आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी \'लढवय्या\' मैत्रीण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइलचा स्क्रीन समोर चमकतो आहे... कुठल्या तरी अनोळखी नंबरवरून मेसेज आला आहे... फक्त चार शब्द... नजरेला अक्षरं दिसताहेत, पण त्यांचा अर्थ डोक्यात शिरत नाहीए. ‘सत्त्वशीला इज नो मोअर’... म्हणजे काय? ठाणकन डोक्यात दगड पडतो. सत्त्वशीला- म्हणजे ‘आपली’ सत्त्वशीला? आणि ‘नो मोअर?’ अगं, कालच तर बोललो होतो ना आपण? आणि आज ‘नो मोअर?’ कसं काय शक्य आहे हे? आणि त्या अपरिचित नंबरावरून कुणीतरी मस्करी तर करत नाहीए ना? अशी जीवघेणी मस्करी? वाईट बातम्या खºया नसाव्यात असं कितीही वाटलं तरी त्या खोट्या नसतातच. तशीच हीदेखील. अजून त्या दु:स्वप्नातून जागं व्हायला मन तयार नाही. माझी जीवश्च कंठश्च मैत्रीण आज या जगात नाही, यावर विश्वास ठेवायला अजूनही मन धजावत नाही.

पन्नास वर्षांपूर्वी आमची रुईया कॉलेजातल्या संस्कृतच्या (बी.ए.) वर्गात भेट झाली आणि तिथे जुळलेले ऋणानुबंध अव्याहतपणे कालपर्यंत चालू राहिले, अधिकाधिक दृढ होत गेले. आमचा पाच-सहा जणींचा गट अगदी वैशिष्ट्यपूर्ण होता. त्यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यांची ‘ला’कारान्त नावं - विमला, शशिकला, नीला, सत्त्वशीला आणि मृदुला. मी सोडून सगळ्या तैलबुद्धी. एकदा वाचलेला श्लोक किंवा सूत्र किंवा ऋचा तोंडपाठ. संस्कृत व्याकरणात इतकी गती की भाषांतरासाठी इंग्रजीत उतारे असले तरी केवळ गद्यात भाषांतर न करता चक्क संस्कृत पद्यात किंवा श्लोकातच. सत्त्वशीला तर एसएससीला बीडकर प्राइस-विनर होती आणि नंतर तर तिला जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्तीही जाहीर झाली होती. पण तिचा विनय एवढा दांडगा की, ही गोष्ट आम्हाला आत्ता आत्ता कळली; तीही केवळ अपघाताने. तिनं स्वत:हून कधीही आपल्या विद्वत्तेचा बडेजाव मिरवला नाही.

संस्कृतच्या वर्गात जुळलेली आमची मैत्री पन्नास वर्षे अभंग राहिली, ती केवळ आमच्या एकमेकींवरील निरपेक्ष प्रेमामुळेच. त्यात कधीही बाधा आली नाही. काळाच्या प्रवाहात/ओघात आम्ही शरीरानं जरी दूर राहिलो तरी मनानं अगदी तश्शाच एकरूप होतो. त्यात प्रत्येकीचं कार्यक्षेत्र वेगवेगळं झालं तरी कुठूनतरी एकमेकींचा संबंध यायचाच आणि प्रत्येक जण शक्य तितकी एकमेकींना मदत करायचीच. सत्त्वशीला महाराष्ट्र राज्याच्या भाषा संचालनालयात वरिष्ठ अधिकारी, अनुवादक म्हणून काम करू लागली आणि तिनं ‘न्यायव्यवहार कोश’ निर्माण करण्यात खूप महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यात तिचं एलएल.बी.चं शिक्षण तसंच संस्कृतचं सखोल ज्ञान कामाला आलं. नंतर नंतर तिनं संस्कृतचं देवनागरीतून रोमन लिपीत लिप्यंतर करण्याच्या शास्त्रावरही प्रभुत्व मिळवलं. भाषा-संचालनालयातून ती उपसंचालक पदावरून स्वेच्छानिवृत्त झाली तोपर्यंत ती एक तरबेज संपादक, मुद्रितशोधक बनलेली होती. मीही माझ्या परीनं अशीच एक समांतर वाट चोखाळत होते. मी पुस्तकांची संपादक झाले होते आणि त्याच कामाच्या दरम्यान डॉ. ग. त्र्यं. देशपांडे, डॉ. शं. गो. तुळपुळे अशा महनीय विद्वानांकडून संस्कृतचं लिप्यंतर करायलाही शिकले होते. त्यामुळेच 1995मध्ये जेव्हा सत्त्वशीलानं मुंबईहून पुण्याला स्थलांतर करायचं ठरवलं, तेव्हा तिच्या हातातलं एक महत्त्वाचं काम तिनं माझ्या हातात सोपवलं. ते होतं ‘जर्नल ऑफ द एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे’ या वार्षिकांकाचं कॉपी-एडिटिंग आणि प्रूफ-रीडिंग. सत्त्वशीलानं हे काम त्याआधी तीन वर्षं सांभाळलं होतं आणि तिच्यानंतर मी पंधरा वर्षं सांभाळलं.

