Home | Magazine | Pratima | article of patima

लखलख चंदेरी, सोनेरी, विविधरंगी गारगोट्यांची दुनिया...

भूषण देशमुख | Update - Jul 20, 2012, 11:12 PM IST

हळपावत यांचा मूळ पिंड कलावंताचा. मग ती नखचित्रे असोत, की जादूचे खेळ. त्यांचे हस्ताक्षरही सुंदर आहे.

  • article of patima

    हळपावत यांचा मूळ पिंड कलावंताचा. मग ती नखचित्रे असोत, की जादूचे खेळ. त्यांचे हस्ताक्षरही सुंदर आहे. जामखेडला होणा-या सांस्कृतिक कार्यक्रमांत सजावटीची जबाबदारी मामांवर असते. त्यांच्याकडे अनेक गोष्टींचा संग्रह आहे. त्यात नामवंतांच्या पत्रांपासून, कात्रणे, तिकिटे, नाणी, दिवे, वजनमापे, लेखण्या अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. ‘शिवराई’ या शिवकालीन नाण्यांचे तर हजारावर प्रकार त्यांच्याकडे आहेत. दुर्मिळ समजले जाणारे छत्रपती संभाजीमहाराजांचे तांब्याचे नाणेही त्यांच्या संग्रहात आहे. ही नाणी त्यांनी केवळ जमा केली नाहीत, तर त्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यासही ते करतात. नाण्याचे वजन, जाडी, त्याचे वेगळेपण यांच्या नोंदी त्यांनी केल्या आहेत. तिकिटांचेही असेच वर्गीकरण केले आहे. ‘शिरोभूषण’ या प्रकारातील तिकीट संग्रहासाठी त्यांचा अलीकडेच पुण्यात भरलेल्या महापेक्स प्रदर्शनात गौरव झाला. तिकिटांच्या देवाण-घेवाणीतून जगभरातील मित्र त्यांनी जोडले आहेत. रशियातील एक पेनफ्रेंड तर त्यांना हिंदीत पत्र लिहिते!
    गेल्या काही वर्षांपासून हळपावत यांनी गारगोट्यांचा संग्रह करायला सुरुवात केली आहे. जामखेडमधील सोनार गल्लीतील त्यांच्या टुमदार घरात गारगोट्यांचे हे साम्राज्य पाहायला मिळते. घराच्या बाहेरच्या बाजूला झाडांच्या जोडीने गारगोट्यांची सजावट करण्यात आली आहे. हळपावतजी एक-एक प्रकार पुढे करतात. काचेसारख्या पारदर्शक, मोत्यासारख्या दुधाळ, हि-यासारख्या लखलखीत, काट्यासारख्या टोकदार अशा मनोहारी रंगातील गारगोट्या पाहताना निसर्गाच्या असीम रूपांचे दर्शन आपल्याला घडते. या गारगोट्यांची इंग्रजी किंवा तत्सम नावे आपल्याला फारशी कळत नाहीत, पण त्यांचे रंग, आकार, प्रकार, त्यांची सरमिसळ यात आपण हरवून जातो. अजिंठ्याच्या लेणी सुंदर आहेतच, पण त्या परिसरातील गारगोट्याही विलक्षण सुंदर असतात. त्यातील काही नमुने हळपावत यांच्याकडे आहेत. एका गारगोटीला गणपतीचा आकार आला आहे, गायरोलाइट, मॅसोलाइट, मॉर्नेनाइट, कॅल्साइट, स्कोलेसाइट, अ‍ॅमेथिस्ट अशी विविध नावे या गारगोट्यांना आहेत. प्रत्येक दगडाला साजेसा स्टँड असलेला बॉक्स हळपावत यांनी स्वत: तयार केला आहे. या गारगोट्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे नमुने त्यांनी पुणे येथील तज्ज्ञ एम. एफ. मक्की यांच्याकडून मिळवले आहेत.
    आता तर गारगोट्या आपणहून त्यांच्याकडे येऊ लागल्या आहेत. दगडी कोळसा घेऊन जाणारी एक गाडी रस्त्याने जात होती. हळपावत यांना त्यात काहीतरी वेगळे जाणवले. चमकदार काळ्या रंगाचा तो दगड आता त्यांच्या संग्रहात मानाचे स्थान पटकावून बसला आहे. मनालीला सहलीला गेलेल्या मित्रांनी तेथे मिळालेला एक देखणा दगड चक्क विमानातून आणला! हे मैत्र आणि मनस्वी छंद हीच हळपावतजींची मोठी पुंजी आहे...

Trending