आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी अभिजातपणाचे ‘कारस्थान’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी भाषेला अभिजात (क्लासिक) ठरविण्याचे ‘कारस्थान’ आता टीपेला जाऊन पोचले आहे. ‘कारस्थान’ या शब्दप्रयोगामुळे प्रस्तुत लेखक मराठीद्वेष्टा असल्याचा ग्रह काहीजणांचा होऊ शकतो. त्याला नाइलाज आहे. अर्वाचीन वगैरे नव्हे, पण शंभरएक वर्षांपूर्वी ‘कारस्थान’ हा शब्द चांगल्या अर्थाने वापरला जायचा. 1920 पूर्वी प्रसिद्ध झालेल्या ‘दुर्दैवी रंगू’ची नायिका गुणी, कारस्थानी स्त्री असल्याचा उल्लेख सापडतो. प्राचीन बखरी-ग्रंथांमधल्या अनेक स्त्री-पुरुषांना ‘मोठे हिकमती, कारस्थानी’ असे नामाभिधान कौतुकाने लावण्यात आलेले दिसते. लटपट, खटपट करून यश मिळवणे म्हणजे ‘कारस्थान’ असा अर्थ त्या वेळी प्रचलित होता. आता कारस्थान, कारस्थानी म्हटले की संशयाने आणि नकारात्मक नजरेने पाहिले जाते. असो, भाषा लवचीक असते. प्रवाही असते. एवढ्या स्पष्टीकरणानंतर भूमिकेबद्दलची शंका दूर व्हावी. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी ज्या खटपटी सुरू आहेत, त्याला मी जुन्या काळातले ‘कारस्थान’ म्हणू पाहतोय. त्याला कारणही तसेच आहे.

‘अभिजात मराठी भाषा समिती’ चा अहवाल 127 पानांचा, 30 हजार पोथ्या 80 पोथ्या दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीच्या :
सरकारने नेमलेल्या ‘अभिजात मराठी भाषा समिती’चा अहवाल नुकताच राज्य सरकारला सुपूर्द करण्यात आला. मराठी अभिजात कशी, याबद्दलचा सगळा युक्तिवाद या 127 पानांच्या अहवालात पानोपानी मांडला गेला आहे. यासाठी प्राकृत, संस्कृत, इंग्रजी, पाली आदी भाषांमधले शेकडो संदर्भग्रंथ तपासण्यात आले आहेत. पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातल्या प्राचीन पोथ्यांची संख्या 30 हजारांपेक्षा जास्त आहे. यातल्या 80 पोथ्या तर दीड-दोन हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. डॉ. श्रीकांत बहुलकर, डॉ. मैत्रेयी देशपांडे, डॉ. कल्याण काळे या विद्वानांच्या साह्याने या पोथ्यांमधले ‘मराठी’बद्दलचे संदर्भ शोधण्याचे काम झाले. समितीने प्राकृत भाषेतील तब्बल ७ लाख शब्द एकत्र केले आहेत.

तीस शिलालेख, ऐंशी हस्तलिखित पोथ्यांमधले प्राचीन पुरावे समितीने गोळा केले :
अठराव्या शतकात राजारामशास्त्री भागवत, रघुनाथराव गोडबोले, रामकृष्ण भांडारकर, रावसाहेब मंडलिक, डॉ. वेबर, श्रीधर व्यंकटेश केतकर, वि. भी. कोलते या आणि इतर अनेक ज्येष्ठांनी करून ठेवलेल्या अमूल्य संशोधनाचा धांडोळा समितीने घेतला. तीस शिलालेख, ऐंशी हस्तलिखित पोथ्यांमधले प्राचीन पुरावे समितीने गोळा केले. ही सगळी खटपट ‘कारस्थान’ म्हणावी अशीच आहे.

