आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचारपुरूष विनोबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


''आचार्य विनोबा भावे यांनी भारतीय समाजकारणाला प्रखर वैचारिक व आध्यात्मिक बैठक प्रदान केली. त्यांचे ‘आचार्य विनोबा भावे’ हे नवे बृहद्चरित्र वि. प्र. दिवाण यांनी लिहिले असून ते आचार्य विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठानने प्रकाशित केले आहे. आचार्य विनोबा भावे यांची 11 सप्टेंबर रोजी जयंती असून त्या दिवशी सातारा जिल्ह्यातल्या वाई येथील किसनवीर महाविद्यालयात या चरित्रग्रंथाचे प्रकाशन प्रख्यात समाजसेवक डॉ.अभय बंग यांच्या हस्ते होईल. तर याच पुस्तकाचा दुसरा प्रकाशन समारंभ ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर यांच्या हस्ते 14 सप्टेंबर रोजी मुंबई येथे मुंबई सर्वोदय मंडळाच्या सभागृहात होणार आहे. ‘आचार्य विनोबा भावे’ या चरित्रग्रंथातील हा संपादित अंश.''

विनोबा विचारपुरुष आहेत. स्वत:विषयी विनोबांनी लिहिले, ‘माझ्याजवळ मते नाहीत, माझ्याजवळ विचार आहेत... कोणीही मला आपला विचार पटवून द्यावा आणि कोणीही माझा विचार घ्यावा. प्रेम आणि विचार यात जी शक्ती आहे, ती आणखी कशातही नाही. कुठल्या संस्थेत नाही, सरकारमध्ये नाही, कोणत्याही प्रकारच्या वादात नाही, शास्त्रात नाही, शस्त्रात नाही. शक्ती ही प्रेम आणि विचारातच आहे, असे माझे म्हणणे आहे... माझ्या कार्याच्या मुळाशी करुणा आहे, प्रेम आहे आणि विचार आहे. विचाराशिवाय दुसरी शक्ती वापरायची नाही, अशी माझी प्रतिज्ञा आहे.’

विनोबांना फक्त विचार-शासन मंजूर आहे. विचार समजून घेणे आणि विचार समजावून सांगणे, विचार पटल्याशिवाय ते मान्य न करणे आणि विचार समजून न घेता आपले म्हणणे कबूल केले तर दु:खी होणे, विचार समजावून संतुष्ट राहणे, याला विनोबा ‘विचार-शासन’ म्हणतात. विचारावर विश्वास, विचारानेच काम आणि विचाराची सत्ता अशी ही विनोबांची विचारपद्धती आहे.

आपला विचार समोरच्याला जरूर पटवून द्यावा, समजावून सांगावा व हीच आपली मर्यादा आहे, असे विनोबा म्हणतात. विनोबांना विचाराचे आक्रमण मंजूर नाही. त्यात विनोबांना समोरच्याचा विचार-शक्तीवर अविश्वास दर्शवल्यासारखा वाटतो. पुन्हा त्यात विनोबांना अहंकार व हिंसाही दिसते. म्हणून विनोबा म्हणतात, ‘जर ते (विचार) लोकांना पटले तर ते स्वीकारतील व त्यानुसार अंमलही करतील. आपण केवळ निमित्तमात्र आहोत. विचार आपल्याद्वारे प्रकट झाला इतकेच. म्हणून आपले काम विचार पेरणे, सांगणे इथपर्यंतच मर्यादित आहे.’ ‘जनतेला नम्रतापूर्वक विचार समजावीत जावे, याउपर आमच्या डोक्यावर भार नाहीच. विचारांचा स्वीकार-अस्वीकार करण्याचा हक्क जनतेला आहे. आमच्यासाठी जनता स्वामी आहे.’

विनोबांच्या दृष्टीने विचारांचा निकष स्वत: विचारच आहे. विचाराची कसोटी अथवा निकष आचार आहे, हे विनोबांना मंजूर नाही. एखाद्या विचाराप्रमाणे आचार होत नसला म्हणून त्या विचाराचे मूल्य कमी होत नाही. त्यामुळे विचार, आचाराच्या निकषावर घासून पाहण्याचे कारण नाही, असे विनोबांचे म्हणणे आहे. जीवनाचे असे कुठलेही क्षेत्र नाही, जीवनाचा असा एकही पैलू नाही, ज्याला विनोबांनी आपल्या विचार-प्रतिभेने स्पर्श केला नाही. विलक्षण वेगाने बदलणाºया परिस्थितीचे विनोबांना तीव्र अवधान आहे. कुठल्याही प्रश्नाकडे, मनाच्या वर उठून ते पाहू शकतात. त्यामुळे जीवनातील जटिल प्रश्नही विचाराच्या ताकदीवर त्यांनी सहजपणे सोडवून दाखविले. सर्वोदय, भूदान, ग्रामदान, सत्याग्रह, गोरक्षण यांसारखे विनोबांचे विचार चरित्राच्या अनुषंगाने आले आहेत. पण विनोबांचे असे अनेक विचार आहेत ते सुटून गेले. असे सुटलेले विचार येथे साररूपाने देण्याचा प्रयत्न केला आहे.

