आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरु मानिओ ग्रंथ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘श्री गुरुग्रंथसाहिब’ हा ग्रंथ सात खंडांत मराठीत अनुवादित झाला आहे. यात मूळवाणी, देवनागरी लिपी, अवघड शब्दांचे मराठी अर्थ व मराठी भावानुवादासहित हे खंड प्रकाशित झाले आहेत. अनुवादाचे हे महत्कार्य विनायक नारायण लिमये आणि तारासिंह गोरोवाडा यांनी केले आहे. तारासिंह गोरोवाडा यांनी हे मराठी खंड ‘सिख धर्मप्रचार कमिटी, पुणे’ या संस्थेच्या वतीने प्रसिद्ध केले आहेत. ‘श्रीगुरुग्रंथसाहिबा’च्या या मराठी अनुवादाचे सहा खंड प्रकाशित झाले. पुढे सातव्या खंडाच्या अनुवादाचे काम पूर्ण झाले आणि विनायक लिमये यांचे 22 मार्च 2010 रोजी निधन झाले. तारासिंह गोरोवाडा यांनी शीख धर्माचे साहित्य सर्वांना उपलब्ध व्हावे, यासाठी वाचनालय सुरू केले आहे. येथे पंजाबी, हिंदी, इंग्रजी भाषांत व काही मराठी पुस्तके अल्प प्रमाणात आहेत.

प्रस्तुत लेख लिहिण्यासाठी ‘श्रीगुरुग्रंथसाहिबा’च्या या मराठी अनुवादाची मला मदत झाली आहे. शीख धर्म प्रचार कमिटीचे हे उपक्रम शीख धर्म समजून घेण्यासाठी उपयुक्त आहेत. अन्यथा गुरुमुखीतून ते समजणे अशक्य झाले असते. शिखांची जीवनशैली, दैनंदिन व संपूर्ण जीवनातील व्यवहार हे ‘श्रीगुरुग्रंथसाहिबा’शी निगडित आहे. ‘श्रीगुरुग्रंथसाहिबा’शिवाय कोणतीही कृती ते करत नाहीत. ग्रंथाचे हे महत्त्व जाणूनच हा लेखप्रपंच दोन भागांत केला.
महाराष्टÑसंत श्रीगुरुनामदेवजी यांचे श्लोक गुरुग्रंथसाहिबामध्ये श्लोकांच्या पद्यस्वरूपात अंतर्भूत केले आहेत. श्रीसंत नामदेव 18 वर्षे पंजाबात राहिल्यामुळे भाषा, विचार, शैली या सर्व बाबतीत ‘गुरुग्रंथसाहिबा‘तील नामदेव वाणी व मराठीतील त्यांची अभंगवाणी यात खूप अंतर दिसून येते. पंजाबमध्ये संत नामदेवांना जे आदरस्थान आहे, त्यामुळे त्यांना ‘ब्रह्मज्ञानी संत नामदेव’ म्हणतात.

‘गुरुग्रंथसाहिब’ या शिखांच्या पवित्र धर्मग्रंथात अनेक पदे रचण्यात आली आहेत, त्या पदांचे रचनाकार विविध भूप्रदेशातील व भाषांतील आहेत. त्यांची संख्या 36 आहे. त्यात दोन शिष्यांची व अकरा भाटांची पदे आहेत. मुख्य म्हणजे, यातील तीन रचनाकार महाराष्ट्रीतील आहेत. भक्त नामदेव (1270 ते 1350) यांची 134 पदे, भक्त परमानंद (1483-1593) यांचे एक पद, तर भक्त त्रिलोचन (1267-1335) यांची चार पदे आहेत. महाराष्ट्रीचे व शीख पंथाचे अनुबंध यातून स्पष्ट होतात. गुरुग्रंथसाहिबमध्ये ज्या महत्त्वाच्या रचना आहेत, त्यांना जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे.

