आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भला माणूस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योग-व्यवसायात यशस्वी होण्यासाठी दूरदृष्टी, जिद्द आणि कामाशी निष्ठा या बाबींची प्रामुख्याने गरज असते. या गोष्टी जर तुमच्याकडे असल्या तर उद्योजक केवळ देशातच नाही, तर विदेशातही यशस्वी होऊ शकतो. उदारीकरणाच्या सध्याच्या युगात खरे तर उद्योजकासाठी देशांच्या सीमा या ‘संकुचित’ ठरल्या आहेत. विश्व हीच त्यांची बाजारपेठ ठरली आहे. अशा प्रकारे विश्वाला गवसणी घालणारे दुबईस्थित मराठमोळे उद्योजक डॉ. धनंजय दातार यांनी अलीकडेच आपल्या उद्योग व्यवसायाची 30 वर्षे पूर्ण केली. हे निमित्त साधून डॉ. दातार यांनी नव्या आणि जुन्या दुबईला विभागणार्‍या खाडीतून ‘ग्लास बोटी’ने सफर करत पत्रकार परिषद घेतली आणि एका नव्या विक्रमाची नोंदही केली. अशा प्रकारच्या बोटीतून प्रवास करत पत्रकार परिषद घेण्याच्या विक्रमाची नोंद लिम्का बुकमध्ये पहिल्यांदाच झाली आहे

दातार यांच्या अल अदिल उद्योगसमूहाचा विस्तार आता केवळ दुबईतच नव्हे, तर संपूर्ण अरब अमिरातीत पसरला आहे. 25 सुपर स्टोअर्स, दोन फ्लोअर मिल्स, दोन मसाला कारखाने आणि जगात निर्यात करण्यासाठी भारतात स्थापन केलेली निर्यात कंपनी, असा त्यांच्या उद्योगसमूहाचा पसारा आहे. गेल्या 30 वर्षांत त्यांनी ही झेप घेऊन ‘मसाला किंग’ ही पदवी सार्थ ठरवली.

अमरावतीतील शेगावमध्ये 1964मध्ये जन्मलेल्या धनंजय दातार यांच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती साधारणच होती. दोन वेळचे जेमतेम जेवण घेता येईल अशी परिस्थिती. यातच त्यांनी प्राथमिक शिक्षणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतरचे शिक्षण मुंबईच्या कालिनाजवळील महापालिकेच्या शाळेत झाले. 1976मध्ये वडील कामाच्या निमित्ताने दुबईत आले आणि त्या पाठोपाठ तरुण धनंजयचे अरबस्तानला पाय लागले. पुढे जाऊन हा तरुण संयुक्त अरब अमिरातीतील आघाडीच्या भारतीय 100 उद्योजकांत 19व्या क्रमांकावर विराजमान होईल, असे कुणालाही स्वप्नातही वाटले नव्हते. नोकरी करत असताना हळूहळू वडिलांनी दुबईत किराणा मालाचे छोटेसे दुकान सुरू केले. त्याच दुकानाच्या गोदामात राहायचे, तेथेच जेवण करायचे, असा दिनक्रम सुरू होता. दिवस जात होते; मात्र भविष्यात काय वाढले आहे, याचा काहीच पत्ता नव्हता. अगदी झाडू मारण्यापासून ते वेळ पडल्यास 50 किलोचे पोते उचलण्यापर्यंत सर्व कामे करायची. तरुण धनंजयची इच्छाशक्ती दांडगी होती. जीवनात काहीतरी करण्याची महत्त्वाकांक्षा होती. उद्योग क्षेत्रात नाव कमावण्याची मनीषा होती.

