आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीत की दुनिया के दोस्तो...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

''1961मध्ये सुरू झालेल्या ‘मेलडी मेकर्स’ या वाद्यवृंदाने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. पाठोपाठ अनेक एकाहून एक सरस ऑर्केस्ट्रा प्रेक्षकांचे कान आणि मन तृप्त करीत राहिले. परंतु खासगी वाहिन्यांवरील ‘सारेगमप’सारख्या संगीतविषयक रिअ‍ॅलिटी शोमुळे ऑर्केस्ट्राला उतरती कळा लागली. मात्र, एका मोठ्या कालावधीनंतर ऑर्केस्ट्रा पुन्हा एकदा गर्दी खेचू लागले आहेत. या निमित्ताने गणेशोत्सवाची गोडी वाढवणाºया या कलाप्रकाराची ज्येष्ठ गायक सुदेश भोसले आणि अशोक हांडे यांनी ‘दिव्य मराठी’साठी रंगवलेली स्मरणरंजनात्मक सूरसफर...''

वाढवलेली जुल्फे, बेलबॉटम पँट आणि एकाच रंगाचे कपडे घातलेली तरुण मंडळी स्टेजवर अवतरतात. तबला, ढोलक, कीबोर्ड या नेहमीच्या वाद्यांबरोबरच काहींच्या गळ्यात गिटार असते, तर कोणी सेक्सोफोन घेऊन उभा असतो. काही जण बोंगो, कोंगो किंवा तुंबा घेऊन ऐटीत बसलेले असतात. स्टेजवरचा पडदा बाजूला सरकतो आणि क्षणात सूर-ताल तडतडतात...मधाळ आवाज कानात शिरतो... ‘संगीत की दुनिया के दोस्तों’... आणि पाठोपाठ भारतीय हिंदी सिनेमाची संगीतसफर उलगडत जाते... 70 आणि 80च्या दशकांत ‘ऑर्केस्ट्रा’चा मंत्रमुग्ध करणारा हा आविष्कार संगीतप्रेमींना मनोमन भुरळ घालत होता. एका बाजूला लता मंगेशकर, आशा भोसले, किशोरकुमार यांच्या उत्तमोत्तम गाण्यांवर भारतीय रसिकांची सांस्कृतिक भूक पोसली जात होती. लोकांवर जणू हिंदी सिनेमातल्या गाण्यांनी मोहिनी केली होती. रेडिओवर गाणी लागायची, तेव्हा सगळे काम सोडून रेडिओला कान लावून गाणी पटापटा लिहून काढण्याची घाई व्हायची. एखादी ओळ राहिलीच, तर रेडिओ आपल्यावर कृपा करून पुन्हा कधी हे गाणे वाजवेल, तेव्हाच ते गाणे परिपूर्ण होत असे. गुरुवारी दूरदर्शन या एकमेव चॅनलवर ‘छायागीत’ पाहण्यासाठी टीव्ही ज्याच्याकडे असेल त्यांच्या घरी गर्दी होत असे. तेव्हा मनोरंजनाची पुरेशी साधने नसणे हे ‘ऑर्केस्ट्रा’च्या पथ्यावर पडले आणि तिथून सुरू झाले ऑर्केस्ट्राचे सुवर्णयुग!

ऑर्केस्ट्राच्या भराच्या काळात अनेक ग्रुप्स होते; परंतु ‘मेलडी मेकर्स’, ‘बाबला’ आणि ‘महेश कुमार-नरेश कुमार’ हे तीन ऑर्केस्ट्रा अधिक लोकप्रिय होते. ‘मेलडी मेकर्स’ची खासियत म्हणजे, आमच्या ग्रुपमध्ये सर्व कलाकार उच्च शिक्षण घेतलेले आणि वादनात उस्ताद होते. सिनेमातले गाणे हुबेहूब गायले पाहिजे, यासाठी आम्ही सर्वच कलाकार मेहनत घेत असू. सिनेमातले गाणे पुन्हा जसेच्या तसे ऐकायला मिळणे हे तेव्हाच्या पब्लिकसाठी नवीन होते आणि त्यामुळेच ऑर्केस्ट्रा या कलाप्रकाराला देशभरातून मागणी वाढू लागली होती. महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, हैदराबाद अशा अनेक ठिकाणी ‘मेलडी मेकर्स’चे शोज हाऊसफुल्ल होऊ लागले होते... अहमदाबादला तर आम्ही सर्व कलाकार मुक्कामीच राहायचो. आता आश्चर्य वाटेल, पण असे महिन्यातले जवळपास 35 ते 40 शोज आम्ही करत असू. ‘मेलडी मेकर्स’ची ख्याती इतकी पसरली की आशा भोसले, किशोरकुमार, शब्बीरकुमार यांनाही ‘मेलडी मेकर्स’ ऑर्केस्ट्राबरोबर देशात तसेच देशाबाहेर शोज करण्याचा मोह आवरला नव्हता. फिल्मफेअर अवॉर्ड नाइटला ‘मेलडी मेकर्स’चे वाद्यवृंद पुरस्कार विजेत्या कलाकाराचे स्वागत करायचे.

