आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of Madhavi Sharma, Page Three Journalist

माधवी शर्मा: पेजथ्रीची 'बातमीदार'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माधवी शर्मा. वय वर्षे बावीस. मास कम्युनिकेशनमध्ये डिस्टिंक्शन. बडिंग जर्नलिस्ट. ‘नेशन टुडे’ या इंग्रजी दैनिकात पत्रकारितेला सुरुवात करून सहाच महिने झाले आहेत. पेज थ्री हे तिचं बीट!

इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीतली गेल्या दोन-अडीच दशकात बहरलेली पेज थ्री ही संकल्पना. एकेकाळी माणसं आपल्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक-साहित्यिक कर्तृत्वानं प्रसिद्धी पावत. नाट्य आणि चित्रपट अभिनेत्यांना प्रसिद्धीचं वलय असे. पण या सर्वांची प्रसिद्धी ही आपापल्या विशिष्ट मर्यादित अवकाशात असे. आता ‘प्रसिद्ध’ असं न म्हणता ‘सेलिब्रिटी’ असं म्हणतात. या सेलिब्रिटीजच्या क्षेत्रांची संख्याही वाढली आहे आणि त्यांच्या आर्थिक पार्श्वभूमीला सर्वात जास्त महत्त्व आलेलं आहे. त्यामुळे आपापल्या विशिष्ट क्षेत्रातल्या कर्तृत्वापेक्षा आर्थिक झळाळीनं यातली बहुतेक मंडळी सेलिब्रिटी होत असतात. बिझनेसमन, अभिनेते-अभिनेत्री, फॅशन मॉडेल्स, फॅशन डिझायनर्स, चित्रपट व्यावसायिक, उच्चभ्रू लेखक, उच्चभ्रू समाज कार्यकर्त्या आणि श्रीमंत बिझनेसमनचे कुटुंबीय इत्यादी खूप मोठा विस्तार ‘सेलिब्रिटीज’चा झालेला आहे. त्यांच्या श्रीमंती पार्ट्यांनी महानगरांच्या रात्री सजतात. या पार्ट्यांचं रंगीत रिर्पोटिंग म्हणजे पेज थ्री. इंग्रजी दैनिकाचं या सेलिब्रिटीजना वाहिलेलं पान तीन. या तथाकथित सेलिब्रिटीजची प्रसिद्धीची हौस ते भागवतं, त्यांची काही ना काही व्यावसायिक उद्दिष्टं त्यातून साधतात. त्यामुळे अनेकदा अहमहमिकेनं पेज थ्रीवर झळकू पाहणारी ही मंडळी हे पान विकतही घेतात. वृत्तपत्राला जाहिरातींच्या उत्पन्नाबरोबरच किंवा त्याहून अधिक लाभ त्यातून होतो. ‘विकलं जाणं’ या क्रियापदाचे संदर्भ आणि अर्थ काळाबरोबर बदलत असतात! (हळूहळू मराठी वृत्तपत्रांवरही ‘पेज थ्री’ पत्रकारितेची छाया पसरू लागली हे सांगायला नको.) गेल्या काही वर्षांत पत्रकारितेत स्त्रियांचा सहभागही वाढला. पेज थ्रीसारखे विषय हे तर खास स्त्री पत्रकारांचेच मानले जात असतात.
दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी सामान्य जनतेला दुरुनच माहीत असलेल्या काही सामाजिक पैलूंचं वास्तव ओळीनं काही चित्रपटांतून उलगडून दाखवलं. ‘पेज थ्री’ हा त्यातला 2005 सालचा चित्रपट. माधवी शर्मा (कोंकणा सेन-शर्मा) ही वर उल्लेख केलेली त्याची नायिका. ही नायिका म्हणजे प्रत्यक्षात दिग्दर्शकाचं उद्दिष्ट साध्य करण्याचं त्याचं माध्यम आहे. ‘पेज थ्री’चं वास्तव त्याला मांडायचं आहे. ते तो माधवीच्या माध्यमातून मांडतो. त्यामुळे मधूनमधून माधवीच्या आवाजातलं एखाद-दुसºया वाक्याचं निवेदनही येतं. माधवी हे जसं पेज थ्रीसाठी वार्तांकन करणारं या नाट्यातलं एक पात्र आहे, तशीच ती त्या सर्व घटितांची निरीक्षकही आहे. किनाºयावर उभी राहून हे जग बघणारी. पण किनाºयावर उभी असल्यामुळेच ती त्या प्रवाहात कधी भिजली ते तिचं तिलाही कळलं नाही आणि मग त्या प्रवाहाचं वास्तव तिला आणखीनच प्रकर्षानं जाणवलं.

