आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेट्स सेलिब्रेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तम निरीक्षणशक्ती, आकलनशक्ती, प्रचंड कल्पनाशक्ती आणि त्याला जोडून धडाडी, चिकाटी, नेतृत्वगुण, मेहनती आणि प्रामाणिक स्वभाव असेल तर करिअरमध्ये यशस्वी होणं फार काही कठीण नाही. बर्‍याचशा करिअरमध्ये पारंपरिक किंवा साचेबद्ध अभ्यासक्रम असणारी विद्यापीठं किंवा महाविद्यालय नसतातच मुळी, पण तरीही ती करिअर मुलांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवू शकतात. ‘सेलिब्रेशन’ किंवा साजरे करण्याचे सुगीचे दिवस आजकाल आपण पाहतोय. त्यामुळे बच्चे कंपनीच्या वाढदिवसापासून ते लग्न, मुंजीपर्यंत आणि एखाद्या नामांकित उत्पादनाच्या बाजारपेठेतील पदार्पणापासून ते सांस्कृतिक कार्यक्रमापर्यंत सगळीकडेच आज ‘सोहळे’ होत आहेत. हे सोहळे साजरे करणारे लोक म्हणजे ‘इव्हेंट आॅर्गनायझर्र्स’ किंवा ‘इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी’ असते.

आपल्या बर्‍याचशा विद्यार्थी मित्रांचा कल पारंपरिक अभ्यासाकडे तुलनेने कमी असतो. इतिहास, भूगोल आणि गणिताशी त्यांची फारशी मैत्री जमत नाही. काही हरकत नाही. यांच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वैरत्व न ठेवताही काही करिअर मैत्रीपूर्ण मदतीचा हात पुढे करतात तेव्हा मात्र आपण त्यांचा करिअर म्हणून गांभीर्याने विचार करायलाच हवा. एखादा ‘इव्हेंट’ साकार करणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नक्कीच नसते.

त्यासाठी मुळात आधी कार्यक्रमाविषयीची संपूर्ण माहिती घ्यावी लागते. जर ते एखाद्या वस्तूचे उत्पादन असेल तर त्या वस्तूची उपयुक्तता, कुठल्या लोकांसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, त्या लोकांची मानसिकता, त्यांची अभिरुची शिवाय ज्या ठिकाणी कार्यक्रमाचे संयोजन करायचे आहे ती जागा कशी असावी, किती मोठी असावी, त्याच्याशी खर्चाची आखणी कशी काय करता येईल, या ‘इव्हेंट’साठी केलेल्या खर्चाचा ‘मोबदला’ खरोखरीच किती आणि कसा काय मिळवता येईल.

शिवाय या कार्यक्रमाद्वारे प्रदूषणाच्या नियमाचे उल्लंघन तर होणार नाही ना, शिवाय स्थानिक पातळीवरील शासकीय परवानगी सुद्धा आलीच, या आणि अशा कितीतरी बारीक सारीक गोष्टींचा विचार आणि सूक्ष्म अभ्यास करावा लागतो. प्रत्यक्ष कार्यक्रमादरम्यानचे ध्वनिसंयोजन, विजेच्या करामती, अन्य काही उपकरणांसाठी लागणारे इंधन हे सगळंच बघणं महत्त्वाचं असतं. सोहळा अधिक दिमाखदार, आकर्षक, नेत्रसुखकारक, लोभस आणि प्रभावी होण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सगळं करण्यासाठी शर्थीने प्रयत्न करायला हवेत. मग ती नामांकित गवयाची मैफल असो किंवा एखाद्या गाडीचं किंवा तत्सम वस्तूचं बाजारपेठेतील नव्यानेच होणारं पदार्पण असो प्रत्येकालाच त्या सोहळ्यानंतरच्या ‘मोबदल्याची’ अपेक्षा असते. आणि तो मोबदला अधिकाधिक मिळावा या अपेक्षेने आणि उद्देशानेच मुळात कोणताही इव्हेंट अगदी जिवापाड मेहनत करून संयोजित केला जातो. या करिअरसाठी प्रवेश घेण्यासाठी प्रत्यक्ष कुठल्याही औपचारिक शिक्षणाची अट नसली तरी सुद्धा किमान आपल्या विद्यार्थी मित्राने पदवीधर होणे तरी गरजेचे समजावे. ज्यांना ज्या क्षेत्रात खूप उंचावर जायचे आणि आणि पहिल्यापासूनच ठरवलेलं आहे त्यांनी हा विषय स्पेशलायझेशनसाठी घेऊन एमबीए करायला काहीच हरकत नाही. कारण शासकीय, निमशासकीय, खासगी संस्था, कॉर्पोरेट, जाहिरात कंपन्या, प्रसार माध्यमांना अशा इव्हेंट मॅनेजमेंटची नितांत आवश्यकता असते. त्या दृष्टीने तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात अशा एखाद्या कंपनीतून करायला हरकत नाही.

म्हणजे अनुभव मिळण्याच्या दृष्टीने त्याचा खूप फायदा होईल. एखादी गोष्ट आवडीने, उत्साहाने आणि मनापासून केली तरच ती पूर्ण होऊ शकते आणि यशस्वीही होते तेव्हा अचाट, अफाट, कल्पनाशक्ती, जिद्द, चिकाटी, प्रामाणिक परिश्रम करण्याची तयारी ज्यांची आहे त्यांच्यासाठी त्यांच्या करिअरचा प्रत्येक दिवसच ‘सेलिब्रेशन’ होऊ शकतो तेव्हा लेट्स सेलिब्रेट.

(vilasgavraskar@yahoo.co.in)