आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑर्केस्ट्राचे गारूड उतरणार नाही...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी सिनेमातील नट-नट्यांच्या खालोखाल ऑर्केस्ट्रामधील कलाकारांची लोकप्रियता होती. सुहासचंद्र कुलकर्णी इतका सुंदर अ‍ॅकोर्डियन वाजवायचा की त्याला वाजवताना पाहण्यासाठी लोक गर्दी करायचे. ‘सुनहरी यादें’ ऑर्केस्ट्रामधील प्रमिला दातार हिच्या सौंदर्याप्रमाणेच गायनावर प्रेम करणारे हजारो चाहते होते. मिलन सिंग ही गायिका स्त्री आणि पुरुष आवाजात गायची, त्यामुळे मानवी गळ्यातून तेही एका स्त्रीच्या गळ्यातून दोन वेगवेगळे आवाज येऊ शकतात, या आश्चर्याचे साक्षीदार होण्यासाठी प्रेक्षक आवर्जून ‘मिलन सिंग नाइट्स’ला जायचे. ‘कलाकार’मधील सुधीर सिन्हा हाही प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला होता. एका ऑर्केस्ट्रात परशुराम कोळी जोशपूर्ण ड्रम वाजवायचा. वाजवता वाजवता मधूनच उजव्या हातातली काठी वर फेकायचा आणि डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच ती काठी झेलून पुन्हा त्या हिदममध्ये जान आणायचा. त्याची ही वाजवण्याची स्टाइल इतकी लोकप्रिय झाली की नंतर जो-तो त्याची नक्कल करू लागला. चारुशीला बेलसरे, जयश्री शिवरामन अशा अनेक कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. ऑर्केस्ट्रातील एखाद्या कलाकाराला मिळालेले प्रेक्षकांचे प्रेम म्हणजे नेमके काय, याचे एक उदाहरण देतो. ऑर्केस्ट्रामध्ये गाणारी बेला सुलाखे ही ‘डिक्टो लता मंगेशकर’ म्हणून प्रसिद्ध झाली होती. डोळे बंद करून तिचं गाणं ऐकणार्‍याला आपण लतादीदींनाच ऐकत आहोत, असे ठामपणे वाटत असे. तिच्या याच लोकप्रियतेमुळे टी सिरीजने सुरुवातीला लतादीदींच्या आवाजात बाजारात आणलेल्या कॅसेटमधील सर्व गाणी बेला सुलाखे यांच्या आवाजातील होती. या कॅसेट्सचा खप प्रचंड प्रमाणात झाला होता, हे सांगणे न लगे. ‘कलाकार’ ऑर्केस्ट्राने पहिल्यांदा अमिताभ बच्चन, बाळासाहेब ठाकरे, देवानंद यांचे डुप्लिकेट्स आणायची युक्ती लढवली आणि त्या डुप्लिकेट कलाकारांनाही व्यासपीठ मिळाले. शत्रुघ्न सिन्हा, प्राण, अजित यांनी तर मिमिक्री आर्टिस्टना अक्षरश: तारले. ‘मोना डार्लिंग, अब हम सोना नहीं, आम स्मगल करेंगे’ यासारखे डायलॉग प्रसिद्ध झाले. 