गेल्या सहा महिन्यांपासून माधवी मुंबईतल्या अशा पार्ट्या ‘कव्हर’ करते आहे. पार्टीतल्या आगमनांच्या अतिरंजित (ती अशा पार्ट्यांची खासियत) अनाउन्समेंटमधून तसंच माधवीच्या पार्टीत फिरण्यातून पात्रांची ओळख होत जाते. कुठे हिरेन संघवी स्वत:च ‘नेशन टुडे’च्या या पेज थ्री पत्रकार तरुणीला आपलं बिझनेस कार्ड देतो, तर कुठे माधवी आरती या अभिनेत्रीच्या मेकअपमनकडून-अभिजितकडून- गॉसिप मिळवण्याचा प्रयत्न करते. सगळीच मंडळी प्रसिद्धी मिळवण्यासाठी हपापलेली. त्यामुळे पेज थ्रीच्या पत्रकाराला भाव देत, तिला जणू आपल्यात सामील करत चालली आहेत. आपल्या ‘कर्तृत्वा’चं प्रदर्शन आणि दुसºया कुणाविषयी गॉसिप हा तिथल्या गप्पांचा मुख्य गाभा. त्यातून माधवीला तिच्या स्टोºया मिळतात. आई-वडिलांबरोबर बंगळुरूमध्ये राहणारी माधवी पत्रकारितेत करिअर करण्यासाठी मुंबईला आलेली आहे. एअरहोस्टेस पर्लबरोबर ती एक फ्लॅट ‘शेअर’ करते आहे. पार्टीत दिसलेल्या आणि नंतर लोकल ट्रेनमध्ये ओळख झालेल्या गायत्रीलाही ती फ्लॅट-पार्टनर करून घेते. गायत्री बॉलीवूडमध्ये अभिनेत्री बनायला आली आहे. तिला अर्थपूर्ण भूमिका करायच्या आहेत. पार्टीत फिल्म इंडस्ट्रीतल्या ओळखी होऊन चित्रपट मिळतील, अशी तिला आशा आहे. पत्रकार माधवी रोहित या फिल्मस्टारशी तिची ओळखही करून देते. स्त्रीमुक्तीचा पुरस्कार करणारे चित्रपट काढणाºया दिग्दर्शक चारुमोहनच्या प्रत्यक्ष वागण्याचा वाईट अनुभव आल्यानंतर गायत्री हादरते, तेव्हाही माधवी सकारात्मक आदर्शवादी दृष्टिकोन मांडत पर्लशी वाद घालते. म्हणते, ‘एक बुरा इन्सान मिल गया तो इसका यह मतलब थोड़े हो गया कि पूरी इंडस्ट्री बुरी हो गई? और यह तो हर इंडिव्हिज्युअल पे डिपेंड करता है कि वह कॉम्प्रमाइज करके आगे बढ़ना चाहता है या हार्ड वर्क से।’ पेज थ्रीपायीच तिला मॉडेल म्हणून संघर्ष करणारा तरुण भेटतो.
तरुण हा अभिजितचा दोस्त आहे. माधवी, अभिजित आणि तरुण यांची दोस्ती होते. माधवी आणि तरुण एकमेकांच्या जवळ येतात. पार्टीत अंजली थापर या श्रीमंत-पत्नीच्या समाजकार्याविषयी तिनं ऐकलेलं असतं. नवरा रोमेश थापर तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मुलगी रिया स्वच्छंद वागते म्हणून अंजली ही समाजकार्यात मन रमवते, असं गॉसिप पार्टीत केलं जातंय. माधवी मात्र तिच्या अनाथ मुलांच्या संस्थेत जाऊन तिच्यावर लेख लिहिते. परंतु या तिच्या लेखातला समाजकार्यासंबंधातला मजकूरच ‘एडिट’ केला जातो- कापला जातो आणि उरतं ते फक्त अंजलीचं थ्री पेज व्यक्तिमत्त्व. माधवीला पेज थ्रीचा हा आणखी दुसरा धक्का. त्यावर क्राइम रिपोर्टर विनायक माने (अतुल कुलकर्णी) तिला तुच्छतेनं म्हणतो, ‘किसने कहा आप जर्नलिस्ट हो?’
क्राइम रिपोर्टर विनायक माने पेज थ्रीला मुळात पत्रकारिता मानतच नाही. त्याला तो फक्त ‘एंटरटेनमेंट’- मनोरंजन असं म्हणतो. काहीशी अपमानित झालेली माधवी आता अधिकच गंभीरपणे याचा विचार करू लागते. समाजाशी नातं सांगणाºया खºया घटना इथे घडतच नाहीत, दिसतो तो सगळा चकचकीत दांभिकपणा. तिला काहीतरी अर्थपूर्ण करायचं आहे. ‘मला पेज थ्री करायचं नाही’ म्हणून ती संपादकाला सांगते. संपादकाला तिची हुशारी मान्य असली तरी त्याच्या मते ती पेज थ्रीपुरतीच आहे. तिच्या हट्टाखातर तो तिला क्राइम रिपोर्टर विनायक मानेबरोबर काम करायला सांगतो. माधवी शहरातल्या बाँबस्फोटांची घटना विनायकबरोबर कव्हर करते. त्याच दिवशी रात्री तिला पेज थ्री करणारी मुलगी गैरहजर असल्यामुळे पार्टी कव्हर करावी लागते.

