आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गार्‍हाणे ‘जांभूळ आख्यान’चे...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकमनाचे खेळ मोठे विचित्र असतात. धर्म, न्याय, नीती, सामाजिक संकेत आणि मानवी स्वभाव यांची अनाकलनीय सांगड लोकपरंपरांनी वारंवार घातली आहे. जगताना माणसाच्या हातून नैतिक-अनैतिक गोष्टी घडतच असतात. निर्मळ झर्‍यात काट्या-कुट्या पडत्यात म्हनुन झर्‍याचं पानी वंगाळ होत नाही... अन् या मनाच्या झरन्यात वाईट-साईट इच्यार येत्यात म्हनुन सारा जनम पापाचा होत नाही...!

मनात दडलेल्या या गोष्टी रामायण-महाभारतासारख्या काव्यातील कथांमध्ये रूपांतरित करून एक प्रकारचे भावनांचे विरेचनच लोककलांमधून होत असते. देवादिकांनाही लोभ, माया, मत्सर टाळता आले नाहीत; आपण तर मर्त्य मानव आहोत, अशी समजूत घालून शेवटी आख्यानादी कलांमधून जगण्याचे तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न लोककलांमध्ये होतो. शिवाय सामाजिक वास्तवाची किनारही त्याला असतेच. गोंधळी हा समाजव्यवस्थेतील शूद्रातिशूद्र घटकांपैकी एक होता. ते जिणे जगणार्‍या गोंधळ्याचे सामाजिक उपेक्षा, अपमानाचे दु:ख आणि कर्णाचे दु:ख हे एकाच जातीतले. एका दु:खिताने दुसर्‍या दु:खिताची बाजू घेऊन उभे राहणे, ही स्वाभाविक प्रतिक्रिया आणि म्हणूनच ‘जांभूळ आख्यान’ हा तत्त्वज्ञान आणि उपेक्षितांवरील सामाजिक अन्यायाचा भावनिक प्रतिकार आहे.

व्यासांच्या महाभारतात नसलेली, पण लोकवाङ्मयातून झिरपलेली एक विलक्षण कथा म्हणजे ‘जांभूळ आख्यान’. म्हणूनच की काय, नाटक करणार्‍यांनी त्याला ‘लोकमहाभारत’ हे उपनाव दिलंय. गोष्ट अगदीच छोटीशी... दुपारच्या दुसर्‍या प्रहरी पाचही पांडव राजमंदिरातून बाहेर गेले असता, अचानक कर्ण भेटीला आला आणि त्याला पाहून तिथे एकट्या असलेल्या द्रौपदीच्या मनात त्याच्याविषयी अभिलाषा निर्माण झाली.
झाडाची उडविली फळं, एका झाडाला एक फळ
लईच निरमळ... देठी गाभुळलं
अन् कर्णाला पाहून, द्रौपदीचं मन पाकुळलं...
थोडक्यात, ही कथा आहे पाप-पुण्याची, सत्य-असत्याची, नीती-अनीतीची... आणि त्यासाठी फॉर्म वापरला आहे ‘गोंधळ’ या लोककलेचा. लोकशाहीर विठ्ठल उमप आणि ‘जांभूळ आख्यान’ यांचे एक अतूट नाते तयार झाले होते. मेकअपशिवाय आणि कॉस्च्युमशिवाय शाहिरांनी या नाटकात साकारलेली द्रौपदी पाहिली की कोणत्याही अभिनेत्रीला स्वत:च्या अभिनयाची लाज वाटू लागेल, अशी पावतीच ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी हे नाटक पाहिल्यानंतर दिली होती. ‘द्रौपदीचं मन पाकुळलं’ असे म्हणत, शाहीर असे भावकाम करत, की पाहणार्‍याला त्यांच्या जागी द्रौपदीच दिसू लागायची, केवळ अभिनयच नव्हे तर त्यांची देहबोलीही द्रौपदीचीच व्हायची. त्यांचा 20-22 वार झगा म्हणजे त्यांच्या अंगावरचा लाखमोलाचा झगाच व्हायचा, मग तो सावरत ते लचकत-मुरडत चालायचे की, प्रत्यक्षातली द्रौपदीदेखील कधी एवढी अलवार चालली नसेल.

आज शाहीर या जगात नाहीत, परंतु त्यांची सावली ज्याच्यावर पडली, तो शाहिरांचाच मुलगा नंदेश विठ्ठल उमप आज तितक्याच ताकदीने ही द्रौपदी सादर करतो, यात वादच नाही. ‘जांभूळ आख्यान’च्या संपूर्ण प्रयोगभर तो द्रौपदीचा नखरा, रुसवा, तिची कर्णासाठीची तगमग आणि आपण परपुरुषाची वासना धरली म्हणून वाटणारी लज्जा, हे सारे भाव नंदेश मोठ्या नजाकतीने पेश करतो. त्याची ही द्रौपदी पाहताना त्याचे पौरुष कधीच आस्वादाच्या आड येत नाही. कारण हे कलागुण मातीतून म्हणजे लोककलांमधून त्याच्यात आले आहेत. हलगी कडाडते, तुणतुणं वाजू लागतं आणि संबळवर वादकाच्या काठ्या धावू लागतात, तेव्हा नटांच्या अंगात संचारतं. पायघोळ अंगरखा, खांद्यावर उपरणं, डोक्याला फेटा आणि माथा मळवटाने भरलेला, असा तो नट नंदेश विठ्ठल उमप राहत नाही. तो कथाकार होतो, क्षणात राधा होतो, क्षणात द्रौपदी होतो. हातातल्या शेल्याचं बाळ करून तान्ह्या कृष्णाला जोजवू लागतो, पांडवांना निरोप देताना आणि कर्णाला चोरून न्याहाळताना लाजवंती द्रौपदी होतो...

