आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनसेवेतून देशसेवेचा वसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

''आपली उद्यमशीलता जपताना, आपल्या समाजाच्या कल्याणासाठी कार्य करताना, आपण जेथे राहतो त्या देशाचे काही देणे लागतो, त्या देशासाठी काही करावे, या भूमिकेतून बोहरींचे समाजकार्य चालू आहे. यासाठीच त्यांनी त्यांच्या समाजकार्याला नाव दिले आहे - ‘जनसेवेतून देशसेवा’.''

प्रारंभी बोहरी समाजाचे सामाजिक कार्य प्रामुख्याने त्यांच्या समाजातील लोकांसाठी अधिक प्रमाणात होते. मात्र, आपल्या समाजासाठी काम करताना आपण ज्या देशात राहतो, त्या देशातील इतर समाजांसाठीही त्यांनी त्यांच्या सामाजिक उपक्रमाचा लाभ देण्याचे ठरवले आहे. त्यांचे आता मुख्य उद्दिष्ट आहे- ‘जनसेवेतून देशसेवा’. हे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी बोहरी समाजाने त्यांच्या युवकांची फळी कार्यरत केली आहे. त्यापैकी महत्त्वाची बोहरी संघटना म्हणजे ‘बुर्‍हानी गार्ड्स’.
1) बुर्‍हानी गार्ड्स : ही बोहरी समाजातील युवकांची संघटना असली तरी ही फक्त बोहरी नव्हे, तर सर्वच समाजासाठी काम करते. आपल्याकडे ‘होमगार्ड’ असतात त्याप्रमाणेच हे ‘बुर्‍हानी गाडर््स’ आहेत. या गार्ड्‍सना होमगार्ड्सप्रमाणेच खाकी ड्रेस कोड आहे. बुर्‍हानी गाडर््सचे मुख्यालय सुरत येथे आहे. त्याचे जवळजवळ दोन हजार सभासद असून जगभरात जेथे जेथे बोहरी समाज आहे तेथे गार्ड्स आहेत. ते सेवा देत आहेत. या संघटनेत यावे यासाठी युवकांना प्रेरित केले जाते. अनेक युवक स्वयंप्रेरणेनेही येतात.
बोहरी समाजाचे मोहरम वा इतर कार्यक्रम असतात, त्या प्रत्येक कार्यक्रमात हे गाडर््स कार्यक्रमाची देखभाल करत असतात; परंतु बोहरी समाजाव्यतिरिक्त इतरही कार्यक्रमात ते रात्रंदिवस सेवा उपलब्ध करून देतात. पूर, भूकंप, गणपती विसर्जन, मोहरम, बाहेरील आक्रमण, बॉम्बस्फोट अशा बिकट व आणीबाणीच्या प्रसंगी बुर्‍हानी गार्ड्सचे स्वयंसेवक धावून जातात. मुंबईत 26/11ला झालेल्या बॉम्बस्फोटात ताज हॉटेल व इतरत्र मृत झालेल्या व्यक्तींचे पार्थिव बाहेर काढण्यात बुर्‍हानी गार्ड्सचे स्वयंसेवक आघाडीवर होते, हे आपणास माहीत आहेच.
या गाडर््सना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यापैकी मुख्य म्हणजे, प्रथमोपचाराचे प्रशिक्षण. दंगलकाळात कशी सेवासुविधा द्यावी, याचेही प्रशिक्षण दिले जाते. पूर वा भूकंपासारख्या काळात आपत्कालीन सेवा कशी द्यावी, याचेही प्रशिक्षण दिले जाते.
बुर्‍हानी गाडर््सचा स्वत:चा बँड आहे. पोलिस, एस.आर.पी., मिल्ट्री अशा संरक्षण करणार्‍या संस्थांच्या बँडप्रमाणे तो आहेच; पण या संस्थांच्या ‘बँड स्पर्धा’ असतात, तेव्हा हा बँड स्पर्धेत सहभागी होतो.
बुर्‍हानी गार्ड्सना समाजात कसे वागावे, कसे राहावे, बोलावे, याचे प्रशिक्षण दिले जाते. दंगल व इतर आपत्कालीन काळात पाळायची शिस्त व स्वयंसेवकांचे सभ्य, सुसंस्कृत वर्तन हे महत्त्वाचे असते. त्यासाठी आठवड्यातून एकदा गार्ड्सचे समुपदेशन केले जाते.
