Home | Magazine | Pratima | article of pratima pannalal surana

एसटीचे प्रवासी पन्नालाल सुराणा

प्रा. दिनकर बोरीकर | Update - Jul 20, 2012, 11:08 PM IST

उंचीपुरी शरीरयष्टी, गौरवर्ण, चेह-यावर सतत स्मितहास्य, चष्म्यातून वेध घेणारी नजर आणि नेहरू शर्ट-पायजमा अशी वेशभूषा म्हणजे पन्नालाल सुराणा.

 • article of pratima pannalal surana

  उंचीपुरी शरीरयष्टी, गौरवर्ण, चेह-यावर सतत स्मितहास्य, चष्म्यातून वेध घेणारी नजर आणि नेहरू शर्ट-पायजमा अशी वेशभूषा म्हणजे पन्नालाल सुराणा. त्यांची माझी ओळख केव्हा झाली आणि त्याचं मैत्रीत रूपांतर कधी झालं हे कळलंही नाही. कधीही आम्ही भेटलो तर शिळोप्याच्या गप्पात रंगलो, असे कधीही झाले नाही. कुठला तरी चिंतनाचा विषय घेऊनच गप्पा व्हायच्या.
  अनंत भालेरावची पुण्याई लाभलेल्या दैनिक मराठवाड्याच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. तेव्हा मात्र नियमित भेटीगाठी व्हायच्या. संपादकपदाच्या काळात त्यांच्या पायाची भिंगरी मला वाटतं थोडी कमी झालेली असेल. नसता पन्नालाल कोठे भेटतील, असे कोणी विचारले तर एक तर सामाजिक कामानिमित्त एखाद्या गावी गेलेले असतील किंवा एसटीमधून प्रवास करत असतील.
  पन्नालाल यांचे व्यक्तिमत्त्व समजावून घेण्यासाठी मी त्यांची पुस्तके आवर्जून वाचली होती. आपला महाराष्ट्र, शेती आणि समाजवादी धोरण, लोकशाही समाजवादच का?, प्रजासत्ताकाला आव्हान आणि पाण्या पाण्या थांब... थांब आणि इतर पुस्तके प्रसिद्ध आहेत.
  पन्नालालजीसंदर्भात दोन -तीन आठवणी माझ्या कायम स्मरणात राहिल्या आहेत. त्यांच्या पत्नी डॉ. वीणाताई यांचे झालेले निधन धक्कादायक होते. बाहेर रिक्षा उभी... सामान रिक्षात ठेवलेले, टॉयलेटला जाऊन येते म्हणाल्या आणि तिथेच कोसळल्या! त्या गंभीर प्रसंगात पन्नालाल यांचे धीरोदत्त वागणे.. हा प्रसंग आजही डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहतो. दैनिक मराठवाड्यातील लेखावरून होमी तल्यार खान यांच्या बदनामीचा खटला बराच गाजला. पन्नालाल यांनी तो लेख लिहिला होता. ज्यांनी माहिती पुरवली होती. ती व्यक्ती फितूर झाली.
  पन्नालाल आणि अनंत भालेराव यांनी माफी मागण्यास नकार दिला. जे सत्य होते तेच छापले, अशी दोघांची ठाम भूमिका होती. त्यावरून दोघांनाही तुरुं गवास भोगावा लागला. खरे तर होमीना घरी बसवायला पाहिजे होते. होमी तल्यार खान यांना मंत्रिपद सोडावे लागले होते; पण काँग्रेस सरकारने त्यांना पुढे राज्यपालपद बहाल केले.
  आणीबाणीच्या काळातील प्रसंगही असाच आहे. पन्नालाल तेव्हा भूमिगत होते. ते औरंगाबादला आले. गोविंदभाई आणि मी त्यांना भेटायला गेलो. रात्रीची वेळ आणि ते जेथे उतरले होते तो बंगला एकांतात होता. दरवाजावर तीन थापा मारल्या. संकेतानुसार दार उघडलं. पन्नालाल यांची भेट झाली. नंतर गोविंदभार्इंना मी म्हणालो, या प्रकरणाची पोलिस चौकशी होणार... आपण काय सांगायचे. ते म्हणाले, जे घडलं तेच सांगायचे. पन्नालाल निघून गेले. कालांतराने त्यांना अटक झाली. अशा खूप आठवणी आहेत. पन्नालाल यांचे शरीर पूर्णपणे थकेपर्यंत कार्यरत राहतील. हीच त्यांची प्रेरणा आम्हाला मिळावी, असा आशीर्वाद यानिमित्ताने त्यांच्याकडे मागावा वाटतो. साधी राहणी हे त्यांच्याकडे पाहून समजत असे. तरुणांना त्यांच्याकडे बघून सामाजिक कार्य व चळवळीत उडी घेण्याची प्रेरणा मिळत असे.

Trending