आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगभ्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दृष्टिभ्रम म्हणजे काय हे तुम्ही कदाचित ऐकले असेल. आज यापैकीच एका भ्रमाची आपण ओळख करून घेणार आहोत. भ्रम म्हणजे प्रत्यक्ष जे नाही त्याचा भास होणे. पांडवांनी दुर्योधनाला जेव्हा आपल्या नव्या राजवाड्यात बोलावले तेव्हा जेथे पाणी आहे तेथे जमीन आणि जमिनीच्या जागी पाणी असल्याने दुर्याेधन फसला. अशाच एका भ्रमास रंगभ्रम असे म्हणतात. आपल्या डोळ्याच्या दृष्टिपटलामध्ये असलेल्या शंकू व दंड पेशीमुळे आपल्याला प्रतिमेचे ज्ञान होते. दंडपेशी पांढर्‍या, काळ्या प्रतिमेचे ज्ञान करून देतात, पण रंगांचे ज्ञान दृष्टिपटलातील शंकू पेशीमुळे होते. शंकू पेशी तीन प्रकारच्या असतात. तांबड्या संवेदी, निळ्या संवेदी व हिरव्या संवेदी. इतर रंग हे या तीन रंगाचे मिश्रण असते.

आजच्या प्रयोगासाठी आकृतीत दिल्याप्रमाणे एका वर्तुळाचे तीन भाग करा. उजवा एक तृतियांश भाग तांबड्या रंगाने, डावा एक तृतियांश निळ्या रंगाने तर खालील एक तृतियांश हिरव्या रंगाने रंगवा. जर रंग नसतील तर वर्तुळात तीन रंगीत घोटीव कागदाचे तुकडे चिकटवले तरी चालेल. वर्तुळ साधारणपणे 15 सेमी व्यासाचे हवे. प्रत्येक रंगाची कड काळ्या स्केच पेनने मर्यादित करा. मध्यभागी एक पांढरा ठिपका शिल्लक ठेवा. या तुमच्या रंगीत आकृतीच्या शेजारी एक स्वच्छ पांढरा ए-4 आकाराचा कागद पसरून ठेवा. (झेरॉक्स नेहमी ज्या कागदावर काढला जातो तो कागद ए-4 साइजचा असतो.)

आता आपला प्रयोग सुरू करायचा आहे. जवळ एक स्टॉप वॉच किंवा सेकंद काटा असलेले घड्याळ असू द्या. आता तांबड्या रंगाकडे टक लावून 30 सेकंद पाहा. 30 सेकंदानंतर पांढर्‍या कागदाकडे पाहा. त्यावर कोणता रंग दिसतो ते लिहून ठेवा. आता हा प्रयोग तीन वेगवेगळ्या रंगावर टक लावून पाहा आणि काय होते ते लिहा.

तुम्ही तांबड्या रंगाच्या तुकड्याकडे टक लावून पाहिल्यानंतर जेव्हा पांढर्‍या कागदाकडे पाहता तेव्हा तांबड्या रंगाच्या ठिकाणी निळा हिरवा रंग दिसतो. वर्तुळाचा खालील भाग जांभळा दिसतो तर निळ्या रंगाच्या ठिकाणी पिवळा रंग दिसतो. वास्तविक पांढर्‍या कागदावर कोणताच रंग नाही. हे असे का होते याचे उत्तर तुम्हाला पुस्तकात मिळणार नाही. दृष्टिपटलामधील शंकू पेशी तांबड्या, निळ्या व हिरवा रंग संवेदी आहेत. प्रत्येक रंग संवेदी वेगळ्या शंकूपेशी असल्याने जेव्हा आपण तांबड्या रंगाकडे पाहतो तेव्हा तांबडा रंग संवेदी शंकू पेशी उत्तेजित होतात.

पण एक टक 30 सेकंद तांबड्या रंगाकडे आपण पाहिले म्हणजे त्या शंकू पेशी थकतात. आपण दुसर्‍या रंगाकडे पाहिले म्हणजे थकलेल्या पेशीना रंगज्ञान होत नाही पण दुसर्‍या रंगसंवेदी पेशी भलताच रंग असल्याचे दर्शवतात. म्हणून ज्या रंगाकडे पाहतो त्या ऐवजी दुसरे रंग दिसायला लागतात. मिनिटभरात थकलेल्या पेशी पुन्हा आपला मूळ रंग दाखवायला लागतात. यालाच रंगभ्रम असे म्हणतात. आहे की नाही गंमत...

(madwanna@hotmail.com)