वारंवार पुनरुच्चार होत असतो. नेते आपापसात भांडू लागले की ‘सुंदोपसुंदी’ सुरू झाली, अशी शीर्षके देऊन बातम्या रंगविल्या जातात. कुणाला अर्जुन म्हणून गौरवले जाते, तर कुणी पराक्रमी महारथी असूनही शिखंडीला ‘हिजडा’ म्हणतात. कुंतीच्या कानीन पुत्र कर्णाला मंदिरात स्थान दिले गेले आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधी आंदोलन काळात ‘जैतापूरचे महाभारत’ हा शब्दप्रयोग रूढ झाला होता. महाभारताचा परिणाम व प्रभाव संपूर्ण भारतभर पसरलेला आहे. कौरव-पांडवांच्या जीवनाभोवती शेकडो कथा गुंफलेल्या आहेत. शकुंतलेचा जन्म हा विश्वामित्र मेनकेच्या एका वर्षाच्या लिव इन रिलेशनशिपचा प्रसाद होता. श्रीकृष्णाने रुक्मिणीला लग्नाच्या दिवशी देवदर्शनाला गेली असता पळवून नेले. (तिच्या प्रेमपत्राचा आधार) श्रीकृष्णाच्या पराक्रमावर खूश होऊन जांबुवंत आपल्या कन्या कृष्णाला अर्पण करतो. तर सत्राजित सत्यभामेसह तिच्या बहिणी. कृष्ण मामा असलेल्या कंसाला मारतो, आत्तेभाऊ शिशुपालाचे मस्तक सुदर्शनचक्राने उडवितो. भीम दु:शासनाचे रक्त पितो. गांधारीचे किंवा धृतराष्ट्राचे शंभर पुत्र भीमाकडून मारले जातात. घरातील शंभर विधवा सुनांचे आक्रोश धृतराष्ट्र-गांधारीला ऐकावे लागतात. महापराक्रमी परशुरामाचा शिष्य, बृहस्पतीकडून ज्ञान मिळवलेल्या प्रस्वाप अस्त्राचा एकमेव वीर गंगापुत्र भीष्माला भर सभेत शिशुपाल भ्याड व षंढ म्हणतो. कौरव-पांडवांच्या महायुद्धातील किंवा त्या निमित्ताने येणाऱ्या या कथा आजही अद‌्भुताने भरलेल्या असूनही जिवंत-रोचक वाटतात. सर्वमान्य समज असा आहे की, श्रीकृष्ण शिष्टाई हा हे युद्ध होऊ नये, म्हणून केलेला अखेरचा प्रयत्न होता. धर्मराजाने सख्य नांदावे, शम करावा असा आटोकाट प्रयत्न केला. द्रुपदराजाचा ब्राह्मण दूत धृतराष्ट्राकडे प्रथम गेला. ‘पांडवांचे इंद्रप्रस्थ द्या, सख्य करा, संहार टाळा, नाहीतर युद्धाला तयार व्हा. अर्जुनाचे भक्ष्य व्हा!’ असा संदेश त्याने दिला. धृतराष्ट्राने संजयाला पाठवून पांडवांच्या धर्मवृत्तीचे, धर्मपरायणतेचे कौतुक करून क्षत्रियनाश टाळण्यासाठी पांडवांनी भिक्षापात्र घेऊन फिरावे, (दुर्योधन दुष्टबुद्धी आहे) असा निरोप दिला. धर्मराजाने अर्धे राज्य देत नसाल तर पाच भावांना पाच गावे द्यावी, हा निरोप देऊन युद्ध टाळण्याचा, सख्य करण्याचा, समेटाचा प्रयत्न केला. त्यानंतर ‘मी हस्तिनापूरला स्वत: जातो’ असे श्रीकृष्णाने जाहीर केले. पांडवांची संमती नंतर मिळाली. द्रौपदीने हतवीर्य पांडवांची निर्भर्त्सना करून ‘माझे बंधू, पिता, पुत्र, वीर अभिमन्यूला नेता करून युद्ध करतील, असे कृष्णादेखत बजावले. रज:स्वला अवस्थेत असताना झालेल्या बेअब्रूची आठवण कृष्णाला करून दिली व दु:शासनाचा तुटलेला हात धुळीत पडलेला पाहण्याची इच्छा व्यक्त केली. कृष्णाने उत्तम नियोजन करून दुर्योधनाच्या बाजूने लढण्यासाठी कृतवर्म्याला एक अक्षौहिणी सैन्यासह हस्तिनापूरला अगोदरच पाठवले होते. स्वत: शस्त्रसज्ज रथ घेऊन सशस्त्र सात्यकीसह कृष्ण कौरवांच्या दरबारात गेला. परशुराम, नारद, कण्व इ. महर्षींसमोर ‘इंद्रप्रस्थ द्या, क्षत्रियनाश टाळा.’ असे सांगून धृतराष्ट्राकडून स्वत: असमर्थ असल्याचे वदवून घेतले. धृतराष्ट्राने दुर्योधनाची समस्त राजांसमोर ‘दुष्टबुद्धी’, ‘मंदबुद्धी’ म्हणून निर्भर्त्सना केली. दुर्योधनाचा श्रीकृष्णाला बंदी करण्याचा डाव सात्यकीने ओळखून कौरव सभेला कृतवर्म्याच्या सशस्त्र सैन्याने वेढून टाकले. कृष्णाने ‘हे धृतराष्ट्रा, तू दुर्योधनाला मला बंदी करण्याची आज्ञा देच. मग बघ मी तुझ्यासमक्ष त्यालाच बंदी करून पांडवांसमोर उभा करतो.' असा सज्जड दम भरून संपूर्ण सभागृहात विजा चमकल्याचाच सर्वांना भास झाला. श्रीकृष्ण जोरजोरात हसत सभागृहातून कृतवर्मा व सात्यकीला दोन्ही बाजूला घेऊन चालू लागला. धृतराष्ट्राने श्रीकृष्णाचे हे विश्वदर्शनी तेजस्वी रूप पाहण्यासाठी दिव्य दृष्टीची मागणी केली. श्रीकृष्णाने त्याला अदृश्य दिव्य दृष्टीचा वर दिला. मोठ्या रूबाबात कृष्ण बाहेर पडून दारुकाने सज्ज केलेल्या रथात बसून प्रथम कुंतीचे दर्शन घेतले. तेथून परतताना कर्णाला रथात घेऊन त्याच्या जन्माची गोष्ट त्याला सांगून तू ज्येष्ठ बंधू म्हणून राज्याभिषेक करून घेण्याचा सल्ला दिला. द्रौपदीवरचा सहाव्या भागाचा हक्कही अधोरेखित केला व धृतराष्ट्राला निरोप दिला- ‘हा मार्गशीर्ष महिना आहे. आजपासून सातव्या दिवशी अमावास्येला कुरुक्षेत्रावर लढाई सुरू होईल.’

