आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of A Women About Period When She Was Going Through A Dieses

सायटिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरासाठी घड्याळाच्या काट्यानुसार फिरणा-या स्त्रीला एखाद्या आजारामुळे बिछाना धरावा लागला, तर तिला तितक्याच प्रेमाने सांभाळणा-या कुटुंबीयांचं प्रेम सर्वोत्तम औषध ठरतं.

सायटिका हे लेखाचे हेडिंग पाहून तुम्हाला वाटत असणार की मी तुम्हाला या व्याधीविषयी काही माहिती किंवा इलाज सांगणार आहे म्हणून. पण तसं नाही बरं का!

मी सांगणार आहे मला जेव्हा या सायटिकाने पुरतं घेरलं होतं आणि त्या जीवघेण्या दुखण्याने मी अगदी त्रस्त झाले होते. ज्यांच्यावर मी जिवापाड प्रेम करते, त्या सर्वांनी मला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. माझ्या राशीला आलेला हा सायटिका म्हणजे अत्यंत पीडादायक. जणू काही साडेसातीच. ज्यांनी अनुभवला त्यांनाच माहीत.

कोणत्याच दुखण्याला न भिणारी मी, पण या सायटिकानं मला अक्षरश: वेडं करून टाकलं होतं. दिवसभर घरातली सर्व कामं करणारी मी अगदी पांगळी झाले होते. मला ना चालता येत होतं, ना धड उभं राहता येत होतं. झोपतासुद्धा येत नव्हतं. कितीतरी रात्री मी अशा जागून काढल्या. कधीही न रडणारी मी नुसती ओक्साबोक्शी रडत होते.

मात्र हे सगळं दुखणं अनुभवत असताना आमच्या यांनी आणि मुलांनी मला जी साथ दिली. प्रेमाने माझं हवं नको ते केलं. दुखण्यांनी मी अगदी चिडून गेलेले. त्यामुळे मीच त्यांच्यावर ओरडायची. बिच्चारे ते सगळे निमूट सहन करायचे. कोणत्याही दुखण्यावर औषधासोबतच प्रेमाचं मलम किती आवश्यक असतं हे मला त्या वेळेस समजलं.

एरव्ही आमच्या यांना हातात पाण्याचा ग्लास लागतो, पण हेसुद्धा अगदी ‘बंदा आपकी सेवा में हाजिर है’ अशा अाविर्भावात माझं सगळं करत होते. आणि माझी मुलगी तर जणू छोटी मम्मीच झाली होती. आमचे धाकटे चिरंजीव एरव्ही घरभर पसारा करून ठेवणारे. पण तोसुद्धा ताईला होईल तशी मदत करीत होता. एरवी रागावून पाठीत धपाटा घालणारी मी, तोच माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवून मला दिलासा देत होता.

हे सर्व पाहून मला अगदी गहिवरून येत होतं. या सर्वांच्या प्रेमापुढे मी मात्र स्वत:ला खूप लहान समजत होते.कारण रोजच्या धावपळीच्या आणि कामाच्या व्यापामध्ये प्रत्येक गृहिणीला नेहमी असंच वाटतं की आपण घरातल्या प्रत्येकासाठी दिवसरात्र खस्ता खातो. नेहमी त्यांच्याच सरबराईत असतो. पण या सायटिकाने मात्र माझ्या कुटुंबाचं चित्रच बदलून टाकलं.
वै-याच्या वाट्यालासुद्धा कधी हा विकार येऊ नये. तरीही न राहून म्हणावंसं वाटतं, थँक्यू सायटिका.