2) सैफी अ‍ॅम्ब्युलन्स व हॉस्पिटल : सैफी अ‍ॅम्ब्युलन्सद्वारा तत्काळ सेवा दिली जाते. रुग्ण व त्यांचे नातेवाईक, दंगलीच्या भागातील दंगलग्रस्त यांना याचा फायदा झालेला आहे व होत असतो. दहशतवादी हल्ल्यानंतर ताज होरपळत असताना सैफी अ‍ॅम्ब्युलन्सने दिलेली सेवा वा इतर भागात जेव्हा जेव्हा गरज असते तेथे सैफी अ‍ॅम्ब्युलन्स आघाडीवर असतात.
मुंबईतील ‘सैफी हॉस्पिटल’ हे एक अत्याधुनिक हॉस्पिटल आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते 2005मध्ये सैफी हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. आर्थिक संकटात असणार्‍या गरजू रुग्णांना येथे कमी पैशात किंवा वेळप्रसंगी मोफतही सेवा दिली जाते. रुग्णांच्या नातेवाइकांचीही राहण्याची सोय केली जाते व मोफत जेवण पुरवले जाते.
3) चिमणी बचाव अभियान : बोहरी समाजाचे गुरू डॉ. सय्यदना यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त सुरू केलेले हे अभियान आता कायमस्वरूपी चालू आहे. Save Sparrow ही त्यांच्या गुरूंची इच्छा आहे. यासाठी हा उपक्रम जगभरात जेथे बोहरा वस्ती आहे तेथे दरवर्षी केवळ संदेश देऊन साजरा न करता, त्यासाठी ‘बर्ड्स फीडर मशिन्स’ वाटली जातात. बर्ड्स फीडर मशीन हे चिमण्यांना अन्न व पाणी मिळावे यासाठी अत्याधुनिक पद्धतीने डिझाइन केलेले उपकरण आहे. यावर्षी ईदच्या दिवशी अशी दहा लाख उपकरणे संपूर्ण जगभरात मिळून वाटली गेली. या उपक्रमाद्वारे बोहरी गुरूंनी भूतदयेचा संदेश कृतीद्वारा दिला आहे.
4) ताहेरी स्कॉलरशिप सोसायटी : माजगाव-मुंबई येथे शैक्षणिक मदतीसाठी असलेला हा एक बोहरी ट्रस्ट. या ट्रस्टद्वारे बोहरी समाजातील व इतर गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक, वह्या वाटप केले जाते. मुख्य म्हणजे, गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यासाठी हा ट्रस्ट आहे.
5) तहेसुन निकाह कमिटी : ही कमिटी बोहरी समाजातील महिलांची आहे. ही कमिटी समाजातील वधू-वर व त्यांच्या पालकांना मदत व मार्गदर्शन करते. समाजातील मुला-मुलींची लग्ने जमवणे, हे कमिटीचे उद्दिष्ट आहे. समाजातील विधवा, घटस्फोटित स्त्रियांना ही कमिटी मदत करते. त्यांच्या पुनर्विवाहासाठी प्रयत्न करते.
6) व्यसनमुक्ती : बोहरी व इतर समाजातील व्यसनाधीन झालेल्यांना व्यसनमुक्त करणे यासाठी ‘व्यसनमुक्ती उपक्रम’ हे एक मुख्य समाजकार्य आहे. समुपदेशन व वेळ आल्यास सैफी हॉस्पिटलमध्ये उपचार करून व्यसनाधीन व्यक्तीला व्यसनमुक्त करणे, हे मुख्य उद्दिष्ट आहे.
7) सैफी बुर्‍हानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट : बोहरींच्या या उपक्रमाने जगभरातील सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हा एक विलक्षण व अद्भुत असा उपक्रम आहे. मुंबईतील ‘भेंडी बाजार’मध्ये उत्तम इमारती उभ्या करून तेथील लोकांना (बोहरी समाजाचे नसले तरी) नव्या इमारतीत त्यांच्या होत्या तेवढ्या जागा सर्व सोयी-सुविधांसह दिल्या जाणार आहेत. या जागा वाटप करताना प्रत्येकाला कमीत कमी 320 स्क्वेअर फूट जागा मिळणार आहे. तेथील लोकांचे राहणीमान, जीवनमान यामुळे चांगले होणार आहे. बोहरींच्या या उपक्रमांची दखल जगभरातील सर्व वृत्तपत्रांनी घेतली आहे. भेंडीबाजारमधील नवीन घरांच्या प्रकल्पाची एनडीटीव्हीने दखल घेऊन त्यावर कार्यक्रमही दाखवला आहे.
(arunjakhade@padmagandha.com)