आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औषधसाक्षरतेची बाराखडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘औषधभान’ हे प्रा. मंजिरी घरत यांचे पुस्तक वाचताना ‘औषधांचा वापर सजग आणि शिस्तबद्ध होण्यासाठी लागणारी औषधसाक्षरता...’ या उपशीर्षकाचे महत्त्व निश्चितच अधोरेखित होते. ‘लोकसत्ता’ दैनिकात प्रसिद्ध झालेल्या ‘औषधभान’ सदरातील लेखमालेचे हे पुस्तक रूपांतर आहे. लेखिकेची सोपी, सुटसुटीत भाषाशैली व वाचकांच्या जिव्हाळ्याचे विषय, मनातल्या शंकांचे काही प्रमाणात निरसन, योग्य मार्गदर्शन, भरपूर उपयुक्त माहिती या पुस्तकाच्या जमेच्या बाजू आहेत.

औषधे येती घरा, औषधे : जेवणाआधी की नंतर, अँटिबायोटिक्स : समजून घेऊया, द्रव औषध घेताना : मोजून-मापून, आयड्रॉप्स वापरू डोळसपणे!, वेदनाशामके : वापरू जरा जपूनच!, सीने की जलन, ‘पिल्स’: वापर-गैरवापर, कवित्व जेनेरिकचे, औषधसाक्षरता धावता आलेख ही काही लेखांची शीर्षके वाचली तरी पुस्तकाचा आवाका लक्षात येतो. मधुमेह, ब्लडप्रेशर, कोलेस्टेरॉल, क्षयरोग, मानसिक आजार या आता सर्वसामान्य झालेल्या आजारांवरील औषधांविषयी काय काळजी घ्यावी, याचीही मांडणी लेखिकेने केली आहे. औषधांचा अयोग्य वापर ही ‘ग्लोबल’ समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) निष्कर्षानुसार पन्नास टक्क्यांहून अधिक रुग्ण औषधांचा वापर योग्य रीतीने करत नाहीत. औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी त्याचा सुयोग्य वापर होणे महत्त्वाचे आहे. यासाठी ‘योग्य औषधे, योग्य रुग्णास, योग्य मात्रेत दिल्यावर ते योग्य मार्गाने, योग्य कालावधीसाठी वापरणे’ अपेक्षित असते. या प्रक्रियेसाठी ग्राहकाने ‘औषधसाक्षर’ असणे आवश्यक आहे.

औषधे घेण्याची टाळाटाळ, धरसोड करणारे रुग्ण एकीकडे; तर दुसरीकडे औषधांशी अति जवळीक करणारे ग्राहकही दिसतात. डॉक्टरांकडे न जाता सेल्फ मेडिकेशन, परिचितांच्या आग्रही, ‘अनुभवी’ सल्ल्याने; तर कधी जाहिराती वाचून औषधे घेणारेही असतात. वेदनाशामके किंवा अ‍ॅसिडिटीच्या गोळ्या खाऊच्या गोळ्यांइतक्या सहजतेने व वारंवार; पुढे किडनी निकामी होण्याचा धोका लक्षात न घेता घेतल्या जातात. आयुर्वेदिक/हर्बल औषधे ‘साइड इफेक्ट फ्री’ या (गैर)समजाने वैद्यकीय सल्ल्याशिवाय वारंवार व दीर्घकाळ घेतली जातात. आकर्षक जाहिरातींना बळी पडून ‘वापरून तर बघू’ अशा मोहाने स्वत:वर प्रयोग करून आरोग्याशी खेळतात. परदेशात ग्राहकांना औषधांविषयक माहिती देणे अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. औषधांच्या दुकानातून लेखी किंवा तोंडी माहिती फार्मासिस्ट देतो, किंवा औषध उत्पादक कंपन्याच प्रत्येक प्रॉडक्टबरोबर सोप्या भाषेतील रुग्णांसाठीचे माहितीपत्रक (पेशंट पॅकेज इन्सर्ट) बनवतात. शिवाय औषधांच्या लेबलवरच सर्व आवश्यक माहिती सुवाच्य, सोप्या शब्दांत असते. ती ‘युजर फ्रेंडली’ स्वरूपात असावी, याबाबतही नियम आहेत. आपल्याकडे मात्र अशा ‘कन्झ्युमर मेडिसिन इन्फर्मेशन’ची संकल्पना रुजलेली नाही. ग्राहकांनाही त्याची गरज जाणवत नाही. ‘वाचूया प्रिस्क्रिप्शन’ या प्रकरणात लेखिका म्हणतात, ‘प्रिस्क्रिप्शनमधील हस्ताक्षर सुवाच्य नसल्यास ‘ओळखा पाहू’चा खेळ होतो. भारतात औषधांचे ब्रँड्स हजारोंनी आहेत व रोज नवनवीन ब्रँड्स येत असतात. केमिस्टने किती स्टॉक करायचे व डॉक्टरांनी किती लक्षात ठेवायचे, हे एक मोठे आव्हानच असते; पण औषध लिहिताना त्याच्या नावात, मात्रेत अचूकता मात्र नक्कीच असावी. काही ब्रँड्सची नावे इतकी एकसारखी असतात, की एखाद्या अक्षराचा फरक आणि औषधाचे घटक, गुणधर्म पार विरुद्ध होऊ शकतात. चुकूनही ‘ध’चा ‘मा’ डॉक्टरांनी लिहिणे वा फार्मासिस्टला वाटणे हे घातक होऊ शकते.’

