आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of Aishwarya Patekar About Literature, Divya Marathi, Rasik

अक्षरभान : संवेदनशीलतेचा सुईदोरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक धडे वर्तमान वास्तवाच्या शाळेत शिकायला मिळतात. अनेक अवघड गोष्टी असतात. अनुभव असतात. समस्या असतात. त्यांचा अर्थ समजणे इतकी सोपी गोष्ट नक्कीच नसते. मात्र, याच शाळेत शिकलेल्यांच्या विचारांचे, अनुभवांचे, चिंतनाचे संदर्भग्रंथ आपण वाचले की जगण्याचे अवघड पाठ सहज सोपे होत जातात.
मला माणसाच्या घडण्याचा अन् कुंभाराच्या चाकावर निर्माण होणार्‍या चिखलाच्या मडक्याचा कायमच संदर्भ लागत आला आहे. कुंभार चाकावर मडक्याला आकार देतो. त्याचं काम फार एकचित्तानं अन् निगुतीनं चाललेलं असतं. त्याचं जराही लक्ष विचलित होत नाही. त्याचं सारं चित्तच त्या मडक्याचं रूप धारण करणार्‍या चिखलाच्या गोळ्याशी एकवटलेलं असतं. तो चिखलही मळून मळून लोण्याच्या गोळ्यागत तयार केलेला असतो. दर नव्या मडक्यासाठी कुंभार तेवढीच मेहनत घेत असतो अन् कामात भान हरपून जात असतो. कुठल्याच मडक्याशी तो तसूभरही कमी पडत नाही. अन् तसंच काही झालं तर मडकं कच्चं राहून जातं; असं म्हणण्यापेक्षा ते घडतच नाही. ते चिखलातूनच आकार धारण करत नाही. म्हणजे चिखल मळताना काही कसर राहिलेली असते. भाजण्याची प्रक्रिया फार नंतरची. एकदा का मडक्याची घडण झाली की त्याला जाळावर तो चांगलं भाजतो. तेव्हा मडकं पक्कं तयार होतं. त्यात काही ऐब राहत नाही.

माझं मडकं मी कुंभाराच्या चाकावरचं समजतो. ते एकदा का आगीत धरलं की मग भाजून पक्कं होईल. खरं तर माझं मडकं अजून फार कच्चं आहे. लिखाणाची दर नवी कृती मी जेव्हा करतो; तेव्हा पक्कं होण्याच्या दिशेनं टाकलेलं फक्त ते एक एक पाऊल असतं. या पावलासाठी संवेदनशीलतेची आवश्यकता असते. माझं संवेदनशील असणं मी पुन्हा पुन्हा परजून घेतलं आहे. नवनिर्मितीची गोष्ट त्याच्याच तर जोरावर माझ्या हाती लागली. मडक्या-गाडग्यात धन ठेवून मातीत पुरून ठेवावं तशी माझ्या आत ही लाखमोलाची गोष्ट मी जपली.

संवेदनशील असणार्‍या प्रत्येकाला लिहिता येतंच असं नाही. त्यासाठी रस्ता तयार करत जावं लागतं. गावात राहत असल्यामुळे संतवाङ्मयाचे संस्कार माझ्यावर आपसूक झाले. म्हणूनच ज्ञानेश्वरांचं ‘चैतन्यत्व’, नामदेवाचं ‘बहुपिंडत्व’, तुकारामाचं ‘भेदकपण’, मुक्ताबाईचं ‘गूढत्व’, जनाबाईचे ‘वात्सल्य’, चोखामेळाचं ‘विद्रोहीपण’ या सर्व गुणवैशिष्ट्यांची हिर्वी जुडी बांधली आणि ती नित्य ताजी ठेवण्याचा प्रयत्न केला. तुकारामाशी तर मी हरघटका संवाद केला. त्याच्याबरोबर भंडारा डोंगर कैकदा पायाखाली तुडवला. वातावरणात त्याचे अर्धेनिर्ध पांगणारे अभंग स्वत:च्या ओळी घुसडून पूर्ण केले. याचा अर्थ कल्पनेच्या पातळीवर वावरताना मला वर्तमानकालीन वास्तवाचा विसर पडला होता, असे नाही; तर वर्तमानाचीच वास्तवगाथा समजून घेण्यासाठी मी त्याच्याकडे जात होतो. आजचं भयंकर असं अंगावर धावून येणारं वास्तव; बॉम्बस्फोट, घातपात, जाळपोळी, दंगली, हत्या, बलात्कार, आत्महत्या, मूल्यºहास असल्या हजार प्रश्नांसकट मी संवादलो तुकारामाशी.

थांब तुकारामा ऐक माझे पाढे, वैकुंठाशी घोडे दटू नको...!

वर्तमान वास्तवाचं जळजळीत गा-हाणं घातलं त्याच्या कानावर. सांगितलं त्याला, या सर्वांचा गुंता आधी सोडव! मगच तुझं विमान वैकुंठाला घेऊन जा! तेव्हा तुकारामही हतबल उभा. मग लक्षात येतं या व्यवस्थेनं त्याची ‘काठी’ ही काळाच्या ओघात पोखरून टाकलीय, तिथे आपली काय कथा? संवेदनशीलतेच्या डोळ्यानंच मला हे निरखता आलं.
एक आई अन् चार बहिणी यांच्यात मी वाढलो. साहजिकच संवेदनशीलतेचा पहिला संस्कार घरातच माझ्यावर झाला. भावनाशीलही बनलो. आमच्या सहा जणांच्या संघर्षानं असंख्य अनुभव माझ्यासमोर ठेवले. त्याच अनुभवांना मी सहजी कवितेत ठेवलं. आम्हा सहा जणांची भाकरीचा चंद्र शोधतानाची दमछाक लहान वयातच समजूतदार करून गेली. परिस्थितीच्या चाकानं आयुष्य एवढं गरगरून सोडलं की दर नव्या दिवसापाशी नवा जन्म अनुभवला. कवितेचा शोध जेव्हा मला लागला, तेव्हा अनुभव शोधत भटकावं लागलं नाही. ते माझ्या घरातच अन् आसपास प्रचंड संख्येनं दाटीवाटी करून उभेच होते.

