आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यभान : ...पण डॉक्टर नको !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक रुग्ण बरा होण्यासाठी डॉक्टरला दोन ते तीन दिवस देतो. त्यात जर डॉक्टर बरा करू शकला नाही, तर तो डॉक्टर बदलतो किंवा औषधे बदलण्याचा आग्रह करतो. यावरून सगळी जबाबदारी रुग्णांवर झटकण्याचा हेतू नाही; पण डॉक्टरची वागणूक आपोआप कशी बदलत जाते व हा पाश कसा तयार होतो, हे सांगण्याचा प्रयत्न आहे.
काही दिवसांपूर्वी एका दैनिकाच्या एका ठिकाणच्या आवृत्तीने ‘रोग परवडला पण डॉक्टर नको!’ असे सदर सुरू करून रुग्णांना तुमची डॉक्टरांकडून कशी फसवणूक झाली, याचे अनुभव प्रसिद्ध करण्यासाठी आवाहन केले. एका आवृत्तीपुरते मर्यादित असलेल्या या सदराची खबर मेसेज, ईमेल, व्हॉट््सअ‍ॅप, सोशल मीडियातून अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे परदेशातील भारतीय डॉक्टरांपर्यंत पोहोचली. याचा वैद्यकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर निषेध झाला व तो व्हायलाच हवा. वाईट एका गोष्टीचे वाटते की, या एका चौकटीने आधीच अनेक कारणांमुळे ताणले गेलेले रुग्ण-डॉक्टर संबंध अधिकच ताणले गेले. वाद-विवाद, गुण-दोष प्रत्येक कुटुंबात असतात; पण मुलाने वडलांविरोधात वर्तमानपत्रातून नोटीस बजावल्यास वडलांचे भाव-विश्वच उद््ध्वस्त होते. तसाच काहीसा अनुभव या सदराच्या आवाहनातून वैद्यकीय क्षेत्र सध्या घेत आहे. हा मुद्दा बाजूला ठेवला तरी या निमित्ताने फक्त फसवणुकीच्या अनुभवांची चर्चा करण्यापेक्षा रुग्ण-डॉक्टर संबंध सुदृढ कसे करता येतील, यावर चर्चा जास्त फलदायी ठरणार आहे.

रुग्ण, डॉक्टर संबंधांमध्ये पहिली ठिणगी ही वैद्यकीय क्षेत्र ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत आल्यापासून पडली. एकदा रुग्णाला ग्राहक म्हटले की डॉक्टर हा व्यावसायिकाच्या भूमिकेत गेला. त्यामुळे डॉक्टरला प्रत्येक निदान सिद्ध करण्याची गरज पडू लागली. कारण ते सिद्ध न केल्यास कायदा व रुग्ण अशा दोन्ही गोष्टींची टांगती तलवार डॉक्टरच्या डोक्यावर असते. त्यामुळे रुग्णालयात होणारा भरमसाट खर्च हा मुख्यत: तपासण्या व औषधे यांच्यावर होताना दिसतो. औषधांच्या बाबतीतही आज अशी परिस्थिती आहे की, प्रत्येक रुग्ण बरे होण्यासाठी डॉक्टरला दोन ते तीन दिवस देतो. त्यात जर डॉक्टर बरा करू शकला नाही, तर तो डॉक्टर बदलतो किंवा औषधे बदलण्याचा आग्रह करतो. यावरून सगळी जबाबदारी रुग्णांवर झटकण्याचा हेतू नाही; पण डॉक्टरची वागणूक आपोआप कशी बदलत जाते व हा पाश कसा तयार होतो, हे सांगण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे भरमसाट तपासण्या, महागडी औषधे ही बर्‍याचदा फसवणूक नसून रुग्णांची मानसिक गरज होऊन बसते. यावर मार्ग कसा काढायचा?