शहरात बाँबस्फोट होऊन माणसं मेली असताना, वस्त्या-वस्त्यांत सांप्रदायिक दंग्यांची भीती निर्माण झालेली असताना काही लोकांना पार्टी करावीशी वाटावी, त्या पार्टीत चक्क असिस्टंट कमिशनर ऑफ पोलिस कदम असावा (जो अशा पार्ट्यांमधून नेहमीच दिसत आला आहे), याची तिला आणखी चीड येते. ती तिथल्या तिथे त्याला सुनावते, ‘शहर में ब्लास्ट हुए हैं... एसीपी को तो अपने ज्युरिसडिक्शन में होना चाहिए था न? आप तो यहाँ पे पार्टी कर रहे हैं...’ संपादक आणि विनायक दोघेही तिचं कौतुक करतात, त्याच वेळी तरुणला मॉडेलिंगची मोठी असाइनमेंट मिळाल्याचा फोनही येतो. माधवी खुश होऊन कँडललाइट डिनरची तयारी करून तरुणकडे येते आणि तिला धक्काच बसतो. तरुण आणि अभिजितचे संबंध ती याचि डोळा पाहते.

पेज थ्रीच्या जगात खोटेपणाचे चटके जसे गायत्रीला बसलेले तिला दिसतात, तसेच माधवीला स्वत:लाही बसतात. पेज थ्रीपासून फारकत घेऊन ती क्राइम रिर्पोटिंगमध्ये अनाथालयातल्या मुलांमध्ये रमू पाहते. तर अनाथालयातल्या लहान मुलांच्या लैंगिक शोषणाची खबर तिला मिळते. ती इन्स्पेक्टर भोसलेला आणि प्रेस फोटोग्राफर केदारला घेऊन घटनास्थळी पोहोचते आणि अनाथालयाला आर्थिक मदत करणाºया अंजली थापरच्या नवºयाचं-रोमेश थापरचं-हे रॅकेट असल्याचा पर्दाफाश करते. मात्र इथेही उच्चभ्रूंचे हितसंबंध किती खोलवर पोहोचलेले आहेत, याचाच दारुण प्रत्यय तिला येतो. पेज थ्री पार्ट्या ‘थ्रो’ करणारा रोमेश थापर हा ‘नेशन टुडे’चा महत्त्वाचा जाहिरातदार आहे. ‘नेशन टुडे’चा मालक त्याला हात लावू शकत नाही. तो या रिपोर्टर मुलीला नोकरीवरून काढून टाकायला संपादकाला फर्मावतो. हतबुद्ध, निराश झालेल्या माधवीला विनायक माने सल्ला देतो, की सत्य सांगायलाच पाहिजे; पण ते चलाखीनं सांगावं लागतं. तिनं स्वत:जवळ पुरावा ठेवायला हवा होता आणि कुणावर विश्वास ठेवायला नको होता, असं त्याचं म्हणणं. आपल्याला व्यवस्था बदलायची तर व्यवस्थेमध्येच राहावं लागेल, असाही सल्ला तो देतो. हे सल्ले म्हणजे माधवीच्या लेखी एक प्रकारची केवळ मखलाशी उरते. कारण यानंतर माधवीला मुश्किलीनं दुसºया वृत्तपत्रात नोकरी मिळते, ती पेज थ्रीवरच काम करण्याच्या अटीवर. नव्या नोकरीतली पहिली पार्टी कव्हर करायला माधवी जाते, ती उदास निर्विकारपणे. पार्टीत नव्या बातम्या मिळतात- संघवी गेल्या वर्षभरात सेलिब्रिटी झालाय, एसीपी कदमला दिल्लीला गॅलंट्री अवॉर्ड मिळालंय, तरुण यशस्वी मॉडेल झालाय. गेल्या वर्षी चारुमोहनच्या वागण्यानं हादरलेली, रोहितच्या फसवणुकीनं उद्ध्वस्त होऊन परत गेलेली गायत्री पार्टीत दिसते ती चारुमोहनबरोबर बिनधास्त. मला कॉम्प्रमाइज करण्याशिवाय उपाय नव्हता, असं ती हतबुद्ध माधवीला मानभावीपणे सांगते.
वर्षभराच्या काळात पेज थ्रीच्या पानातून माधवी या होतकरू पत्रकार मुलीला अख्ख्या व्यवस्थेचं खरं स्वरूप समजतं. त्याच वेळी तिच्या माध्यमातून पेज थ्रीच्या निमित्तानं प्रेक्षकापुढे अख्ख्या व्यवस्थेचं खरं स्वरूप आलेलं असतं.
deshrekha@yahoo.com