आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष लक्ष पांडुरंग सांगवीकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेमाड्यांच्या ‘कोसला’ने मराठी साहित्यात हाहाकार उडवून पन्नास वर्षे झालीत. पण ‘कोसला’च्या बॉम्बचा स्फोट कालच झाला, असंच वाटतं. या साहित्यिक स्फोटातून सावरू न शकलेली, चकित मराठी संवेदनशीलता पन्नास वर्षांनंतरसुद्धा या परात्मभावी कादंबरीला आधुनिकतेचा माइलस्टोन मानते.
मराठी साहित्याच्या बहुसांस्कृतिक जगात कुठल्याही एका गोष्टीच्या ग्रेटपणाबद्दल सहमती होणं कठीण, पण ती ‘कोसला’च्या वाट्याला आली. नेमाड्यांचं हे यश बंपर आहे. जो चेक्सचं बुशशर्ट घालतो आणि ज्याच्या भल्या मोठ्या मिश्या आणि कुरळे केस आज पांढरे झाले आहेत, त्या ‘कोसला’च्या अँटी हीरोचं, पांडुरंग सांगवीकरचं ‘कोसला’च्या गोल्डन ज्युबिलीच्या निमित्ताने अभिनंदन! पोस्टमॉडर्न काळात असं यश कुठल्याही मराठी लेखकाच्या वाट्याला परत येणे नाही! बहुसंपर्कशील ग्लोबलाइज्ड जगात नवसंपर्क टाळून आपल्या गावी परतून जाणारा आणि तिथे कंटाळ्याचं अध्यात्मशास्त्र रचणारा पांडुरंग सांगवीकरही परत होणे नाही!
पांडुरंग सांगवीकर हिट झाला, याचं एक कारण त्याची बिनधास्त भाषा. ही भाषा ‘ग्रांथिक’ नव्हती. ती ‘बोली’ म्हणजे ‘लिंगो’ होती. तिचं कौतुक जसं पन्नास वर्षांपूर्वीच्या कॉलेजकुमारांना होतं, तसंच ते आजच्या टेक्नोसॅव्ही तरुणांनासुद्धा वाटू शकतं. टारगट पांडुरंग गंमत करता करता सपकन एखादं गंभीर विधान करतो. ‘कोसला’ पूर्वी मराठी कादंबरी कडक इस्त्रीच्या कपड्यात वावरत होती, ‘कोसला’नंतर ती टी-शर्टमध्ये वावरू लागली. ‘कोसला’ आपण वाचत नसतो, ती आपल्याशी बोलते. पांडुरंग वाचकाशी दोस्त होऊन बोलतो. पण हा दोस्त नसनखवड्या म्हणजेच माणूसघाण्या वृत्तीचा आहे. इतका की, लाडात पडलेल्या मैत्रिणीला-बुंदीला-तो थंडपणे सिगरेटचा चटका देऊन तिच्यापासून स्वत:ची सुटका करतो.
पांडुरंगने मराठी कादंबरीला परात्मभावी निवेदनशैलीचा आद्य साचा पुरवला. त्याला अनुसरून किमान दहा-वीस मराठी लेखकांनी गेल्या पन्नास वर्षांत प्रथमपुरुषी आत्मचरित्रात्मक स्वराच्या कादंबर्‍या लिहिल्या. ‘कोसला’च्या नसनखवड्या जीवनदृष्टीच्या (world view) जवळ जाणार्‍या इतर मराठी कादंबर्‍या म्हणजे, भाऊ पाध्यांची ‘बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर’, विलास सारंगांची ‘एन्कीच्या राज्यात’ आणि शशांक ओकची ‘अमूकचे स्वातंत्र्य.’
आपल्या अस्तित्वाचं नेमकं काय करावं? या संभ्रमातून लिहिल्या गेलेल्या या काही प्रातिनिधिक मराठी कादंबर्‍या कंटाळ्याचं आणि निरर्थकतेचं सौंदर्यशास्त्र रचणार्‍या ‘कोसला’च्या अ‍ॅलिनिएशनवादी बहिणी आहेत. स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यातल्या अस्तित्ववादाचा स्रोत अर्थातच पाश्चात्त्य आहे. औद्योगिकीकरणानंतर पण जागतिकीकरणापूर्वी मराठीसहित जगभराच्या साहित्यात परात्मभावी कादंबर्‍यांचं पेव फुटलं होतं.