1. जपुजी : हे प्रारंभीचे काव्य गुरुनानक देवांनी रचले आहे. यात नामजपाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
2. सोदर : ही रचना पउडी प्र 27 मध्ये पृ. प्र. 6, 8 व 10 वर आली आहे. पुढे पृ. प्र. 347 वर आसा रागाच्या सुरुवातीस आली आहे. यात भूलोकातील व स्वर्गलोकातील अनेक थोर व्यक्ती, देव, देवता, गंधर्व, यक्ष, किन्नर, ऋषी, मुनी व संत महात्मे प्रभू परमात्म्याचे गुणगान गात आहेत.
3. सोहिला : गुरुग्रंथसाहिबामध्ये पृ. प्र. 12 व 157 वर नानकरचित पदे आहेत. हे काव्य रात्री झोपण्यापूर्वी म्हणण्याचा प्रघात आहे.
4. सुखमनी : ही गुरू अरजनदेव यांची रचना पृ. प्र. 262 ते 296 वर आहे. आत्मिक सुख हेच शाश्वत सुख आहे, हे यात स्पष्ट केले आहे. यात नामजपाचे, संत सहवासाचे महत्त्व वर्णन केले आहे. ब्रह्मज्ञानाची महती वर्णन केली आहे. संतजनांची निंदा करणाºयांची हेटाळणी केली आहे.
5. आसा की वार : ही रचना श्रीगुरुनानकदेवांची पृ. प्र. 462 ते 475 वर आहे. नंतर या रचनेत श्रीगुरुअरजन देवांनी श्रीगुरुअंगद देवांच्या 15 श्लोकांचा समावेश केला आहे. ही वाणी प्रत्येक गुरुद्वारात सकाळी गायली जाते. या वाणीत गुरुमुख साधकाच्या आध्यात्मिक उन्नतीत येणारे अडथळे, गुरुमुख व मनमुख यांच्यातील वैचारिक संघर्ष व त्यात शेवटी सत्यानुगामी गुरुमुख साधकाचा होणारा विजय याचे वर्णन केले आहे.
6. आनंदसाहिब : हे गुरू अमरदासजी यांचे काव्य पृ. 917 ते पृ. 922 वर संकलित केले आहे. हे काव्य प्रत्येक मंगल व आनंददायी घटनेच्या वेळी म्हटले जाते. खरा आनंद म्हणजे काय, याचे स्पष्टीकरण या काव्यात केले आहे. सत्गुरुकडून ज्ञान प्राप्त झाल्यावर मोहमायेचे पाश तुटतात व नामभक्तीचे रहस्य समजते आणि खरा आनंद पदरी पडतो, हा संदेश पदांतून दिला आहे.
7. आनंद कारज : ही गुरू रामदास यांची रचना पृ. प्र. 773 व 774 वर संकलित केली आहे. ही रचना विवाहाच्या वेळी गायली जाते. यातील चार छंत म्हटले जातात. प्रत्येक छंताचे वेळी वधू-वर गुरुग्रंथसाहिबला प्रदक्षिणा घालतात. आपल्या सप्तपदीसारखा हा प्रकार आहे. यात वधू ही जीवात्मा व वर हा परमात्मा मानला गेला आहे. विवाह हा जीवात्मा व परमात्मा यांचे एकरूप मिलन आहे, असे शीख समजतात.
8. सद : ही रचना गुरू अमरदासजी यांची असून पृ. 923वर संकलित केली आहे. सद याचा अर्थ बोलावणे. प्रभू परमात्म्याचे बोलावणे म्हणजे मृत्यू. यात मृत्यू ही दु:खद घटना नसून आनंदाची घटना आहे, असे सांगितले आहे.
9. सिंध गोसटी : ही गुरुनानकदेवांची रचना पृ. 938 ते 946वर संकलित केली आहे. योगी होऊन संसाराचा त्याग करण्याची वा देहक्लेश घेण्याची गरज नाही, हे गुरुनानकांनी पटवून दिले आहे. संसारात राहून, अनासक्त होऊन, अहंकाराचा त्याग करून प्रभूचे नामस्मरण केल्याने ईश्वर प्राप्त होतो, हे यात सांगितले आहे.
10. ओअंकार : ही श्रीगुरुदेवनानकांची रचना पृ. 929 ते 938 वर आहे. यात गुरुनानकांनी प्रत्येक मुळाक्षरातील आध्यात्मिक अर्थ स्पष्ट केला आहे.
11. सलोक : श्रीगुरुग्रंथसाहिबामध्ये सर्वत्र विखुरले आहेत. या सर्व श्लोकांत मनाला उपदेश केला आहे.
(arunjakhade@padmagandha.com)