कथाकाराचा रांगडी ठसका आणि द्रौपदीची सरसर बदलणारी स्त्रीसुलभ रूपं नंदेश उमप दाखवतो, अवस्थांतरांमधले पॉजेस भल्या भल्या नटांना गारद करतील, अशा आत्मविश्वासाने घेतो आणि खुल्या गळ्याने गात आसमंत थरारून टाकतो. हे पाहिलं की प्रेक्षकांमध्ये टाळ्या देण्याइतकंही भान उरत नाही. उमपच नव्हे तर नागेश मोरवेकर, भरत काळे, विनोद पंडित आणि रंगमंचावरचा प्रत्येक कलाकार आणि वादक विद्युतभारित होऊन आपल्याला मुग्ध करतो. या सर्वांवर सुंदर साज चढवत राहतं ते अच्युत ठाकुरांचं प्रवाही संगीत.

सुमारे सतरा-अठरा वर्षांपूर्वी ‘इंडियन नॅशनल थिएटर’ अर्थात ‘आयएनटी’च्या लोककला संशोधन विभागाने ‘जांभूळ आख्यान’चा प्रयोग सादर केला होता. ‘आयएनटी’ने या आख्यानाला संशोधनाची जोड देऊन ते रंगभूमीवर सादर करण्याआधी काही वर्षे छबिलदास शाळेच्या रंगभूमीवर प्रायोगिक नाटकांच्या माहेरघरात नव्वदी पार केलेल्या गोंधळमहर्षी राजारामबापू कदमांनी ‘जांभूळ आख्यान’ लावलं, तेव्हा त्यांच्या अदेनं समस्त ‘इंटुकां’चे डोळे गरगरले होते. राजारामबापूंचा वारसा शाहीर विठ्ठल उमपांनी तितक्याच नेकीने आणि टेचाने रंगमंचावर मिरवला होता. लोककला प्रकारातल्या जागरण या विधिनाट्याचा बाज शक्यतो शुद्ध स्वरूपात राखून त्यातून नाटक घडवण्याचा प्रयत्न म्हणून, एरवी मौखिक परंपरेतून वाहत आलेल्या या आख्यानाची सुरेश चिखले यांनी बांधीव संहिता तयार केली आणि अजित भगत यांनी दिग्दर्शक म्हणून जबाबदारी शिरावर घेतली. लोकनाट्य नागर रंगमंचावर सादर होताना लेखक-दिग्दर्शकही अत्यावश्यक भासू लागले, त्याची ही खूण. पण त्यामुळे या आख्यानाला रंगमंचीय शिस्त आली.

आज अशा नाटकांसाठी चित्र जराही आशादायक नसताना, नंदेश उमपने पुन्हा या नाटकाची निर्मिती करण्याचे ठरवले, ते वडलांना आदरांजली देण्यासाठीच नव्हे तर स्वत:तल्या कलावंताची तडफड थांबवण्यासाठीच, यात वाद नाही. आज या नाटकाचे फारसे प्रयोग होत नाहीत, झाले तरी त्याला फारसे बुकिंग मिळत नाही. कारण अभिरुचीची व्याख्याच बदलली आहे. एका अस्सल जिवंतपणाला प्रेक्षक मुकत चालले आहेत. मात्र तरीही ‘जांभूळ आख्यान’ थांबणार नाही, असे नंदेश ठासून सांगतो. 2015मध्ये ‘जांभूळ आख्यान’ला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. निदान तोपर्यंत तरी हे नाटक खेचणारच, असा चंग नंदेशने बांधला आहे. आपली संस्कृती जिवंत राहिली पाहिजे, मूळ जिवंत राहिले पाहिजे, या जाणिवेतूनच नंदेश अतिशय खडतर अवस्थेत असतानाही नाटकाचे प्रयोग लावतोय. अनेक शाळा-महाविद्यालयांना त्याने ‘जांभूळ आख्यान’ पाहणे का गरजेचे आहे, आजच्या काळाशी ही कथा कशी सुसंगत आहे, याबद्दल आवाहन केले आहे. मुंबई-ठाण्याबाहेर या नाटकाचे प्रयोग करण्यासाठी नंदेश खूप उत्सुक आहे. लोककलेचा अभिमान बाळगणार्‍या मराठी रंगभूमीच्या मुख्य धारेत लोकनाट्यांकडे कायम दुय्यम म्हणून पाहिले गेले आहे. दादा कोंडकेंच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ने प्रस्थापित मराठी रंगभूमीला हलवून सोडलं. पण मराठीमधील सर्वोत्कृष्ट नाटक ठरवताना त्याचा कोणी उल्लेखही करणार नाही. शाहीर साबळे पार्टीचे ‘आंधळं दळतंय’, ‘कशी काय वाट चुकला’, आयएनटीचे ‘खंडोबाचे लगीन’ आणि अगदी त्याच वेळी सादर झालेले ‘जांभूळ आख्यान’ या नाटकांना नाटकांच्या प्रमुख स्पर्धेत कधीच स्थान मिळाले नाही, पुरस्कार मिळाले नाहीत, ‘मिफ्टा’ची परदेशवारी घडली नाही. अशा वेळी गावकुसाबाहेरच्या या नाटकांना मुख्य प्रवाहात आणणे खूप गरजेचे आहे, आणि तसे होताना दिसत नाही, ही या सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महाराष्ट्र राज्याची, मायबाप प्रेक्षकांची कुठेतरी चूक होत आहे, असे जेव्हा नंदेश म्हणतो; तेव्हा ते मनोमन पटायला लागतात.
(shivaprash@gmail.com)