आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छडी लागे छमछम; शिस्त की प्रेम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेम करत असाल तर शिस्तीची गरज नसते. प्रकाश आणि अंधारासारखेच प्रेम आणि शिस्तीचे नाते आहे...जसजसे उजाडत जाईल तसतसा अंधार मावळत जाईल...
शिस्तपालनावर कृष्णमूर्तींचा दृष्टिकोन शिक्षक आणि पालकांना खूपच आदर्शवादी आणि अव्यावहारिक वाटतो. मुलांना मारलेच नाही तर मुले अभ्यास करतील का, हा त्यांचा प्रश्न असतो. मागच्या पिढीने शिस्तीचा इतका प्रचंड बडगा आपल्यावर बसवलेला आहे की, आपण दुसर्‍या बाजूने विचार करण्याची क्षमताच गमावून बसलो आहोत. भीतीशिवाय अपेक्षित परिणाम साधला जाईल, यावर आपला विश्वासच उरला नाही. छडी लागे छमछम हे गुळगुळीत झालेले वाक्य सतत यासाठी ऐकवले जाते.

शिक्षक ज्या अडचणी सांगतात त्या समजण्यासारख्या आहेत. आज शहरी भागात एका वर्गात विद्यार्थीसंख्या प्रचंड आहे. शिक्षकाला वर्गात मिळणारा वेळ कमी आहे. हे समजण्यासारखे असले तरी शाळा म्हणून परिपाठ आॅफ तास यांचा उपयोग यांचा वापर त्यासाठी करायला हवा. मुलांच्या घरी जाण्याचाही रिवाज अपेक्षित आहे. कृष्णमूर्ती शाळेत शिक्षक व मुले एकत्र राहतात. ते शक्य नसले तरी एकत्र येण्याच्या शाळेबाहेरच्या शक्यता वाढवायला हव्यात.
अडचणी सांगण्याअगोदर खरंच संवादाने प्रेमाने मुले बदलू शकतात; यावर आपला विश्वास आहे का, हे मनाच्या तळात जाऊन स्वत:पुरतेच शोधले पाहिजे. आपलाच मुळात प्रेमावर एक थेरपी म्हणून विश्वास नाही, म्हणून आपण शिस्त आणि शारीरिक शिक्षा यांना कवटाळून बसतो आहोत. आमच्या सर्व चर्चांमध्ये जेव्हा बालपणीच्या जुन्या पिढीच्या चांगल्या शिक्षकांचा विषय निघतो तेव्हा हमखास ते एका गल्लीने जात तेव्हा आम्ही दुसर्‍या गल्लीने जात असू. ही आमची चांगल्या शिक्षकाची व्याख्या... शिक्षक आणि पोलिस यातला फरक आम्ही करणार की नाही....

कृष्णमूर्ती नेमके प्रेमाच्या बाजूचे आहेत... ते म्हणतात, ‘‘प्रेम करत असाल तर शिस्तीची गरज नसते. प्रेमामुळे आपोआपच सर्जनशील बोधाचा उदय होतो. त्यामुळे प्रतिकार नसतो व संघर्षही नसतो, पण तुम्हाला विशेषत: लहानपणी आतूनच पूर्णपणे सुरक्षित घरच्यासारखे वाटत असेल तेव्हाच अशा पूर्ण एकसंघपणातूनच प्रेम करणे शक्य होते... याचा अर्थ शिक्षक व विद्यार्थी यांचा परस्परांवर प्रचंड विश्वास असला पाहिजे.’’ तेव्हा शिस्तीच्या गरजेपेक्षा प्रेमाची मात्रा वाढवण्याची गरज आहे. गाडी चालवताना अ‍ॅक्सिलेटर वाढत जाताना ब्रेकवरचा पाय हळूहळू निघत जातो. अगदी तसेच प्रेम वाढत जाईल त्या प्रमाणात शिस्तीची गरज संपेल.

कृष्णमूर्ती शाळेत हा प्रयोग गेली 75वर्षे सुरू आहे. त्यामुळे हे आदर्शवादी आणि अव्यावहारिक तर नक्कीच नाही. मी एकदा कृष्णमूर्ती शाळेत एका शिक्षिकेला विचारले होते की, आमच्या शाळेत झोपडपट्टी, गरीब वस्तीतली मुले असतात. ती काठीने मारामारी करतात. तुमच्या शाळेत श्रीमंत घरातली मुले आहेत. तेव्हा तुमच्या वाट्याला हे प्रश्न येत नाहीत? ती शिक्षिका म्हणाली, ‘‘श्रीमंत मुलांमध्ये हिंसा नसते, असा तुमचा समज आहे की काय... आम्ही जर या मुलांना योग्यरीतीने हाताळले नाही, तर या मुलांची ऐपत बंदुका आणण्याची आहे. ते शाळेत बंदुकाही आणू शकतील. तेव्हा प्रश्न मुले कोणत्या वातावरणातून आली, हे महत्त्वाचे नाही तर या मुलांना कसे हाताळले जाते हे महत्त्वाचे आहे...’’

जगातील अनेक प्रयोगशील शाळांधील अनुभवांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. या सर्व प्रयोगांचा निष्कर्ष हाच आहे की, प्रेमानेच मुले बदलली आहेत. समर हिल ही शाळा चालवणार्‍या नील या शिक्षकाने तर मुलांना हवे तसे वागण्याची मुभा देऊनही त्यांच्यात स्वयंशिस्त निर्माण करून दाखवली होती. दो आँखे बारह हाथ हा चित्रपट पाहिला असला तर थीम स्पष्ट होईल. कृष्णमूर्तींनी आणखी मुद्दा सांतिला, व्यक्तिमत्त्वातील एकसंघतेचा मांडला आहे. एकसंघपणा म्हणजे सर्व पातळीवर एकाच वेळी आपण अखंड व्यक्तिमत्त्वाचे असणे होय. अशाप्रकारे विसंगती नसणारे शिक्षण जर मिळाले, तर शिस्तीची गरजच उरणार नाही. अगदी कोवळ्या वयापासून अशी घरी असल्यासारखी सुरक्षितपणाची भावना निर्माण करता येईल का, असे ते विचारतात. थोडक्यात, प्रकाश व अंधारासारखेच प्रेम व शिस्तीचे नाते आहे... जसजसे उजाडत जाईल तसतसा अंधार मावळत जाईल.
herambrk@rediffmail.com