तहानल्याच्या ओठी घोटभर पाणी. भुकेल्याच्या हाती चतकोर भाकर. भागलेल्याला घडीभर विसावा. दु:खानं आयुष्य भरलेल्याच्या मनावर सुखाची फुंकर. बेवारस मेलेल्या जिवासाठी आपला खांदा. हेही याच शाळेत शिकलो. एक एक माणूस वाचला. तेव्हा कळून आला त्याचा जिव्हाळा. कळून आली त्याची माणुसकी. कळून आलं वात्सल्य. कळून आली त्याची क्रूरता. त्याचा निर्दयीपणा, त्याचा स्वार्थीपणा, त्याचा ढोंगीपणा. नाना तºहा दृष्टिपथात येतात. पायात काटा खुडला म्हणून चालणं सोडायचं नाही. काटा तेवढा काढून फेकत आपली वाट चालत राहायची. हे इथलं अध्यापन. त्याचं नीट अध्ययन झालं नाही तर आयुष्यभर कुठलीच परीक्षा आपण पास होणार नाही. आयुष्यभर नापासाचा शिक्का माथ्यावर घेऊन फिरावं लागेल. संवेदनशीलतेचं संदर्भ पुस्तक आपल्याला या कामी उपयोगी पडतं. संवेदनशीलताच चांगल्या-वाईटाचा अदमास घेत असते. समाजात घडणार्‍या गोष्टी कवीच्या काळजावर ओरखडे ओढीत जातात. संवेदनशीलतेला परजून घ्यायचं असेल तर; श्रमिकांच्या वेदनेचा जाहीरनामा मांडणारी नारायण सुर्वेंची कविता. विद्रोहाचा महाग्रंथ चितारणारी नामदेव ढसाळांची कविता. यापुढचं महाराष्ट्रगीत लिहिण्याची भाषा करणारी दि. पु. चित्र्यांची कविता. तिरकस मात्र देखणी आणि मेलडी असलेली भालचंद्र नेमाड्यांची कविता. कवितेच्या आत्म्याला बोलतं करायला लावणारी अरुण कोलटकरांची कविता. लोकगीताचा स्वर आणि कृषिवेदनेचा गीतात्मक आविष्कार करणारी विठ्ठल वाघांची कविता. उत्कट स्त्रीमनाच्या दु:खाला चिंतनाचा, संवादाचा ठसठशीत काठपदर बहाल करताना आत्मनिष्ठतेचे मखर त्यावर चढविणारी अनुराधा पाटलांची कविता. मेंदूतलं ‘तणकट’ उपटू पाहणारी नारायण कुलकर्णी-कवठेकरांची कविता. तुम्ही ओलांडून जाऊ शकत नाही. संवेदनशीलतेला बळकटी मिळवून देणारी वाङ्मयाच्या वावरातली ही कसदार झाडे आहेत.

बाकी वर्तमान वास्तवाच्या ‘शाळेत’ अनेक गोष्टींचे धडे मिळाले. जगण्याची बाराखडी गिरवली. व्यवस्थेचे पाढे पाठ झाले. वास्तवाच्या गणिती क्रिया करताना अनेक समीकरणं सुटलीही. म्हणून, झुंडी कुणाच्या असतात? कोण फिरत असतं कळपाने? आणि कुणाचा असतो थवा? या गोष्टींचा उमज इथल्याच पाठशाळेत झाला. थवे असतात हिंस्र पक्ष्यांचे. झुंडी असतात श्वापदांच्या. कळप असतात मात्र मस्तवाल लांडग्यांचे.
वडिलोपार्जित असूनही कसता येत नाही शेत
हा लांडग्यांचा मस्तवाल कळप, घालतोय धुमाकूळ वावरभर...
गव्हातून खडा निवडून टाकावा तसा वाईट माणूस निवडून टाकता येत नाही. तो लडबडून आलेला असतो वस्तुमात्रात. त्याच्याच हरेक त-हा लिखाणातनं उभ्या राहतात. थोडक्यात, अनेक धडे वर्तमान वास्तवाच्या शाळेत शिकायला मिळतात. अनेक अवघड गोष्टी असतात. अनुभव असतात. समस्या असतात. त्यांचा अर्थ समजणे इतकी सोपी गोष्ट नक्कीच नसते. मात्र याच शाळेतल्या शिकलेल्यांच्या विचारांचे, अनुभवांचे, चिंतनाचे संदर्भग्रंथ आपण वाचले की जगण्याचे अवघड पाठ सहज सोपे होत जातात. याच वर्तमान वास्तवानं संवेदनशीलतेचा सुईदोरा माझ्या हाती ठेवला. त्याच्याच साहाय्याने मी टाचतोय अनुभवाला अनुभव. त्याचीच तर होतेय कविता. एवढेच तर सांगायचे होते मला.

oviaishpate@gmail.com