आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाचा हेतू कोणता...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजपर्यंतच्या लेखमालेत आपण कृष्णमूर्तींचे शिक्षणावरचे अत्यंत टोकदार आक्षेप बघितले. शिक्षण कशाला म्हणू नये हे कृष्णमूर्तींच्या शब्दातच समजावून घेतले. पण कृष्णमूर्ती केवळ शिक्षणाचे दोष सांगत नाहीत, तर शिक्षण म्हणजे काय हेसुद्धा स्पष्ट करतात. वास्तविक पाहता त्यांच्या मनात शिक्षणाचे अत्यंत सुस्पष्ट चित्र आहेच. त्या चित्राला जिथे तडे जातात तेव्हा ते शिक्षणावर कोरडे ओढतात. तेव्हा तो केवळ नकार नसतो. कृष्णमूर्तींच्या शिक्षणविषयक मांडणीला आदर्शवादी अव्यवहारी ठरवण्याची एक फॅशन आहे. व्यवहार खूप वेगळा आहे, असे बोलले जाते. पण अशी टीका करणारे हे लक्षात घेत नाहीत की, गेली 75 वर्षे या मांडणीवर आधारित शाळा चालल्या आहेत आणि या शाळांमधून बाहेर पडलेले हजारो विद्यार्थी तुमच्या यशाच्या निकषावर उतरून परदेशातही आहेत. तेव्हा एकाच वेळी आंतरिक जीवन व बाह्य जीवन यशस्वी करण्याची ताकद कृष्णजींच्या मांडणीत आहे.

कृष्णमूर्ती आजचे शिक्षण, जे मुलांच्या उदरनिर्वाहाचा विचार करते त्याला तुच्छ लेखत नाहीत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ते फक्त शिक्षणाला तिथेच न थांबता आंतरिक जीवनाचा विचार करण्याचा आग्रह धरतात. केवळ भाकरी मिळवणे हेच शिक्षणाचे उद्दिष्ट नसावे हे कोणीही मान्य करील. कृष्णजींचा आग्रह यासाठी आहे की परीक्षा पास होणे, विषयांची तयारी करणे हे भावी जीवनातील आव्हानांसाठी जी तयारी करायला हवी त्यासाठीचा खूप छोटा भाग आहे. त्यातून उदरनिर्वाहाची सोय होईलही, पण जीवन म्हणजे फक्त तितकेच नाही. कृष्णजींच्याच शब्दांत समजावून घ्यायचे तर.....‘खरेखुरे जीवन जगण्यासाठी फार मोठे प्रेम हवे. शांततेविषयी खूप आस्था हवी. आत्यंतिक साधेपणा हवा. पूर्वग्रह, भोळ्या समजुती, आशा, भय यांचे बंधन नसता कामा नये. जीवनात हे सारे असते आणि असे जगण्यासाठी जर तुम्हाला शिक्षण मिळत नसेल तर ते शिक्षण अर्थहीन आहे.... तुम्ही टापटिपीने राहण्यास शिकाल, प्रसंगोचित योग्य वर्तणूक करण्यास शिकाल आणि सर्व परीक्षा पास व्हाल, पण एकीकडे समाजाची सारी इमारत कोलमडून पडत असताना या वरवरच्या क्षुल्लक गोष्टींना महत्त्व देणे म्हणजे तुमचे घर जळून राख होत असताना तुम्ही नखे साफ करून त्यांना चमक आणीत बसावे असा प्रकार होईल.... तुम्ही गणित, इतिहास, भूगोल असे काही विषय शिकण्यात दिवस घालवता. गंभीर विषयांबद्दल बोलण्यासाठी खर्च करायला हवा. कारण त्यामुळेच जीवनाला संपन्नता येते... पण या सर्व गोष्टींविषयी तुमच्याशी कोणी बोलत नाही...’

मला वाटते, या वाक्यांमधून शिक्षणात काय होत नाही व काय व्हायला हवे हे अत्यंत थेटपणे कृष्णजींनी सांगितले आहे. पण आमच्या शिक्षणाचा सारा भर एकतर केवळ उदरनिर्वाहाची साधने मिळवण्यासाठी तयार करतो किंवा किडलेल्या समाजाचा पाया असलेल्या मूल्यांना आदर्श मानून मुलांना अनुकरण करायला शिकवतो. महत्त्वाकांक्षेचे विष पाजून यशाची पूजा करायला शिकवतो. चांगले जीवन म्हणजे महत्त्वाकांक्षेत जळणे हे शिकवतो. हे कृष्णजी आपल्या लक्षात आणून देतात. जीवनाचे प्रश्न केवळ आर्थिक नाहीत तर भावनांचे समायोजन करणे आहे. ताणतणाव व्यवस्थापन करणे आहे. विचारांचा कलह शांत करून शांततेने जगणे आहे. चिंता, भीती यापासून सुटका करत ताणरहित जगणे आहे. महत्त्वाकांक्षेच्या आहारी न जाता प्रसिद्धीच्या पाठी न पळता अनामिकपणे समृद्ध जगता येणे आहे. कामवासना, क्रोध, द्वेष, सूड या पशुवत भावनांना आपल्यावर स्वार होऊ न देता संवेदनशीलतेने निसर्गाशी तादात्म्य होऊन जगणे आहे... हे सारे आमच्या शिक्षणाने आम्हाला शिकवायला हवे. कृष्णजी म्हणतात...‘जीवन म्हणजे ते पक्षी, ती फुले, ते वृक्ष-आकाश-तारे ...मनातील हेवेदावे, हव्यास, भय... पण आपण सामान्यपणे त्यातीलच एखादाच कोपरा समजावून घेण्याची तयारी करत असतो. आपण काही परीक्षा उत्तीर्ण होतो. नोकरी मिळवतो. लग्न करतो. मुलेबाळे होतात आणि आपण अधिकाधिक यंत्रवत बनतो... जीवनाची संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यास मदत करणे हे शिक्षणाचे कार्य आहे....’