आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकोत्तर राजाची चरितगाथा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साधारण सत्तरीच्या दशकाच्या सुरुवातीच्या दोन-तीन वर्षांत एकामागून एक तीन अनुभव आले. त्या सर्वांचा केंद्रबिंदू एकच; बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड.
सौराष्ट्राच्या अमरेली जिल्ह्यात व सोमनाथच्या देवळापासून जवळच असलेल्या कोडीनार तालुक्यात एका आर्थिक, सामाजिक योजनेचे प्रारूप घडवण्यासाठी आम्ही पाहणी (सर्व्हे) करत होतो. खेडोपाडी 55 ते 70 वयाचे पुरुष चौथीपर्यंत शाळेत गेलेले. त्यांना लिहिता-वाचता येत होतेच, शिवाय त्या त्या शाळांमधून त्यांचे दाखले मिळत होते. ही पिढी शाळकरी वयात असणार, दुसर्‍या महायुद्धाच्या आधी. सौराष्ट्र हा दुष्काळी, आर्थिक-शैक्षणिक आघाडीवर मागास, त्या काळी मग हे कसे? उत्तर ते ‘खेडूत’ अभिमानाने देत. ‘अमे गायकवाडी छिये.’आम्ही गायकवाडीची प्रजा आहोत. प्राथमिक शिक्षण विनामूल्य व अनिवार्य करणार्‍या ‘त्या’ गायकवाडीचा अभिमान स्वातंत्र्यानंतर 25 वर्षांनी, तर सयाजीरावांच्या निधनानंतर 35 वर्षे उलटूनही ताजा होता.
बडोदा शहरातून आजूबाजूच्या गावांमध्ये जाण्यासाठी जे पाच-सात रस्ते होते, तिथून जाताना आपली बिनपाठीची बाके (दोन खांब + वर आडवी एक फरशी) असतात, तशी पण उंचीला साधारण खांद्यापर्यंतची रचना थोड्या थोड्या अंतरावर आढळे. त्या उंचीमुळे ती बसण्यासाठी नाहीत, हे उघड होते. मग उद्देश काय? सयाजीराव पहाटे पायी फेरफटका मारायला जात, तेव्हा साधे कपडे व कुठलेही राजचिन्ह नसे, कुणीही अधिकारी- दरबारी सोबत नसे. अशा एका प्रसंगी रस्त्याकडेला बसलेल्या वृद्धेने लाकडाची मोळी उचलून डोक्यावर घेण्यासाठी मदत कर, अशी हाक मारली. राजा ओळखणे शक्य नव्हते. तिला मदत करताना केलेल्या चौकशीत लक्षात आले की, अनेक जण रोज मोळी विकायला तीन-पाच मैल चालत येतात. त्या वेळी घरगुती इंधन लाकूड होते. त्यातल्या काहींना मोळी विश्रांतीसाठी खाली ठेवल्यावर पुन्हा डोक्यावर घेण्यासाठी मदतीसाठी कुणी पांथस्थ येण्याची वाट पाहावी लागते. विचार करून राजाज्ञा सुटली. मोळीविक्यांना, त्या बाकवजा रचनेवर मोळी ठेवता-उचलता एकट्याने करता येऊ लागले.
आणंद इथल्या ‘अमूल’ची डेअरी पाहताना विनंतीवरून डॉ. कुरियन यांची दहा-पंधरा मिनिटे भेट मिळाली. ‘अमूल’च्या यशात त्यांचा वाटा ज्ञात आहे. परंतु इतर कारणांत ‘मंडळी’ म्हणजे खेड्याच्या स्तरावर प्राथमिक सहकारी सोसायटी ही प्राथमिक शिक्षणासोबत अनिवार्य सयाजीरावांनी केली असल्याने सहकार ‘रुजला’ होता, हा एक घटक त्यांनी आवर्जून नोंदवला.
महाभारतात एक श्लोक आहे.
‘‘कालो वा कारणं राज्ञो राजा वा कालकारणम्।
इति ते संशयो माभूत्, राजा कालस्य कारणम्।’’
राज्यशास्त्रात खूप चर्चिला गेलेला हा प्रश्न. नेता काळ घडवतो, की परिस्थिती म्हणून काळच नेतृत्व घडवतो. कुठलाही एकच दृष्टिकोन टोकाचा होईल. परिस्थिती जशी आवश्यक आहे, तसे त्या परिस्थितीत वावरणारे नेतृत्वही महत्त्वाचे. आपण छत्रपती शिवाजी व पंडित नेहरू ही दोन लोकोत्तर व्यक्तिमत्त्वे अभ्यासतो. त्यांच्या उदय व विकासाला परिस्थिती अनुकूल होती, पण त्या परिस्थितीतही ही दोन व्यक्तिमत्त्वे नसती, तर इतिहास निराळा घडला असता. सयाजीरावांच्या कार्याकडे पाहताना हे भान असणे आवश्यक आहे.
