आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्यू समाजाची कर्तृत्त्वभरारी...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील बेने इस्रायली ज्यू समाजात सुरक्षितता व जागरूकता निर्माण होताना धार्मिक परंपरा, रीतिरिवाज समाजापर्यंत पोहोचवणे, तसेच त्यांचा अर्थ व पालनाच्या काटेकोर पद्धतीची माहिती करून देणे जरुरीचे ठरू लागले. ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या धर्मप्रसाराच्या प्रचाराला आळा घालणेही आवश्यक होते. त्यात महत्त्वाचा वाटा जसा वर्तमानपत्रांनी उचलला होता, तसाच हिंदू समाजात रुजलेल्या कीर्तन परंपरेनेही उचलला होता. ज्यू समाजाने 1880 पासून कीर्तनाचा अवलंब केला. समाजात कीर्तने करून धर्मनिष्ठा वाढवण्यासाठी दाविद हाईम दिवेकर, बिनयामिन शिमशोन अष्टमकर, राहमिम शलोम तळकर अशा व्यक्तींनी प्रयत्न केला. 1880 मध्ये त्यासाठी ‘कीर्तनोत्तेजक मंडल’ ही संस्था स्थापन करून कीर्तनाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. समाजासाठी कीर्तने करताना काही नियम पाळले जावेत, असेही ठरले. या कीर्तनांसाठी स्वतंत्र कथा व पदरचना केल्या गेल्या. प्रथम कीर्तनात परमेश्वराचा लाडका भक्त व बेने इस्रायलींचा मूळ पुरुष अब्राहम परमेश्वराच्या आज्ञेवरून आपला लाडका पुत्र ‘इसहाक’ याला अर्पण करण्यास तयार होतो; पण परमेश्वर त्याची सुटका करतो. ही कथा सादर झाली 8 ऑगस्ट 1880 रोजी. मुंबईतील निशाणपाड्यावरील एका वखारीत हे कीर्तन ‘बिनयामिन शिमशोन अष्टमकर’ यांनी केले. मात्र या कीर्तनाचा समाजातील कर्मठांनी ही परंपरा हिंदू आहे; त्यातून समाजाला हिंदू बनवू पाहत आहात, असा अपप्रचार करून कीर्तनोत्तेजक मंडळातील लोकांना मारण्याची धमकी देण्यापर्यंत विरोध केला. त्यामुळे कीर्तन परंपरेला धर्मशास्त्राचा पुरावा शोधून- राजा दावीद काळात वाद्यांच्या तालासुरावर परमेश्वराची स्तुती केली जात असे. त्यापेक्षा कीर्तन वेगळे नाही, हे पुढील दोन वर्षांत सिद्ध केले व 1882 पासून समाजमान्य झालेली कीर्तने 1950पर्यंत सुरू राहिली. या काळात सुमारे 34 कीर्तन पदावल्या रचल्या गेल्या, तर 25-26 व्यक्तींनी हरिदास म्हणून कीर्तने केली. स्वातंत्र्यपूर्व काळात भारताच्या सर्व भागात जिथे जिथे बेने इस्रायली वसाहती होत्या त्या ठिकाणी, थेट कराचीपर्यंत कीर्तने झाल्याचे उल्लेख त्या वेळच्या इस्रायली वर्तमानपत्रांतून आले आहेत. अगदी अलीकडे फ्लोरा सॅम्युएल व रेचल गडकर यांनी कीर्तन सादर करून नव्या पिढीला त्याचा परिचय करून दिला. पौराणिक कथांवर आधारित असलेली नाटके सादर करण्यासाठी त्या काळी चार-पाच क्लब स्थापन झाले होते. 1896 मध्ये सॉलोमान शालोम आपटेकर यांनी लिहिलेली 75 पदे असलेले ‘संगीत दानिएल’ या नाटकाचे प्रयोग पुणे व मुंबई येथे झाले. या काळातील नाटकात स्त्री पात्रे पुरुषच रंगवत. यातील अब्राहम मोझेस इंदापूरकर यांचा उल्लेख ‘अंकुर’ या हस्तलिखितात आला होता. 