मराठीचा डंका, मराठी फक्त महाराष्ट्राचीच भाषा कधीही नव्हती ही तर सातवाहनांची दक्षिणापथाची भाषा :
मराठी बोलतानादेखील कमीपणा वाटावा, अशा न्यूनगंडाने भारलेल्या वातावरणात हा सगळा खटाटोप कशासाठी आणि कोणासाठी? मराठी ‘अभिजात’ नाही म्हणून सध्या कुठं घोडं अडलंय? खरे तर मराठी बापुडवाणी कधीच नव्हती. मराठी ही फक्त महाराष्ट्राचीही भाषा कधी नाही. दोन हजार वर्षांपूर्वी पैठणचे राजे सातवाहन होते. त्यांची भाषा मराठी होती. पैठणच्या राजांची सत्ता अखिल भारतावर होती. साहजिकच राज्यकर्त्यांची भाषा म्हणून ती सर्वत्र पसरली. छत्रपती शिवाजी महारांजांच्या रूपाने गुजरात, कर्नाटकात मराठीचे पुनरुज्जीवन झाले. पेशव्यांच्या काळात पश्चिमेला अफगाणिस्थानापर्यंत आणि उत्तरेला दिल्लीपर्यंत मराठीचा डंका वाजला. महादजी शिंदे, मल्हारराव होळकरांमुळे दीर्घकाळ मराठीची जरब कायम राहिली. नागपूरच्या भोसल्यांमुळे बंगाल प्रांतापर्यंत मराठीने मजल मारली.

...अन् मराठी विचारवंतही झाली :
अव्वल इंग्रजी काळात न्यायमूर्ती महादेव रानडे, लोकहितवादी, महर्षी शिंदे, रा. गो. भांडारकर यांच्यामुळे मराठीची प्रतिष्ठा वाढली. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या जहाल मराठीचे चटके हजारो कोसावरच्या लंडनला बसले. मराठीचा दरारा वाढला. गांधीजींनी गुरुस्थानी मानलेल्या गोपाळकृष्ण गोखल्यांमुळे मराठी आदराचे स्थान बनली. महात्मा फुले, आगरकर, आंबेडकर यांच्यामुळे मराठी विचारवंत झाली.

मराठी भाषेत प्रकाशीत पुस्तकांची संख्या लाखापेक्षा जास्त, पाच हजार ग्रंथ जागतिक दर्जाचे :
मराठी भाषेत प्रकाशीत झालेल्या पुस्तकांची संख्या एक लाखापेक्षा अधिक आहेत. यातले पाच हजार ग्रंथ जागतिक स्तरावर श्रेष्ठ ठरवण्याच्या दर्जाचे आहेत, परंतु त्यांचे श्रेष्ठत्व मराठी वाचक-श्रोत्यांचे कुंपण ओलांडून कधी गेलेच नाही. चित्र्यांनी तुकारामांना इंग्रजीत नेले, तेव्हा त्यांच्या अद््भुत साहित्यनिर्मितीची जाणीव इतरांना झाली. मराठीत एकटे तुकारामच नाहीत. ज्ञानेश्वर, नामदेव, चक्रधर यांच्यापासून ते अलीकडच्या जीए, विंदा, कुसुमाग्रजापर्यंत शेकडोजण आहेत.

मराठीत 52 बोलीभाषा, नकारात्मक दृष्टिकोन बदलेल :
मराठीतल्या बोलीभाषांची संख्या 52 आहे. मराठीतले शब्दधन अफाट आहे. प्राचीन, समृद्ध, वैविध्यपूर्ण भाषा जगाच्या परीघावर दुर्लक्षलेली का राहते? अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मायबोलीकडे नकारात्मकतेने पाहणार्‍या मराठी माणसांचाच दृष्टिकोन बदलण्यास कदाचित मदत होईल अखिल भारतीय पातळीवरची श्रेष्ठ भाषा म्हणून मराठीवर केंद्राचे शिक्कामोर्तब होईल.

