आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फिलगुड सिनेमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिडे हा चित्रपट एक परफेक्ट चित्रपट आहे. सिनेमा म्हटल्यानंतर दोन गोष्टी येतात; एक कला आणि मनोरंजन. कुरासावाचे चित्रपट व इराणी चित्रपट आपण कला म्हणून बघतो, पण शनिवार- रविवारचा वेळ जावा म्हणून पाहिलेला चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठीचा असतो. त्यात आपल्याकडचा शोले किंवा इंग्रजीतला गॉडफादर, बाँडपट, हॅरी पॉटर इत्यादी मोडतात. हॉलिडे हा त्यापैकीच एक आहे. मुद्दाम त्याबद्दल लिहिण्याचे कारण असे की त्याची दिग्दर्शिका महिला आहे आणि मानवी नात्याचा इतका सहजसुंदर वेध घेणारा चित्रपट अभावाने जाणवतो. अ‍ॅमंडा ही तरुणी हॉलीवूडचे ट्रेलर्स बनवते, तर आयरिश (केंट ब्रिसलेट) ही एका वृत्तपत्रात पत्रकार म्हणून नोकरीला आहे. दोघींचाही ख्रिसमसच्या आधी ब्रेकअप झाला आहे. अ‍ॅमंडा आपल्या बॉयफ्रेंडने सेक्रेटरीशी संबंध ठेवल्याने त्याला बाहेर काढते, तर आयरिश ही एका वर्तमानपत्रात नोकरी करते आणि ज्याच्यावर तिचं प्रेम असतं तो आॅफिसातला सहकारी एंगेजमेंट घोषित करतो. चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा आयरिशच्या आवाजातलं निवेदन ऐकून ती म्हणते, काही वेळा जगात लोकांना प्रेम लागतं. पण आमच्यासारख्या एकतर्फी प्रेम करणार्‍यांचं काय? हृदयावर आघात झालेल्या दोघीही कुठेतरी दूर एकट्याने सुटी घालवायचा प्लॅन करतात आणि इंग्लंडच्या सरेमध्ये राहणारी आयरिश आणि लॉस एंजलिसमध्ये राहणारी अ‍ॅमंडा एकमेकांच्या घरी (परिचय नसताना) सुटी घालवतात.

अ‍ॅमंडाने कामालाच वाहून घेतलेलं असतं. त्यामुळे सुटीचा तिला अनुभव नसतो. आयरिशच्या घरात बर्फ पडत असतो. त्यातून तगमगत ती घरात प्रवेश करते आणि इथे तिला अचानक आयरिशचा भाऊ भेटतो; विधुर, दोन मुलांना घेऊन राहणारा. दोघेही जवळ येतात, अगदी प्रेमातल्या पुढच्या पायर्‍याही पार करतात आणि मग तो तिला हे सत्य सांगतो. साहजिकच थोड्या काळापुरता आपण चांगला वेळ घालवला आणि यापुढे ते आठवत एकमेकांपासून वेगळं व्हायचं, असं दोघं ठरवतात. कारण अर्थातच अ‍ॅमंडाचं घर अमेरिकेत असतं. इकडे आयरिशच्याही आयुष्यात बरंच काही घडतं. सर्वप्रथम तिला वाट चुकलेला नव्वदीचा म्हातारा भेटतो. तिच्याशी थोडं बोलल्यावर तो तिला विचारतो, ‘तू इंग्लंडमधल्या कोणत्या भागातून आलीस?’ ती म्हणते, ‘सरे’. तर तो म्हणतो, ‘कॅरी ग्रँड सरेचा होता.’ ती विचारते, ‘तुम्हाला कसे कळले?’ तो म्हणतो, ‘एकदा त्यानेच मला हे सांगितले.’ तो असतो एकेकाळचा प्रसिद्ध पटकथा लेखक आर्थर एॅबट. त्या घरात तिची माइल्स या संगीतकाराशी ओळख होते. तो एका अभिनेत्रीच्या प्रेमात बुडालेला असतो. माइल्स आणि आर्थर हे दोघे मिळून तिला एक वेगळी उमेद देतात. दरम्यान माइल्सचाही ब्रेकअप होतो आणि दोघे प्रेमात पडतात. अशा चित्रपटात अनेक गोष्टी रचलेल्या असतात, शेवट आपल्याला माहीत असतो. तरीही तो पाहायला लावण्यासाठी अभिनय, संवाद, पात्रांची निवड आणि जगण्याचं सोपं, सुटसुटीत तत्त्वज्ञान हे सारे दिग्दर्शकाकडे असावे लागते. त्यामुळेच रोमँटिक कॉमेडी हा प्रकार आधी इंग्लंड, अमेरिकेत प्रथम नाटक आणि मग सिनेमात रुजू झाला. सुरुवातीलाच दोघींच्या प्रेमभंगामुळे प्रेक्षक त्यांच्या थोडा जवळ जातो, पण खरे तर असे सिनेमे बरेच आहेत. या सिनेमाचे वेगळेपण म्हणजे त्यानंतर दोघींचाही समजूतदारपणाकडे प्रवास होतो. आयरिशला माइल्स संगीताबद्दल आणि एॅबट आपल्या नव्वद वर्षांच्या अनुभवाने जगाबद्दल सज्ञान करतो, तर अ‍ॅमंडाला तिचं कचकड्याचं जग सोडून दोन मुलांना वाढवणार्‍या वडलांना आई आणि वडलांच्या भूमिका कशा साकाराव्या लागतात ते दिसतं. त्या छोट्याशा गोष्टीत दोघीही मनाने बर्‍याच मोठ्या झालेल्या असतात. टीकाकारांना हा चित्रपट आवडला नाही, पण कधीही पाहिलं की आनंद देणारा आणि अफाट लोकप्रियता मिळवलेला हा चित्रपट आहे.
shashibooks@gmail.com