श्रीकृष्णाने द्रौपदीला वचन दिल्याप्रमाणे युद्ध हाच पर्याय निवडला. समेट झालाच नाही. श्रीकृष्ण शिष्टाई असफल होऊन सात दिवसांचा काल संपला. दोन्हीकडच्या सज्ज सेनांचे अवलोकन करून व्यासमहर्षी शोकग्रस्त पुत्र धृतराष्ट्राला भेटण्यासाठी अवतीर्ण झाले. कृष्णशिष्टाईच्या दिवशी व्यास उपस्थित नव्हते. एकांतात धृतराष्ट्राला म्हणाले - ‘विपरीत काळ प्राप्त झाला आहे. हे प्रजानाथा, दुर्योधन पुत्राच्या रूपाने काळच तुझ्या पोटी जन्माला आला आहे. वेदात वधाची प्रशंसा केलेली नाही. कोणत्याही प्रकारे वध हा हितकारक नाही. संकट नसतानाही (काळाच्या प्रेरणेने) तू भलत्याच मार्गाला लागलेला आहेस. तुझ्या अतिरेकामुळे तुझ्या धर्माचा लोप झालेला आहे. तुझ्या पुत्रांना धर्म समजावून दे. युद्धाचा कलंक तुला लागलाच आहे. यश, धर्म, कीर्ती यांचे रक्षण केलेस तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल. अजूनही पांडवांना राज्य मिळू दे. कौरवांना शांती लाभू दे. चर्चेने समेट करून किंवा काही देऊन मिळवलेला विजय ‘श्रेष्ठ’ असतो. भेद-फंदफितुरी करून प्राप्त झालेला विजय ‘मध्यम’ समजला जातो. युद्ध करून मिळालेला विजय हा अत्यंत ‘अधम’ असतो. विनाश त्यालाच म्हणतात. सैन्य अधिक असले म्हणजे विजय प्राप्त होतो, असे नव्हे.' युद्ध टाळण्याचा अखेरचा प्रयत्न कृष्णाने नव्हे तर व्यासानी केला होता, हे स्पष्टपणे सिद्ध होते.

याचाही धृतराष्ट्रावर काहीच परिणाम झाला नाही. त्याच्या चेहऱ्यावरचा खेद व शोक अधिकच गडद झाला. "तुझे पुत्र व इतर राजे युद्धात परस्परांचा संहार करतील. तुला काळच प्रेरणा देत असून तू खेद किंवा शोक करू नकोस. तुला हा संग्राम पाहण्याची इच्छा असेल तर हे पुत्रा, तुला मी दिव्य दृष्टी (कृष्णानेही दिली होती.) देईन. त्यायोगे तू युद्ध पाहू शकशील.’

"हे व्यासमहर्षी, पित्या! हा संहार पाहणे मला रुचणार नाही. परंतु तुझ्या तेजामुळे या युद्धाचे संपूर्ण वर्णन ऐकायला मिळेल, अशी व्यवस्था कर.' व्यासांना काय अशक्य? संजयाला युद्ध वार्ताहर बनवला. ‘राजा! हा संजय तुला युद्धाचे कथन करील. युद्धातील सर्व गोष्टी त्याला दिसतील. अप्रकट किंवा प्रकट, दिवसा वा रात्री, एवढेच नव्हे व्यक्तींचे मनोव्यापारही संजयला समजतील. त्याला शस्त्र व अस्त्रांमुळे इजा होणार नाही. कोणतीही वेदना होणार नाही. हा गल्वगण पुत्र (संजय) स्वत: जिवंत राहील. जिथे धर्म आहे तिथे जय ठरलेला आहे.’

‘हे भरतश्रेष्ठा - धृतराष्ट्रा! कौरवांची आणि पांडवांची कीर्ती मी स्वत: सर्वत्र पसरवीन.'
या वचनाची पूर्तता म्हणजेच व्यासांचा ग्रंथ महाभारत होय. सबंध भारतात महाभारताइतका दुसरा लोकप्रिय ग्रंथ नाही. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी ‘समाजशास्त्रीय शहाणपणाचा खजिना’, असे महाभारताचे यथार्थ वर्णन केलेले आहे.

patwardhanraja@hotmail.com
(लेखक महाभारताचे व्यासंगी अभ्यासक असून पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेचे माजी नियामक मंडळ सदस्य आहेत.)

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...