‘अभिजात’ झाल्यानंतर...दरवर्षी केंद्राकडून कोट्यवधीचा निधी मिळणार :
भारतीय अभिजातपणाचा सर्वात महत्त्वाचा निकष ‘श्रेष्ठता’ आहे. अभिजात म्हणजे श्रेष्ठ. अभिजात म्हणजे विकसनशील, सर्वसमावेशक. जीवनाच्या सर्व अंगांना कलेत घेऊ शकणारी, खूप बोलीभाषा असलेली भाषा. जागतिकीकरण, व्यापारीकरणाच्या गाळात ‘मार्केट’ची भाषा सर्वावर स्वार होते, राज्य करू लागते, पण याच ‘मार्केट’चाही एक नियम असतो. व्यवहाराची, ज्ञानाची भाषा ‘मार्केट’ काबीज करते. आताचा काळ मराठीचे स्थान उंचावण्यासाठी सर्वात अनुकूल आणि तितकाच कसोटीचाही आहे. मराठीजनांनी आता झोपा काढल्या तर, मराठीची प्रचंड पीछेहाट होईल. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दरवर्षी केंद्राकडून महाराष्ट्राला शंभर ते पाचशे कोटी रुपयांपर्यंतचा निधी भाषा समृद्धीसाठी मिळू लागेल. यातून अनेक बाबी साधता येतील. खास मराठीसाठी म्हणून विविध माध्यमांमधून सध्या राज्याच्या तिजोरीतून वर्षाला पंचवीस कोटीसुद्धा खर्ची पडत नाहीत.

मराठीचा विस्तार होऊन ती ज्ञानव्यवहाराची भाषा होईल :
मराठी ज्ञानव्यवहाराची भाषा ठरावी, यासाठी ‘अभिजात’ दर्जा कामी येईल. मराठीचा प्रसार होणे आवश्यक आहे. आजमितीस महाराष्ट्राबाहेरच्या फक्त पंधरा विद्यापीठांमध्ये मराठी शिकवली जाते. भारताबाहेरच्या तीन विद्यापीठांमध्ये मराठी भाषा विभाग आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) अभिजात भाषांना अनुदान मिळते. या अनुदानामुळे भारतातल्या इतर राज्यांमध्ये शैक्षणिक स्तरावर मराठीचा विस्तार होईल. मराठीसाठी नेटाने झटणार्‍या संस्था निधीअभावी प्रतिकूल अवस्थेत असल्याचे चित्र आहे. मराठीच्या अभ्यासक-संशोधकांना ‘फेलोशिप’चे बळ देता येणे शक्य होऊ शकते. परदेशी विद्यापीठांमधले अनेक विद्यार्थी अशा फेलोशिप घेऊन भारतात येतात आणि इथल्या भाषांचा अभ्यास करतात. दरवर्षी मराठीत अडीचशे छोटी-मोठी साहित्य संमेलने होतात. संमेलनांच्या माध्यमातून भाषेबद्दलची जागरूकता वाढीस लागते, चर्चा घडते, वाङ्मयीन वातावरणनिर्मिती होते. या सर्व संमेलनांना निधी देणे सरकारला शक्य होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मिळणार्‍या सरकारी पैशांवरून होणारी ओरड थांबवण्याची संधी (!) यानिमित्ताने उपलब्ध होईल.