पुस्तकात ‘हे माहीत हवेच’ या शीर्षकाखाली चौकटीत औषधसाक्षरतेविषयीचे ठळक मुद्दे दिले आहेत. उदा. फार्मासिस्ट-रुग्ण संवाद, प्रिस्क्रिप्शन औषधे; नॉन-प्रिस्क्रिप्शन (ओटीसी) औषधे, औषधांच्या लेबलवर काय असते?, इंटरनेट फार्मसी म्हणजे काय? त्यावरून औषधे विकत घ्यावी का?, नकली औषधे म्हणजे काय?, पर्यटनापूर्वीची चेकलिस्ट, ग्राहक व ग्राहक संघटनांनी आग्रह धरावा असे काही मुद्दे... विस्ताराने आले आहे. ते वाचकांच्या माहिती आणि ज्ञानात भर घालणारे आहेत. पुस्तकाच्या शेवटी काही उपयुक्त वेबसाइट्स, काही उपयुक्त पत्ते दिले आहेत. तसेच माझ्या आजारासंबंधी इतिहास, औषधोपचाराचा तक्ता, डॉक्टरांना सांगायचं आहे (डॉक्टर-रुग्ण संवादासाठीचे साधन), शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी तयारी सूची (घरून निघण्यापूर्वी, दाखल होताना, घरी परत जाताना) असे साधन तक्ते पेशंट सेफ्टी अलायन्सच्या सौजन्याने दिले आहेत. औषधांचे काही दुष्परिणाम जाणवल्यास त्या औषधांची माहिती औषध केंद्रास कळवण्याबाबत नमुना फॉर्मही दिला आहे. या फॉर्मची छायांकित प्रत आपण वापरू शकतो. पुस्तकाचे मुखपृष्ठ साधेच, पण आकर्षक आहे. चमच्यामध्ये रंगीबेरंगी गोळ्या, कॅप्सुल्स ठेवल्या आहेत. औषध तेच, पण योग्य मात्रेत, जबाबदारीने वापरले तर अमृत; नाहीतर विष. कधी रक्षक, तर कधी भक्षक.
जणू विषामृताचा खेळ. म्हणूनच ही ‘औषधसाक्षरता’
महत्त्वाची! असा संदेशही या पुस्तकाद्वारे वाचकांपर्यंत पूर्णांशाने पोहोचला आहे.

औषधभान : प्रा. मंजिरी घरत,
मेनका प्रकाशन; मूल्य : 150 रु., पृष्ठे : 126