गायकवाड घराण्याला वारस म्हणून दत्तकपुत्र घेण्याची वेळ आली. ज्या पद्धतशीरपणे वारस निवडणे, दत्तकविधान व त्या 12 वर्षांच्या कुमाराचे शिक्षण-प्रशिक्षण ब्रिटिशांनी व सर टी. माधवराव यांनी योजनापूर्वक केले, त्या पार्श्वभूमीचा खूप मोठा वाटा सयाजीरावांच्या कर्तृत्वात आहे. मात्र पैलू पाडणारा वैकर्तन कितीही कुशल व विवेकी असला, तरी हाती असलेला खडाही अस्सल हिरा असावा लागतो. काळ व राजा एकमेकाला पूरक हवेत. तसा मेळ झाल्यानेच बडोद्याने इतिहास घडवला.
सयाजीरावांनी शिक्षण संपून थोडा अनुभव मिळताच, स्वतंत्र निर्णय घ्यायला सुरुवात करून आपला ठसा उमटवला. एक गोष्ट स्पष्टपणे नमूद करायला हवी, संस्थानी प्रदेशांत त्रावणकोर, म्हैसूर, इंदूर, ग्वालियर, औंध, कोल्हापूर या व अशा काही संस्थानांनी प्रजाहिताची विविध पावले आपापल्या संस्थानात उचलली. त्या तोडीची काही कामे स्वतंत्र भारतात आजही उभी करता आलेली नाहीत. या सर्व चांगल्या कामांची गंगोत्री ही सयाजीराव व बडोदा आहे, याचा महाराष्ट्राला विसर तरी पडला आहे, किंवा दुर्लक्ष, उपेक्षा या पद्धतींचा सराव आहे.
1980-85 या काळापर्यंत (पुढे मला अनुभव नाही) बडोद्याच्या रस्त्यावर हायकोर्ट कुठे विचारले, इंजिनियरिंग कॉलेज रस्ता पुसला, तर समोरच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह उमटे. मात्र न्यायमंदिर, कलाभुवन असे म्हटले की लगेच मार्ग दाखवला जाई. परभाषिक शब्द भाषेत यायलाच हवेत, रुळायलाही हवेत, नाहीतर भाषा मृतप्राय होईल. मात्र आपल्या भाषेत उत्तम शब्द असताना उसनवारी कशाला? प्रशासन लोकभाषेत हवे, हा सयाजीरावांचा आग्रह होता. फक्त शिक्षण अनिवार्य, मोफत यावर न थांबता त्यांनी पाठ्यपुस्तक निर्मिती ही तज्ज्ञांच्या देखरेखीत केली. ग्रंथप्रकाशनाला राजाश्रय, बडोदा ओरिएंटल सिरिजमधून अनेक जुने संस्कृत ग्रंथ छापून उपलब्ध केले. नाटक, संगीत यांना बळ दिले. भूगंधर्व रहिमतखां बडोदा संस्थानचे राजगायक. परदेश प्रवास सयाजीरावांनी खूप केला. त्यात ज्या चांगल्या गोष्टी आढळल्या (प्राणी संग्रहालय, म्युझियम- भारतात पहिली ‘ममी’ त्यांनी आणली) त्या आपल्या संस्थानात आवर्जून आणल्या.
जमीन मोजणी, शेतसारा नव्याने शास्त्रीय पातळीवर आणला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या नररत्नाला हेरून परदेशी शिक्षणासाठी पाठराखण केली. रियासतकार सरदेसार्इंचे मोठे काम बडोदा संस्थानच्या सेवेत असताना झाले. बडोद्यालाही ‘वेदोक्त’ प्रश्न उद्भवला होता. नरहर कुरुंदकरांच्या शब्दांत, ‘‘तो प्रश्न त्यांनी राजाच्या दिमाखात सोडवला.’’ रस्ते, रेल्वे, पेयजल, इमारती, प्रशासन लोकोपयोगी-लोकाभिमुख करण्यासाठी संस्थात्मक उभारणी अत्यावश्यक, हे हेरून राज्यात संस्था उभारल्या.
