आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article In Rasik By Saurabh Mahadik About Monsoon

ऋतू हिरवा (निसर्ग-रंग)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलपाखरांचा फडफडाट, शिंजीर पक्ष्यांची लगबग, बेडकांचा नाच, गवतांमध्ये घुटमळणारे हत्ती, हरीण आणि गव्यांचे कळप... डोंगरदऱ्यांतले तुमच्या गालांना स्पर्श करणारे ढग हे सगळं अनुभवण्यासाठी हिरव्या ऋतूसारखा दुसरा क्षण नाही...
पावसाळ्यातला निसर्ग, वन्यजीवन मनाला जास्त भुरळ पाडते. पावसाळ्यात माती न्हातीधुती होते. नवीन पालवी लेऊन झाडं जमिनीवर छत्री धरतात. छोट्या-छोट्या वनस्पती जागोजागी भाऊगर्दी करतात. घाणेरी, लीयासारख्या वनस्पती तरारून फुलतात. किड्यांसाठी जागोजागी पिवळ्या-लाल फुलांचं आमिष तयार होतं. फुलपाखरांचा त्यावर विशेष वावर... दुसरं फुलपाखरू येण्यापूर्वी फुलातला मधुरस मटकवायचा, नाहीतर मधुरसाच्या शोधात दुसऱ्या फुलांचा शोध घ्यायचा. शिंजीर पक्ष्यांची हीच लगबग. प्रत्येक फुलात चोच बुडवून त्यात मकरंद आहे की नाही, ते बघायचं. मकरंद मिळाला तर तो अधाशासारखा प्यायचा आणि नसलाच तर त्याच आनंदी वृत्तीने मकरंदाचा शोध घ्यायचा आणि दुसरं फूल गाठायचं...

पावसाळ्यात पाण्याजवळ चालताना पावलांमागे पाच-पन्नास बेडूक उड्या मारताना दिसतात. या बेडकांचे पण किती रंग आणि किती तऱ्हा. भरपूर पाणी, खाण्यासाठी पुष्कळ किडे, प्रेम करण्यासाठी आणि प्रेमगीत आळवण्यासाठी इतकं ‘रोमॅण्टीक’ ढगाळ वातावरण असल्यावर, त्यांना तरी दुसरं काय हवं असणार? बेडकांची प्रजा वाढण्यासाठी पाण्यात अन्नाचा पुरेसा साठा असतोच! बेडकांच्या याच आशेवर विविध बगळे, खंड्या, साप हेही अवलंबून असतात. या प्रजेचा पोटपूजेचा तो एक मुख्य आधारच असतो.

हत्ती, हरण, गवे यांसाठी गवताचं पीक मुबलक प्रमाणात आलेलं असतं, ते त्यावर सुखेनैव चरतात. त्यांच्या पायात बाळं घुटमळताना दिसतात. त्यांच्या टुकटुकीत नजरेला दिसणारं सारं जंगल काही उड्यांमध्ये पार करायचं, त्याची मजा चाखायची, याची त्यांना कोण घाई असते. पण त्यांना जवळ ठेवायची पालकांची धडपड. त्यांनाही पिलांची मस्ती, आनंद बघून तृप्त वाटत असेल, नाही?

हे सर्व अनुभवायचं असेल तर पावसाळ्यासारखा ऋतूच यावा लागतो. शिवाय विविध प्रकारच्या जंगलांमध्ये निसर्गामध्ये डोळे व कान उघडे ठेवून भटकंती करावी लागते. हा निसर्गानुभव व वन्यजीवनाचा आनंद घेण्यासाठी लांब जायचीही गरज नसते. आसपासच्या जंगलामध्येही ती अनुभवता येतो. अर्थात, ज्यांना दूरची ठिकाणं खुणावत असतात, ते या काळात मुंबईतील बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कान्हेरी ट्रेल करू शकतात. पावसाळ्यात कान्हेरी किंवा शिलोंद्याला भटकताना आपल्याला अनेक वनस्पती, रंगीबेरंगी कीटक, फुलपाखरे तर दिसतातच; परंतु रस्त्याच्या दुतर्फा ससे, माकडे, स्पॉटेड डिअर्स, सांबर असे विविध प्रकारचे प्राणी तसेच दयाळ, भारद्वाज, मैना, लालबुड्या बुलबुल असे अनेक पक्षीही दिसतात. तसेच कान्हेरी टेकड्यांवरून दिसणारे, चोहोबाजूला पसरलेले डोंगर व त्यावरील हिरवाई व वाहणारे निर्झर आपल्याला बालकवींच्या ‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे!!’ या ओळींची आठवण करून देतात.

पावसाळ्यात अनुभवण्यासारखे आणखी एक ठिकाण म्हणजे, ठाणे, घोडबंदरजवळील ‘नागला ब्लॉक’. नागल्याला मुंबईतील फुलपाखरांचे, विविधरंगी कीटकांचे, औषधी वनस्पतींचे माहेरघर म्हटले जाते. इथे फुलपाखरांच्या जवळपास १५७ जाती आपल्याला आढळतात. तसेच कीटकांच्या व औषधी वनस्पतींच्या असंख्य जाती आढळतात. पावसाळ्यात इथे विविध जातींच्या अळंब्या, ऑर्किड्स आणि रानहळदीसारख्या वनस्पती आढळतात.

कर्जतजवळील ‘कोंडाणा लेणी’ ही आपल्या निसर्गरम्यतेमुळे व तिथल्या डोंगरावरून पावसाळ्यात कोसळणाऱ्या धबधब्यासाठी प्रसिद्ध आहेत. रिमझिम बरसणारा पाऊस, डोंगरमाथ्यावर पसरलेला हिरवाकंच निसर्ग, आजूबाजूला शेतातून भाताची लावणी करणाऱ्या स्त्रिया, मध्येच वाटेवरून चालताना दिसणारी रंगीबेरंगी रानफुलांची नक्षी, कळलावीसारखी फुलझाडे व समोरून दिसणारा राजमाचीचा कडा व त्यावर पावसामुळे दाटून येणारे ढग व धुके आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. या व अशा निसर्गरम्य ठिकाणांना व जंगलांना पावसाळ्यात भेटी दिल्याने पावसाळ्यातला जंगलाचा त्याचबरोबर निसर्गात होणाऱ्या हळुवार बदलांचा मागोवा व आनंद जोडीने घेता येतो. निसर्गाबद्दलच्या जाणिवाही समृद्ध होतात. प्रत्येक पावसाळ्यात भटकंतीत निसर्गप्रेमींना निसर्गातील अनेक हिरव्या गुपितांचा ठावठिकाणाही लागतो...

saurabh.nisarg09@gmail.com