आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रपंच हा लटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरखगडाहून आहुपे घाट चढत होतो. वाटेवर एक शॉर्टकट घ्यावासा वाटला. त्या बाजूने जाऊ लागलो, तर एका गावकर्‍याने रोखले. इशारा दिला, त्या बाजूच्या गुहेत बिबट्या असतो! शहाणपणाने मळलेली वाट धरली. व्याघ्रजीव, अस्वल, हे प्राणी डोंगरकपारीतील गुहांमध्ये डेरेदाखल असतात. करवंदीची जाळी, बांबू बेटे, गवताळ जागा यामध्येदेखील जनावरे छपलेली असतात. एकूणच, पशु-प्राण्यांच्या रहिवासाचा अभ्यास, हा एक रंजक विषय.
मँचेस्टर युनिव्हर्सिटीच्या एका गटाने सुमात्रा बेटावरील माकडांच्या रहिवासाचा अभ्यास केला होता. झाडाची जाडजूड फांदी हा त्यांच्या निवार्‍याचा जोता, तर कोवळ्या पानांच्या फांद्या ही उशी. दिवसा अगर रात्री विश्रांतीस्तव, असा आसरा. मलेशियात ओरांगउट्टन ही वानरांची मोठ्या आकाराची प्रजाती पाहण्यात आली. एका झाडावरून दुसर्‍या झाडावर झोके घेतानाची त्यांची कसरत पाहून टारझनची आठवण आली. या वानरांत आणि माणसांत बरेच साम्य आहे. वजनात बाकी माणसालाही भारी, 80 किलो वजन गटातले प्राणी. उंच उंच झाडींच्या जंगलात रहिवास. तिथल्या वनअभ्यासकाने माहिती दिली, यांची निवासस्थाने तर चांगली 20-30 मीटर उंचीच्या झाडांवर असतात. अशा प्रकारच्या माकडांच्या घरांचा अभ्यास करून मँचेस्टर युनिव्हर्सिटीच्या एका गटाने एक सर्वसाधारण निष्कर्ष काढला होता, घर बांधून राहणारा आद्य प्राणी मानव नसून मर्कट होय. मर्कट हा घर बांधून राहणारा आद्य सस्तन प्राणी म्हणता येईल. तथापि, पक्ष्यांच्या घरट्यांना आपण दुर्लक्षू शकत नाही. पक्ष्यांच्या घरट्यांची नजाकत, कसब मानवालादेखील शक्य नाही.
अणुशक्तिनगरमध्ये वास्तव्यास असलेल्या डॉ. वेंकटरामाणी यांच्या घरी पक्ष्यांच्या घरट्यांचे प्रदर्शन पाहिले होते. नेहा पुल्लरवार या आर्टिस्ट. ‘कॉलनी’ हे प्रदर्शन असेच आनंद देऊन गेले. किड्या-मुंग्यांची मातीची घरे म्हणजे वारुळांनाही या प्रदर्शनांत स्थान होते. तथापि पक्ष्यांच्या निवार्‍याबाबतीत अधिक वैविध्य दिसून येते; डोंगरकपारी, उघड्यावरील दगडधोंडे, गवताळ जागा, झाडे, फांदीमधील ढोल्या, मानवी घरांतील आडजागा, अशा ठिकाणी पक्ष्यांच्या वसाहती आढळून येतातच, तथापि पक्ष्यांनी बनवलेली सुबक घरटी हा एक अजब निसर्ग नजारा असतो.
