Home | Magazine | Akshara | article of rakesh shirke in akshara

‘दादा’ माणूस

राकेश शिर्के | Update - Dec 30, 2016, 03:00 AM IST

मुंबईतील विक्रोळी हे एक उपनगर. पण या उपनगराची ख्याती अवघ्या आशिया खंडात पसरलेली.

 • article of rakesh shirke in akshara
  मुंबईतील विक्रोळी हे एक उपनगर. पण या उपनगराची ख्याती अवघ्या आशिया खंडात पसरलेली. विक्रोळीतील कन्नमवारनगर ही वसाहत आजही सर्वात मोठी लोक-वसाहत म्हणून गणली जाते आणि कन्नमवारनगराची ही ओळख सर्वार्थानं योग्यच आहे असं मला वाटतं. याचं कारण, कन्नमवारनगर ही वसाहत केवळ लोकसंख्येनंच मोठी नाहीये. तर ती सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि साहित्यिक दृष्टीनंदेखील समृद्ध आहे. हे नगर दिग्गज व्यक्तिमत्त्वांनं बहरलेलं आहे. या कन्नमवारनगरात सर्वच क्षेत्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी राहतात... ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, दिवंगत लोकशाहीर विठ्ठल उमप, ज्येष्ठ विचारवंत राजाभाऊ ढाले, ज्येष्ठ संगीतकार दिवंगत विठ्ठल शिंदे, अभिनेता संजय नार्वेकर, ज्येष्ठ पत्रकार काकासाहेब पुरंदरे, हुतात्मा अरुण म्हात्रे अशी एकापेक्षा एक दिग्गजांची मांदियाळीच या कन्नमवारनगरात आहे...! यातलंच एक नाव म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक वामनदादा होवाळ...

  २३ डिसेंबर २०१६ची दुपार... मी आणि नाटककार आमचा नाशिकचा नाटककार मित्र स्वप्नील गांगुर्डे यांच्या नव्या “सब घोडे बारा टक्के” या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला निघालो होतो. तितक्यात नगरातच वामनदादा आम्हाला भेटले. वयाच्या ७८व्या वर्षीदेखील हा माणूस वॉकरच्या साहाय्यानं चालत-फिरत होता... जवळपास ७-८ मिनिटं आम्ही तिघं एकमेकांशी बोललो. यावेळी गज्वी यांनी आदल्या दिवशी राजाभाऊ ढाले आणि गज्वी यांच्या भेटीतील वृत्तांत वामनदादांना सांगितला होता. राजाभाऊंच्या मते आज सर्व आंबेडकरी विचारवंतांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असं गज्वी यांनी वामनदादांना सांगितलं. यावर दादांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत स्मितहास्य करत म्हटलं की, अहो, आता या तरुणांनी पुढे आलं पाहिजे. आत्ता या वयात आपली इच्छा असूनदेखील आपण काहीच करू शकत नाही...! यानंतर मी अन‌् गज्वी नाटकाच्या प्रयोगाला निघालो... आणि वामनदादा त्यांच्या घराकडे वळले... दुपारचा प्रयोग पाहून आम्ही संध्याकाळी घरी परतलो... आणि रात्री साडेनऊ वाजता बातमी आली वामनदादा गेले... तो फोन कॉल खोटा वाटला म्हणून मी पुन्हा गज्वी सरांना फोन केला. तेही म्हणाले, “बातमी खरीय!”

  दुपारी तीन वाजता भेटलेला माणूस रात्री साडेनऊ वाजता आपल्यातून कायमचा निघून जातो... इतकं अस्थिर बनलंय आपलं आजचं जगणं! वामनदादा होवाळ यांची साहित्यसंपदा आपण सर्वच जाणतो. “वाटा आडवाटा”, “येळकोट”, “बेनवाड” हे त्यांचे कथासंग्रह... ‘येळकोट’नं मराठी साहित्याला आणखीच समृद्ध करण्याचं मोठं काम केलं. खरंतर वामनदादांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या साहित्यावर लिहिणं मला तितकंसं कबूल होत नाहीय. कारण या कथाकाराच्या प्रत्यक्ष सहवासात आम्ही कथाकथनाचा अनुभव घेतलाय. त्यामुळे त्यांच्या साहित्याविषयी समीक्षाच्या अंगानं काही लिहिणं मला उचित वाटत नाहीय. याचं दुसरं एक कारण असंही असू शकेल की, दादा ज्या ताकदीनं कथा सांगायचे त्या ताकदीनं आपल्याला त्यांच्या कथांची मांडणी करता येईल का? या प्रश्नाचं उत्तर माझ्यापुरतं तरी मी नाही असंच देईन. दादा कथा सांगताना केवळ गोष्ट सांगत नसत तर त्या गोष्टीला प्रेक्षकांसमोर जशीच्या तशी उभी करत असत. अगदी त्या कथेतील पात्रांच्या स्वभाव गुणधर्मासह... त्यामुळेच वामनदादांच्या कथा त्यांच्याकडूनच ऐकणं हा एक सुखद अनुभव असे... आमच्यासाठी!

  वामनदादा होवाळ हे एक अचाट व्यक्तिमत्त्व होतं. त्यांची कुणाशीही एकदा ओळख झाली की ती ओळख दादा कधीच विसरत नसत. दादांचा हाच गुण होता ज्यामुळे ते उभ्या महाराष्ट्रातील अनेक लोकांशी कायमचे जोडले गेले होते. कथा सांगणारा हा माणूस प्रत्यक्षात मात्र प्रचंड मृदू होता. पण दादांना जे खूप जवळून ओळखत असतील ते माझ्यापुढील विधानाशी नक्कीच सहमत होतील... “दादा प्रचंड खट्याळ होते”! होय, दादा सत्तरी उलटली असली तरीही एखाद्या तरुणाला लाजवतील इतका खट्याळपणा करत असत. नगरात रोज फेरफटका मारत असताना वामनदादांची नक्की भेट होत असे... त्या भेटीत दादा वर्तमानात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर किमान एकतरी “मार्मिक” कोटी करत असतच. गप्पांच्या फडात हशा पिकवण्याची अफाट ताकद त्यांच्यात मुळातच होती. असे हे दादा... दुपारी भेटले आणि संध्याकाळी कायमचे निघून गेले. वामनदादांनी आधीच सांगून ठेवलं होतं की, त्यांच्या अंत्ययात्रेत कुणीही भाषण करू नये. दादांची ती इच्छा मान्य केली गेली... पण दादा आता तुमच्या आठवणी एकमेकांना सांगण्याशिवाय आम्ही करू तरी काय शकतो...? दादा, तुमच्या साहित्याने आम्हाला जगण्याची दिशा दिलेली आहेच... पण तुमच्या आठवणी आम्हाला तुमचं नसणं सहन करण्याची ताकद देवोत!
  राकेश शिर्के, मुंबई

Trending