त्या काळी ‘मेलडी मेकर्स’च्या तोडीस तोड ‘बाबला ऑर्केस्ट्रा’चे नाव घ्यावे लागेल. बाबला हे संगीतकार कल्याणजी आनंदजी यांचे धाकटे बंधू. त्यामुळे त्यांच्याभोवती आपसूक वलय होते. बाबला स्टेजवर सहा, आठ अशा संख्येतले रोटो घेऊन बसायचे. स्टेजवरील अंधारात स्पॉट लाइटमध्ये 8 पीस रोटो वाजवणाºया बाबलाला पाहण्यासाठी दर्दी रसिकांची तुफान गर्दी व्हायची. नंतर नवरात्रीत या प्रकारच्या वादनाचा ट्रेंड चांगलाच रुजला आणि लोकप्रियही झाला. बाबला आणि कांचन दोघांनीही उत्तम प्रकारे ऑर्केस्ट्रा जपला. तर महेशकुमार हे गायक एकाच वेळी गायिकेच्या आवाजातही गायचे. दोन आवाजात गाणारे महेश कुमार हे प्रेक्षकांना मिरॅकल वाटायचे. त्याचप्रमाणे नरेश कुमार मिमिक्री करायचे म्हणून त्यांचाही ऑर्केस्ट्रा लोकप्रिय होता. यांच्या जोडीला विनोद गीध यांचा ‘झंकार’, ‘कलाकार’, ‘शहेनशहा’, ‘सुनहरी यादें’, ‘मिलन सिंग नाइट्स’ असे अनेक एकाहून एक सरस ऑर्केस्ट्रा प्रेक्षकांचे कान आणि मन तृप्त करीत होते. बहुतांशी ऑर्केस्ट्रात सादर करण्यासाठी लता मंगेशकर, आशा भोसले, किशोरकुमार, मोहंमद रफी आणि मुकेश या पाच गायक-गायिकांची गाणी ठरलेली असायची. मात्र ऑर्केस्ट्रा प्रसिद्ध होण्यामध्ये मिमिक्री आर्टिस्टचीही भूमिका अतिशय महत्त्वाची होती. प्रत्येक मिमिक्री आर्टिस्ट ऑर्केस्ट्राची वेगळी ओळख तयार करण्यासाठी कल्पनाशक्तीचा पुरेपूर वापर करत होते. ‘मेलडी मेकर्स’मध्ये माधव मोघे प्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट होते. ते इंग्रजी चित्रपटांचा ट्रेलर सादर करायचे. ब्रिटिश किंवा अमेरिकन अ‍ॅक्सेंटमध्ये चढउतार घेत घाईघाईत बोलणाºया माधवजींचे सादरीकरण पाहण्यासाठी प्रेक्षक आवर्जून यायचे. खरे म्हणजे ते इंग्रजी बोलतच नसत, मात्र ते अशा काही सफाईदारपणे सादरीकरण करायचे की ऐकणाºयाला ते इंग्रजी सिनेमातला एखादा सीन रंगवत आहेत, याचा आभास व्हायचा. अनेक मिमिक्री आर्टिस्ट मशीनगनने गोळ्या झाडण्याचा, पिस्तुलाच्या गोळीचा, भरधाव वेगाच्या गाडीचा तसेच गाडीने करकचून ब्रेक मारल्याचा आवाज असा लीलया काढायचे की, डोळे मिटले की तो कलाकार तोंडाने ते आवाज काढीत आहे, यावर कान विश्वासच ठेवायला तयार होत नसत. धावपट्टीवर उतरणारे विमान, पायांतील घुंगरू अशा अनेक आवाजांनी त्या काळी ऑर्केस्ट्राला अधिकाधिक श्रवणीय केले. त्यातले एक श्रेष्ठ कलाकार मला आजही आठवतात, ते म्हणजे कमलाकर वैशंपायन. ते बोलता बोलता अशी काही विनोदाची पेरणी करायचे की प्रेक्षक पोट

