आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी असावी आदर्श शाळा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळा कशी असावी याची कविकल्पना अनेकांनी रंगवली आहे. शाळा कशी असावी यावर कविता, गाणीही आहेत. त्या कविता एकूणच शाळेतील शिस्त, कंटाळा यापासून सुटका मागतात. निसर्गात जायला मागतात. बंड करून मोकळेपणा मागतात.... कृष्णमूर्ती लहानपणी शाळेत रमणारे नव्हते. त्यांनी शाळेत अनेकदा बोलणे खाल्ले कारण वर्गातल्या त्या कंटाळवाण्या वातावरणात त्यांचे मनच रमत नसायचे. त्यामुळे ते फारसे शिकू शकले नाहीत. त्यातूनच शिक्षण, शाळा हा त्यांच्या चिंतनाचा विषय झाला असावा.

त्यांचे ते प्रसिद्ध वाक्य नेहमीच सर्वत्र सांगितले जाते की, ‘‘शाळा आणि तुरुंग या जगातल्या दोनच जागा अशा आहेत की जिथं कुणीचं स्वत:होऊन जात नाही दाखल करावं लागतं ’’ यातून शाळा त्यांना तुरुंगासारखी वाटली... त्यामुळेच कृष्णजींनी जेव्हा पुढे शिक्षणाची मांडणी केली तेव्हा त्यांनी आदर्श मुक्त मनांची शाळा कशी असेल याची मांडणी केली. शाळेचा पाया भीती, शिस्त नसेल तर शाळा ही प्रेमाच्या पायावर आधारित असेल याचा पुरस्कार केला.
आदर्श शाळेचे चित्र मांडताना ते म्हणतात, ‘‘ शाळेच्या समर्पित कामावर प्रेम करणारे शिक्षक असतील तर तशाच प्रकारचे इतर सहकारी त्यांना मिळत जातील व जे समर्पित नाहीत ते हळूहळू दूर होतील... शिक्षक मुख्याध्यापकांच्या भीती दडपणाखाली नसतील व मुख्याध्यापकही शाळेतील ज्येष्ठ शिक्षकांच्या दडपणाखाली नसतील. जेव्हा शाळेतील संबंध हे समानतेचे असतील तेव्हाच एक आनंदाचे प्रेमाचे वातावरण असेल....मुख्याध्यापक सर्व जबाबदार्‍या स्वत:च्याच खांद्यावर घेणार नाही तर याउलट प्रत्येक शिक्षक हा शाळेची जबाबदारी घेणारा असेल... अशी मध्यवर्ती केंद्र नसणारी शाळा चालू शकेल का, असा प्रश्न विचारला जाईल पण जेव्हा सर्वजण प्रज्ञेच्या, सहकार्याच्या आधारे काम करत असतील तेव्हाच हे घडू शकेल... ’’ कृष्णजींनी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यालाच स्पर्श केलाय. ते शाळा म्हणजे शाळेची इमारत, तिथले उपक्रम, अभ्यासक्रम यावर भर देत नाहीत तर तिथे काम करणार्‍या माणसांवर भर देतात. तिथल्या माणसांच्या संबंधांविषयी माणसांच्या समजेविषयी बोलतात... हे त्यांचे वेगळेपण आहे. पुन्हा मुख्याध्यापकाला शाळेत स्वामित्वही ते देत नाही तर समज असलेल्या शिक्षकांच्या सामूहिक नेतृत्वाविषयी ते बोलतात.... शिक्षकांच्या वागण्यातूनच शाळेत एक वेगळे वातावरण निर्माण होईल, अशी त्यांची एकूण मांडणी आहे.

या शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांविषयीही ते बोलतात. ते म्हणतात, ‘‘ स्वयंनिर्णय घेणारे विद्यार्थी प्राधान्याने शाळेने निवडावे. स्वयंशिस्त पाळणारे विद्यार्थी या शाळेत तयार व्हावेत जेणेकरून भविष्यात स्वयंशासन देशात तयार व्हायला मदत होईल. शाळेत विद्यार्थी जर दुसर्‍याच्या भावना लक्षात घ्यायला व वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाने व ‘प्रज्ञेने संवादात भाग घेतला तर भावी काळातील जीवनात येणारे कठीण प्रश्न तो सोडवू शकेल... त्याहीपुढे शाळेत केवळ दैनंदिन जीवनाला गरजेचे शिक्षण देणे गरजेचे नाही तर जीवनातील सर्व गुंतागुंतीला सामोरे जाण्याची कला शिकविणे अपेक्षित आहे....’’ विद्यार्थ्यांना शाळेने कसे शिक्षण द्यावे हे ते नेमकेपणाने सांगतात. त्यांना अभिप्रेत असलेले शिक्षण शाळेने विद्यार्थ्याला भावी जीवनासाठी तयार करणे आहे... बाह्य शिस्तीपेक्षा त्यांना आंतरिक शिस्त शाळेत निर्माण होणे महत्त्वाचे वाटते. आज शाळांमध्ये तेच हरवल्याने केवळ भीतीच्या पायावर शाळा उभ्या आहेत.
शाळेत सतत शिकण्याची प्रक्रिया सुरू असणे त्यांना विलक्षण महत्त्वाचे वाटते. ते शिकणे केवळ शाळेतच नाही तर प्रत्येक क्षणाला शिकणे आहे. यातूनच शाळा त्यांना विलक्षण महत्त्वाच्या वाटतात. त्यांचे एक विलक्षण धाडसी विधान आहे. ते म्हणतात, ‘शाळा ही मला मंदिर-मशीद-चर्चपेक्षाही पवित्र वाटते कारण इथे शिकण्याची निरंतर प्रक्रिया सुरू आहे आणि इतरत्र ही शिकण्याची प्रक्रिया बंद झाली आहे....’’
शाळा हे या अर्थाने कृष्णजींना धार्मिक केंद्र वाटते....’’

(herambrk@ rediffmail.com)