आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडखोर व्रतीची आई

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्रती चॅटर्जीची आई, ‘हजार चौरासी की माँ’ (1998) या चित्रपटाची नायिका (जया बच्चन) आहे. वीस वर्षांचा व्रती चॅटर्जी (जॉय सेनगुप्ता) हे तिचं सर्वात धाकटं अपत्य.
मध्यरात्री केव्हा तरी फोन वाजू लागतो. ती फोन उचलते. ‘‘दिव्यनाथ चॅटर्जींचं घर? घरात कोणी पुरुष माणूस नाही का?’’ पलीकडून विचारणा होते. ती म्हणते, ‘‘सगळे झोपले आहेत. मी मिसेस चॅटर्जी.’’ ‘‘व्रती चॅटर्जी तुमचा कोण लागतो?’’ ‘‘मुलगा माझा. काय झालंय?’’ ‘‘तुम्हाला कांतापुकुरला यावं लागेल. ओळख पटवायची आहे.’’ तिला काहीच कळत नाही. अशुभाची चाहुल मात्र जाणवते...

‘‘1084 नंबरच्या प्रेताची ओळख पटवायची आहे.’’ पलीकडून आवाज येतो. कांतापुकुर हे कलकत्त्यातलं मुर्दाघर आहे, हे तिला नंतर कळतं. व्रतीचे वडील दिव्यनाथ चॅटर्जी तिथे तिला गाडी नेण्याची परवानगी देत नाहीत. कारण, पोलिस मुर्दाघराबाहेर आपली गाडी दिसणं, म्हणजे आपल्या प्रतिष्ठेला बाधा येणं. व्रतीचे वडील, भाऊ कुणीच ओळख पटवायला येत नाहीत. आई सुनेसह तिथे जाते. ओळीनं पाच तरुणांची प्रेतं मांडलेली असतात. पायाच्या अंगठ्यात नंबर अडकवलेला असतो. 1084! ती छातीवरच्या बुलेटच्या जखमा बघते. चेहरा ओळखण्याच्या पलीकडे गेलेला असतो, तरीही हे आपलंच मूल - ती ओळखते. मटकन खालीच बसते.

उच्चभ्रू चॅटर्जींच्या घरातला धाकटा मुलगा नक्षलवादी म्हणून मारला गेलेला असतो. दुसर्‍या दिवशी सकाळी वडील, भाऊ वृत्तपत्रात मारल्या गेलेल्या तरुणांमध्ये व्रतीचा उल्लेख नाही ना, ही खात्री करून सुटकेचा नि:श्वास सोडतात. त्यांची धडपड कामी आलेली असते. त्या मुलाला जन्म देणारी आई मात्र हतबुद्ध होते. या घरातल्यांना त्याच्या मरणाचं काहीच कसं नाही? त्यांना आपली प्रतिष्ठाच जपायची आहे? त्याच्याशी आपलं नाव जोडलं जायला नको आहे त्यांना. आपला मुलगा नक्षलवादी कारवायांमध्ये मारला का जातो? त्याला घरी आणून त्याचा अंत्यसंस्कारही करता येत नाही, ते का? बेनाम होऊन 1084 क्रमांक म्हणूनच त्याचा दाहसंस्कार होतो? आपलं मूल आणि त्याच्या वीस वर्षांच्या आयुष्यात एवढं सगळं घडत असलेलं आपल्याला माहीतच नाही? आपल्या शरीराचा कोंब हा. त्याचा श्वासन्श्वास आपल्या परिचयाचा आहे, असं आपल्याला वाटत असताना त्याच्यावरचं संकटही आपल्याला जाणवलं नाही?