सत्त्वशीलानं मुंबई सोडून पुण्याला जायचं ठरवलं होतं ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं; कारण मुंबईतल्या प्रदूषित हवेमुळे तिच्या फुप्फुसांवर विपरीत परिणाम झाला होता आणि पुण्याच्या हवेत तिची प्रकृती सुधारेल, असा त्यांचा अंदाज होता. खरोखरच तसं झालं. 1995 ते 2013 या अठरा वर्षांत तिची प्रकृती नुसती सुधारली एवढंच नाही, तर तिनं तुम्हा-आम्हाला झेपणार नाहीत अशी डोंगराएवढी कामं करून दाखवली.

त्यातलं सर्वांत मोठं काम ‘शब्दानंद’ या महाप्रचंड शब्दकोशाचं. पूर्ण बारा वर्षं अथक परिश्रम करून तिनं अक्षरश: एकहाती हा त्रैभाषिक शब्दकोश लिहिला. तपश्चर्याच म्हणायची ती. इंग्रजी-मराठी-हिंदी या तिन्ही भाषांतले हजारो पर्यायी शब्द तिनं उतरवून काढले, काही तर स्वत: निर्माण केले. त्यांची तिला हवी तशी मांडणी करण्यासाठी संगणकतज्ज्ञांची मदत घेऊन एक नवीन प्रणाली निर्माण केली आणि हे सर्व स्वत:च्या प्रकृतीची तमा न बाळगता किंवा अन्य अडचणींमुळे भांबावून न जाता. तिची जिद्द, चिवटपणा, बौद्धिक क्षमता आणि कोशकार्याची जिवंत ओढ निव्वळ ‘विलक्षण’ म्हणावी अशी होती. आम्ही मैत्रिणींनी या शब्दानंदच्या प्रकाशनानंतर तिचा शाब्दिक सत्कार केला, ‘महाराष्ट्रातील कोशकारांच्या थोर परंपरेत’ ती जाऊन बसली म्हणून. याच कार्याशी संलग्न असं तिचं दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे ‘मराठी भाषेच्या संवर्धनासाठी’ किंबहुना मराठीच्या शुद्धलेखनासाठी तिनं सुरू केलेली चळवळ. ‘शुद्धलेखन’ या विषयाच्या ध्यासानं तिचं आतडं तुटत असे. त्यासाठी तिनं एक जोरदार मोहीमच उभारली. किती वृत्तपत्रांतून, मासिकांतून लेख लिहिले, सरकारदरबारी किती पत्रं लिहिली, किती परिसंवादांतून किंवा व्याख्यानांतून आपले विचार तळमळीनं मांडले त्याची गणतीच नाही. मराठी साहित्य महामंडळाकडे पोटतिडकीनं पाठपुरावा केला त्याची परिणती झाली नुकत्याच निघालेल्या एका दुरुस्तीच्या आदेशानं. मध्यंतरीच्या काळात दोन-तीन पिढ्यांना परिचित झालेले ‘ल’ आणि ‘श’ आता पुन्हा ‘ल’ आणि ‘श’ होणार आहेत, केवळ सत्त्वशीलामुळं.

अशीच तिची एक वेगळी कामगिरी म्हणजे नवीन शब्द चलनात आणणं. ‘एन्फोर्समेंट डिरेक्टरेट’ला पूर्वी ‘अंमलबजावणी संचालनालय’ म्हणत असत, पण सत्त्वशीलानं आपला मुद्दा अभ्यासपूर्वक मांडून त्याचं ‘सक्तवसुली संचालनालय’ करायला लावलं. याचं सर्व श्रेय तिला एकटीलाच आहे.

तिच्या स्वभावातच एक ‘लढवय्या’पण होतं. कुणाचंही, कसलंही काम असो; एकदा तिनं हातात घेतलं की सर्वस्व ओतून तिनं पाठपुरावा केलाच असं समजा. सत्त्वशीलाची ‘घरचं खाऊन लष्कराच्या भाकºया भाजण्याची’ कामं सतत चालू असत. एवढं करून तिनं भाषेच्या अभिवृद्धीचा जो वसा हातात घेतला होता, त्याचा कधीच विसर पडू दिला नाही. ‘व्याकरणशुद्ध लेखनप्रणाली’, ‘शब्दानंद’ आणि अशीच आणखी काही पुस्तकं म्हणजे तिच्या बौद्धिक कामगिरीची साक्ष आहेत.

सर्वांसाठी झटून काम करणारी अशी माणसं आताशा दुर्मिळ होत चालली आहेत. त्यामुळे ‘सत्त्वशीला सामंत यांचे निधन’ नुसते दुर्दैवी आणि अकालीच नाही, तर त्यामुळे समाजाचीही कितीतरी वैचारिक हानी झाली आहे. माझी तर सख्खी धाकटी मैत्रीण गेली, हे दु:ख मी आता कसं पेलणार?
(mrudulapj@gmail.com)