पक्ष्यांच्या निवार्‍यांची विविधता भारतात कुठेही टिपता येऊ शकते. तथापि, काही पक्षितीर्थे त्यास्तव ख्यात आहेत. राजस्थानातील भरतपूर ही तर पक्षीपंढरीच. जायकवाडी, नांदूर-मधमेश्वर, मायणी, नवेगाव, सागरेश्वर, भिगवण, ही महाराष्ट्रातील पक्षितीर्थस्थळे. उंच, बाणासारखे टोकदार रामबाण गवत. त्यात निवार्‍याला येणारे पक्षी हे नांदूर-मधमेश्वरचे वैशिष्ट्य. तर वाहत्या पाण्यावर तरते निवारे बांधणारे पक्षी जायकवाडी परिसरात ठिकठिकाणी दिसून येतात. पक्ष्यांचे निवारे हा प्रबंधाचा विषय आहे. मुख्यत्वेकरून विणीचा कार्यक्रम, अंडी उबवणे, पिल्लांचे पालनपोषण, यासाठी पक्ष्यांना निवार्‍याची जरुरी भासते. इमू म्हणजे शहामृगाची लहानसर जात. हा पक्षी भारतातला नव्हे. तथापि भारतात आज विविध ठिकाणी इमू फार्म्स उठताहेत! बारामतीशेजारच्या माळेगावचे संदीप टावरे, महाराष्ट्रात इमू फार्मचा शुभारंभ करण्याचा मान त्यांना जातो. इमूची उघड्यावर चालणारी वीण इथे निरखता येते. दलदलीतील गवतात आयबिस पक्ष्याचे कार्यक्रम पाहता येतात. जांभळ्या पाणकोंबड्यांनादेखील दलदल आणि गवताळ प्रदेश निवार्‍यासाठी भावतो. ग्रेब, गल्ल, स्टिल्ट पक्षी तर वाहत्या पाण्यावर आपले संसार थाटून ‘जीवन जैसा बहता पानी’चे दर्शन घडवतात.
पोपटाच्या जातीच्या पक्ष्यांचा कुटुंबकबिला झाडांच्या ढोलीतच वसतो. पारवे वगैरे कबुतर जातीचे पक्षी झाडाचा आधार घेतात, गवत किंवा काटक्या जमवून त्यावर घरटे बांधतात. राखी बगळे, रात बगळे, करकोचे, आदी बगळे आपली घरटी काटक्या अगर गवतांच्या साहाय्याने झाडावर बांधतात. झाडांमध्येदेखील दाट छायेच्या चिंचेच्या झाडांना अधिक पसंती. नवेगाव-गांधारी परिसरातील चिंचेची झाडे बगळ्यांनी व्यापलेली असतात. नर बगळा गवत, काटक्या जमवतो, मादीच्या चोचीत देतो. मादी बांधकाम करते. थोडे फार विणकामासारखेच काम. नाही तरी कलाकुसरीची कामे महिलावर्गाकडेच. गरुड, राखी श्रायिक, वॅबलर, ओरियल आदी पक्षीदेखील पालापाचोळा जमवून झाडावर निवारा बांधतात.
ओरियल, दयाळ वगैरे पक्ष्यांची झाडावरील घरटी फारच मोहक असतात. झाडाच्या दोन फांद्यांतल्या बेचक्यातले घर हा दयाळाच्या तंत्रकौशल्याचा दिमाखदार नमुना. वॅगटेल पक्षीदेखील हेच तंत्र अवलंबतो. त्याची कारागिरी दृष्ट लागण्यासारखी असते. याच तंत्राचा वापर वॅबलर पक्षी फक्कडपणे करतो. उभ्या बांबूच्या दोन काठ्यांच्या आधारे घरटे असे गुंफतो, की रसिकाच्या मुखातून केवळ दोनच शब्द उमटतात, ‘वाहवा... वाहवा!’ बगिचे तथा वडा-पिंपळाच्या झाडांवर बुलबुलांचा ‘प्रपंच हा लटका’. आंबा, जांभळासारख्या झाडांवर कावळ्यांनी बांधलेली घरटी अगदी शहरातदेखील पाहायला मिळतात. माळढोक पक्षी माळरानावर काट्याकुट्यांत अगर झाडावर आपला विणीचा कार्यक्रम उरकत असतो...