आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप घेताना...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेले वर्षभर जे. कृष्णमूर्तींचे शिक्षणविचार यावर लिहिता आले. खरं तर वर्षभर यातील विषयात विविधता येईल का, ही शंका होती. पण शिक्षणातले प्रश्न आणि कृष्णजींची उत्तरे असे विकसित होत गेले. पूर्वीपासून कृष्णजी वाचत होतो, पण प्रत्यक्ष आजच्या शिक्षणातल्या प्रश्नांना त्यांची मांडणी उत्तर ठरेल का, याबाबत स्पष्टता लेखनातून आली आणि ते आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आहेत हे लक्षात आले.
लेखमाला चालू असताना अनेकांनी हे सारे नवीनच वाटतेय.... कृष्णजींविषयी माहीत नव्हते, अशा प्रतिक्रिया दिल्या. याचे कारण कृष्णजींनी शिक्षणावर इतके चिंतन करूनसुद्धा जगभर त्यांच्या प्रेरणेने शाळा सुरू होऊनसुद्धा आमच्या डीएड, बीएड कॉलेजात त्यांचा साधा उल्लेखही कधी आला नाही. त्यामुळे शिक्षकांना कृष्णजी कधी माहीतच झाले नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रतिबिंब शिक्षणात पडले नाही. आज शिक्षण कायद्यातली मूल्यमापन प्रक्रिया मुलांना कृतिरूप शिकवणे, शिक्षा न करणे यासारख्या अनेक गोष्टी या शाळांकडून आल्या; पण या शिक्षणाविषयी, कृष्णजींविषयी शासन म्हणून कुठेच परिचय केला गेला नाही. शांतिनिकेतनला केंद्र सरकारने जितके महत्त्व दिले तितके कृष्णमूर्ती शाळांना कधीच दिले गेले नाही. पं नेहरू, इंदिरा गांधी कृष्णजींना अनेकदा भेटायचे; पण तरीही हे घडले नाही. अनेकांनी कृष्णजींच्या पुस्तकांविषयी उत्सुकता दाखवली. कुठे मिळतील हेही विचारले. मराठीत पुस्तके कमी आहेत. ती औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाने व पुण्याच्या चंद्रकला प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहेत. इंग्रजीतली बहुतेक सर्व पुस्तके ही कृष्णमूर्ती फाउंडेशनने प्रसिद्ध केली आहेत. पण इंटरनेट वापरणार्‍ यांसाठी खुशखबर ही आहे की, त्यांचे सर्व विचार सर्व व्हिडिओ नेटवर उपलब्ध आहेत. ‘ऑनलाइन कृष्णमूर्ती’ या साइटवर ते आहेत. त्यात कोणताही शब्द टाकला की कृष्णजींनी त्या विषयावर काय म्हटलंय याची शेकडो पाने समोर येतात. त्याची लिंक www.jkrishnamurti.org/
भारतातील या शाळांचे व अभ्यास मंडळ, पुस्तके यांचे संचालन करणारी संस्था आहे कृष्णमूर्ती फाउंडेशन. या फाउंडेशनच्या सर्व उपक्रमाची माहिती आपल्यालाwww.kfionline.org/
या लिंकवर वाचायला मिळेल. भारतातील सर्व कृष्णमूर्ती शाळांच्या विषयीची एकत्रित माहिती याच वेबसाइटच्या
http://www.kfionline.org/education/education-centres या लिंकवर वाचायला मिळेल. भारतात त्यांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांचे वेबसाइट खालीलप्रमाणे आहेत.
http://www.rishivalley.org/
http://www.kfirural.org/Apschool.html
http://www.j-krishnamurti.org/
http://www.thevalleyschool.info/
http://www.theschoolkfi.org/
http://www.sahyadrischool.org/
परदेशातील कृष्णजींच्या शाळांची माहिती पुढील लिंकवर उपलब्ध आहेत.
http://brockwood.org.uk/
http://www.oakgroveschool.com/
वरील सर्व माहिती ही खूप तांत्रिक वाटेल, पण कृष्णजींविषयी परिपूर्ण माहिती या लिंकमधून जिज्ञासू वाचकांना नक्कीच मिळू शकेल. महाराष्‍ट्रात राजगुरूनगरजवळ सह्याद्री स्कूल ही शाळा आहे. या शाळेच्या परिसरातच कृष्णमूर्ती अभ्यास केंद्र आहे. तिथे राहून कृष्णजींचा अभ्यास करणेही शक्य आहे. कृष्णजी वाचणे हा असा अनुभव असा असतो की, तुम्ही स्वत:चा बचाव करूच शकत नाही... तुम्ही अपरिहार्यपणे बदलाच्या प्रक्रियेचा भाग बनून जाता. पाण्यात राहून कोरडे राहणे जसे शक्य नसते तीच तुमची अवस्था असते. तुम्ही नकळत स्वत:चे निरीक्षण करायला सुरुवात करता. त्याची परिणती ही तुम्ही अतिशय कोमल, संवेदनशील होण्यात होते. भावना तुमच्यावर फारशी हुकूमत गाजवू शकत नाही. तुम्ही शांतपणे तिचे निरीक्षण सुरू करता.गेले वर्षभर कृष्णजींविषयींची माझी समज मलाच तपासता आली. कदाचित खरे वाटणार नाही, पण अगदी उत्स्फूर्तपणे हे सारे लिहिले गेले. लिहीपर्यंत ठरवले नसायचे.ज्येष्ठ कवी द. भा. धामनस्कर यांनी कृष्णमूर्तींवर लिहिलेल्या कृतज्ञतेच्या कवितेच्या ओळींनी डोळ्यात अश्रू येऊन लिहावेसे वाटते...
जीव तोडून सांगायचास हिताच्या गोष्टी
कळवायचाही क्वचितच आम्हाला
कळत नाही म्हणून
तेव्हा तुझी संपूर्ण कणव दिसायची तुझ्या चेहर्‍ यावर
ईश्वरत्वाची झलक असलेली...

आपल्या स्मृतींनाही आपल्यावर
अधिकार गाजवायचा नाही
इतका सूक्ष्म होता तुझ्या मानवी स्वातंत्र्याचा अर्थ.

अहिंसा तुझ्या कणवेचेच फुल होते
तू इतका अहिंसक की क्रोधालाही
भयालाही दाबू नकोस म्हणायचास
‘‘ जे उद्भवते ते पाहा फक्त.
जे पाहणेच देईल मुक्ती अक्षरश : बघता बघता’’
जागे आहोत प्रत्येक विकार उद्भवताना
होत आहोत अधिकाधिक कोमल
होत आहोत अधिकाधिक प्रेममय

आमच्या निद्राधीन मूढतेवर तुझ्या करूणेचा पहारा ठेव.