व्यवहार्य जग ‘भंपक’ आहे, हे म्हणणारा पांडुरंग जगाशी एकरूप होत नाही. मानसशास्त्राच्या भाषेत याला ‘मालअ‍ॅडजस्टमेंट’ म्हणतात. वाढाळू वयात हा दुजाभाव नैसर्गिक असतो. निसर्गरम्य सांगवीत वाढलेला पांडुरंग पुण्यात शिकायला येतो. पण तिथे तो रमत नाही. कारण पांडुरंग वृत्तीने पराकोटीचा व्यक्तिवादी, रोमँटिक आणि उपरा (outsider) तरुण आहे. मी कोणाचा नाही; कोणी माझा नाही, हा वांझोटा वैताग पांडुरंगच्या वाट्याला आला आहे. हा वैतागी मूड पांडुरंगचं तत्त्वदर्शन म्हणून पुढे येतो. ज्या अस्तित्ववादी (existentialist) स्कूलला प्रमाण मानून ‘कोसला’ लिहिली गेली, त्यानुसार ‘लेखकाची मन:स्थिती (psychology) हेच त्याचं तत्त्वदर्शन (philosophy) ठरतं.
भक्तिपरंपरेवर धष्टपुष्ट झालेल्या अभिजात मराठी साहित्यात एकात्मभावाचं कोण कौतुक. ‘कोसला’ने नेमका या विरुद्ध परात्मभावाचा जागर केला. हे तेव्हा अतोनात आधुनिक होतं म्हणून ‘कोसला’ क्रांतिकारी ठरते. ‘बापाच्या सत्तेला आदर द्यावा’ या पारंपरिक महासत्याकडे (grand narrative) पांडुरंग संशयाने बघतो. ‘कोसला’तला हा रांगडा बाप संयुक्त कुटुंबसंस्थेतल्या हुकूमशहा बापाचं प्रतीक आहे. त्याच्याकडून पांडुरंग स्वत:च्या शिक्षणासाठी फी वसूल करूनही त्याची भरपूर भंबेरी उडवतो.
बापच नव्हे तर एकूणच पितृसत्ताक समाजातल्या व्यवहार्य जगण्याची, पोस्टमॉडर्न परिभाषेत सांगायचं झालं तर, पांडुरंग सांगवीकर 1963मध्ये विरचना (deconstruction) करतो. बाप फक्त शिस्तच लावत नाही; तर तो दमनसुद्धा करतो, असं हे ‘डिकन्स्ट्रक्शन’ आहे. हे पन्नास वर्षांपूर्वीच नाही, तर आजही नवं आहे. शिस्त आणि दमनाचा परस्पर संबंध ट्रजिकच असतो.
साने गुरुजींनी प्रसृत केलेली सुबोध निरागसता (innocence) जपण्यासाठी रोमँटिक प्रवृत्तीचा भटका पांडुरंग आटोकाट प्रयत्न करतो. निरागसता हे मूल्य एक बौद्धिक संकल्पना आहे, ते वास्तव असूच शकत नाही, हे पांडुरंगला न कळलेलं वास्तव ग्लोबलाइज्ड जगातल्या लाखो पांडुरंगांना कळलं आहे. ‘कोसला’च्या गोल्डन ज्युबिलीच्या निमित्ताने औद्योगिकरणोत्तर पांडुरंग सांगवीकरचा जागतिकीकरणोत्तर पांडुरंगांशी झालेला गमतीदायक विरोधाभास लक्षात घ्यावा लागतो.
ग्लोबलाइज्ड जग निरागस नाही, ते व्यवहार्य (pragmatic) आहे. पांडुरंग सांगवीकरचं जग रम्य होतं. तिथे सांगवी आणि पुणं हे दोनच जगण्याचे प्रदेश होते. ग्रामीण आणि शहरी हे दोनच संवेदनशीलतेचे अवकाश होते, ‘भंपक’ आणि ‘सच्ची’ अशी दोनच प्रकारची मानसिकता होती. नवोत्तर जगात ही सुगम द्वंद्वात्मकता लोप पावून त्या ऐवजी बहुसंस्कारित जगण्याच्या व्यामिश्र प्रेरणा आणि सांस्कृतिक अवकाश निर्माण झाले आहेत.
परस्पर सामाजिक संपर्क वाढल्यानंतर व्यक्तिवादी रोमँटिक प्रेरणांची कोंडी होते. आज महाराष्टÑातल्या खेडेगावांतून आय.टी.च्या जगात भविष्य शोधायला आलेल्या लाखो पांडुरंगांना भटक्या प्रवृत्तीची किंवा परात्मभावाची ऐश करणं परवडणारं नाही. एकविसाव्या शतकातले लाखो पांडुरंग त्यांच्या अंधार्‍या तालुक्यांमधून कसंही करून बाहेर पडून शहरातल्या सोडियम व्हेपर लँप्सच्या लालसर प्रकाशात वावरायला उतावळे झाले आहेत. हे स्वाभाविकच नव्हे तर सामाजिक न्यायाचंसुद्धा आहे.
