आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...तोपर्यंत देवाला रिटायर करता येणार नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आइन्स्टाइनच्या सापेक्षतावादाने विज्ञानात प्रस्थापित संदर्भाला पुन्हा एकदा प्रचंड धक्के द्यायला सुरुवात केली. न्यूटनच्या कार्यकारणभावात अंगभूत धरलेले गुणधर्म, उदाहरणार्थ, गुरुत्वाकर्षण वस्तुत: स्थल-काल वक्र झाल्याचा परिणाम होता. शिवाय ते विलक्षण सापेक्ष होते. न्यूटनचे नियम फक्त स्थलकालाच्या एकाच संदर्भ चौकटीत शक्य व गणितीदृष्ट्या बरोबर होते. दुसर्‍या संदर्भ चौकटीत ते चुकीचे ठरले असते. शिवाय सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार एकच गोष्ट ‘सत्य’ वा असापेक्ष होती : प्रकाशवेग. प्रकाशवेगाने जाणार्‍या कोणत्याही द्रव्याचे ऊर्जेत रूपांतर होणे अपरिहार्य होते. आइन्स्टाइनने गमतीने म्हटले : मला नेहमी असा प्रश्न पडतो की, देवाला असे विश्व बनवताना काही पर्याय होता का?
वस्तुत: लौकिकार्थाने आइन्स्टाइन धार्मिक वा आस्तिक नव्हता. अस्तित्वाच्या गहन प्रश्नांसाठी त्याला देवाची संज्ञा आवडे. किंबहुना, अशा प्रकारच्या प्रश्नांनी शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, ईश्वरवाद्यांना आजतागायत अक्षरश: पछाडलेले आहे. आइन्स्टाइनच्या सापेक्षतावादाचा धक्का बसतो न बसतो तोच क्वाँटम सिद्धांताने विज्ञान-विश्वातील सर्व गृहीतकेच उलटीपालटी केली. कुठलाही सूक्ष्म कण उदाहरणार्थ, इलेक्ट्रॉन. याची स्थिती व संवेग दोन्ही एकाच वेळेला ठरवणे शक्य नसते. जर स्थितीचे मापन केले, तर संवेग अनिश्चित असतो. याउलट संवेग निश्चित ठरवला, तर स्थिती अनिश्चित. कोणत्याही क्षणी तुम्ही काय अवलोकन करायचे ठरवता, यावर निश्चित-अनिश्चित काय ते ठरते. म्हणजेच, काय होऊ शकेल, हे तुम्ही काय निवड करता यावर अवलंबून असते. निवडीचे ‘स्वातंत्र्य’ आहे, पण तेही मर्यादित. आणि काय होऊ शकेल, तेही निश्चित आहे; परंतु ते निवडीवर अवलंबून आहे. नियती पूर्णत: ठरलेली नसते. त्याचबरोबर ती तितकीशी स्वैरसुद्धा नसते. तो पर्याय व शक्यतांचा एक अपूर्व संगम असतो. केवळ ईश्वरवाद्यांनाच नव्हे, तर विज्ञानवाद्यांनासुद्धा हलवून टाकणारे हे निष्कर्ष होते. प्रश्न फक्त ‘इतकाच’ आहे की निवड व शक्यता ‘ठरतात’ कशा?
नमूद करण्यासारखी गोष्ट अशी की, विज्ञानाने आजतागायत वारंवार क्वाँटम मेकॅनिक्सचे हे निष्कर्ष प्रयोगाद्वारे, गणिताद्वारे सिद्ध केले आहेत. मानवी अंत:प्रेरणेच्या व कार्यकारणभावापेक्षा काहीशी फारकत सांगणार्‍या या सिद्धांतावर आइन्स्टाइनने म्हटले होते, ‘‘देव कधी फासे टाकत नाही.’’ कोपनहेगन या परिषदेत नील बोहरने आइन्स्टाइनला उत्तर दिले : ‘‘जग कसे चालवायचे, हे आपण देवाला सांगू शकत नाही.’’ लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, दोघेही लौकिकार्थाने श्रद्धाळू नव्हते. क्वाँटम मेकॅनिक्सच्या सिद्धांताने वैज्ञानिक जगात खळबळ माजवून दिलेली असताना व सर्व स्थापित निष्कर्ष झुगारून दिलेले असताना, कुर्ट गोडेल या ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ व गणितज्ञाने अजून एक सिद्धांत मांडून खळबळ माजवून दिली. गॉडेलच्या सूत्रानुसार कोणत्याही एका गणिती व्यवस्थेत, कमीत कमी एका गणितीय सत्याची सत्यासत्यता सिद्ध करणे शक्य नसते; त्या अर्थाने ती गणितीय व्यवस्था अपूर्ण असते. 