आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of Dasu Vaidya About Poetry, Divya Marathi, Rasik

काव्यार्थ : शब्दांची मांडामांड आणि अर्थाची आदळाआपट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2003 मध्ये पॉप्युलर प्रकाशनाकडून प्रकाशित झालेल्या ‘तूर्तास’ या कवितासंग्रहाने एकूणच मराठी कवितेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे नव्वदोत्तरी पिढीतील दासू वैद्य हे अतिशय महत्त्वाचे कवी. त्यांच्या ‘तूर्तास’ या कवितासंग्रहाचा कवितांचा तामिळ, तेलुगू, गुजराती, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. कवितेतून लयबद्ध सृजन करणाºया वैद्य यांच्या काव्यविश्वाविषयी...
अभिव्यक्त होणे हा माणसाचा स्थायीभाव आहे. आतला कल्लोळ, आतली खदखद नेहमीच व्यक्त व्हायला उत्सुक असते. प्रत्येक जण आपापल्या वकुबाने व्यक्तही होत असतो. या व्यक्त होण्यातूनच प्रकार, दर्जा, तºहा यांची परिमाणे निश्चित होत गेली. कुणी रंगरेषांतून, कुणी शिल्पातून, कुणी अभिनयातून, कुणी पदन्यासातून, तसा कुणी शब्दातून व्यक्त होतो. इथे साहित्याचा जन्म होतो. विशेष भाषिक वर्तनातून कविता निर्माण होते.

वरकरणी अत्यंत सोपा वाटणारा कविता हा प्रकार भल्याभल्यांना चकवा देतो. कविता लिहिणे ही तशी सरावाने सोपी गोष्ट असू शकते; पण चांगली कविता लिहिणे ही मात्र अवघड गोष्ट आहे. चांगल्या कवितेसाठी रियाजाची आवश्यकता असते. एखादी बरी कविता लिहिण्यासाठी कित्येक कवितांचा रियाज करावा लागतो. रियाजातल्या सगळ्याच कविता कागदावर उतरतीलच असे नाही. कवीच्या मनोमंचावर कवितेच्या अनेक आवृत्त्यांची रेलचेल असू शकते. त्यातली एखादी आवृत्ती कवितेचा अंतिम खर्डा म्हणून कागदावर उमटते. भाषेत एक नवी कविता तरंगते आणि एक कवी आपापल्या वकुबाप्रमाणे पाय रोवून उभा राहतो.

