आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत की कुंभी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी 1993 पासून दरवर्षी ‘ऋतुरंग’ दिवाळी अंक प्रकाशित करत असतो. एकच विषय घेतल्याने त्याच्या अनेक बाजू आपल्याला पाहता येतात. आपल्यालाही काम केल्याचे समाधान मिळते. एका वर्षी मी ‘स्त्री’ हा विषय दिवाळी अंकासाठी घेतला होता. एरवी आई, पत्नी, बहीण, मैत्रीण, मुलगी या वेगवेगळ्या नातेसंबंधांत आपण ‘स्त्री’ अनुभवत असतो. ‘स्त्री’ कशी असते आणि आपल्याला कशी उमगते, माणूस म्हणून आपण तिच्याकडे कुठल्या दृष्टीने पाहतो, या संदर्भात एक अल्पसा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. ज्यांना ‘एकच मुलगी’ आहे त्या कलावंतांनी या अंकात लिहिले होते.
‘स्त्री’ आपल्याला नवनिर्मितीचा आनंद देते. आयुष्य पुरून उरणा-या एका नितळ नातेसंबंधाला ती जन्म देत असते. असे असताना जन्मापूर्वीच आपण तिची हत्या करतो. कितीतरी जाती-जमातीत मुलगी जन्माला येण्यापूर्वीच तिला मारून टाकण्याची अघोरी प्रथा होती. आता काळ बदलला. विज्ञानाच्या प्रगतीने झेप घेतली. आपण अशा काळात विज्ञानाच्या साहाय्याने गर्भलिंग चाचणी करून जग पाहणा-या गर्भाला काळोखात लोटतो. एकविसाव्या शतकात दररोज भ्रूणहत्येच्या बातम्या वाचून मन अस्वस्थ होते. आपण एकीकडे प्रगती करतो आणि दुसरीकडे अधोगतीकडे वाटचाल करतो आहोत. प्रगती आणि अधोगती एकाच नाण्याच्या दोन बाजू समाजात रुजू पाहत आहेत, याचे वैषम्य वाटते. माणूस सुशिक्षित असो, अशिक्षित असो, भ्रूणहत्येचा विचार त्याच्या मनात येणे हेच त्याचे माणूसपण संपल्याचे लक्षण आहे. एकीकडे आईची पूजा करायची आणि दुसरीकडे गर्भलिंगनिदान चाचणी करून ते बीज मुलगा आहे की मुलगी आहे याचा शोध घ्यायचा, हा दांभिकपणा विचित्र आहे. नको असलेली मुलगी जन्माला आली तर जन्मभर तिला ‘नकोशी’ नावाने वागवणे; याला काय म्हणावे?

वंशाला दिवा पाहिजे म्हणजे नेमके काय असते? हजारो राजे-रजवाडे, लाखोपती होऊन गेले; आज त्यांचे वंशज कुठे आहेत, याचा आपल्याला पत्ता नसतो. आपण मेल्यानंतर आपल्या मागे काय होते, हेही आपल्याला कळत नाही. आपल्या हयातीतच आपले धिंडवडे आपल्या जवळच्या माणसाकडून निघत असतात. असे असताना माझ्या मागे मुलगा पाहिजे, याला काय अर्थ आहे? ‘वंशाला दिवा पाहिजे’ हीच एक मूर्खपणाची कल्पना आहे. आपल्या मनात चैतन्याचे रूप सतत तेवत राहणे, तो संस्कार समाजात रुजणे हे महत्त्वाचे असते. अनेक मोठ्या माणसांचे वंशाचे दिवे भिकेचे कटोरे घेऊन रस्त्यात उभे असतात. त्यांच्या बातम्याही आपण वाचत असतो. मुलगा असो की मुलगी असो, ते आपल्या आयुष्याचे नंदनवन असते. आपल्या आयुष्याची वाटचाल त्या इवल्या चेहºयांची वाढ पाहूनच आपण करत असतो. चांगले विचार, चांगल्या जाणिवा एकाकडून दुसºयांकडे जाणे हा खरा दिव्यांचा प्रवास असतो. परंतु आपला मुलगा हा वंशाचा दिवा आहे, या भ्रामक कल्पनेपायी आपण राक्षसी मनोवृत्ती मनात बाळगतो. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, हिलरी क्लिंटन, गुलजार, शरद पवार, निळू फुले, सुलोचना, मृणाल गोरे, रिमा,

