आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of Madras Cafe Hindi Movie And Indian Politics

पडद्यामागचे कारस्थान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मद्रास कॅफे’ या चित्रपटातील एक ज्येष्ठ अधिकारी देशाच्या एका गुप्तहेराला सांगतो, ‘‘भारताच्या विरोधात एक षड्यंत्र रचलेले आहे... त्या कारस्थानानुसार भारताला वेढा घालून नामोहरम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा कट आंतरराष्ट्रीय आहे आणि म्हणून आपल्याला अतिशय सावध राहायला हवे... नाहीतर...’’

‘मद्रास कॅफे’मध्ये राजीव गांधींच्या हत्येचे कुभांड कसे आंतरराष्ट्रीय पातळीवर उभे केले जात होते आणि अखेरीस तो कट कसा ‘यशस्वी’ झाला, याचे चित्तथरारक चित्रण आहे. हिंसेचे थैमान, दगाबाजी, बेभान माणसे आणि उग्र राजकारण अशा वातावरणात कथानकाचे सूत्र गुंफणे सोपे नाही. शिवाय, भारतीय उपखंडातील राजकारण इतके रक्तरंजित आहे आणि अंतर्विरोधांनी भडकलेले आहे की त्याची संगती लावणेही सोपे नाही. दोन तासांच्या चित्रपटात तो पट उभा करणे हे तर मोठेच आव्हान. शुजित सरकार या दिग्दर्शकाला आणि जॉन अब्राहम या निर्माता-नायकाला हे आव्हान पेललेले आहे. पण गेल्या 50 वर्षांतील अशा अनेक थरारनाट्यांचे चित्रण करायला कुणीही धजावलेले नाही, हेदेखील खरे आहे. म्हणूनच त्या आपल्या अंगवळणी पडलेल्या पण अतिशय हिंस्र अशा राजकारणाचा आणि आंतरराष्ट्रीय कटकारस्थानांचा वेध ‘मद्रास कॅफे’च्या निमित्ताने घेण्याचा हा प्रयत्न. खरे म्हणजे एका महाग्रंथाचा तो विषय आहे; पण एक आराखडा, एक चौकट, एक कॅन्व्हास उभा केला तर विचक्षक वाचकाला त्यात रंग भरता येतील. आपल्या वास्तवाचे भान यायलाही त्यामुळे मदत होईल. गेल्या 50 वर्षांतील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जरी बारकाईने पाहिल्या तरी आपण किती अस्थिर, असुरक्षित, अस्वस्थ वातावरणात असतो आणि सतत व्यापक कट-कारस्थानांच्या सावलीत असतो, हे ध्यानात येऊ शकेल.

बरोबर 40 वर्षांपूर्वी याच महिन्यात म्हणजे 11 सप्टेंबर 1973रोजी चिलीचे अध्यक्ष साल्वादोर आयेंदे यांची त्यांच्या घरात जाऊन हत्या करण्यात आली. आयेंदे हे लोकशाही-समाजवादाचे कट्टर पुरस्कर्ते होते आणि दोनच वर्षांपूर्वी प्रचंड बहुमताने निवडून आल्यावर अध्यक्ष झाले होते. पण तो काळ शीतयुद्ध अगदी टोकाला पोहोचल्याचा होता. आयेंदेंनी बडे भांडवलदार, जमीनदार आणि बलाढ्य अमेरिकन कंपन्या यांना वेसण घालायला सुरुवात केली होती. त्याच वेळेस तिकडे