आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘एलियन’ चित्रपटाच्या लोकप्रियतेपेक्षा आणि यशापेक्षा उजवे चित्रपट किती तरी आहेत. उदा. स्टार वॉर्स किंवा ‘जेम्स बाँड’ मालिका. पण ‘एलियन’ची अनेक वैशिष्ट्ये त्याला अभिजात दर्जा प्राप्त करून देतात. त्याच वेळी सवंग लोकप्रिय फॉर्म्युला वापरूनही किती उच्च प्रतीचा चित्रपट निर्माण होऊ शकतो, हेही दिसते.
अंधारात कुणी तरी झडप घालेल, ही भीती आपल्याला कायमच असते. मोठे होता होता ही भीती नाहीशी होते किंवा कमी होते; पण विश्वात कोणी तरी आहे आणि ते आपल्यापेक्षा वरचढ असतील तर आणि आपल्याला संपवतील तर? या नव्या भीतीची जाणीव विज्ञान साहित्य आणि कथा वाचताना होत राहते. दुसरीकडे, भयकथांमधून आणि भयपटांमधून अंधारातून अज्ञात गोष्टींनी तुमच्यावर हल्ला करणे, हा फॉर्म्युला तर पूर्ण घिसापिटा झालेला असतो. पण त्याचाच उपयोग ‘एलियन’ चित्रपट करतो. नायिकाप्रधान अॅक्शनपट याचे आणखी एक वैशिष्ट्य ठरते. दिग्दर्शक रेडलेक्स कॉट यांचा हा दुसरा चित्रपट. तो सुरू होतो, भविष्यकाळात. दूरवर अंतराळात गेलेले यान पृथ्वीवर परत येत आहे. पृथ्वीवर पोहोचायला अजून 12 महिने आहेत, तोच त्याला एका ग्रहावरून सिग्नल मिळतो. ग्रहावर काहीतरी जिवंत आहे. त्याच्याबद्दलचे कुतूहल चाळवले जाते आणि यानातून कॅप्टन टॉम स्केरिटसह 2 अंतराळ प्रवासी उतरतात. ग्रहावर एका प्रचंड यानासारख्या वस्तीवर एक महाकाय आकार थिजलेला दिसतो. हा अफलातून सेट हे एलियनचे आणखी एक वैशिष्ट्य. त्याच ग्रहावर धगधगत्या अंड्यासारखे काही तरी त्यातील केन या अंतराळ प्रवाशाला दिसते. तो जवळ जाताच अंडे फुटून त्याच्यावर तो प्रचंड आकार झेप घेतो, आणि तोंडावरच्या काच आणि धातूने बनलेल्या हेल्मेटवर चिकटतो. त्या प्राण्यासकट त्याला यानावर आणले जाते. हे घातक आहे, असे नायिका सिगोर्नी विव्हर सांगत राहते. यानाचा विज्ञान अधिकारी अॅश तिला विरोध करतो. त्याला या ‘परग्रहवासी’मध्ये रस असतो. त्या प्राण्याला कापायला जातात तोच त्याच्या शरीरातून पडलेला रस यानाचे 2-3 मजले भेदून जातो. थोडक्यात, हा एलियन अॅसिडने भरलेला असतो आणि स्वत:चे कवच हवे तसे बदलून स्वत:चे रक्षण करू शकतो. त्याला मारण्यात यानावरील तज्ज्ञांना यश येते. सगळे निर्धास्त होतात. यानंतर सर्वांत थिजवून टाकणारा क्षण येतो. हेल्मेटवर प्राणी चिकटलेला केन जेवत असताना त्याच्या पोटात दुखू लागते आणि वेदनेने तो खाली पडतो. त्याचे पोट फाडून एक भेसूर प्राणी वर येतो. थोडक्यात, मरताना त्या एलियनने नवा जीव तयार केलेला असतो. आता हा चित्रपट सरळसरळ एलियन विरुद्ध मानव असा संघर्ष दाखवणार, असे वाटत असताना अनेक चकवणार्या कलाटण्या कथेला मिळतात.
आजवरचे भयपट आणि एलियन त्यामधला मोठा फरक हा, की यात थेट हाणामारीला किंवा खूनबाजीला हात न घालता दीर्घकाळ एलियनबद्दलचे कुतूहल चाळवत राहते. त्याची चाहूल, दर्शन, वर्णन आणि वैज्ञानिक तपासणी यात चित्रपटाचा बराच काळ जातो. यानावरील संगणक एलियनला पृथ्वीवर आणावे, असा आदेश देतो; ज्याला ‘स्पेशल ऑर्डर 24’ म्हटले जाते. हा आदेश धुडकावून नायिकेने एलियनला मारण्याचा प्रयत्न करणे आणि चित्रपटाच्या पुढच्या भागात हा संघर्ष चालू ठेवणे, हे 80च्या सुमारास भोवताली प्रगट होणार्या स्त्रीवादी विचारसरणीशी सुसंगत होते. चित्रपट केवळ भयपट न राहता, अनेक नैतिक प्रश्नांना हात घालतो. मानवी कुतूहल आणि अस्तित्वासाठी संघर्ष, यांत प्राधान्य कशाला द्यावे?
माणसाने बनवलेले यंत्रमानव माणसाला नियंत्रित करू लागले तर? अशा नैतिक प्रश्नांपासून विश्वातील ‘लाइफ फॉरमॅट’ आपल्या कल्पनेपेक्षा, ज्ञानापेक्षा पूर्ण वेगळा असेल तर? आणि त्याच्याशी संघर्ष करण्याइतकी आपली वैज्ञानिक प्रगती नसेल तर? अशा प्रश्नांपर्यंत तो आपल्याला आणून पोहोचवतो. चित्रपटातील दृश्ये विस्तृतपणे प्रेक्षकाला एकेका अनुभवात सहभागी करून घेणारी आहेत. यानावरचे प्रवासी तसे तिशीच्या पुढचे, निव्वळ पैशासाठी काम करणारे आहेत. 2 कोटी टन खनिजे पृथ्वीवर आणण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवली गेली आहे. त्यामुळे यानाचा आकारही अवाढव्य आहे, त्यासमोर माणूस खुजा आहे. हे खुजेपण ग्रहावर जमिनीत खिळलेल्या एलियन्सच्या यानाच्या तुलनेत नीटपणे दिसते. एलियनला मारण्यासाठी पारंपरिक आगीसारखा उपाय सुरुवातीला निरुपयोगी ठरतो. पण शेवटी आगीच्या भव्य लोळात, तो आपला निरोप घेतो. नायिका सुखरूप परतते, ती यानातल्या छोट्या मांजरालाही वाचवून. भव्यता, तांत्रिक सफाई, अफलातून संगीत या सर्वांच्या जोडीला मानवी स्पर्श आणि ऊब यांनी हा चित्रपट समृद्ध आहे. त्यामुळेच तो आताच्या डिजिटल क्लृप्त्या असलेल्या चित्रपटांपेक्षा वेगळा ठरतो. भव्य सेट आणि सुंदर नायिका हे टाळून दिग्दर्शकाने चित्रपटाच्या पोस्टरवर मात्र केवळ अंडे दाखवले आहे. यात कल्पकताही होतीच, पण रिस्कही होती. 1978चा हा चित्रपट आजही पाहताना ताजा वाटतो, आणि स्तिमित करतो. त्यानंतर ब्लेड रनर, ग्लॅलिएटर, ब्लॅक ऑफ डाऊन यांसारखे उत्तम चित्रपट रिडेसने दिले. पण या सम हाच!
(shashibooks@gmail.com)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.