मला एका गोष्टीचे नवल वाटते की, कपडे घेताना, मोबाइल घेताना आम्ही ब्रँड तपासतो, चौकशी करतो; मग डॉक्टरची निवड करताना हा चौकसपणा कुठे जातो? तुम्ही सर्वप्रथम बसून डॉक्टरांच्या निरनिराळ्या डिग्रीज, त्यांचा अर्थ, त्यांच्या कार्यकक्षेत येणार्‍या गोष्टी, त्यांच्या मूळ शिक्षणाच्या मर्यादा समजून घ्या. एक बारावी झालेले भोंदू डॉक्टर, ज्यांच्याकडे गेल्या दोन वर्षांत दोन गरोदर स्त्रियांचा मृत्यू झाला आहे; त्यांच्याकडे तिसर्‍या गरोदर स्त्रीचा मृत्यू झाल्यावर नातेवाईक मला भेटले व म्हणाले की, आमची फसवणूक झाली. ‘कसायाला गाय धार्जिणी’ या म्हणीप्रमाणे गाय स्वत: कसायाच्या दारात जात असेल तर तिला कोण वाचवणार? योग्य डिग्रीचा डॉक्टर शोधल्यावर दुसरी व सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे ‘विश्वास’. या पायरीवर तुम्ही डॉक्टरला पास करू शकलात तरच त्याच्या रुग्णालयाची पायरी ओलांडा.
याविषयी एक गोष्ट आवर्जून सांगण्यासारखी आहे. माझ्याकडे निरनिराळ्या डॉक्टरांकडून रेफर होणारे रुग्ण व त्यांच्या स्वभावांचा अभ्यास केल्यावर मला असे लक्षात आले की, रेफर होऊन आलेला रुग्ण हा नेमका त्याला रेफर करणार्‍या डॉक्टरच्याच स्वभावाचा असतो. म्हणून कधी कधी वाटते की, यथा प्रजा तथा राजा या म्हणीप्रमाणे यथा रुग्ण तथा डॉक्टर, ही म्हण रूढ करावी. आजही बरेच स्वच्छ, प्रामाणिक डॉक्टर रुग्णांची वाट पाहात बसलेले आहेत. स्वच्छ मनाने तुम्ही त्यांचा शोध घ्या. तुम्हाला प्रामाणिक डॉक्टर जरूर भेटेल. तसेच तो भेटल्यावर तपासणीसाठी डॉक्टरसमोर बसल्यावर त्याला एक वाक्य अगदी मनापासून सांगा. ‘डॉक्टर मी मोठ्या विश्वासाने माझा जीव तुमच्या हातात देतो आहे. तुम्हाला हव्या त्या तपासण्या करा व आवश्यक ती औषधे द्या. माझ्याकडे बरे होण्यासाठी भरपूर वेळ आहे. लवकरात लवकर बरे करा, असे मी म्हणणार नाही.’ एवढे म्हणून डॉक्टर सांगेल त्या गोष्टीचे पालन करा आणि मग काय कमाल होते ते बघा.

चांगले आयुष्य जगण्यासाठी आपल्याला चार गोष्टींची गरज असते. चांगला जीवनसाथी, चांगला मित्र, चांगला सी. ए. व चांगला डॉक्टर मित्र सल्लागार. हा डॉक्टर तुमचा फक्त फॅमिली डॉक्टर नसतो, तर तुमचा कौटुंबिक मित्र व सल्लागार असतो. असा एक चांगला डॉक्टर मित्र प्रत्येकाने आयुष्यात आवर्जून जोडावा. त्याच्याशी संबंध इतके दृढ करावे की तो तुमच्याबद्दल हळवा होऊन जिव्हाळ्याने विचार करेल. हाच डॉक्टर मित्र तुमच्या उपचारांमध्ये वाटाड्या म्हणून कार्य करेल व रुग्ण-डॉक्टर संबंधांच्या कोशातून ‘फसवणूक’ हा शब्द हद्दपार होईल. मी बालरोगशास्त्रासारखी क्लिनिक व त्यातही क्रिटिकल केअर म्हणजेच गंभीर बाळांच्या उपचाराची शाखा उच्च शिक्षणासाठी निवडली, तेव्हा हा निर्णय घेताना माझ्या गुरूंनी बजावले की, लक्षात ठेव, ही शाखा म्हणजे स्मशानातल्या क्रिया करणार्‍या जोग्यासारखे आयुष्य असते. अनेक मृत्यू पाहावे लागतात, त्यांचे दु:ख, शिव्या डोक्यावर घ्यावे लागतात व दहापैकी एक जीव वाचवल्याची किंमत पैशांत होते. पण तरीही तेव्हा ‘क्रिटिकल केअर’चा काटेरी मुकुट स्वीकारलाच. आताची परिस्थिती पाहता सध्याचे वैद्यकीय विद्यार्थी अशा शाखांकडे सहजासहजी वळतील असे दिसत नाही. त्यातच अशा बोचर्‍या टीकेतून आपण ‘डॉक्टर नको!’ म्हटल्यास डॉक्टर समाजापासून अधिकच लांब जाईल. आज एम. बी. बी. एस.च्या सीट रिकाम्या जात आहेत व बुद्धिवान विद्यार्थी वैद्यकीय शाखेपासून लांब जात आहेत. दूरगामी विचार करता हे समाजासाठी घातक आहे.

फसवणुकीच्या चर्चेत एका विसंगतीचे उत्तर मात्र कुठेच सापडत नाही. फसवणुकीसाठी प्रसिद्ध असणार्‍या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये भरमसाट गर्दी होते व प्रामाणिक डॉक्टरला पर्याय नाही म्हणून या हॉस्पिटलची नोकरी स्वीकारावी लागते. हर्बल औषधे, आयुर्वेदिक औषधांचा बाजार मांडणारे, वेट लॉस औषधे यांचे व्यवसाय बिनबोभाट सुरू असतात. फसवणूक झाली म्हणून आम्ही कंठशोष करतो, पण फसवणूक करणार्‍याकडेच गर्दी करतो. याला उत्तर एका मित्राकडून मिळाले. या परिस्थितीने निराश होऊन एकदा सहज मित्राला मेसेज पाठवला, ‘दोपहर तक बीक गया बाजार का हर एक झूठ और मैं एक सच शाम तक लेकर बैठा रहा।’ त्यावर मित्राचे उत्तर आले, ‘झूठ का बाजार दोपहर तक ही रहता है!’

amolaannadate@yahoo.co.in