विनोबांनी सर्वोदयाची गणिती भाषेत सूत्रमय व्याख्या केली आहे. ती अशी-‘अध्यात्म+विज्ञान=सर्वोदय’. अध्यात्माचे लक्षात येणारे पाच अंश विनोबांनी थोडक्यात असे सांगितले आहेत 1) निरपेक्ष नैतिक मूल्यांवरील श्रद्धा 2) जीवनाची मरणोत्तर अखंडता 3) प्राणिमात्राची एकता आणि पावित्र्य 4) विश्वात व्यवस्था आणि बुद्धी असणे व
5) पूर्णतेच्या अनुभवाची संभवनीयता.

विनोबांना विज्ञान व अध्यात्म यात सत्याचा शोध हे समानतत्त्व दिसते. विज्ञान व अध्यात्म यांच्याद्वारे विश्वाचे ज्ञान होऊ शकते. विज्ञान विश्लेषण करते तर अध्यात्म संश्लेषण (सिंथेसिस). विज्ञान बाह्य प्रमाणाने शोध घेते तर अध्यात्म आंतरिक प्रतीतीने शोध घेते, असे विनोबा म्हणतात. त्यांचे म्हणणे आहे की विज्ञान नीतिनिरपेक्ष आहे. ते ना नैतिक आहे, ना अनैतिक. विज्ञानात विनाशक व विकासक दोन्ही शक्ती आहेत. म्हणून विज्ञान सेवाही करू शकेल व संहारही. विनोबांचे म्हणणे असे की याचसाठी विज्ञानाला मूल्याची व अध्यात्माची आवश्यकता आहे. विज्ञानाला चुकीचे मार्गदर्शन मिळाले तर विज्ञान नरकाचा मार्ग होऊ शकते व योग्य मार्गदर्शन मिळाले तर स्वर्गाचा मार्ग होऊ शकते. म्हणून विज्ञानाला अध्यात्माची जोड हवी. विज्ञान जीवनाला रूप व गती देते, तर अध्यात्म जीवनाला शक्ती व दिशा देते. विज्ञान पाय आहेत तर अध्यात्म डोळे. हे विज्ञानयुग आहे व म्हणून अध्यात्माची आज सर्वाधिक गरज आहे, असे विनोबांचे सांगणे आहे.

विनोबांना अभिप्रेत असलेला धर्म हा मानवधर्म आहे. विनोबा म्हणतात, ‘‘धर्म हा एक व्यापक शब्द आहे. आपले जीवन ज्या नीतिविचारांवर आधारलेले असते त्याला आपण धर्म म्हणतो. धर्म अविचल आहे व त्याची तत्त्वे पक्की असतात.’’ श्रद्धा, सत्य, प्रेम आणि त्याग ही चार पक्की तत्त्वे त्यांनी सांगितली आहेत. मानवधर्म आपल्या परिशुद्ध सत्य तत्त्वाच्या आधारानेच पसरू शकतो, असे विनोबा म्हणतात.

हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हे धर्म नसून पंथ वा फेथ आहेत, असे विनोबा म्हणतात. एखाद्या संताला वा महापुरुषाला सत्य-प्रेमाचा साक्षात्कार होतो व अशा साक्षात्कारी माणसावर जे लोक श्रद्धा ठेवतात ते त्या ‘फेथ’चे झाले. म्हणून प्रचलित धर्मासाठी विनोबा ‘फेथ’ असा शब्द उपयोजितात. ज्याच्या विरोधात जाण्याची कोणाला इच्छाच होणार नाही, अशा खºया धर्माची स्थापनाच अजून झालेली नाही. कारण सर्वच धर्म मानसिक भूमिकेवर राहिलेत. आता धर्म जेव्हा विज्ञानाच्या भूमिकेवर येईल तेव्हा खरा धर्म बनेल. कारण विज्ञानयुगात व्यापक भावनाच टिकेल, संकुचित भावना टिकणार नाही, असे विनोबांचे सांगणे आहे. आज धर्म व व्यवहार यांची फारकत झाली आहे. धर्म हा पुजारी, मुल्ला व पादरी यांच्या हाती असून मंदिर, मस्जिद व चर्चमध्ये कैद आहे. या कैदेतून धर्माची सुटका करून खरी धर्मभावना सर्वत्र पसरवायची आहे व अशा धर्माने व्यवहाराची सर्व नाकी काबीज केली पाहिजेत. व्यवहारात, व्यापारात व राजकारणातही धर्माने शिरकाव केला पाहिजे, असे विनोबा म्हणतात. आज जी धर्म व व्यवहाराची फारकत झाली आहे, ती त्यांना मंजूर नाही.
पृष्ठसंख्या - 496, मूल्य - 500 रुपये