आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे गेले भयपटांचे भय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी मनातील भावनांमध्ये भय हा प्रमुख घटक असतो. माणसाला वाटणारी कुठल्याही गोष्टीतील असुरक्षितता, स्वत:ला त्यातून वाचण्याची नसलेली हमी भयाची निर्मिती करण्यास पुरेशी ठरते. आदिम आणि स्वाभाविक समजल्या जाणार्‍या मानवी भावनेला, म्हणजेच भयाला केंद्रस्थानी ठेवून बनवलेल्या कुठल्याही आविष्काराला म्हणजेच चित्रपट वा साहित्याला बुद्धिजीवी वर्गाने कायमच दुय्यम स्थान दिले आहे. मात्र या भयपटांचं आजतागायत जगभरातल्या प्रेक्षकांवर गारूड राहिलं आहे. अशा वेळी अलीकडच्या काळात प्रदर्शित भयपटातले ‘भय’ संपत तर चाललेले नाही, असा प्रश्न सृजनाच्या पातळीवर उपस्थित होऊ लागला आहे.

बॉलीवूडमध्ये साधारणत: 1949 च्या सुमारास कमाल अमरोही यांचा ‘महल’ हा भयपट आला होता. अशोककुमार आणि मधुबाला यांची भूमिका असलेल्या या चित्रपटाने त्या काळी प्रचंड यश मिळवले होते. पूर्णत: भयपट म्हणवल्या जाणार्‍या प्रकारात ‘महल’ हा बॉलीवूडचा पहिला भयपट. या भयपटाने अशोककुमार व मधुबाला यांच्यासह पार्श्वगायन करणार्‍या लता मंगेशकर यांनाही रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली. इथून मानवी मनातील भयाचे कोपरे चाचपडणे बॉलीवूडमध्ये सुरू झाले. याचेच आणखी एक 1962 मधले यशस्वी उदाहरण म्हणजे ‘बीस साल बाद’. लगोलग 1965मध्ये आलेला ‘भूत बंगला’ हा चित्रपटही आता भयपटांची मालिका सुरू होणार, हे अधोरेखित करू लागला.

तो काळ कृष्णधवल होता. पांढरा आणि काळा या रंगांचा एरवी इतर प्रकारच्या चित्रपटांमध्ये होणारा वापर आणि भयपटांमधील वापर यात अर्थातच फरक होता. भयपटांमध्ये पांढरा रंग सज्जनतेचे प्रतीक होते; तर काळा रंग सैतानी शक्तीचे. भयपटातले भूत ही सहसा स्त्रीच असायची, जी पांढर्‍या साडीत दाखवली जायची. ओसाड महालापासून महालातली एखादी कुलूपबंद रहस्यमय खोली वा घनदाट जंगलातून रात्री-बेरात्री येणारे घुंगरांचे आवाज, झोका घेणारा आत्मा, अचानक स्वयंपाकघरातील ओट्यावरून पडणारी भांडी वा अचानक कंदील पडून दिवाणखान्यात लागलेली आग, वार्‍याचा सन्नाटा, उघडझाप करणारे दरवाजे, खिडक्या इथपासून सिनेमॅटोग्राफीचे तंत्र विकसित होत गेले, तसे एखाद्या बंद दरवाजामागे तो हळूहळू उघडताना काय असेल, याची वाढवणारी उत्कंठा आणि दचकवणारा एखादा क्षण अशी अनेक धक्कातंत्रे भय निर्माण करण्यासाठी वापरली जाऊ लागली. कथानकामध्ये फसवणूक करून खून वा मृत्यू झालेला आत्मा वा सैतानी आत्मा असे ढोबळ फरक वगळल्यास आत्मा, भूत, पिशाच ही मूळ संकल्पना कायम असायची. बहुतांश धक्कातंत्रे अगदी रामसे बंधूंचे हॉररपट येईपर्यंतही कायमच होती. रामसे बंधूंनी 1972 मध्ये ‘दो गज जमीन के नीचे’ चित्रपट काढून हॉररपटांमध्ये थोडे वेगळेपण आणण्याचा प्रयत्न केला. मिथकांचा वापर राजकुमार कोहलींच्या दोन चित्रपटांपासून सुरू झाला, त्यात ‘नागिन’ आणि ‘जानी दुश्मन’ या त्यांच्या चित्रपटांना वगळून चालणार नाही.

ज्या ‘द एक्झॉर्सिस्ट’मध्ये पांढर्‍या व काळ्या रंगाचा बरोबर विरुद्ध वापर करण्यात आला होता (काळ्या रंगाला सज्जनतेचे प्रतीक दाखवण्यात आले होते, पांढर्‍या रंगातल्या आत्म्याला सैतानी वृत्तीचे दाखवण्यात आले होते) त्या 1973 मध्ये आलेल्या चित्रपटापासून प्रेरित होऊन बॉलीवूडमध्ये ‘गहराई’ हा चित्रपट काढण्यात आला होता. मूळ चित्रपटातील लिंडा ब्लेअरची व्यक्तिरेखा त्या वेळी पद्मिनी कोल्हापुरेने साकारली होती. ‘द एक्झॉर्सिस्ट’नंतर बरोबर सहा-सात वर्षांनी म्हणजे 1980 मध्ये हा चित्रपट आला होता.

