आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमवा आणि उडवा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरलेला वर्ग, प्राध्यापकांनी अचानक जाहीर केलेले पुरस्कार. त्या कॉलेजची ही खासियत. वर्षातून एकदा होणारी घोषणा. वेगळ्या वाटेवर जाणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार. आपण गौरवले जाणार, हे माहीत नसलेले अनेक जण. एका रात्रीत दुसर्‍यासाठी ‘गिव्ह मी सनशाइन’ असे प्रेरणादायी ठरणारे. दोन जणांची निवड. सुमेध नि अनुप. सायन्स साइड असूनही कॉलेज सांभाळून जॉब करणारे, उत्तम मार्क मिळवणारे दोघे. सुमेधने घराला आधार दिला, वडिलांचा अपघात, मात्र न डगमगता त्यांची शुश्रूषा करता करता त्याला सुचलेली वेबसाइटची कल्पना. अपघात होणार्‍या घरात काय घडू शकते, अगदी मृत्यूपर्यंत वेळ आली तरी कोणते नंबर आपल्याजवळ असावे, याबद्दल सारे काही असणारी साईट. सुमेधचे मनापासून कौतुक करणार्‍या मुलांना अनुपचा सत्कार कशासाठी, हे मात्र कळेना. स्मार्ट दिसणारा, राहणारा अनुप सढळ पैसा खर्च करणारा...

कॉलेजमध्ये शिकताना जॉब मिळण्याचा प्रचंड आनंद अनेकांना होत असतो. तीन, पाच, अगदी दहा-पंधरा हजारांपर्यंत दर महिन्याला पैसा हातात येणार. मात्र या पैशाचे करायचे काय, हे वीसपैकी पंधरा जणांनी नक्की केलेले असते. फक्त मज्जा, जस्ट एन्जॉय. चिक्कार शॉपिंग, ब्रँडेड वस्तूंचा साठा, रोज नवीन कपडे, सेलफोन, नि हजारो दिखाऊ वस्तू. जेवढा पगार तेवढा खर्च करायचा.

मॉलमध्ये चक्कर मारणे क्रमप्राप्त, ‘सीसीडी’मध्ये सकाळी किंवा संध्याकाळी जाणे ही काळाची गरज. मॅक्डोनाल्ड कशासाठी, तो तर पोटासाठीचा अपरिहार्य मार्ग. आवश्यक असो नसो; चपला, बूट या सगळ्याचे एक-दोन जोड घरात आणायला हवेच. पार्टी कधीही ठरू शकते, अकस्मात जावे लागते, वाढदिवस हे सेलिब्रेट करण्याचे एक कारण थोडीच?

मूड चांगला असला, लेक्चर झाले किंवा झाले नाही, नवीन हॉटेल सुरू झाले, पैज जिंकली, हरली... कारणे कित्तीतरी. मजा करण्यासाठी पैसा हवाच. हा पैसा आईवडिलांचा नाही. आपला स्वत:चा. तो वापरण्याचा अधिकार आपला. नोकरी आपली. आपण मिळवली. आपले स्किल. आपले डोके. मेहनत आपण करणार. आठ तास खपणार. मार्केटिंगचा जॉब असला तर इकडेतिकडे भटकणार. शनिवार-रविवार मनाप्रमाणे दिवस घालवण्याची मोकळीक आपल्याला मिळायला हवीच. अनुपची ही मनोवृत्ती घरातल्यांसाठी दिवसेंदिवस त्रासदायक ठरू लागली. त्याला जॉब मिळाला, तेव्हा मध्यमवर्गीय घर हरखून गेले. घरातला मुलगा कर्ता झाला याचा आनंद. महागाईच्या दिवसांत पाच जणांच्या घरात वडिलांबरोबर अनुपदेखील हातभार लावणार, जबाबदारी घेणार. मात्र, अनुपने पैसा देणे तर सोडाच, उलट स्वत:ची स्टाइल बदलत आपले ते सगळे वेगळे ठेवायला सुरुवात केली. टू-व्हीलर वडिलांकडून घेतली. हेल्मेट त्यांनीच आणलेले. मात्र कपडे, शूज यावर पैसा खर्च करणारा अनुप आपला राहण्या-जेवण्याचा खर्च घरातल्यांनी करायलाच हवा, यावर ठाम. आपण रोज घरी वेळेत येतो, पार्टीसाठी पैसे घेत नाही; तरी घरी चिडचिड व्हावी, याचे त्याला आश्चर्य वाटायचे.

‘अर्न अँड स्पेंड’चे तत्त्व आचरणात आणणारा आपला मुलगा, पैसा खर्च करणे हा आयुष्यातील सुखाचा भाग मानतो. स्वत:साठी जगतो. मी मिळवलेला हा पैसा; मला लागेल तसा मी खर्च करणार, ही त्याची वृत्ती. यातून त्याला बाहेर कसे काढायचे? आजीने ‘तू देतोस ना घरात पैसा?’ असे विचारले तेव्हा प्रचंड हसत तो म्हणाला, ‘माझा ‘पॉकेटमनी’ आहे. मी कशाला देऊ?’ तेव्हाच कॉलेजमध्ये जाऊन अनुपच्या असल्या वागण्यावर त्याच्या प्राध्यापकांशी बोलायचे, हे वडिलांनी ठरवले. वडिलांना सहकार्य करत कॉलेजने अनुपचा सत्कार करायचे ठरवले. मुद्दाम. संयोजकांनी कुटुंबाला मदत करणारा, स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात जसा बदल केला तसा घरादाराचा अंतर्बाह्य बदल घडवणारा, म्हणून त्याची प्रशंसा केली.

‘मोअर मनी मे मेक अस् समव्हॉट हॅपिअर, बट हॅपी पीपल अल्सो सीम टू मेक मोअर मनी’ असे म्हणत तो कसा छान, खुश राहतो, हे सगळ्यांना सांगितले. आपली ही स्तुती ऐकताना तो गोंधळला. सुमेध क्रिएटिव्ह आहे, सोशल मीडियाचा योग्य वापर त्याचा नि आपण फक्त सोशल होत जगतोय. आहोत आपण मजेत? आहे अधिकार सत्काराचा? केलीय मदत घराला? खाली मान घालून तो बसून राहिला.

आपली निवड का केली? जॉब करून पैसे उधळणारे आपण. घरासाठी पैसा खर्च करणे, ही घर चालवणार्‍या वडिलांची जबाबदारी. आजवर असेच मानत आलो. कायम बाहेरच राहिलो, कोणकोणते प्रॉब्लेम्स घरी असू शकतात, याचे भान ठेवले नाही. हे काहीच माहीत नसलेल्या या कमिटीने आपले नाव सुचवले. खरे काय ते सांगून आपण इथून ताबडतोब घरी गेले पाहिजे. ‘सॉरी सर, आय डोंट डिझर्व इट’ म्हणत ताडकन उठत तो बाहेर पडला, तेव्हा त्याला कोणी अडवले नाही...
(bhargavevrinda9@gmail.com)