ना. सं. इनामदार, बेगम परवीन सुलताना, आरती अंकलीकर-टिकेकर, नीलम गो-हे, रझिया पटेल, सदा क-हाडे या सर्वांना एकच मुलगी आहे. वंशाला दिवा पाहिजे म्हणजे मुलगा हवा, ही सनातन परंपरा त्यांनी नाकारली आहे. या साºयांनी आपल्या एकाच मुलीच्या सुंदर आठवणी मनमोकळेपणाने सांगितल्या आहेत.

स्त्री मूल जन्माला घालते. त्या वेळेच्या प्रसूतिवेदना विलक्षण असतात. त्याची कल्पना पुरुषांना येणे अवघड असते. नऊ महिने पोटात गर्भ सांभाळायचा, त्याची स्वप्ने पाहायची आणि मूल जन्माला येताना होणाºया वेदना, कळा सहन करणे हे ‘स्त्रीच’ सहन करू जाणे. कवी गुलजार एका मुलाखतीत म्हणाले होते, मी प्रसूतिवेदना भोगल्या नसल्या तरी मी मातृहृदयी आहे. एक कवीच असं म्हणू शकतो. त्यांची मुलगी मेघना जेव्हा हॉस्पिटलमध्ये प्रसूतिवेदना सहन करत होती, त्या वेळेस हा मातृहृदयी कवी अस्वस्थ होत होता. त्या प्रसूतिवेदना त्यांना आपल्या वाटत होत्या. त्या अस्वस्थपणाची कविता त्यांनी लिहिली. या कवितेत त्यांनी मुलीला ‘अमृत की कुंभी’ म्हटले आहे.

एकूणच, एकुलत्या एका मुलीला वाढवणे, तिला समजून घेणे, तिच्या जडणघडणीविषयी, नातेसंबंधाविषयी वेगवेगळे बंध पुस्तकात आहेत. प्रत्येकाची कौटुंबिक परिस्थिती वेगळी, आयुष्याची जडणघडण वेगळी. त्याचे प्रत्ययकारी दर्शन पुस्तकात वाचायला मिळते. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या मुलीला जगाच्या उत्क्रांतीविषयी सांगितले. ‘इंदिरेस पत्र’ या नावाने ती प्रसिद्धच आहेत. हिलरी क्लिंटन यांनी आपल्या आत्मचरित्रात पानोपानी आपल्या मुलीच्या जडणघडणीविषयी लिहिले आहे. मूल वाढवताना आईवडलांनी किती सजग आणि सृजनशील राहिले पाहिजे, हे पुस्तकातून वाचायला मिळते.

शरद पवारांनी 43 वर्षांपूर्वी एकाच मुलीनंतर आॅपरेशन करून घेतले, हे सुप्रिया सुळेंच्या लेखातून वाचायला मिळते. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या 8 मार्च 2013च्या अंकात सुप्रिया सुळेंचा लेख प्रसिद्ध झाला. एकुलती एक मुलगी किती समृद्ध आयुष्य जगू शकते, हे या लेखातून समजते. त्यामुळे हा लेख पुस्तकात समाविष्ट केला आहे. एकीकडे भ्रूणहत्येच्या बातम्यांनी मन अस्वस्थ होत असताना पवारांसारख्या प्रभृतींनी समाजापुढे आदर्श ठेवला आहे. अशा वेळी आपण सर्वांनी स्त्री भ्रूणहत्येच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. लेक वाचवली पाहिजे. समाज निरोगी बनवला पाहिजे. हाच या पुस्तकाचा हेतू आहे.