Home | Magazine | Pratima | article of pratima

‘अविनाशी’ झेप

विकास नाईक | Update - Jul 20, 2012, 11:19 PM IST

प्रचंड संख्येने असलेल्या तरुण वर्गाला योग्य मार्गदर्शन करणारी संस्था आजही अपवादाने आढळते

  • article of pratima

    प्रचंड संख्येने असलेल्या तरुण वर्गाला योग्य मार्गदर्शन करणारी संस्था आजही अपवादाने आढळते; परंतु जर एखादी व्यक्ती अथवा संस्था मागे खंबीरपणे उभी राहिली, तर दिशाहीन होऊ पाहणारे तरुण किती आश्चर्यकारक प्रगती करू शकतात, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अविनाश धुमे आणि त्यांचे मित्र अजय गायकवाड, अविनाश कोष्टी. याच अविनाश धुमे यांना ‘यूथ बिझनेस इंटरनॅशनल’ या संघटनेतर्फे आयोजित ‘पीपल्स चॉइस अवॉर्ड’साठी नामांकन देण्यात आले आहे. अविनाश धुमे हे पुण्यातील एका प्रकाशन संस्थेमध्ये विक्रेते म्हणून दहा वर्षे नोकरी करत होते. या पुस्तक प्रकाशन संस्थेत काम करत असताना पुस्तक प्रकाशन व्यवसायाच्या खाचाखोचा समजल्या; परंतु उत्पन्न मात्र महिन्याला चार हजारांच्या पुढे गेले नाही. वयाच्या 33 व्या वर्षी अविनाश यांनी आपल्या सहकाºयांच्या सोबतीने ‘कौशल्य प्रकाशन’ या नावाने प्रकाशन संस्था सुरू केली. दहा वर्षांच्या ‘फिल्ड वर्क’च्या अनुभवाव्यतिरिक्त काहीही नसताना पत्नी आणि लहान मुलाची कौटुंबिक जबाबदारी असलेल्या अविनाशने पत्नीचे सौभाग्य लेणे गहाण ठेवून पैसे उभे केले. त्याचबरोबर ‘भारतीय युवा शक्ती ट्रस्ट’ या संस्थेचे पाठबळ कायम होतेच. 2007 मध्ये काही हजार रुपयांनी सुरू केलेला ‘कौशल्य’चा व्यवसाय आज चार वर्षांत सुमारे 50 लाख रुपयांपर्यंत पोहोचला. कौशल्य प्रकाशन संस्थेचा वाढीचा दर दरवर्षी सुमारे 131 टक्के असून हा एक विक्रम म्हणावा लागेल. ‘कौशल्य’ची सुरुवात जरी डळमळीत झाली असली तरीही अल्पशिक्षित असलेले अविनाश यांनी चिकाटीने या पुस्तकांच्या व्यवसायात अल्पावधीतच बस्तान बसवले. आजपर्यंत त्यांनी 52 प्रकारची शालेय आणि शालोपयोगी पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. यासाठी अविनाश आणि त्यांचे सहकारी महाराष्ट्रातील गावोगावी फिरले. प्रामुख्याने मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके आहेत. विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे त्यांनी आपल्या पुस्तकांमध्ये बदल केले. उत्तम प्रकारची चित्रे, छायाचित्रे यांचा वापर केला. त्याचबरोबर नफा हे एकमेव उद्दिष्ट न ठेवता विक्री वाढवण्यावर भर दिला. आज कौशल्य प्रकाशन मराठीबरोबरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी पुस्तक निर्मितीमध्ये उतरले आहे. आज देशातील आघाडीच्या काही मोजक्या प्रकाशन संस्थांमध्ये एक तुल्यबल स्पर्धक म्हणून कौशल्य प्रकाशन संस्था उभी आहे. अविनाश धुमे आज जरी एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आले असले तरीही आपल्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही, याची जाणीव असल्याने आज जवळपास 200 गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना ते मोफत पुस्तके देतात. अशा समाजाभिमुख उद्योजकाला ‘पीपल्स चॉइस अवॉर्ड’ मिळावे, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Trending