आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेदखलपात्र बारबाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारबाला प्रामुख्याने बंगाल, नेपाळ, राजस्थान, कर्नाटक या भागांतून येतात. बेलिया, पाछडा, राजनाथ या समाजातील निरक्षर अशा या स्त्रियांचे नाच व लोकांची करमणूक करणे, हे पारंपरिक काम होते. यांच्या घरातील पुरुषांनी काहीही काम न करता बसून खाण्याची प्रथाही प्रचलित होती. राजस्थान व उत्तर प्रदेश सरकारला प्रथेच्या नावाखाली बारबालांच्या प्रश्नाची दखल घ्यावी वाटत नाही. महाराष्ट्रात मात्र कोल्हाटीण व देवदासी स्त्रिया हे काम परंपरेने करीत असतात. पण सामाजिक संस्थांच्या आंदोलनामुळे हे प्रमाण कमी झाले आहे. बारबालांचे अकराव्या, बाराव्या वर्षी लग्न होते. नंतर नवरा त्यांना विकतो किंवा सोडून देतो. काही वेळा नवर्‍याच्या संमतीने त्या हा व्यवसाय करतात. वयाच्या पंधरा वर्षापासून बत्तीस वर्षापर्यंत हा व्यवसाय त्या करू शकतात. मुंबईत मंगळुरू व बंगळुरूच्या शेट्टी लोकांचे तसेच राजकीय लागेबांधे असलेल्या लोकांचेही बार आहेत. पिक-अप पॉइंट व सर्व्हिसबार असे बारचे दोन प्रकार आहेत. बारमध्ये कमीत कमी वीस व जास्तीत जास्त चाळीस बारबाला असतात. पिक-अप पॉइंट बारमध्ये संगीत व भरपूर उजेड असतो. बारबाला ग्राहकाला बिअर, व्होडका, ज्यूस, लंच, डिनर अशी सेवा देतात. ग्राहकाने आग्रह केला तर जवळ बसून कंपनीही देतात. या बारबाला रिक्षातून येतात. रिक्षावाल्याचे पैसे बारमालक देतो. काही मुली समूहाने दहा-पंधरा जणी मिळून सुमोमधून येतात. सुमोवाल्याचे भाडे बारमालक देतो. बारमालक पूर्वी बारबालांकडून 30 टक्के वसूल करायचा, आज 40 टक्के घेतो. 1000 रुपयांतील 400 रुपये तिला बारमालकाला द्यावे लागतात. डान्सबार बंद झाले, पण ग्राहकांच्या आग्रहावरून चोरून बारबाला डान्स करतात. बारला जोडूनच खोल्या असतात. तिथे बारबाला शरीरविक्रय करतात. सर्व्हिसबार या प्रकारामध्ये पूर्ण अंधार असतो. ग्राहकाला आपली ओळख लपवायची असते. प्रत्येक टेबलाला पार्टिशिन असते. बारबाला येथे दारू पुरवते. शारीरिक लगटही तिला सहन करावी लागते. अनेकदा शरीरसंबंधासाठी ग्राहक रूममध्ये घेऊन जातो.

बारबाला क्लायंट व पार्टनर या दोघांनाही सेवा देतात. क्लायंट पैसे देतात. पार्टनर लग्न न करता घरीच येऊन राहतो. बारबालेला सुरक्षितता हवी असते. भावनिक आधार व प्रेम हवे असते. त्यामुळे पार्टनर तिच्या घरी राहतो. नवर्‍यासारखी ती त्याची सर्व सेवा करते. जेवण, दारू पुरवते. खर्चाला पैसे देते. शरीर पुरवते. एकदा स्त्री मुक्ती संघटनेच्या कौटुंबिक सल्ला केंद्रात मनीषा आली. तिच्या आई-वडलांनी तिला वयाच्या तेराव्या वर्षी या धंद्यात ढकलले. पहिल्या शरीरसंंबंधाला ‘सील तोडणे’ असे या धंद्यात म्हणतात. गिºहाईक पन्नास हजार रुपयापर्यंत पैसे देतात. मनीषाला सातव्या महिन्यापर्यंत ती गरोदर असल्याचे कळले नाही. त्यामुळे गर्भपात करता नाही आला. मुलगी झाली. आज ती नऊ वर्षांची आहे. मनीषाने तिला वडलांचे नाव दिले आहे. डोंबिवलीला शिक्षक असलेला एक गृहस्थ तीन वर्षे मनीषाकडे तुझ्याशी लग्न करतो, म्हणून राहिला. महागडा मोबाइल, अंगठी, कपडे, लॅपटॉप, मित्राबरोबर पार्ट्या असे जवळजवळ दहा लाखांपर्यंत मनीषाने या शिक्षकावर खर्च केले. नंतर त्याचे गावाकडच्या मुलीशी लग्न ठरवले. दोघींनाही सांभाळीन, असे प्रौढीने सांगत होता. स्थानिक नगरसेवक व विरोधी पक्षनेते या शिक्षकाची बाजू घेऊन भांडत होते. मी अशा 26 बारबालांना हाताळतो, असे नगरसेवक म्हणाले. एक लाख रुपये देऊन माझा हिच्याशी काही संबंध नाही, असे लेखी लिहून घेऊन शिक्षकाने आपली सुटका करून घेतली...