कविता हा अत्यंत गांभीर्याने हाताळण्याचा साहित्य प्रकार आहे. व्यक्त होण्यासाठीचे प्रभावी माध्यम आहे. जगात कुठलीच कृती निर्हेतुक नसते. कविताही त्याला अपवाद नाही. कवी अरुण काळे म्हणतात तसे, ‘शुद्धलेखन सुधारण्यासाठी कोणी कविता लिहीत नसते.’ भोवतालचा अवकाशच कवितेच्या निर्मितीला कारणीभूत ठरतो. माणुसकी जेव्हा ठेचकाळत राहते तेव्हा कवितेला व्यक्त होण्याशिवाय पर्याय उरत नाही. कविता हा सामाजिक पर्यावरणाचा भाग असतो. सातत्याचा कवीने ध्यास घेतलेला असतो. वस्त्रहीन राजाच्या मिरवणुकीत राजवस्त्राची तारीफ करण्यात मश्गूल असलेल्या गर्दीत, राजाचे नागवेपण उजागर करणारा कवी असतो. कवीचे मूळ गाव वेदनेचे असते. कुठल्याही प्रकारची कविता लिहिणारा कवी असला तरी त्याची मुळं भोवतालच्या मातीतूनच जीवनद्रव्य मिळवत असतात. मी जेव्हा माझ्या कवितेच्या अवकाशाचा विचार करतो, तेव्हा अपरिहार्यपणे बालपणाकडे वळावे लागते. सामाजिक-सांस्कृतिक अर्थाने खूप समृद्ध बालपण मला मिळालं. उच्चारात जात आहे पण वर्तनात जात नाही, अशा गावात मी वाढलो. रूढ अर्थाने हातात नांगर धरलेला मी शेतकरी नाही. पण भोवताली कृषी संस्कृती होती. भल्या पहाटेपासून दारावर वासुदेव, गोंधळी, मसणजोगी हजेरी लावायचे. शब्द, सूर, संगीताचा श्रवणसंस्कार होता तो. मंदिरातल्या आरत्या, भजनी मंडळात टाळ-मृदंगाच्या साथीने रंगलेली भजने, कीर्तनात रंगलेला गाव, भागवत सप्ताह, कव्वालीचा मुकाबला, रामलीला, ग्रामीण नाटके, तमाशे अशी श्रीमंती होती. लोकगीतातून, लोकसंगीतातून श्रवणभक्ती घडत गेली. त्यातून कान तयार व्हायला मदत झाली. पुढे शालेय अभ्यासक्रमातून छापील कविता भेटल्या. या कविता भेटल्या आणि कवितालेखन सुरू झाले, असे मात्र नाही. व्यक्त होण्यासाठी धडपडणे- चाचपडणे सुरूच होते. प्रथम मी चित्र काढायचो. वडील शिक्षक. शाळेतून वडील घरी आले की त्यांचा नेहरू शर्ट खुंटीला अडकवत. त्यांच्या शर्टाच्या खिशात हमखास खडूचे तुकडे असत. हे खडू मी ताब्यात घ्यायचो आणि सारवलेल्या ओसरीवर, भिंतीवर चित्र काढत सुटायचो. मंदिरात जाऊन जोरजोरात आरत्या, भजन म्हणताना मजा यायची. माळावरची लाल माती आणून पोळ्याचे बैल, गणपती बनवले. या सार्‍यातून व्यक्त होण्याचाच प्रयत्न होता. रूढ अर्थाने वाचन वगैरे नव्हते; पण जगण्याच्या जिवंत पुस्तकाचे एकेक पान उलटवत होतो. पुढे कॉलेजात गेल्यावर पुस्तकांच्या संपर्कात आलो. इथेच कविता कागदावर उतरू लागली. कविता लिहायला लागल्यानंतर तब्बल पंधरा वर्षांनी संग्रह काढला. आधी भरमसाट कविता लिहून होत. आता खूप कमी कविता लिहून होतात. एखादी गोष्ट जाणवते, एखादा क्षण खटकतो, तेव्हा कवितेचे बीज डोक्यात पडते. कधी एका ओघात कविता लिहून होते, कधी मात्र कवितेचे बीज पडून राहते. वर्ष-वर्ष अंकुरत नाही. एखाद्या कवितेत अवतरलेली प्रतिमा कुठे दडून बसली होती, ते कळत नाही. लहानपणी आंब्याच्या कोयी शोधून त्याच्या पुंग्या बनवायचो आम्ही. ही सहसा उकंड्यावर उगवणारी आंब्याची कोय अचानक वडिलांवरच्या कवितेत उगवली.

‘मळकट आंब्याच्या कोयीतून
हिरवी काडी वर यावी
तशी जुनाट आठवण सांगतात कधीतरी’

या आंब्याच्या कोयीतून निघणार्‍या हिरव्या काडीसारखे अनेक संदर्भ कागदावर उतरत जातात. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने व्यक्त व्हावे. मूल्यमापन करण्यासाठी काळ समर्थ असतो. पाठलागात जो आनंद असतो तो प्राप्तीत कधीच नसतो, असे म्हणतात. ते कवितालेखनाच्या बाबतीत जाणवतं. कविता लिहून झाल्यावर काही क्षण बरं वाटतं, पण थोड्याच वेळात पुन्हा अस्वस्थता भरून येते. नव्या चांगल्या कवितेचा शोध संपत नाही. मग पुन्हा एकदा सुरू होते शब्दांची मांडामांड आणि अर्थाची आदळआपट.

vishnujoshi80@gmail.com
शब्दांकन : विष्णू जोशी

मी जेव्हा माझ्या कवितेच्या अवकाशाचा विचार करतो, तेव्हा अपरिहार्यपणे बालपणाकडे वळावे लागते. सामाजिक-सांस्कृतिक अर्थाने खूप समृद्ध बालपण मला मिळालं. उच्चारात जात आहे पण वर्तनात जात नाही, अशा गावात मी वाढलो.