आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of Bollywood Corporate Movie Bye Rekha Deshpande

निशी : ‘कॉर्पोरेट’ पटावरचं प्यादं!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘‘कॉल इट हिपोक्रसी. इस सोसायटी और कॉर्पोरेट वर्ल्ड में करिअर-ओरिएण्टेड लड़कियों के लिए कोई जगह नहीं है।’’- कॉर्पोरेट जगतात नव्यानंच प्रवेशणार्‍या मध्यमवर्गीय मेधा आपटेला निशी म्हणते. निशी- कॉर्पोरेट जगातली एक यशस्वी, महत्त्वाकांक्षी, आत्मविश्वासाचं जणू प्रतीक अशी महिला. नुकताच ‘बिझिनेस मॅगझिन’नं जिचा ‘द बेस्ट फीमेल एक्झिक्युटिव्ह’ म्हणून गौरव केला आहे, मेघासारख्या होतकरू मुली जिला आदर्श मानतात, ती निशी हे म्हणते आहे. निशिगंधा दासगुप्ता (बिपाशा बसू) ही मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘कॉर्पोरेट’ या चित्रपटाची नायिका.

‘कॉर्पोरेट’ हा आजच्या अर्थकेंद्रित जगाचा परवलीचा शब्द झाला आहे. ‘कॉर्पोरेट’ म्हणताच व्यवसाय करण्याची एक विशिष्ट आधुनिक पद्धतच नव्हे तर एक विशिष्ट निर्मम विचारसरणी, एक उद्दाम आणि विधिनिषेधशून्य, वेगवान जीवनशैली डोळ्यापुढे येऊ लागते. कारण या कॉर्पोरेट तत्त्वज्ञानाचं लक्ष्य आहे ‘फायदा’. ‘कॉर्पोरेट’ हा चित्रपट याच निर्मम जगताचं चित्रण करतो. आणि त्या सर्व निर्ममतेला अधिकच ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी योजना केली आहे ती नायिकेची. त्यामुळे निशी ही यातली सर्वात महत्त्वाची, केंद्रस्थानी असलेली व्यक्तिरेखा ठरते.

निशीचं पहिलं दर्शन होतं ते वर उल्लेखिलेल्या तिच्या रूपात. ती कारमधून उतरते, ऑफिसमध्ये येते, ती केबिनकडे जात असताना तिची सेक्रेटरी तिला महत्त्वाची माहिती देते, कारण गेले पंधरा दिवस सिंगापूरमध्ये कंपनीचं एक डील करून निशी नुकतीच परतते आहे. केबिनकडे जाता जाता निशी कंपनीचा मालक विनय सहगलला ‘काँग्रँट्स’ही देते. सहगलनं नुकतंच फ्रिस्कॉन या परदेशी कंपनीशी यशस्वीरीत्या टाय अप केलेलं आहे. केबिनकडे जाण्याच्या निशीच्या एवढ्या दृश्यातूनच तिचं कंपनीतलं स्थान कळतं. पांढरा, उंची, कडक सूट, मागे घट्ट बांधलेले केस, मुद्रेवरचा एक कडक, नो-नॉन्सेन्स भाव, देहबोलीतला आत्मविश्वास- अशी कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह निशीची प्रतिमा तत्काळ मनावर ठसते.

मारवाह ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजबरोबरच्या सहगल ग्रुपच्या स्पर्धेत सहगल ग्रुपला विजय मिळवून देण्यात कुशाग्र बुद्धिमत्तेची निशी फार मोठी भूमिका बजावते. मारवाहचा परवेज हा एक्झिक्युटिव्ह एकीकडे तिला आपल्या कंपनीत ओढायचा प्रयत्न करत असतो, त्याचबरोबर तिला स्त्री म्हणूनही व्यक्तिगत पातळीवर गटवायचा प्रयत्न करत असतो, तर निशी त्याचे सगळे डावपेच, त्याचा लंपटपणा ओळखून आहे. ती त्याला दाद देत नाहीच, उलट मारवाह समूहातल्या शर्लीला लाच चारून ती कौशल्यानं त्यांची गुप्त कागदपत्रं मिळवते आणि परवेजवर आणि पर्यायानं मारवाह समूहावर कडी करते.