एक विलक्षण तडफड व्रतीच्या आईच्या रूपानं आणखी कितीतरी पटींनी इथे तीव्र होते. कारण ती आई असते, आणि तिच्या मुलाच्या मृत्यूला एक व्यापक परिमाण असतं. नक्षलवादी चळवळीचं परिमाण, व्यवस्थाविरोधी क्रांतीचं परिमाण. आणि ती आई असते केवळ आई! उच्चभ्रू कुटुंबातली गृहिणी, बँकेत नोकरी करणारी सुशिक्षित स्त्री, पण बाहेरच्या जगात व्यवस्थाविरोधी असंतोष धगधगतो आहे, तरुण मुलं त्या असंतोषाविरुद्ध पेटून उठत आहेत, विषमता जोपासणारी ही भ्रष्ट व्यवस्था उलथून टाकायचं स्वप्न ती बघत आहेत आणि त्यासाठी जिवाची बाजी लावायला निघाली आहेत, तसेच क्रूर व्यवस्था त्यांच्या जिवावर उठली आहे, या कशाची तिला कल्पनाच नाही. तिला ओळखीचं आहे ते गोड हसणारं आपलं शेंडेफळ. त्याचं घरात आईशिवाय इतर कुणाशीच पटत नाही. वडलांशी तर सतत वादच होतात. सुखलोलुप वडील व्यवस्थेची बाजू घेणारे, ‘सब अपनी अपनी हैसियत के मुताबिक बेईमानी करते हैं, रिश्वत लेते हैं।’ म्हणून भ्रष्टाचाराची तरफदारी करणारे. तर मुलगा व्यवस्थेतल्या अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध लढू पाहणारा. आईला त्याच्या बोलण्यातलं क्लास, व्हॅल्यूज वगैरे काही कळत नाही. पण त्याचा जीव घेणार्‍या जीवघेण्या वातावरणात तो जगतो आहे, याची कल्पनाच तिला येत नाही. परंतु 1084 क्रमांकाच्या प्रेताची ओळख पटवायला तिला बोलावलं जातं आणि तिच्यापुढे सत्य अक्राळविक्राळ रूप घेऊन उभं राहतं. म्हणजे, आपल्याला आपलंच मूल कळलंच नव्हतं? हजार चौरासीच्या आईची व्यथा समजून घ्यायला जरा मागे जावं लागेल. आज वृत्तपत्रांतून नक्षलवादी हिंसेच्या ज्या बातम्या येत असतात, त्यावरून तिला समजून घ्यायचं म्हटलं, तर नवी पिढी भलतेच गैरसमज करून घेईल. 1970च्या दशकाच्या सुरुवातीला नक्सलबारीमधून जमीनदारी व्यवस्थेद्वारे चालू असलेल्या शोषणाविरुद्ध शोषितांनी उठाव केला, व्यवस्थेतल्या भ्रष्टाचाराविरुद्ध शहरांतले (विशेषत: बंगालमधले) सुशिक्षित तरुण मार्क्स आणि माओच्या साम्यवादी तत्त्वज्ञानानं भारले जाऊन, अभावग्रस्तांसाठी क्रांतीचं हत्यार उचलते झाले. तरुण होते, वास्तवाचं पुरतं भान नव्हतं, पण त्यांची उद्दिष्टं स्वच्छ होती. ‘हजार चौरासी की माँ’च्या उत्तरार्धात व्रतीची मैत्रीण अणि सहकारी नंदिनी (नंदिता दास) हिच्या बोलण्यात क्रांतीच्या विचारानं भारून जात केलेल्या चुकांचं भानही येतंच. मात्र, परिवर्तनासाठी नवे मार्ग चोखाळण्याला तेव्हाही तिची तयारी आहेच. महाश्वेतादेवींच्या या कथेचा काळ हा असा आहे. आज लागलं आहे ते वळण ‘नक्षलवादा’ला त्या वेळी लागलेलं नव्हतं. महाश्वेतादेवी केवळ लेखिका नव्हेत. त्या व्यवस्थेविरुद्ध लढ्यातल्या सक्रिय सैनिक राहिल्या आहेत. आदिवासी भागात जनजागृती करत आल्या आहेत. त्यांच्या भूमिकेला आणखी एक परिमाण आहे ते त्यांच्या वयाचं, त्यांच्या स्त्रीत्वाचं, मातृत्वाचं. कार्यकर्त्यांच्या त्या आईच आहेत. नेमक्या याच भूमिकेतून त्यांना 1084च्या आईची कथा सांगावीशी वाटली आहे. तिच्या सुजाता या नावाचा उल्लेख फक्त एकदाच येतो. कारण सर्वकाळ - अनंतकाळ - ती असते व्रतीची आईच.

दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी ही कथा पडद्यावर उतरवताना आईच्या स्वगताचा फॉर्म घेतला आहे. संपूर्ण चित्रपट हा व्रतीच्या आईचा स्वत:शी संवाद आहे, स्वत:ला तिचं प्रश्न विचारणं आहे आणि त्या ओघात फ्लॅशबॅकच्या छोट्या छोट्या तुकड्यांतून किंवा कधी-कधी तिच्या वर्तमानातल्या शोधप्रयत्नांतून काही प्रसंग घडताना दिसतात. वडील आणि घरातल्या इतरांशी व्रतीचा विसंवाद आणि वितंडवाद, प्रत्यक्ष तिच्याशी त्याचा संवाद, त्याच्याबरोबरच मारल्या गेलेल्या त्याच्या मित्राच्या - सोमूच्या - आईकडून तिला कळलेला व्रती, सोमू आणि इतर मित्रांच्या कुटुंबांचं अभावग्रस्त जीवन, आपल्यातली आणि त्यांच्यातली दरी, ती जाणवणारा व्रती, नंदिनीकडून समजलेला व्रती आणि नंदिनीकडूनच व्रतीच्या आपल्याविषयीच्या कोमल भावना असा सगळा पट उलगडत जातो. आपल्या मुलाला आपण समजू शकलो नाही, आपण आपलं आई-मुलाचं नातं किती गृहीत धरत होतो, याचं भान तिला हळूहळू येत जातं. दोन प्रसंगांच्या मध्ये पोलिस कस्टडीत टॉर्चरला तोंड देणार्‍या नंदिनीची इन्सर्शन्स येतात, मात्र ती उत्तरार्धात कथेशी अर्थपूर्णपणे जोडली जातात, तसंच आईच्या व्यक्तिरेखेचा पुढचा विस्तार करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तिचंही मन, कधी घरातल्या दांभिकपणात रमलं नव्हतं. जसजसा व्रती तिला कळत जातो तसतशी, तिला या दांभिकपणाची शिसारी येत जाते. मुलीच्या साखरपुड्याचा बेत ठरतो, तो नेमका व्रतीच्या दुसर्‍या स्मृतिदिनी. पण स्मृतिदिन फक्त आईला. बाकीचे आपल्या दांभिक जल्लोषात मग्न. आजवर मुकाट्यानं सहन करत आलेली आई, इथेच ‘व्रतीच्या आई’ला शोभावं असं बंड करते.
वयाच्या पुढच्या टप्प्यांवर आई बदलत गेलेली आहे. समाजोन्मुख होत ती आता मानवाधिकारांसाठी लढू लागली आहे. पंचवीस वर्षांनी व्रतीच्या मित्राचा - तिच्याबरोबरच काम करणार्‍या नीतूचा-तिच्यादेखत भर रस्त्यात गुंड खून करतात, तेव्हा तीच जिवाची पर्वा न करता त्या गुंडाला पकडते. आपण आपल्या मुलाला ओळखलं नाही, या अपराधाची बोच संपते! आपल्या स्मृतिरूप उरलेल्या मुलाशी ती संवाद साधते, ‘‘तुम्हे अपना बेटा नहीं मानती अब. एक साथी, एक कॉम्रेड, एक दोस्त... तुम्हारे सपने की साझीदार हूँ मैं. जितना आगे बढ़ती हूँ उतना ही तुम्हारे पास सरक आती हूँ और तुम मेरे... अन्यायाविरुद्ध ज्या ज्या वेळी काही पाहते, करते, त्या त्या वेळी तुझाच एखादा नवा पैलू दिसतो मला... मैं फिर फिर तुम्हें जन्म देती हूँ और हर बार नया पाती हूँ.’’ एका आईची तडफड समाजाभिमुख होऊन धीर-उदात्त रूपात परिवर्तित होत पुन्हा एकदा नव्या आशावादाला जन्म देते...
(deshrekha@yahoo.com)