80च्या दशकापर्यंत ‘ऑर्केस्ट्रा’ नावाच्या लहरीत दोन पिढ्या मनसोक्त भिजल्या. छोट्या समारंभापासून ते लग्न समारंभापर्यंत सगळीकडे ‘ऑर्केस्ट्रा’ची मागणी वाढली याचे कारण भारतीयांचे संगीतप्रेम! कॉलेजचे पिकनिक तर ऑर्केस्ट्रामधील गाणी, मिमिक्री, डायलॉग यांच्याशिवाय पूर्णच होत नसे. तेव्हा मोठमोठ्या ऑर्केस्ट्राबरोबर काही छोटेखानी ऑर्केस्ट्राजही निघाले. हिंदी गाण्यांचे ऑर्केस्ट्रा प्रसिद्ध होतेच, पण काही मराठी ऑर्केस्ट्राही बाजारात उदयाला आले होते. सर्वाधिक कॅसेट खपाचा विक्रम असलेल्या ‘मेंदीच्या पानावर’ या ऑर्केस्ट्राचे उदाहरण तर आपल्याला ठाऊकच आहे. माझ्या चुलतभावाने काढलेल्या छोट्या ऑर्केस्ट्रामध्ये गाणी गाण्यापासून माझ्या करिअरला सुरुवात झाली आणि कॉलेजमध्ये असतानाच मी ‘मंगलगाणी दंगलगाणी’ या कार्यक्रमाला सुरुवात केली. मूळ ऑर्केस्ट्राचे रूप बदलून त्यातला निवेदक, मिमिक्री आर्टिस्ट वगैरे काढून केवळ संगीतावर आधारलेला ‘आवाज की दुनिया’ हा कार्यक्रम सुरू केला. मात्र एव्हाना काळ बदलला होता. नव्वदीच्या दशकात ऑर्केस्ट्राला उतरती कळा लागल्याने मी केलेल्या त्या कार्यक्रमांमध्ये गुणात्मक बदल करणे भाग होते. तेव्हापासून आजपर्यंत ऑर्केस्ट्रा बंद झाले नाहीत, त्यांचे माध्यम बदलले. पूर्वी तिकीट काढून बंद सभागृहात होणारे ऑर्केस्ट्रा ओपन होऊ लागले. तेव्हा ओपन ग्राउंडमध्ये साउंडची चांगली टेक्नॉलॉजी नसल्याने नाटकातील कलाकारांचे आवाज पोहोचत नसत. त्यामुळे ऑर्केस्ट्राला चांगली मागणी होती. गणेशोत्सवात ‘ऑर्केस्ट्रा’ची क्रेझ आजही कमी झालेली नाही. ऑर्केस्ट्रा ही कलाकारांची खाण होती, मात्र ऑर्केस्ट्राचा पडता काळ सुरूझाल्यावर त्यातल्या अनेक चांगल्या कलाकारांचे पुनर्वसन चित्रपट, नाट्य, मैफलींमध्ये झाले. ऑडिओटेप, सीडी, नंतर आलेली खासगी म्युझिक चॅनल्स, आता खिशात 500 गाणी साठवणारा मोबाइल, एमपीथ्री प्लेअर, डाऊनलोडची सुविधा असा काळानुसार बदल होत गेला, तरीही लाइव्ह ऐकण्याची एक वेगळीच मजा आहे. गुलाम अलींची कॅसेट ऐकणं आणि गुलाम अलींना लाइव्ह ऐकणं, यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे आजही गाण्यांचे कार्यक्रम होत आहेतच की. हेच कशाला, झाकीर हुसेन, लता मंगेशकर, आशा भोसले इत्यादी कलाकारांच्या लाइव्ह कार्यक्रमांना आवरता येणार नाही इतकी गर्दी होतेच. मूळ ‘ऑर्केस्ट्रा’च्या व्यवसायाला फटका मात्र बसलेला आहे. ज्या गायिकेला ‘सारेगमप’सारख्या टीव्ही रिअ‍ॅलिटी शोमधून झटपट प्रसिद्धी मिळते, ती लाइव्ह गायला नकार देते. त्यामुळे ऑडिशन्सला लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत असल्या तरी लाइव्ह कार्यक्रमांमध्ये गाण्यासाठी पट्टीची गायिका मिळत नाही. म्युझिशियन्ससकट सर्व कलाकार कोणत्याही ग्रुपशी बांधील न राहता फ्रीलान्स करतात. एकेका एंट्रीचे पैसे आकारतात. हे सगळे खरे असले तरीही ऑर्केस्ट्रा हा कलाप्रकार संपणार नाही. कारण वाद्यवृंदाच्या साथीने रंगलेल्या गाण्यांची सर दुसर्‍या कशाला येणार नाही.
(शब्दांकन : नम्रता भिंगार्डे)