जागतिक स्तरावरील भयपटांची किंचितशी झाक या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलीवूडमधील भयपटांमध्ये यायला लागली आहे, अशी आशा निर्माण झाली होती. पण आपल्याकडे इतर प्रकारचे चित्रपट कथानकाच्या मूळ संकल्पनेच्या बाबतीत जसे विकसित झाले, त्या वेगाने मात्र भयपट आकार घेऊ शकले नाहीत. साधारणत: 80च्या दशकानंतर रामसे बंधू नाहीत तर भयपट कुणी काढणार नाही का, असा प्रश्न उपस्थित होईस्तोवर काही काळ पोकळी निर्माण झाली होती. जे भयपट त्या काळात निघत होते, ते ही पोकळी भरून काढण्याच्या ताकदीचे नव्हते. भयाचे क्षेत्र आता विस्तारत चालले आहे, याची समज जागतिक स्तराबरोबरच (चांगले हॉलीवूड दिग्दर्शकही अपयशी ठरले आहेत. आतापर्यंत आॅस्करच्या यादीत ‘द एक्झॉर्सिस्ट’सारखी एखाद-दुसरीच दुर्मिळ भयपटांची नावे आपल्याला दिसतील.) बॉलीवूडमध्ये अद्यापपावेतो भयपट भूतपिशाचाच्या पलीकडे जाऊ शकलेला नाही. रामसे बंधूंनी ज्या प्रकारचे भयपट आणले त्यात साचेबद्धता आल्याने एका टप्प्यानंतर ते हास्यास्पद ठरत गेले. जागतिक पातळीवर त्यातल्या त्यात ‘द डिसेप्शन’सारख्या अलीकडील चित्रपटात केव्हिंग करताना होणार्‍या हॅलूसिनेशन्सचा (दृष्टी आणि जाणिवांच्या पातळीवरचे भ्रम) भयपट बनवण्यासाठी आधार घेतला गेला, वा ‘जॉज’ या स्पीलबर्गच्या चित्रपटात शार्क माशाच्या हल्ल्यांमधून थेट व वास्तव भयाचे तंत्र वापरले गेले, ‘टेक्सास इन मॅसॅकर’सारख्या चित्रपटात नरभक्षकांवर आधारित भयनिर्मिती करण्यात आली होती. मात्र आपल्याकडील भयपटांमध्ये भूतपिशाचाचा वापर करून किळसवाणे प्रकार निर्माण केले गेले, ज्याची एक अप्रत्यक्ष भीती प्रेक्षकाच्या मनात निर्माण केली गेली.

‘100 डेज’ या 1991मधील चित्रपटाने ज्या प्रकारे एक्स्ट्रा सेन्सेशन्सवर भर देऊन भय निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याचाच पुढचा प्रगत प्रकार म्हणजे ‘राज 3’सारख्या चित्रपटाने (राज या पहिल्या भागात जी किमया दिग्दर्शकाने साधली ती ‘राज 2’मध्ये साधली नाही; ना ‘राज 3’मध्ये, हे मात्र खरे) किळस ही भावना वापरून काही दृश्यांमधून भयाची निर्मिती केली. ‘राज 3’मध्ये थ्रीडी तंत्रज्ञान वापरून नायिकेच्या सर्वांगावर झुरळांचा वावर असो वा खलनायिकेचे अर्धवट बिनाकातडीच्या गचाळ आत्म्याशी चुंबनदृश्य असो वा शेवटी स्वत:वर अ‍ॅसिड फेकून जळून घेणे असो, अशी दृश्ये मनात किळसमिश्रित भय निर्माण करतात व भयपटाचा उद्देश साधला जातो.

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या विक्रम भट्टच्या केवळ दीड तासाच्या ‘हॉरर स्टोरी’ने प्रेक्षकांना सतत खिळवून ठेवणारा अनुभव दिला असला तरी संकल्पनेच्या बाबतीत पुन्हा या चित्रपटाने आत्म्याचीच चौकट वापरली. मात्र गाणी, प्रणयदृश्ये वा अंगप्रदर्शनासारखे भयापासून थोडे विचलित करणारे प्रकार न वापरून या चित्रपटाने भयावरची पकड कायम ठेवण्यात यश मिळवले, हा एक त्यातल्या त्यात चांगला प्रयोग म्हणावा लागेल. मात्र हे बदल 1949 ते 2013 हा प्रदीर्घ काळ पाहता पुरेसे नाहीत, हेही लक्षात घ्यावे लागते. कारण बहुतांश भयपटांनी प्रेक्षकांच्या मनातील अंधश्रद्धा ‘एन्कॅश’ करण्याचाच प्रयत्न केला, त्यात एकसुरीपणा येत गेल्यानेच ‘आत्मा’, ‘एक थी डायन’ आदी चित्रपटांनी अपेक्षित परिणाम साधला नाही. अशा वेळी केवळ पारंपरिक भयसूचक घटकांवर अवलंबून न राहता, लेखक-दिग्दर्शकांनी मानवी मनातल्या भयाच्या नव्या जागांचा कल्पकतेने शोध घेतला तरच यापुढील काळातले भयपट खर्‍या अर्थाने प्रेक्षकांची झोप उडवतील, तेव्हाच ‘भय इथले संपत नाही’ असे कुणी कल्पक लेखक-दिग्दर्शक म्हणू धजतील.
(priyanka.dahale@dainikbhaskargroup.com)