1950 नंतर हौशी रंगभूमीवर बेने इस्रायली स्त्रिया काम करू लागल्या. त्यापैकी पूर्वाश्रमीच्या लिली इझिकेल तळेकर म्हणजेच आशा भेंडे; ज्यांनी व्यावसायिक मराठी रंगभूमीवर आपले अभिनयकौशल्य दाखवले. त्यानंतर सामाजिक नाटके नव्या नाट्यसंस्थांकडून सादर केली जाऊ लागली. मराठी नाटकेही हे कलाकार सादर करत. त्यामध्ये उद्याचा संसार, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, देवमाणूस अशा नाटकांचा उल्लेख करावा लागेल. चित्रपट क्षेत्रातही बेने इस्रायली समाजाचे योगदान मोठे आहे. 1931 ला प्रकाशित झालेल्या ‘आलम आरा’ या चित्रपटाची पटकथा योसेफ दाविद पेणकर यांनी लिहिली होती. चित्रपट क्षेत्रात नावाजलेले अभिनेते पद्मश्री डेविड म्हणजेच डेविड अब्राहम चौलकर, ज्यांना ‘बूटपॉलिश’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. तर रुबी मायर्स (सुलोचना) ही बोलपटाच्या क्षेत्रातील पहिली अभिनेत्री तर मिस प्रमिला एस्तेर अब्राहम यांची 1939 ते 1949 या काळात मिस इंडिया म्हणून निवड झाली होती. त्यांनी अभिनेत्री म्हणून लोकप्रियता मिळवली होती. याशिवाय सोफी सॅलोमान नागावकर यांनी नाट्य व चित्रपट क्षेत्रात अभिनय क्षेत्र गाजवले, त्याचप्रमाणे हान्नेक इसहाक सातामकर यांचाही उल्लेख करावा लागेल. साहित्याच्या क्षेत्रात नाटककारांप्रमाणेच प्रवासवर्णने, मानसशास्त्रावर आधारित साहित्य, चरित्रात्मक अशा मराठी साहित्याप्रमाणेच पुढील काळात इंग्रजी भाषेतून साहित्य निर्मिती करण्यात वाढ झाली. कारण इंग्रजी भाषेतून शिक्षण घेणार्‍यांची संख्या वाढली. सामाजिक व आरोग्यविषयक क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी झटणार्‍या काही व्यक्तींचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रातील बेने इस्रायली समाजाचे योगदान लक्षात येणार नाही. रिबेका सीमियान बेंजामिन (रिबेका सायमन वाक्रुळकर) या मुलीला विवाहानंतर मुंबईत वास्तव्याला आल्यानंतर तिच्या समाजसुधारक नवर्‍याने ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये सुईणीच्या प्रशिक्षणवर्गात दाखल केले. प्रेतांना, अस्थींना शिवणे धर्माविरुद्ध आहे, म्हणून त्यांच्या शिक्षणास विरोध करणार्‍या समाजाला न जुमानता त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्या काळात स्त्रियांना वैद्यकीय पदवी (डॉक्टर) मिळवता येत नव्हती. पण आपल्या डॉक्टर पतीकडून शिक्षण घेऊन त्या स्त्री रोगतज्ज्ञ झाल्या. स्त्री आरोग्य, बाळंतपण, गर्भधारणा अशा अनेक विषयांवर त्यांनी वृत्तपत्रांतून लेखन केले. त्यांचा ‘वंध्यत्व अथवा वांझपणा’ हा संशोधनात्मक लेख 1880मध्ये ‘सुधारक’च्या अंकात क्रमश: प्रसिद्ध झाला. त्याबद्दल कै. गोपाळ गणेश आगरकर यांनी त्यांचा या