आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आँसुओंंको बहेंने दो...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून रडू येणं अगदी साहजिक आहे. मात्र या रडण्यामुळे स्वत:ला त्रास करवून घेणं अयोग्य आहे. आपले विचार, भावना स्पष्ट आणि योग्य शब्दांमध्ये मांडता येणं, हे कौशल्य आहे.
भिशी पार्टी अगदी छान चालू होती. तेवढ्यात सलोनीनं अशी काही कॉमेंट केली की, वैदेहीच्या डोळ्यांमधून चटकन पाणी आलं. एकदम वातावरण बदलूनच गेलं. इतरांनी वैदेहीला सावरलं. थोड्या वेळाने पार्टी पुन्हा सुरुवातीसारखी सुरू झाली. पण वैदेही त्याचा मनापासून आनंद घेऊ शकत नव्हती. वरवर हसत असली तरी मनातून स्वत:ला खूप रागवत होती. ‘हे असं कसं होतं नेहमीच माझ्या बाबतीत? एवढंसं काही झालं की, आलंच डोळ्यांत पाणी, चारचौघात हसं होतं माझं, अशा विचारांनी ती अस्वस्थ झाली होती. सलोनीच्या कॉमेंटपेक्षा याच विचारांनी तिला जास्त त्रास होत होता.

एखाद्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून रडू येणं अगदी साहजिक आहे. मात्र या रडण्यामुळे स्वत:ला त्रास करवून घेणं अयोग्य आहे. आपले विचार, भावना स्पष्ट आणि योग्य शब्दांमध्ये मांडता येणं, हे कौशल्य आहे, हे अगदी खरं! त्यासाठी प्रयत्नही करायला हवेत, यात वादच नाही. म्हणूनच नाही का, एखादे वेळी शब्दांऐवजी रडणंच बाहेर पडेल, या भीतीनं आपण मान वळवून घेत? ओठ घट्ट मिटून घेत? पण, तरीदेखील आलेच अश्रू बाहेर तर? तर खुश्शाल येऊ उद्या! संवेदनशीलतेचा अभिमान बाळगा. मोठ्यात मोठी क्रांतीदेखील संवेदनशील लोकांनीच घडवून आणली आहे, हे लक्षात घ्या.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, स्वत:ला स्वीकारा, आरामात राहा. ‘का होतं हे असं माझ्यासोबत?’ असं मूळ आपटून विचारण्याऐवजी स्वत:शी ‘अच्छा! हे असं होतं होय माझं,’ असं म्हणा. जे काही होत आहे, त्यासोबत अगोदर सेटल व्हा. तसं सेटल झाल्यानंतर आता उपाययोजनांकडे लक्ष द्या.
कोणत्या प्रकारची परिस्थिती उद््भवल्यावर अश्रू जमा होतात, त्या वेळी नेमक्या कोणत्या भावना निर्माण झालेल्या असतात, त्यावर विचार करा. नंतर त्या भावनांच्या खोलाशी जाऊन त्या हाताळण्यासाठी योग्य प्रयत्न करता येतील.

मुख्यत्वे अश्रूंमुळे स्वत:बद्दल अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही, हे लक्षात घ्यावं लागेल. अशीच परिस्थिती आणखीही बऱ्याचदा उद््भवते. ग्रामीण भागातून एकदम मोठ्या शहरात गेलं की, बुजल्यासारखं होतं. पंचतारांकित हॉटेलमध्ये पहिल्यांदाच जाताना ‘ही चप्पल शोभेल ना?’ ‘ही साडी ठीक दिसेल का?’ असे प्रश्न मनात निर्माण होतात. त्या भव्यदिव्य भौतिक वातावरणामुळे दिपून जायला होतं. इमारत कितीही भव्य असली तरी ती निर्जीव आहे, आपलं जिवंत आणि स्वतंत्र अस्तित्व आहे, हेदेखील आपण विसरून जातो. नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत काही वेळा आढळतं की, वरिष्ठांच्या पदाच्या ओझ्याखाली त्या एकदम दबून गेलेल्या असतात. वरिष्ठांबद्दल व त्यांच्या पदाबद्दल आदर नक्कीच असावा, मात्र त्याचं रूपांतर स्वत:ला कमी लेखण्यामध्ये होऊ नये, कारण प्रत्येक जण आपापल्या जागी श्रेष्ठ असतो! ‘जगज्जेता नेपोलियन श्रेष्ठ आहे,’ असं म्हणताना स्वत:साठी कनिष्ठ भाव का निर्माण व्हावा? ‘माझ्यातही काही बाबी नक्कीच अशा असतील, ज्यामध्ये मी नेपोलियनपेक्षाही श्रेष्ठ असेन,’ असं वाटण्यात काय गैर? मात्र असं वाटत असताना त्यामध्ये ‘अहं’ असू नये, स्वाभिमान जरूर असावा!

परिस्थिती अश्रूंमुळे निर्माण झालेली असो, सभोवतालच्या दडपणामुळे किंवा कुणाच्या अहंगंडामुळे उद‌्भवलेली. जोपर्यंत स्वत:च्याच सोबतीमध्ये आपण खूश आणि समाधानी असतो, तोपर्यंत आपण नेहमीच योग्य मार्गावर असतो.

म्हणूनच खुशाल वाहू द्या अश्रूंना. त्याही परिस्थितीत स्वत:चा सुखद सहवास अनुभवा आणि तुमच्यातील प्रिय मैत्रिणीचे आभार माना-जी नेहमीच तुम्हाला साथ देते!
अंजली धानोरकर, औरंगाबाद
anjalidhanorkar26@gmail.com
बातम्या आणखी आहेत...