राज्य सरकारकडून महाराष्ट्र बॉटलिंग अँड कन्फेक्शनरीजसाठीचं टेंडर मिळवण्याची दोन्ही प्रतिस्पर्धी समूहांची धडपड चालू असते. त्यात मारवाहतर्फे परवेज जेव्हा राज्याच्या अर्थमंत्र्याला - गुलाबराव इंगळेला- अर्थ आणि आयटेम गर्ल पुरवून ते टेंडर पास करून घेतो, तेव्हा पुन्हा एकदा निशी नवा डावपेच लढवते. महाराष्ट्र बॉटलिंगच्या प्लांटमधून मारवाहचा बेत मिनरल वॉटर बनवण्याचा नसून मिंट-बेस्ड सॉफ्ट ड्रिंक बनवण्याचा आहे, ही माहिती तसंच त्यांचे मार्केटिंग प्लॅन्स पळवण्यासाठी ती सवाई खेळी करते. ती परवेजला दिल्लीतल्या हॉटेलमध्ये योगायोगानं भेटल्यासारखी गाठते. परवेजच्या लंपटपणाचा स्वत:ला कोणताही स्पर्श होऊ न देता ती कौशल्यानं फायदा घेते, तो एका कॉल गर्लचा वापर करून. जी पार्टी अधिक पैसे देईल तिचं काम कॉल गर्ल करणार. निशी ही प्रतिष्ठित समाजातली महिला, कॉर्पोरेट जगातली अधिकारी व्यक्ती. पण इथे ती आधी कॉर्पोरेट जगातली महत्त्वाकांक्षी अधिकारी व्यक्ती आहे, स्त्री नंतर! कॉल गर्लच्या का होईना, स्त्रीत्वाचा वापर कंपनीच्या आर्थिक फायद्यासाठी करून घेताना तिच्या सदसद्विवेकाला कोणतीही टोचणी लागत नाही.

कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह म्हणून असलेलं तिचं करडं, ताठर, भावहीन, धूर्त व्यक्तिमत्त्व रितेशचा विचार करताच मात्र भावुक, उत्फुल्ल, झोकून देऊन प्रेम करणारं होऊन जातं. किंबहुना निशीची ही दोन रूपं हा या कथेच्या केंद्रस्थानी असलेला गाभाच आहे.

मारवाहशी स्पर्धा अटीतटीची होऊ लागलेली असताना बोर्ड मीटिंगमध्ये सहगल घोषित करतो, की त्याचा मेहुणा रितेश सीनियर व्हाइस-प्रेसिडेंट म्हणून लवकरच जॉइन होतो आहे. त्या वेळी निशीचा एकाएकी फुललेला चेहरा ही तिच्या या दुसर्‍या रूपाची प्रस्तावनाच. यापूर्वी ज्याच्यामुळे कंपनीचं नुकसान झालं होतं आणि म्हणून ज्याला विनय सहगलनं दूर केलं होतं तो पुन्हा कंपनीत येतो आहे हे कळताच नवीन इत्यादी इतर एक्झिक्युटिव्हचे चेहरे साशंक होतात. पण निशीला मात्र आनंद होतो. स्पर्धेची भावना तिच्या मनाला रितेशच्या बाबतीत शिवत नाही.