दुखेपर्यंत हसत. उदा. ‘माझी मराठी बायको तिच्या एका ख्रिश्चन मैत्रिणीला उपासाची बटाट्याची भाजी कशी करायची हे सांगत असते. असे सांगत ते रेसिपी सांगू लागतात. ‘टेक वन बटाटा. यू शूड उकड इट. देन कट इट पार्ट इट पुट इट इनटू पातेला’ आणि शेवटी एक्स्पर्ट अ‍ॅडव्हाइस द्यायलाही ती विसरत नाही. ‘तडतडतड नॉइज विल कम देन इट इज व्हेरी गुड फॉर उपासाचं हं.’ दिलीपकुमार, अशोककुमार, ओमप्रकाश, शत्रुघ्न सिन्हा, अमिताभ, नाना पाटेकर या प्रसिद्ध नायकांचे डायलॉग्ज त्यांच्या आवाजाची नक्कल करत हुबेहूब घेणे किंवा अमुक एक डायलॉग किंवा गाणं ओमप्रकाशने म्हटलं तर कसं होईल? किंवा राज कपूरने म्हटलं तर कसं म्हणेल? अशा प्रकारचे गिमिक्स माझ्यासह अनेकांनी केले. आज टीव्हीवर ओसंडून वाहणाºया स्टँड अप कॉमेडी शोजमध्ये हे प्रकार सर्रास आढळतात, मात्र ते आम्ही 30 वर्षांपूर्वीच लोकप्रिय केलेले आहेत. फरक इतकाच की तेव्हा टीव्ही नव्हते; त्यामुळे प्रत्येक ठिकाणी शोज करत करत आम्ही प्रसिद्धीच्या पायरीला लागलो. ऑर्केस्ट्रा या कलाप्रकाराने उत्तमोत्तम कलाकार सिनेसृष्टीला दिले आहेत. कल्याणजी आनंदजी यांनी लहान मुलांना घेऊन ‘लिटल वंडर्स’ हा ऑर्केस्ट्रा सुरूकेला, ज्यामुळे साधना सरगम, सुनिधी चौहान, मनहर उधास, सपना मुखर्जी यांच्यासारखे पट्टीचे गायक इंडस्ट्रीला मिळाले. आज टीव्हीवर रिअ‍ॅलिटी शोमध्ये लहान मुलांना समाविष्ट करण्याची नवी (?) युक्ती लढवत टॅलेंट हंट शोज प्रसारित केले जातात. कल्याणजी आनंदजी यांनी हे 25 वर्षांपूर्वीच केले होते. सोनू निगम, जॉनी लिव्हर हे चतुरस्र कलाकारही ऑर्केस्ट्रामधूनच आले आहेत. ऑर्केस्ट्रा हा तेव्हाच्या रसिक प्रेक्षकांचे पूर्ण मनोरंजन करण्याच्या दृष्टीनेच तयार झाला. ऑर्केस्ट्रात काय नव्हते? गाणी, मिमिक्री, नक्कल, नृत्य, बाहुल्यांचा खेळ, गिमिक्स असे कोणतेही प्रयोग करण्याची ती प्रयोगशाळा होती. मात्र तरीही नव्वदीच्या दशकात ऑर्केस्ट्राला उतरती कळा लागली. प्रचंड प्रमाणात वाढलेले खासगी चॅनल्स प्रेक्षकांची मनोरंजनाची भूक घरच्याघरी भागवू लागले. एफएम रेडिओ आणि मोबाइल तंत्रज्ञानामुळे 24 तास आवडती गाणी ऐकण्याचे साधन खिशात रुळू लागले. त्याचबरोबरीने नव्वदीत आलेल्या सुमार दर्जाच्या चित्रपटांप्रमाणेच सुमार दर्जाची गाणी वाजवून ऑर्केस्ट्रा चालणार नाही, हे लक्षात आल्यावर एक पाऊल मागे जाण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय उरला नव्हता. इथे ऑर्केस्ट्रा संपला असे मी म्हणणार नाही. कारण नंतरच्या काळात थिएटरमध्ये तिकीट लावून होणारे शोज होऊ लागले. ‘लता मंगेशकर नाइट’, ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल नाइट’, ‘किशोरकुमार नाइट’, ‘हमारी आशा’ असे थीम घेऊन काहींनी कॉर्पोरेट कार्यक्रम घेतले. अनेक जण परदेशी जाऊन हॉटेलांमध्ये वाजवू लागले, तर काहींना लग्नांमध्ये बोलावले जाऊ लागले. ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून व्यासपीठ लाभलेले डुप्लिकेट आर्टिस्ट आणि वादकही नंतर स्थानिक शो करू लागले. आजही गणेशोत्सवामध्ये किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ऑर्केस्ट्राला मागणी आहे. मधला काही काळ वगळला तर पुन्हा एकदा ऑर्केस्ट्रांची जाहिरात वर्तमानपत्रांत दिसू लागली आहे. तब्बल 52 वर्षांनी पुण्यातल्या ‘मेलडी मेकर्स’च्या कार्यक्रमाला हाऊसफुल्ल गर्दी होत आहे. हे सर्व बघितल्यावर राजेश खन्नाच्या शैलीत मी एवढेच म्हणेन, ‘ऑर्केस्ट्रा मरते नहीं’...
(शब्दांकन - नम्रता भिंगार्डे)