व्हिएतनाममध्ये अमेरिकेचा पराभव अटळ दिसत होता. त्यामुळे सोव्हिएत युनियन अधिक सामर्थ्यशाली होत होता. आयेंदे हे फिडेल कॅस्ट्रोंचे समर्थक आणि चाहते होते. आता क्युबापाठोपाठ चिलीसुद्धा आपल्या हातातून जाईल आणि परिणामी शीतयुद्ध अमेरिकेच्या दारात म्हणजे दक्षिण अमेरिकेत येईल, अशी वेळ येऊन ठेपली होती. अमेरिकेला आपले महासत्तापद टिकविणे मुश्कील झाले होते. तशातच चिलीतील लष्कराला आणि त्यांच्या जनरल पिनोचेत या सेनाप्रमुखाला हाताशी धरून सीआयए या अमेरिकेच्या हेरखात्याने आयेंदेंना ठार मारले. त्यानंतर चिलीत लष्करी राजवट आली. हजारो तरुण, विद्यार्थी, कामगार कार्यकर्ते, लेखक, कवी, पत्रकार- जे लोकशाहीच्या बाजूचे होते, त्यांचे हत्याकांड करण्यात आले. पुढे दीर्घकाळ चिलीमध्ये लष्करशाहीने राज्य केले. गरिबांच्या बाजूने घेतलेले निर्णय फिरवले गेले. पुढे बर्‍याच वर्षांनी चिलीमध्ये पुन्हा लोकशाही राजवट प्रस्थापित झाली. पिनोचेत यांच्यावर नरसंहाराचा खटला भरला गेला व त्यांना जन्मठेप झाली.

त्यानंतर दोनच वर्षांनी 15/16 ऑगस्ट 1975 रोजी आपल्या शेजारच्या राज्यात बांगलादेशमध्ये त्यांचे अध्यक्ष मुजिबूर रहमान व त्यांचे बहुसंख्य कुटुंबीय यांना त्यांच्या निवासस्थानात घुसून काही लष्करी अधिकाºयांनी ठार केले. सध्याच्या पंतप्रधान शेख हसीना या मुजिबूर रहमान यांच्या कन्या. नशिबाने त्या त्या वेळेस तेथे नव्हत्या आणि म्हणूनच वाचल्या. आता सुमारे 40 वर्षांनंतर मुजिबूर रहमान यांच्या खुनाचा खटला पुन्हा उभा झाल्यावर मुजिबूर विरोधकांनी देशभर दंगे माजवायला सुरुवात केली. शेकडो जण ठार झाले. मुजिबूर यांची हत्या अमेरिकेने पाकिस्तानचे लष्कर व गुप्तहेरांच्या मदतीने केली होती. बांगलादेश स्वतंत्र करण्यात इंदिरा गांधींचा हात होता. बांगलादेश निर्मितीमुळे पाकिस्तानची फाळणी झाली. त्यामुळे अमेरिकेचा पाकिस्तान हा तळ विस्कळीत झाला. त्यामुळे अमेरिका व पाकिस्तान दोघांना भारतावर सूड उगवायचा होता. मुजिबूर व त्यांचे कुटुंबीय यांची हत्या हा इंदिरा गांधींना इशारा होता. कारण इंदिरा व मुजिबूर यांचे घनिष्ठ स्नेहसंबंध होते. भारतातही नेमके त्याच काळात म्हणजे 1972 ते 1975 या वर्षांत अराजक माजविण्यात आले होते. भ्रष्टाचाराचा मुद्दा करून ‘इंदिरा हटाओ’चे राजकारण केले जात होते. त्या अराजकाची वावटळ परतवण्यासाठी इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली होती. जर आणीबाणी नसती तर ते हत्याकांड भारतात घडविण्याच्या योजना होत्या.