रितेश आणि निशी यांचं गेली पाच वर्षं एकमेकांवर प्रेम आहे. त्यापूर्वी निशीला निराशेच्या गर्तेतून त्यानंच बाहेर काढलं आहे, घटस्फोटानं वैफल्यग्रस्त झालेल्या निशीला त्यानं सावरलं होतं. भूतकाळातली अपयशं गोंजारत न बसता नव्या उमेदीनं नव्या आव्हानांना सामोरं जायला उद्युक्त केलं होतं. आजचा निशीचा आत्मविश्वास, तिचं यश यांच्यासाठी ती कायमच रितेशची कृतज्ञ राहिलेली आहे. आणि आता अपयशी म्हणून शिक्का लागलेल्या रितेशला त्याच्या वैफल्यातून बाहेर काढून यशस्वी करण्यासाठी ती आपली सगळी बुद्धिमत्ता पणाला लावते. परवेजचे मार्केटिंग प्लॅन्स पळवण्याच्या तिच्या उद्योगांमागे जशी सहगल समूहाविषयीची निष्ठा आहे, व्यक्तिगत कर्तबगारीची नशा आहे, तशीच रितेश यशस्वी व्हावा, कंपनीत त्याची पत वाढावी, अशी असोशीही आहे. रितेशलाही तिच्या भावनेची पुरती जाण आहे. (हे तिचं सुदैव. कारण कॉर्पोरेट जगात कुणी नात्याला फार महत्त्व देत नाही. रितेश-निशी हे नातं अपवाद म्हणूनच पुढे येतं.) दोघांचा लग्न करण्याचाही बेत आहे.

रुइयाशेठशी सहगल समूहाच्या वतीनं अव्वाच्या सव्वा सौदा करताना रितेशला भान राहात नसलं तरी निशी त्याला सावध करायचा प्रयत्न करते. परंतु रितेश तो इशारा लक्षात न घेता बोलणी करतो. बुद्धिमान, व्यवसायकुशल निशीला याचे परिणाम काय होणार ते कळत असतं. नवीन जेव्हा या सौद्याविषयी रितेशची कानउघाडणी करतो, रितेश अहंकार दुखवल्यामुळे मीटिंग सोडून निघून जातो, तो सर्ववेळ निशीची अवस्था लक्षणीय आहे. रितेशची चूक तिला कळते आहे. तिनं त्याला सावध करायचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा रितेश अपयशाचा धनी, धोरणीपणाचा अभाव असलेला असा ठरेल, हेही तिला माहीत आहे. नवीन म्हणतो आहे ते तिला पटतं आहे. ‘तू तरी हा सौदा कसा होऊ दिलास?’ असं नवीन तिला म्हणतो, त्यावर कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह निशी काही उत्तर देऊ शकत नाही. कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह वरचढ झाली असती तर सगळा दोष रितेशवर टाकून ती मोकळी होऊ शकली असती, पण रितेशवरचं तिचं प्रेम अधिक गहिरं आहे, याचीच चुणूक इथे दिसते.

मारवाह समूहावर कडी करण्यासाठी त्याच्या आधीच घाईनं मिंट-बेस्ड सॉफ्ट ड्रिंक बाजारात आणण्याच्या भरात उत्पादनासाठी कीटकनाशकयुक्त पाणी वापरलं जात असल्याचं निष्पन्न होतं आणि सहगल समूहाची प्रतिष्ठा, व्यवसाय धुळीला मिळण्याची वेळ येते. कॉर्पोरेट स्पर्धेमध्ये राज्याच्या तसंच केंद्रातल्या राजकारण्यांमधल्या स्पर्धेनंही सतत मोठी भूमिका बजावलेली असते.