प्रत्येक उद्योजकाकडे संशोधन वृत्ती लागते. त्यातूनच नवीन बाजारपेठेचा शोध लागतो. दातार यांनीदेखील दुबईतील एक सुप्त बाजारपेठ हेरली. दुबईत कामधंद्यासाठी जे भारतीय गेले होते त्यांना आपल्या घरचे मसाले, लोणची, खाखरा व अन्य अस्सल भारतीय खाद्यपदार्थ मिळाले तर पाहिजेच होते. जास्त किंमत मोजूनही ते यांची खरेदी करायला तयार होते. दातार यांच्या वडिलांच्या किराणा मालाच्या दुकानात भारतीय ग्राहकांना धान्य जरूर मिळत होते, मात्र त्यापेक्षाही त्यांना भारताच्या कानाकोपर्‍यातून जर कुणी खाद्यान्ने आणली असती तर ती पाहिजे होती. दातार यांनी हाच नेमका धागा पकडला आणि दुबईतील केवळ मराठीच नव्हे, तर पंजाबी, गुजराती व भारतातील कानाकोपर्‍यातील ग्राहकांच्या जिव्हेची मागणी पूर्ण करण्यास सुरुवात केली. पाव दशकापूर्वी दुबईत नोकरीधंद्यासाठी येणार्‍या भारतीयांची संख्या झपाट्याने वाढत चालली होती. त्याच जोडीला दातार यांचा व्यवसायही बहरू लागला.

भारतातून विविध प्रकारची खाद्यान्ने आयात करून त्याचे दुबईत वितरण करण्याच्या कामात दातार यांचे नाव झाले. त्यांनी पहिले सुपरस्टोअर सुरू केले आणि अल अदिल हा ब्रँड विकसित केला. जशी अल अदिलच्या उत्पादनांची मागणी वाढत गेली, तशी त्यांच्या सुपर स्टोअरची संख्या फुगत गेली. आता त्यांच्या सुपर स्टोअर्सची संख्या 25वर गेली आहे. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या पाच वर्षांत त्यांच्या सुपर स्टोअर्सची संख्या दुपटीने वाढली. जगात व पर्यायाने दुबईला जागतिक मंदीचा फटका सहन करावा लागत असताना दातार यांच्या उद्योगाने भरारी घेतली, हे कौतुकास्पद आहे. आज भारतातून सुमारे आठ हजार उत्पादने ते आयात करतात आणि आपल्या दुबईतील लाखो भारतीय ग्राहकांपर्यत पोहोचवतात. दुबईत खाद्यान्ने आयात करण्यासाठी कडक नियमावली आहे. या सर्व नियमांची पूर्तता करत कोणताही पदार्थ खराब होणार नाही याची दक्षता घेत त्यांनी हा व्यवसाय सांभाळला आहे. दुबईत भारतासारखे करांचे ओझे नाही. तसेच तेथील व्यवहारातही पारदर्शकता आहे. अशी स्थिती जोपर्यंत भारतात येत नाही तोपर्यंत आपल्याकडे खर्‍या अर्थाने विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर येणार नाही, या दातारांच्या म्हणण्यात तथ्य आहे. आज जगभरातून गुंतवणूकदार दुबईत गुंतवणूक करण्यासाठी येतात. त्यांच्या दृष्टीने दुबई हा गुंतवणुकीसाठी स्वर्गच ठरला आहे. दुबईतील 96 टक्के व्यापार हा भारतीयांच्या हातात आहे. तर सोन्याच्या व्यवहारात तर हे प्रमाण 90 टक्के आहे. दुबईतील अनेक जण भारतात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, दुबईसारखी सुलभ कररचना व व्यवहारातील पारदर्शकता भारतात आली तरच ते भारतात गुंतवणूक करतील. धनंजय दातार यांची ही जी मते आहेत त्याच्याशी अनेक उद्योजक सहमत असतील.

धनंजय दातार हे जन्माने मराठी असले तरीही त्यांचा उल्लेख आता मराठी उद्योजक म्हणून करणे चुकीचे वाटते. कारण त्यांचा व्याप आता जगभर पोहोचला आहे. मराठी माणूस मात्र आजही ‘आमची अन्य शाखा नाही’, असे म्हणण्यात धन्यता मानतो. दातार मात्र मराठी असले तरीही या ‘मराठी संकुचित’ मनोवृत्तीचे नाहीत. उलट ‘आमच्या जगभर शाखा आहेत’, असे सांगण्यात त्यांना अभिमान वाटतो. मराठी माणसाने, उद्योजकाने आपल्यात कसा बदल घडवून आणला पाहिजे, याचा आदर्श दातार यांनी घालून दिला आहे. आपण उद्योजक नसतो तर ‘अल अदिल’ मात्र असतो. अरबी भाषेत ‘अल अदिल’चा अर्थ भला माणूस असा आहे. अशी ही ‘अल अदिल’ मसाला किंगच्या उद्योजकतेची कथा.
prasadkerkar73@gmail.com