आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of Mangal Shah About Singapur And India In Rasik

आमचेही सिंगापूर (शब्दवेल)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूरचे जनक दिवंगत लि कुआन यी यांच्याबद्दल प्रदीर्घ लेख वाचला. मग डोक्यात विचार आला, आपल्यात नेमका कशाचा अभाव आहे? भारत असा भ्रष्टाचारमुक्त, देखणा व आकर्षक का होऊ शकत नाही? का होऊ शकणार नाही? कोणतंही स्वप्न पूर्ण करण्यास किमान तीन गोष्टींची आवश्यकता असते. दुर्दम्य इच्छाशक्ती, अपार कष्ट करण्याची तयारी आणि तुमच्या स्वप्नात सामील होणारे तुमचे सहकारी, स्वजन!

परवा रविवारी एका दैनिकात सिंगापूरचे जनक दिवंगत लि कुआन यी यांच्याबद्दल प्रदीर्घ लेख वाचला. त्यातील एक वाक्य मनात घर करून राहिलं. ‘नको असलेलं मूल गटारात टाकून द्यावं तसा, चिखलाच्या दलदलीचा एक तुकडा, ब्रिटिशांनी देऊ केला. तिथे आपल्या मातब्बर मंत्रीमंडळाच्या सहकार्याने जगाचं आकर्षण ठरलेलं सिंगापूर सळसळत हाकारत उभं आहे...’
आज प्रत्येकाचं स्वप्न आहे या सळसळत्या सिंगापूरला जाण्याचं.
मग आपल्या डोक्यात विचार आला. आपल्यात नेमका कशाचा अभाव आहे? भारत असा भ्रष्टाचारमुक्त, देखणा व आकर्षक का होऊ शकत नाही? का होऊ शकणार नाही?
कोणतंही स्वप्न पूर्ण करण्यास किमान तीन गोष्टींची आवश्यकता असते. दुर्दम्य इच्छाशक्ती, अपार कष्ट करण्याची तयारी आणि तुमच्या स्वप्नात सामील होणारे तुमचे सहकारी, स्वजन!
रक्त सांडून ज्यांनी इतिहास घडवला, तिरंगा फडकवला, त्याचाच आज रंग उडू पाहतोय. आपल्या सर्वांच्या प्रामाणिक कष्टाने, वृत्तीने त्याचा रंग गडद करूयात. कोठूनही पाहिला तरी तिरंगा दिसलाच पाहिजे, एवढ्या उंचीवर त्याला नेऊयात. त्याला उंचीवर न्यायचं म्हणजे, आपणही आपली उंची वाढवायलाच हवी, नाही का?
सिंगापूरचा जनक डोक्यात जाऊन बसलाच आणि डोक्यातली गोष्ट हृदयात उतरायला कितीसा वेळ लागतो?
आता एक विचार रुतून बसला आहे. आपली ‘पालवी’ अशाच एका उंचीवर न्यायची. आयुष्यात ताजमहाल न बघितल्याचं दु:ख, खंत जशी माणसाला असते, तशी खंत नुसत्या पंढरपुरात येणाऱ्याला नव्हे तर महाराष्ट्रात व भारतात राहणाऱ्याला वाटावी, इतकं अप्रतिम सेवाकार्य ‘पालवी’त झालं पाहिजे. पण काय काय करायचं? कोठून, कशी सुरुवात करायची? वाचनामुळे प्रत्येक पावलाला एक आदर्श पुढचा मार्ग दाख‍विण्यास उभा असतो. खूप दिवसांपूर्वी एक कथा वाचली होती. मुंबईच्या ताजमहाल हॉटेलमध्ये एका जपानी तज्ज्ञाला व्यवस्थापनाची कार्यशाळा घ्यायला बोलावलेलं असतं. ताजच्या स्टाफला आश्चर्य वाटतं, इतकं नावाजलेलं हॉटेल आहे, इतकं भरभरून हॉटेल चालत असताना, या माणसाला लाखभर फी देऊन कशाला बोलावलं आहे? कार्यशाळा घेणारे गृहस्थ येतात. कॉन्फरन्स रुममधे मीटिंग ठेवलेली असते. प्रत्येक जण उत्सुक, ते काय काय सांगताहेत हे ऐकायला. हे गृहस्थ येतात, म्हणतात, आपण इथं काय करतोय? चला जरा हॉटेलमध्येच फिरू या...

त्यांना एक रुम दिसते. त्या रुममधून समुद्र व इतर देखावा खूप छान दिसत असतो. परंतु सद्य:स्थितीत तिथे लाँड्रीची व्यवस्था केलेली असते. परंतु महाशय सांगतात, ही रुम पर्यटकांना दिल्यास उत्तम भाडे येऊन हॉटेलचा फायदा होईल. हॉटेलचा मॅनेजर सूचना लिहून घ्यायला लागतो. सहकारी तज्ज्ञाने सुचवलेली रचना लिहून घ्यायला लागतात. जपानी तज्ज्ञ विचारतात, काय करता? मॅनेजर म्हणतात, लिहून घेतोय, काय काय सुधारणा करायच्या ते. तज्ज्ञ म्हणतात, छे-छे लिहून वगैरे काय करायचं? मग ते स्वत: ती रुम रिकामी व स्वच्छ करू लागतात. त्याच दिवसापासून ताजमहालच्या व्यवस्थापनात फरक पडून सर्वच गोष्टींत प्रगतीला सुरुवात होते...
आपण भिंतीवर सुविचार लिहिण्यात तरबेज.

‘कल करे सो आज कर आज करे सो अभी।’
‘पालवी’तील मुलांची व सहकाऱ्यांची मीटिंग घेतली. त्यांना समजावून सांगितलं, सिंगापूर कसं उभं राहिलं
आणि हेही सांगितलं की, आपण बाहेरून कोणतेच साधन आणणार नाही. आपला वेळ, आपले कष्ट, आपली कल्पकता आणि आहे हीच जागा आपण अजून चांगल्या रीतीने वापरणार आहोत. मुलांना एक दिवसाची मुदत दिली, विचार करून सांगण्यासाठी, कल्पना मांडण्यासाठी. तसंच सर्व सहकाऱ्यांनाही सांगितलं. प्रत्येक जण उत्साहाने कामाला लागला. पण प्रत्येकाला एक निक्षून सांगितलं,
‘पालवी’चं उद्दिष्ट आहे, संपूर्ण निरोगी व दीर्घायुषी होणं. तेव्हा प्रथम ठरवायचं, शक्यतो आजारी पडणार नाही, या दृष्टीने मी माझ्या प्रकृतीची काळजी घेईन, यासोबत सर्व ताई-दादांनी एका-एका लहान मुलावर लक्ष ठेवायचं, प्रत्येक ग्रुपनं ‘पालवी’तला प्रत्येक कोपरा प्रसन्न व सुशोभित करायचा, एक चांगली संकल्पना घेऊन येणाऱ्या पाहुण्यांसाठी नाटिका सादर करायची, ज्यातून चांगले संदेश व चांगले विचार देता येतील. सध्यापुरता २१ दिवसांचा कालावधी आम्ही ठरवून घेतला आहे. २१ दिवसांनंतरचा प्रत्येक दिवस ‘पालवी’त येणाऱ्याच्या दृष्टीत एक स्वप्न पेरणारा असेल, आणि त्यानंतर प्रत्येक घराघरातून ‘पालवी’तल्या हिंमतवान मुलांची गोष्ट अभिमानाने, कौतुकाने सांगितली जाईल.

dimple@palawi.org