महाराष्ट्र एकवटण्याची गरज, कारण असे निर्णय गुणवत्तेसह राजकीय चष्म्यातूनच घेतले जातात :
दोनशे वर्षांपूर्वीही मराठीच्या मरणाबद्दलची चिंता व्यक्त केली गेली. आजही मराठी मरणासन्न झाल्याचा आक्रोश केला जातो. दोन हजार वर्षांपूर्वीच्या श्रेष्ठ मराठीचा अंत कधी होणार, याच्या भविष्यकथनात वेळ दवडण्यापेक्षा तिला ‘अभिजात’ ठरवण्याचे प्रयत्न अधिक कालोचित ठरणारे आहेत. राज्याचा प्रस्ताव लवकरच केंद्राकडे जाईल. बोलावणे आल्यानंतर अभिजात मराठी भाषा समिती बाजू मांडेल. त्यानंतर मराठीच्या अभिजातपणाचा निवाडा केला जाईल. मात्र साहित्यिक-सांस्कृतिक निर्णयदेखील अखेरीस ‘राजकीय चष्म्या’तूनच घेतले जातात. म्हणूनच या मुद्द्यावर महाराष्ट्र एकवटण्याची गरज आहे. मल्याळमसाठी केरळ एकजुटीने उभा राहिला. कन्नडसाठी कर्नाटकने एका दिवसाचा बंद पाळला. राजकीय मतभेद विसरून एक होणे महाराष्ट्राने जमवायला हवे. फक्त विद्वान, साहित्यिकांपुरता हा प्रश्न मर्यादित नाही. प्रश्न शेवटी मायबोलीच्या प्रतिष्ठेचा आहे.

‘अभिजात’ भाषा कोणती?
अभिजात भाषा कोणती, हे ठरवण्यासाठीचे केंद्र सरकारने निश्चित केलेले चार मुख्य निकष आहेत. पहिला निकष भाषेच्या वयाचा आहे. भाषा किमान दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीची असावी. भाषा बोलणार्‍या लोकांनी वारसा म्हणून जपलेले प्राचीन साहित्य असले पाहिजे. भाषेला स्वत:ची अशी परंपरा असावी. शेवटचा निकष म्हणजे भाषेचे आधुनिक रूप हे तिच्या अर्वाचीन रूपापेक्षा वेगळे असले तरी त्यांच्यातले आंतरिक नाते सुस्पष्ट असावे.

...तर मराठी सहावी
आतापर्यंत तामिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड आणि काही दिवसांपूर्वीच मल्याळम या पाचव्या भारतीय भाषेला अभिजात दर्जा दिला गेला आहे. विशेष म्हणजे पहिल्या प्रयत्नात मल्याळमला हा दर्जा नाकारण्यात आला होता. दुसर्‍या प्रयत्नात त्यांना यश मिळाले. हिंंदी आणि बंगाली भाषांना हा दर्जा अद्याप मिळू शकलेला नाही. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यास ती देशातली सहावी ‘अभिजात भाषा’ ठरेल. सव्वा अकरा कोटी लोकांच्या ‘मराठी’ जगातली दहाव्या क्रमांकाची भाषा.

‘अभिजात’ होणारच...
‘‘मराठी भाषेचा उगम संस्कृतमधून झाल्याचा समज होता. यात तथ्य नसल्याचे संशोधन अठराव्या शतकातच राजारामशास्त्री भागवत यांनी मांडले. संस्कृतपूर्वी वैदिक भाषा होती. त्याआधी पूर्ववैदिक बोली प्रचलित होत्या. या बोलींमधून मराठी भाषा तयार झाली. नाणेघाट (जुन्नर, जि. पुणे) येथे ब्राम्ही लिपीतला बावीसशे वर्षांपूर्वीचा शिलालेख सापडला. या शिलालेखात ‘महारठीनो’ (अर्थ : मराठी बोलणार्‍यांनो) हा उल्लेख सापडतो. दुसर्‍या शतकातील ‘वररुचीचे व्याकरण’ यात मराठी व्याकरणाचे नियम आहेत. अडीच हजार वर्षांपूर्वीच्या ‘विनयपिटक’ या पाली भाषेतील धर्मग्रंथात ‘महारठ्ठ’ उल्लेख आहे. श्रीलंकेत सिंहिली भाषेतील ‘दीपवंश’ ग्रंथात ‘महारठ्ठ’, ‘महाराष्ट्र’ शब्द सापडतात. भाषा दोन हजार वर्षे जुनी असली पाहिजे, हा केंद्राचा निकष मराठीच्या बाबतीत सहज सिद्ध होईल, करता येईल.’’
- प्रा. हरी नरके, समन्वयक,
अभिजात मराठी भाषा समिती