जुना पांडुरंग भटक्या होता. नवे पांडुरंग टुरिस्टस् आहेत. जुना पांडुरंग सांगवीकर कंटाळ्याने पीडित आहे. नवे पांडुरंग शहरी गमतीजमतीच्या शक्यतेमुळे अतोनात एक्साइट झाले आहेत. जुना पांडुरंग जगण्याचा पेला अर्धा रिकामाच आहे, असं म्हणून कुढला होता; तर नवे पांडुरंग जगण्याचा अर्धा पेला भरलेला आहे आणि प्रयत्न केला तर तो पूर्ण भरेल, याची खात्री बाळगून आहेत. जुना पांडुरंग परात्मभावी होता. नवे पांडुरंग आनंदवादी आहेत. जुना पांडुरंग मुलींशी एकूण फटकून वागणारा होता, नवे पांडुरंग खिशात कंडोम बाळगणारे आहेत.
पन्नास वर्षांच्या पिशवीत पाचशे वर्षांचे आर्थिक आणि सांस्कृतिक बदल कोंबून भरले की जुने पांडुरंग ऐतिहासिक किंवा पौराणिक वाटू लागतात. नवे, म्हणजे पोस्टमॉडर्न पांडुरंग शहरोशहरी ‘हिरो होंडा’ आणि ‘पल्सर्स’वर भरार वेगाने इकडून तिकडे पळताना दिसतात. पोस्टमॉडर्निझमचा फंडा असा, की पांडुरंग सांगवीकरची ती ‘इनफॉर्मल’, ‘चॅटी’ भाषा आजही टिकून आहे. भाषेच्या बाबतीत नेमाड्यांनी पन्नास वर्षांपूर्वी मराठी साहित्याला एकदम शंभर वर्षे पुढे नेऊन ठेवलं. मात्र नव्या जगात पांडुरंग सांगवीकरचा परात्मभावी मूड गैरलागू झाला आहे.
पन्नास वर्षांपूर्वी उतरंडीच्या समाजात शीर्षस्थानी राहणारा पाटलाचा एकुलता एक मुलगा पांडुरंग आपल्या खेडवळ मित्रांना मागे सोडून एकटाच पुण्यात शिकायला आला होता. पोस्टमॉडर्न म्हणजेच आडव्या (horizontal) समाजात उच्च शिक्षणाचं लोकशाहीकरण झालं आणि लोकशाहीचं सार्वत्रिकीकरण झालं. म्हणून नव्या पांडुरंगांसोबत त्यांचे गावाकडले सवंगडीसुद्धा मुंबई-पुण्याला बी.ए. सारख्या स्वप्नाळू पदव्या नव्हे; तर बी.बी.ए., बी.सी.ए., एम.सी.ए., एम.बी.ए. सारख्या उपयुक्त पदव्या हस्तगत करायला येऊ लागले आहेत. एकविसाव्या शतकात पांडुरंगाच्या या नवशिक्षित सवंगड्यांची संख्या वाढत जाणार आहे.
‘काही झालं तरी हे आपल्याला खुंट्यावर आणून वगैरे बांधतीलच. मग नेमकं अगोदरच खुंट्यावर येऊन उभं राहिलेलं बरं’ असं 1963मध्ये हताश पांडुरंग म्हणू शकत होता. पण आय.टी.प्रवीण, कॉम्प्युटरकुशल पांडुरंगांच्या नव्या पिढीला खुंट्यावर कोणी आणून बांधतील, याची भीतीच नाही. काल सांगवी, आज पुणं, उद्या बंगळुरू, तर परवा कॅलिफोर्निया असा पोस्टमॉडर्न काळातल्या लक्षलक्ष पांडुरंगांचा भ्रमणमार्ग आहे.
काहीही असो, ‘कोसला’चा पांडुरंग सांगवीकर सच्चा पण स्वप्नाळू होता. लक्षलक्ष नवे पांडुरंग स्मार्ट आणि व्यवहारी आहेत. ‘टाइम्स, दे आर अ चेंजिंग...’ असं नवे पांडुरंग जुन्या पांडुरंग सांगवीकराला डिस्कोथेकमध्ये नाचत सांगताहेत. ‘कोसला’चा पांडुरंग ‘विलेज’मधून पुण्यात आला होता, ‘ग्लोबल विलेज’मधून नाही; हे लक्षात ठेवलं तर ‘कोसला’ आजही एक ऐतिहासिक कादंबरी म्हणून समजून घेता येते.
(vishram.sharad@gmail.com)