हे करत असताना अडचणी आल्याच. कुठल्याही साम्राज्याला साम्राज्यात माणसे लोकप्रिय होणे हा धोका वाटतो. त्यामुळे सयाजीरावांवर, विश्वासू माणसांवर, गुप्त पाळत, आरोप असे सर्व झाले. सावध असल्याने ते कुठे अडकले नाहीत, पण त्रास सहन करावा लागलाच.
सयाजीरावांच्या सर्व उपक्रमांची चर्चा करणे इथे जागेअभावी शक्य नाही. मात्र हे नोंदणे आवश्यक आहे की, संस्थानी मुलखात आधुनिकीकरण, नवा विचार, संस्था निर्माण, सांस्कृतिक विश्व, कला, लोकाभिमुख कारभार, चोख प्रशासन या व अशा अनेकानेक क्षेत्रांत जी कामे झाली, त्या प्रत्येक बाबीत अग्रदूताचा मान सयाजीरावांचा आहे. हे नजरेआड करण्यात आजच्या महाराष्ट्राला काय लाभ वा सुख मिळते, हे सयाजीरावांना अनुल्लेखाने दुर्लक्षित करणारेच जाणोत.
या पार्श्वभूमीवर बाबा भांड यांच्या सयाजीचरित्राकडे पाहायला हवे. प्रथम भांड यांनी या खर्‍याखुर्‍या ‘जाणत्या राजा’ला केंद्रस्थानी ठेवत कादंबरी लिहिली. ती स्वीकारली गेली, आवृत्त्या निघाल्या. मात्र ऐतिहासिक कादंबरीत कर्तृत्व घटना रचून सांगावे लागते. साहजिकच निवड आली. चरित्रात बरेच काही मांडता येते. ही गरज जाणवूनच बहुधा भांड यांनी कादंबरीनंतर चरित्राला हात घातला.
हे पुस्तक ‘अ‍ॅकॅडॅमिक’ पद्धतीने लिहिलेले नाही. सामान्य वाचक डोळ्यासमोर ठेवून हे लिखाण झाले आहे. त्या प्रजाहितदक्ष राजाच्या व्यापक कार्याचे दर्शन घडवण्यात लेखक ‘यशस्वी’ झाला आहे. सयाजीरावांचे हे काही पहिलेच चरित्र नाही. त्यांची भाषणे पूर्वीच छापली गेली. त्यांच्या महत्त्वाच्या राजाज्ञांचे खंड भांड यांनीच प्रकाशात आणले आहेत. संदर्भ ग्रंथांची यादी, जीवनपटातल्या महत्त्वाच्या घटना क्रमानुसार नोंदणे, वंशवृक्ष, बडोदा संस्थानचा नकाशा अशी आवश्यक ती परिशिष्टे आहेत. हा नकाशा मात्र फार अस्पष्ट छापला गेला आहे, जो पुस्तकाच्या छपाईशी विसंगत आहे. पुस्तकावरून संपादकीय हात फिरला असता तर बरे झाले असते. पृ. 16वर ‘घर खाऊन-पिऊन सुखी होते.’ असे म्हटल्यावर पृ. 19 व 38वर ‘अठराविश्वे दारिद्र्य’ कसे अवतरले? पान 25 वर ‘व्हाईसरॉय, गव्हर्नर, बादशाह यांच्या भेटीचे प्रसंग वारंवार येत’ असे म्हटले आहे. हे शक्य नाही. या भेटी तुरळकच राहणार. पान 44वर ट्रॅक्टरचा उल्लेख आहे, तो कालविसंगत वाटतो. राक्षरभुवनची लढाई पानिपत (1761) नंतरची. ती 1720 मध्ये कशी येणार? असो. या त्रुटी खटकल्या तरी सयाजीरावांचे एक वाचनीय चरित्र भांड यांनी मराठी वाचकांच्या हाती दिले, हे श्रेय त्यांचे राहणारच.
नव्याने ब्रिटिश म्युझियममध्ये उपलब्ध कागदपत्रे, बडोदा संस्थानचे पुराभिलेखागारातले कागदपत्र हे सर्व वापरून सखोल संशोधनातून सयाजीरावांचा अभ्यास मांडायला अजूनही वाव आहे, तशी गरजही.

लोकपाळ राजा सयाजीराव
लेखक : बाबा भांड
पृष्ठ संख्या : 240
प्रकाशक : साकेत प्रकाशन, औरंगाबाद
किंमत : रु. 200/-