सरकारी अधिकार्‍याना लाच चारून वर्तमान प्लांटवर आहे तसंच उत्पादन चालू ठेवायच्या सहगलच्या विचाराला आदर्शवादी नवीन विरोध करतो आणि कंपनी सोडून जातो. निशीलाही सहगलचा निर्णय अनैतिक वाटतो, पण रितेशला सोडून तिच्यातली स्त्री नवीनप्रमाणे कंपनी सोडून जाऊ शकत नाही. मुकेश त्यागीनं तर विश्वासघातच केलेला असतो, तेव्हा उरतात रितेश आणि निशी. समूहाला वाचवण्यासाठी चौकशी आयोगापुढे या चुकीची जबाबदारी कुणी एकानं घ्यावी आणि सहगल समूहाला वाचवावं, अशी सूचना राजकीय सूत्रांकडून येते. मिसेस सहगल हीही कॉर्पोरेट रंगमंचाची बॅक स्टेज आर्टिस्ट आहे. कंपनीच्या मालकाची पत्नी या नात्यानं ती शोषण करू शकते. तिच्या हट्टापायीच सहगलनं अपयशी ठरलेल्या मेहुण्याला पुन्हा नवी संधी दिली आहे. रितेश जेव्हा चौकशी आयोगापुढे स्वत: जबाबदारी स्वीकारायचं म्हणतो, तेव्हा ती ‘तुम भी सहगल परिवार का हिस्सा हो’ असं म्हणून भावाला रोखते आणि निशीचं नाव पुढे करते. (पुढे मागे भावाला बळी द्यावं लागलंच तर कदाचित त्यालाही तिची तयारी असेल... कारण ‘द ओन्ली थिंग इन बिझिनेस दॅट मॅटर्स इज प्रोफिट!’) दोन-तीन दिवसांचा प्रश्न आहे, असं सांगून रितेशचं मन निशीवर ही जबाबदारी टाकण्यासाठी वळवलं जातं.

रितेश द्विधा मन:स्थितीत सापडतो तेव्हा निशीच त्याला समजावते, कारण रितेशचं भविष्य हे तिच्या दृष्टीनं अधिक महत्त्वाचं असतं. पुरुष आणि स्त्री यांच्यापैकी कुणाची करिअर पणाला लावायची, असा प्रश्न उद्भवतो त्या वेळी स्त्रीनं त्याग करायचा ही परंपरा, ती स्त्रीची पारंपरिक मानसिकता. त्या मानसिकतेत जेवढी परंपरा आहे तेवढंच अनेकदा तिचं प्रेमही असतं. रितेशवर प्रेम करणारी आणि त्याच्याविषयी कायम कृतज्ञ असणारी निशी हेच करते. ती जबाबदारी घेते... आणि कायमची चौकशीच्या, पोलिस कस्टडीच्या सापळ्यात अडकते. स्वत:ची प्रतिष्ठा गमावून, आजवर मेहनतीनं आणि महत्त्वाकांक्षेनं मिळवलेलं सगळं सगळं गमावून.

अर्थमंत्री गुलाबराव मारवाह आणि सहगल या प्रतिस्पर्ध्यांमध्ये समझोता घडवून आणतो आणि निवडणुका होईपर्यंत निशीची केस प्रलंबित राहणार असते, म्हणजेच तिला पोलिस कस्टडीतच राहावं लागणार असतं. त्यातच ती गर्भवती झालेली असल्याचं कळतं. पोलिस कस्टडीतून आणि प्रकरणातून तिच्या सुटकेची निकड अधिकच तीव्र होते, त्याच वेळी रितेशला आपण मेहुण्याकडून आणि बहिणीकडून फसवले गेल्याचं लक्षात येतं. तो त्यांना जाब विचारायला जातो आणि धमकीही देतो, ‘अठ्ठेचाळीस तासांत निशीला सोडवण्यात आलं नाही तर मी तुमचा पर्दाफाश करीन.’

निर्मम कॉर्पोरेट जग नाती ओळखत नसतं. ‘अठ्ठेचाळीस तासांच्या आत भाऊ, मेहुणा अनैसर्गिक मृत्यूच्या हवाली झालेला असतो. नोंद आत्महत्येची होते. अनुच्चारित संशय खुनाचा असतो... काळ पुढे सरकतो. रया गेलेली, हताश निशी कस्टडीत जन्मलेल्या, तिथेच वाढू लागलेल्या आपल्या मुलीला महिला पोलिसच्या कडेवर देऊन न्यायालयात खटल्यासाठी हजर व्हायला जाते आहे... तो सिलसिला चालूच राहणार आहे...
कॉर्पोरेट पटावरचं एक प्यादं ठरली आहे निशी. कॉर्पोरेट जगात निष्ठेची, स्त्रीसुलभ भावुकतेची बळी ठरली आहे निशी...
(deshrekha@yahoo.com)