आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of Prakash Joshi About Research Of Plants, Divya Marathi, Rasik

‘मैत्री’पर्व : गोंडवनलँड सिद्धांत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोंडवन सिद्धांतानुसार भारत अंटार्क्टिकाचाच भाग आहे आणि आम्ही आपल्या मूळभूमीचं दर्शन घ्यायला चाललो होतो. डॉ. सूस या ऑस्ट्रियन वैज्ञानिकाने 1984 मध्ये हा सिद्धांत मांडला आणि हे नामकरण भारतातील गोंड जमातीवरून केलं.
जहाजाच्या प्रवासापासून रोप ट्रिक आमच्या कामाला येत होती. गोव्याहून प्रवासाला सुरुवात झाली. सुरुवातीचे दिवस कसे मजेत चालले होते. एकाच स्थानी सूर्योदय आणि सूर्यास्त पाहायला मिळतो, म्हणून आपल्याला कन्याकुमारीचं काय कौतुक! इथं रोज सूर्योदय आणि सूर्यास्ताचा नजारा पाहायला मिळायचा. सकाळ-संध्याकाळ डेकवर मौजेत गुजरायच्या. तथापि या मौजा 40 द. अक्षांशापर्यंतच. त्यानंतर वेगळ्याच मौजांचं साम्राज्य चालू होतं. शालेय भूगोलात रडवणारे चाळीस आणि खवळणारे पन्नास(रोअरिंग फॉर्टीज अँड फ्युरियस फिफ्टीज)विषयी वाचलं होतं. हा भूगोल परीक्षेशी निगडित असल्यामुळं विसरलंही गेलं होतं. आता त्यांचा अनुभव घेत होतो. 40 द. अक्षांशात जहाजाने प्रवेश केला आणि सागर तुफानी मौजांनी खवळला (कोकणीत मौजा म्हणजे लाटा). याचं कारण 40-50 (द.) अक्षांश हा तुफानी वादळांचा प्रदेश. त्यालाही भौगोलिक कारण आहे.

हे कारण सांगण्याअगोदर मी सर्वांना सांगत असतो, भारत ते अंटार्क्टिका हा सर्वात सोपा प्रवासी जलमार्ग आहे. भारतातल्या पश्चिम किनार्‍यावरून जहाजातून प्रवासाला निघायचं. दक्षिण दिशा धरायची. साधारणपणे अकरा-साडेअकरा हजार कि.मी. अंतर काटलं की अंटार्क्टिका लागतोच. फक्त मार्गातले धोके हीच काय ती अडचण. सर्वात महत्त्वाचा धोका, अर्थातच तुफानी वादळं. ही वादळं उठण्याचं कारण, त्यांना अटकाव करण्यासाठी मार्गात भूमी अगर बेटं असं काही नाही.
गोंडवनलँड थिअरीचा अभ्यास केला की याचं कारणही उमजतं. सुमारे 22 कोटी वर्षांपूर्वी अंटार्क्टिक खंडावर काही ज्वालामुखीचे उद्रेक झाले. या उद्रेकांतून काही भूखंड विभक्त झाले.
पश्चिम आणि पूर्वेला उत्तर दिशांना ते वाहत गेले. पश्चिमेला वाहत गेलेल्या खंडांनी दक्षिण अमेरिका निर्माण झाला. पूर्वेला साधारणपणे 4 हजार कि.मी.वर दक्षिण आफ्रिकेला काही भूखंड थडकले. साधारणपणे तेवढ्याच अंतरावर वाहत गेलेल्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड वगैरे भूखंडांचा एक नवा खंडच उदयास आला. सर्वात अधिक अंतर काटलं सुमारे 11 हजार कि. मी. भारताने. (या मार्गात कुठंही भूप्रदेश नाही, फक्त मॉरिशस हे छोटंसं बेट लागतं. तेदेखील या उद्रेकांतून वाहत आलेलं. या बेटावरदेखील बर्‍याच भारतीयांचा रहिवास आहे. त्याच्या दक्षिणेला द. आफ्रिकेच्या अधिपत्याखाली असलेले मरियन बेट लागते.) तंतोतंत जुळलेलं भूखंडमापन आणि भूगर्भीय साम्यामुळं या सिद्धांताला मान्यता मिळाली.

या सिद्धांतानुसार भारत अंटार्क्टिकाचाच भाग आहे आणि आम्ही आमच्या मूळभूमीचं दर्शन घ्यायला चाललो होतो, ही आपलेपणाची भावना निर्माण झाली. भारताचा आपलेपणा या गोंडवन लँड सिद्धांताच्या नामाभिधानातूनच प्रतीत होतो. डॉ. सूस या ऑस्ट्रियन वैज्ञानिकाने 1984 मध्ये गोंडवन लँड सिद्धांत मांडला आणि हे नामकरण भारतातील गोंड जमातीवरून केलं. आज केवळ काही शैवाल जातीच्या वनस्पती अंटार्क्टिकावर तगून आहेत. तथापि समशीतोष्ण कटिबंधात आढळणार्‍या वनस्पती 20 कोटी वर्षांपूर्वी अंटार्क्टिकावर होत्या, हे बर्फाच्या थराखाली सापडलेल्या जिवाश्मांवरून दिसून येतं. आद्य सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी यांचंही वास्तव्य अंटार्क्टिकावर होतं. त्या काळी अंटार्क्टिकाचं वातावरण थोडंसं आर्द्र असावं, असा कयास केला गेला. भूखंडीय वहन आजही चालू आहे. त्याची वार्षिक गती पाच-सहा सें.मी. एवढीच असल्यामुळं ते वहन जाणवत नाही, एवढंच. तथापि अधूनमधून होणारे भूकंप आपण चल आहोत, याची जाणीव मोठ्या आवाजात करून देतात. या भूगोलाचाच संबंध प्रवासातील आमच्या रोप ट्रिकशी होता.

अंटार्क्टिकावर आज केवळ काही शैवाल जातीच्या वनस्पती तगून आहेत. तथापि समशीतोष्ण कटिबंधात आढळणार्‍या वनस्पती 20 कोटी वर्षांपूर्वी अंटार्क्टिकावर होत्या, हे बर्फाच्या थराखाली सापडलेल्या जिवाश्मांवरून दिसून येतं.