त्यानंतर दोनच वर्षांनी पाकिस्तानमध्ये तेथील लष्करशहा जनरल झिया-उल-हक यांनी रीतसर निवडून आलेल्या झुल्फिकार अली भुत्तोंना पदच्युत करून अटक केली. भुत्तोे आणि इंदिरा गांधी यांनी सिमला करार करून भारत-पाकिस्तान संघर्ष संपवण्याच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वपूर्ण पावले उचलली होती. शिवाय, भुत्तोंनी बांगलादेशच्या सार्वभौमत्वालाही मान्यता दिली होती. परंतु भारतीय उपखंडातील ही लोकशाही प्रक्रिया उखडून टाकल्याशिवाय अमेरिकेची व्यूहरचना सफल झाली नसती. म्हणून भुत्तोंना अटक केली आणि मुजीबूर रहमानला ठार करण्यात आले. दोन वर्षांनी 1979 मध्ये झुल्फिकार अली भुत्तो यांना फाशी देण्यात आले. (त्याचे वर्णन ‘ज्युडिशियल मर्डर’ असे केले जाते. ज्या वर्षी भुत्तोंना फाशी दिले गेले, त्याच वर्षी सोव्हिएत फौजा अफगाणिस्तानात आल्या आणि अमेरिकेने पाकिस्तानच्या व झियांच्या मदतीने मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांना हाताशी धरून सोव्हिएत युनियनला आव्हान दिले.

भारतीय उपखंडात मुस्लिम अतिरेक्यांना अमेरिकेचा आशीर्वाद आणि पाकिस्तानच्या मदतीने शस्त्र व अर्थसाहाय्य सुरू झाले ते तेव्हाच. आपल्या परिसरातील धर्मवादी शक्तींना (सर्व धर्माच्या) अमेरिके ने तेव्हापासून साहाय्य सुरू केले, ते आजही चालू आहे. त्याच वर्षी अमेरिका व ब्रिटन यांच्या हेरखात्याच्या सहकार्याने शीख अतिरेक्यांना हाताशी धरून स्वतंत्र खलिस्तानची चळवळ सुरू केली गेली. सुमारे 80 हजार शिखांची कत्तल 1979 ते 1984 या काळात खलिस्तान्यांनी केली. इंदिरा गांधींनी अमृतसरच्या सुवर्णमंदिरात सैन्य पाठवून खलिस्तानी फुटीरवाद्यांचा बीमोड केला नसता, तर 1984मध्ये खलिस्तानची निर्मिती होऊन भारताची फाळणी झाली असती. त्या लष्करी कारवाईचा सूड खलिस्तान्यांनी इंदिरा गांधींचा खून करून घेतला. पण इंदिरा गांधींनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाची एकात्मता टिकवली होती. म्हणजेच 1973 ते 1984 या काळात अमेरिकेच्या आशीर्वादाने आयेंदे, मुजीबूर रहमान, भुत्तो आणि इंदिरा गांधी यांच्या हत्या करण्यात आल्या. त्यांचा मृत्यू त्यांच्या उमेदीत आणि राष्ट्रीय जबाबदाºया पार पाडताना झाला होता. असे मृत्यू नैसर्गिक नसतात वा ते अपघातही नसतात. ते कारस्थानाचे बळी असतात. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. पण काही महिन्यांतच त्यांच्यावर दोन खुनी हल्ले झाले. एक दिल्लीतच, राजघाटाजवळ आणि दुसरा श्रीलंकेच्या भेटीवर असताना, लष्करी सलामीच्या वेळी. अमेरिकेला श्रीलंका व भारत यांच्यामधील सामुद्री आखातात, त्रिंकोमल्ली येथे नौदलाचा तळ हवा होता. प्रथम इंदिरा व नंतर राजीव यांनी अमेरिकेचे ते डावपेच उधळून लावले होते. इंदिरा गांधींना ठार मारल्यावर राजीव यांना वश करून वा दहशत बसवून कह्यात घेता येईल, असा त्यांचा कयास होता. तो जमेना म्हणून राजीव गांधींना जाळ्यात पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले. श्रीलंकेतील सरकारने सिंहली आणि तामिळ जनतेमध्ये दुफळी माजवली होती. तामिळांना दुय्यम नागरिकत्व दिले गेले होते. जसे 1970-71मध्ये बंगाली निर्वासित बांगलादेशातून भारतात आले, तसे तामिळ निर्वासित 1983पासून तामिळनाडूत येऊ लागले होते. कधी सिंहली तर कधी तामीळ अतिरेक्यांना हाताशी धरून श्रीलंकेत व भारतात हाहाकार माजवला जात होता. सिंहलींच्या निर्घृण अत्याचाराचा प्रतिकार तितक्याच हिंस्रपणे तामिळ अतिरेक्यांकडून होऊ लागला होता. खरे तर 1985मध्ये सत्तेत येताच राजीव गांधींनी श्रीलंकेतील तामिळ लोकांचा प्रश्न सोडवायच्या दिशेने पावले उचलली होती. खुद्द प्र्रभाकरन यांच्याशी चर्चाही केली होती. म्हणजेच राजीव गांधींच्या खुनाचे अनेक पैलू आहेत, त्याचा राजकीय कॅन्व्हास 1985मध्येच तयार होत होता. परंतु अशा घटनांचे पदर नंतरच्या काळात उलगडत जातात. राजीव गांधींच्या हत्येविषयी तुलनेने फार कमी लिहिले गेले आहे. फार कमी शोधपत्रकारांनी या हत्येवर नवीन प्रकाश टाकला आहे. त्या काळी उच्चपदस्थ असलेल्या फारच कमी अधिकाºयांनी वा राजकीय व्यक्तींंनी राजीव हत्येसंबंधातील प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संदर्भ देऊन नवीन दृष्टिकोन मांडला आहे. डी. आर. कार्तिकेयन आणि राधाविनोद राजू यांच्या ‘शोध राजीव हत्येचा’ या पुस्तकासारखे काही अपवाद वगळता! (या पुस्तकाचे उत्कृष्ट मराठी भाषांतर सारंग दर्शने यांनी केले आहे. प्रकाशक : राजहंस, पुणे.) तसे पाहिले तर इंदिरा गांधींच्या हत्येवरही जसे संशोधन व्हायला हवे तसे झालेले नाही. अशा व्यक्तीची हत्या करण्यासाठी प्रचंड मोठी योजना लागते. पूर्वतयारी लागते, कटात सामील होणाºयांचा निर्धार लागतो, प्रत्यक्ष हत्या करणाºया व्यक्तीच्या मनाची तयारी लागते, गुप्तता लागते. या एकूण षड्यंत्राला प्रचंड पैसे लागतात. ते पुरविणारी संस्था, व्यक्ती वा बारभाई कारस्थानी ते पैसे ‘गुंतवीत’ असतात. खुनातून काय साधायचे व कसे, याबद्दल त्यांच्याकडे काही योजना असतात. केनेडी किंवा राजीव गांधींची हत्या करणारे त्या अर्थाने माथेफिरू नसतात. असे खून शांत डोक्याने योजले व केले जातात. राजीव हत्येसंबंधात प्रकाशात आलेली जी माहिती आहे, त्याहीपेक्षा बरेच काही दडले वा दडविले असण्याची शक्यता आहे. जर त्या हत्येमागील सूत्रधार व्यक्ती, संस्था व कारस्थानी गट अजूनही मोकाट असतील तर आपल्या देशात आणखीही काही तसेच खून होऊ शकतील! आज दहशतवाद हाच मुख्य शत्रू आहे, असे सांगितले जाते. परंतु इंदिरा आणि नंतर राजीव यांची हत्या झाली तेव्हा मात्र या दहशतवादाचा संदर्भ कुणी देत नव्हते. सीआयए आणि मोसाद त्या काळात दहशतवादाला उत्तेजन देत होते आणि अफगाणिस्तान, श्रीलंका, पंजाब, काश्मीर इत्यादी भागांत दहशतवाद्यांचे प्रशिक्षणही करीत होते. राजीव गांधींची हत्या करणारे मारेकरी पकडले गेले, पण ज्यांनी नेपथ्यरचना केली ते मात्र अजून मोकाट आहेत.