बारबालांचा असा मोफत वापर पोलिस, वेटर, बारमालक, सरकारी अधिकारी करून घेतात. ती स्वत:च्या कामासाठी गेली की आधी फोन नंबर घेतात व मगच काम करतात. एका रेशनिंग अधिकार्‍याने फोन नंबर मागितला. बारबालेने नंबर दिला व ‘अलर्ट इंडिया’कडे तक्रार केली. मग संस्थेने त्या अधिकार्‍याचा पर्दाफाश केला. नातवंड असलेल्या एका वृद्ध गृहस्थांनी आपली खोली बारबालेला भाड्याने देऊन तिचा नियमित वापर केला. बारबालांशी करार करून त्यांना दहा दिवसांसाठी गोवा, बंगळुरू, राजस्थान या ठिकाणी नेले जाते. कमाई भरपूर होते, पण शोषणही खूप होते. अठरा वर्षांची एक बारबाला गोव्याहून पहाटे पळून आली. तिला चालताही येत नव्हते. रिक्षावाल्याला हात केल्यावर त्याने खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला, मग स्टेशनला सोडले.

बारवर अनेकदा धाड पडते. बांगलादेशी व कमी वयाच्या मुलींची गुन्ह्याखाली नोंद करता येते. पोलिस रीतसर कोर्टात केस न नोंदवता पैसे घेऊन सोडून देतात. यात इतर मुलींकडूनही पैसे घेऊन हात धुऊन घेतात. बारबालांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रमाण पाच टक्केही नाही. त्यांना गावी पाठवले जाते. खर्चासाठी गावी पाठविले जाते. पस्तिशीनंतर तिची मिळकत काहीही असणार नाही, हे माहीत असूनही तिच्याकडून बचत होत नाही. सर्व पैसा पार्टनरवर किंवा स्वत:च्या चैनीवर खर्च होतो. यातील 95 टक्के महिला दारू पितात. बेशरम व्हायचे असेल तर दारू प्यावीच लागते, असे एक बारबाला म्हणाली. पार्टनर असणे ही त्यांची भावनिक गरज असते. याचा फायदा पार्टनर घेतो. गर्भपाताचे प्रमाण खूप आहे. हा गर्भपातही खासगी, बेकायदेशीर दवाखान्यात जाऊन करावा लागतो. ब्ल्यू फिल्ममध्ये एका तासाला पन्नास हजार मिळतात, त्यामुळे तिकडेही बारबाला वळतात. चाळिशीनंतर गावी जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. काही बांगलादेशी बारबाला आपल्या गावातील मुलींना या धंद्यात ढकलून कमिशन घेतात.

‘अलर्ट इंडिया’ ही संस्था एचआयव्हीच्या प्रश्नांवर काम करते. या संस्थेने 2005मध्ये ‘आस्था’ या नावाने बारबालांच्या प्रश्नांवर काम करायला सुरुवात केली. या महिलांना एचआयव्हीपासून वाचविणे हे उद्दिष्ट ठेवून ही संस्था काम करू लागली. या बायकांमध्ये हे प्रमाण घटले की सर्व समाजातही हे प्रमाण कमी होईल, असे संस्थेला वाटले. सुरुवातीच्या काळात बारबालांमध्ये एचआयव्हीचे प्रमाण 20 टक्के होते. ते आज एक टक्क्यावर आले आहे, असे ‘अलर्ट इंडिया’च्या समन्वयक डेझी गांगुर्डे सांगतात. याचबरोबर आरोग्यसुविधा देणे, समुपदेशन करणे, मुलांना शाळेत किंवा वसतिगृहात दाखल करण्यासाठी मदत अशी कामे संस्थेमार्फत केली जातात. या महिलांना चॉकलेट बनविण्याचे प्रशिक्षणही संस्थेने दिले आहे. वस्तीत किराणा मालाची दुकाने काढण्यास संस्थेने मदत केली. पण अनेकांनी त्यांच्याकडून माल उधार घेतला, पण पैसेच दिले नाहीत. सरतेशेवटी दुकाने बंद करावी लागली. अर्थात, या परिस्थितीतही बारबालांची काही मुले आज दहावी, बारावी झाली आहेत. एका मुलीला संस्थेने डिप्लोमाला प्रवेश मिळवून दिला आहे.

मुंबईतील कामाठीपुरा व लालबत्ती भागात प्रीती पाटकरांच्या माध्यमातून ‘प्रेरणा’ ही संस्था गेली 26 वर्षे काम करीत आहे. बारमधून सुटका झालेल्या अल्पवयीन मुलींना भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे प्रशिक्षण, तसेच केटरिंग, फॅशन डिझायनिंग, हाउसकीपिंग, ब्यूटीपार्लरचे प्रशिक्षण दिले जाते.

एकूण, बारबाला प्रयत्नपूर्वक मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु बारबालांचे आज जे शोषण होत आहे, त्यामागे समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. बारबाला ही स्त्रियांच्या शोषणाची जागा आहे. पुरुषप्रधान समाजात पुरुषच तिला बाजारात बसवून लग्नसंस्थेच्या बाहेर ठेवून शोषण करतो. त्यामुळेच असहाय, फसलेल्या, फसवलेल्या, काहीच मार्ग नसलेल्या अशा या बारबाला आपल्या समाजातून बेदखलपात्र झाल्या, तर आश्चर्य नाही!
vamagdum@gmail.com