16व्या शतकातल्या हतबुद्ध अपूर्णतेने विसाव्या शतकात ‘मूर्त’ गणितीय स्वरूप घेतले आहे! परंतु प्रश्न केवळ अपूर्णतेचा नाही व श्रद्धा-अंधश्रद्धा-आस्तिकता, नास्तिक असण्याचाही नाही. तो या विश्वाचे, कितीही ते अगम्य अनंत असले तरी त्याचे अवधान असण्याचा आहे. ‘‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेचि झाले एकसंध’’ असे ज्ञानेश्वर म्हणाले, त्याचा आहे. माणसाच्या सहवेदनेचा आहे. अशी एकसंधता केवळ तर्कशुद्ध कार्यकारणभावातून साधता येत नाही. तसे असते तर मानवनिर्मित प्रचंड संहार, विज्ञानाच्या विलक्षण शोधाचाच वापर करून होणारी युद्धे व रक्तपात झाला नसता. वेड लावणारे एकारलेपणही नसते आणि समूहातले एकटेपणही. धर्मश्रेष्ठतेच्या नावाने, परंपरेच्या, भूतकाळाच्या नावाने हिंसा झाली नसती. जग हे गणिती अर्थाने ‘न्याय्य’ झाले असते. परंतु तसे झालेले नाही. म्हणूनच ज्ञानेश्वरांना ‘आता विश्वात्मके देवे’ असे म्हणून पसायदान मागावे लागले. तर जे. कृष्णमूर्ती म्हणाले, ‘विचारांच्या मार्गाने तयार केलेली देवाची संकल्पना, ही त्या विचारांसारखीच मर्यादित असते. त्या विचारांच्या अनन्वित मार्गाचा आणि चलाख मार्गांचा वेध घेणे, मनाचा गोंधळ उडवणारे असते. कारण तो श्वास अखेरीस कालाच्या कक्षेत असल्याने सीमित असतो. तो ‘मी’चा एक आविष्कार असतो. त्यांची मर्यादा कळली तर बुद्धी, मन व सततचे विचारांचे दुष्टचक्र शांत होऊ शकेल; त्यातून निर्माण होणारी ऊर्जा अनिर्बंध असेल, पण मी त्याला ‘देव’ म्हणणार नाही. ती अवस्था म्हणजे शोध नसेल वा एखाद्या नवीन संकल्पनेचा उदय. ती एक स्वगतीविरहित चैतन्यमय अवस्था असेल.’ काही जण अशी अवस्था, ‘नामस्मरणाने’ ‘प्राप्त’ करता येऊ शकेल, असेही म्हणतात.
कदाचित ती अवस्था ‘अवघा रंग एक झाला’ अशी असेलही, परंतु विज्ञानदेखील अशा ‘मानवी’ जगासाठी प्रयत्नशील आहे. क्वाँटम मेकॅनिक्सचा शोध लागून जेमतेम सत्तर वर्षेच झाली आहेत. आणि या सर्व विज्ञानांना सामावून घेणारी ‘युनिफाइड थिअरी’ असावी, असे बहुतेक शास्त्रज्ञांचे मत आहे. क्वाँटम शास्त्रज्ञ वॉर्नर हायझेनबर्गने लिहिले आहे, ‘‘या नवीन तत्त्वसिद्धांतात मनुष्य, भावना, मन व माणसाच्या जाणिवेचा अंतर्भाव असेल.’’ अशा तत्त्वसरणीमुळे सध्या जगाला भेडसावणारे सांस्कृतिक व राजकीय तणाव कमी होऊ लागतील. परंतु अशा प्रक्रियेला विरोध करणार्‍या प्रक्रियासुद्धा तितक्याच जोमाने कार्य करतील.

आपली उज्ज्वल, सांस्कृतिक परंपरा व ज्ञानाच्या ‘जाज्वल्य’ इतिहासाला त्यात प्राधान्य मिळावे, असा त्यांचा प्रयत्न असेल. तंत्रज्ञान अशा विरोधी प्रक्रियेला मदतच करेल. मानवी समाजासाठी व जगासाठी या प्रक्रियांचा अंतर्विरोध व घर्षण ही एक अत्यंत अस्थिर व धोकादायक अवस्था असेल. परंतु त्यातून अंतिमत: निर्माण होणार्‍या जगात स्थिरता व शांतता असेल. त्यात सर्व संस्कृती व विविध मानवी प्रवाह एकत्र नांदू शकतील. त्यात विचार व कर्म, ध्यान आणि कृती यांचा विलक्षण संगम असेल. कदाचित तशी ‘अवस्था’ येईलही, पण तोपर्यंत ज्याच्या त्याच्या ‘देवाला’ रिटायर करता येणार नाही! (समाप्त)
(संदर्भ : माइंड ऑफ गॉड - पॉल डेव्हिस, शॅडो ऑफ माइंड - रॉजर पेन्रोज, फिजिक्स ऑफ फिलॉसॉफी - वॉर्नर हायझेनबर्ग, किनारा - कुसुमाग्रज, ट्रॅडिशन अँड रेव्होल्युशन - जे. कृष्णमूर्ती)
chinmay.borkar@gmail.com