कार्याबद्दल पत्र पाठवून गौरव केला. त्यांनी ‘कुटुंब मंत्री’ (1878) व ‘सुईण’ (1879) ही पुस्तके प्रसिद्ध केली. स्त्री आरोग्य विषयावर त्या सातत्याने व्याख्यानेही देत. रिबेकाबार्इंची मोठी मुलगी एलिझाबेथ ही अमेरिकेत वैद्यकीय शिक्षण घेऊन एम. डी. झाली. ती भारतातील बेने इस्रायली समाजातील पहिली स्त्री डॉक्टर. 1947ला प्रकाशित झालेले ‘मक्काबी’ हे वृत्तपत्र सुवर्णमहोत्सवापर्यंत पोहोचवण्याचे श्रेय जाते ते एस. आर. बंदरकरांकडे (भाई बंदरकर). 1942 ला स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय भाग घेणार्‍या भाई बंदरकरांनी फाळणीच्या काळात व दंगलीच्या काळात पीडितांच्या पुनर्वसनासाठी मोलाचे श्रम घेतले. अहमदाबादमध्ये म्युनिसिपल प्राणिसंग्रहालय स्थापण्यास पुढाकार घेणार्‍या रुबेन डेविड दांडेकर यांना भारत सरकारच्या वतीने ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित केले गेले. ते हिंस्र, पाळीव व सर्व प्रकारच्या प्राण्यांशी सांकेतिक भाषा बोलू शकत. याशिवाय पद्मश्री डॉ. एसरबाई अब्राहम सॉलोमन कासुरकर या ‘संस्कृत पंडिता’ ज्यांना महामहोपाध्याय या पदानेही गौरवले गेले. ज्यू समाजातील अनेक संस्था-संघटना आहेत, ज्यांनी राज्याच्या; पर्यायाने देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले. यात बेने इस्रायली स्त्री मंडळाने ( 1913) स्त्रियांना मार्गदर्शन करण्याबरोबर व्यवसायासाठी, त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केले. तर दी ज्युईश क्लब- मुंबई, बेन हावरा हेल्थ होम-माथेरान, दिल्ली, पुण्याची द जुईश वेलफेअर असोसिएशन आदी संस्थांनी सांस्कृतिक कलागुणांना प्रोत्साहन दिले. स्वातंत्र्योत्तर काळात स्थलांतरित बेने इस्रायलींच्या समस्या सोडवण्यासाठी कौन्सिल आॅफ इंडियन ज्युरी प्रयत्न करते, तशीच (ओ.आर. टी.) आर्ट इंडिया ही 1960ला स्थापन झालेली संस्था सर्व देशातील ज्यू तरुणांनी स्वावलंबी व्हावे, म्हणून प्रयत्न करत आहे. द अमेरिकन ज्युईश जॉइंट डिस्ट्रिब्युशन कमिटी या संस्थेमार्फत भारतातील ज्यू समाजाला सहकार्य, प्रोत्साहन व मार्गदर्शन केले जाते, तर इव्हज असोसिएशन ठाणे, ही स्त्रियांसाठी असणारी संस्था ‘शायली’ हे त्रैमासिक चालवते. स्वातंत्र्योत्तर काळात इस्रायलच्या निर्मितीनंतर बेने इस्रायली समाजाचे इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले. त्यांची भारतातील लोकसंख्या कमी झाली, पण त्यांनी भारताशी असलेली नाळ व नाते तोडले नाही. आजही त्यांना आपल्या पितृभूमी इस्रायलप्रमाणेच मातृभूमी भारत व मायबोली मराठीचा अभिमान आहे व तो जपण्याचा, ते नाते वाढवण्याचे प्रयत्न सातत्याने या समाजाकडून केले जात आहेत.
(bsj286@yahoo.co.in)
(पुढील आठवड्यापासून प्रा. मंगला पुरंदरे यांची कच्छी गुजराती समाजाच्या योगदानाचा वेध घेणारी मालिका.)