आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of Ranjit Rajput On Godess Kanbai, Divya Marathi, Rasik

सातपुड्याची बखर : कानबाई मायनी जतरा !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गौरी-गणपतीचा उत्सव जवळ आला की दूरवर पसरलेल्या मूळ कोकणवासीयांना कोकणात जाण्याचे वेध लागतात; तशीच अवस्था सातपुड्यातल्या खान्देशवासीयांची कानबाई उत्सवाच्या वेळी होते. कानबाई हे नेमक्या कोणत्या देवतेचं रूप, हे नेमकं स्पष्ट नाही. याला फार जुनी परंपरा आहे.

कृषी संस्कृतीशी नाते जोडणारे सणवार आपल्याकडे मोठ्या उत्साहात साजरे होतात. खान्देशी सातपुड्यात मोठ्या जल्लोषात साजरा होणारा कानबाईचा उत्सव त्यापैकीच एक! ‘खान्देश’ नावाच्या उत्पत्तीसंदर्भात अनेक प्रवाद आहेत. त्यावर विद्वान मंडळींचे अद्याप एकमत झालेले नाही. थेट इतिहासाचार्य राजवाड्यांच्या कालखंडापासून खान्देश नाम व्युत्पत्तीचे चर्वितचर्वण सुरू आहे. मात्र ‘कानबाईचा देश तो खान्देश’ अशी सर्वसामान्य मनाला चटकन पटणारी व्युत्पत्ती ज्या प्रमुख ग्रामदेवतेच्या नावावरून रूढ झाली, त्या कानबाई उत्सवाची सांगता गेल्या आठवड्यात झाली.

‘पुंगानीवर पडं बोट, पुढे येतस चटकशी रोट’ या ओळीचं खान्देशशी अतूट नातं आहे. खान्देशातील मायमाउल्यांच्या ओठांवर या ओळी येऊ लागल्या की प्रथम नांदी होते ती श्रावणाच्या आगमनाची. श्रावणाच्या आरंभी नागपंचमीची तिथी पंचांगात दिसते, त्यापाठोपाठ लगबग सुरू होते ती ‘रोटांची’. अहिराणी-मराठी बोलीभाषेत रोट म्हणजे कानबाई-रानबाईचा सण. रोट म्हणजे सवाई मापाने गहू दळून माहेरी आलेल्या कानबाईच्या नैवेद्यासाठी केलेल्या पुरणपोळ्या. हे रोट फक्त भाऊबंदातील व्यक्तींनाच खायला देतात. विवाहित मुलीला रोट खायला देत नाहीत. साधारण नागपंचमीनंतर येणाºया पहिल्या रविवारी खान्देशात कानबाईची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते.

कानबाई हे नेमक्या कोणत्या देवतेचं रूप, हे नेमकं स्पष्ट नाही. याला फार जुनी परंपरा आहे. कुणी म्हणतं की, पूर्वी खानाचं राज्य होतं. त्याला ‘तुझ्या नावाची म्हणजे ‘खानबाई’ साजरी करतो’, असं सांगून हिंदू हा सण साजरा करत होते. कुणी म्हणतं की, हा खानदेश म्हणजे कान्हादेश! खानदेशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात, म्हणून त्यांनी देवीचा उत्सव सुरू करण्यासाठी ‘कानबाई’ हे नाव घेतलं असावं. सूर्यकन्या तापी नदीच्या खोºयात खान्देशचं जनजीवन बहरलं आहे. सूर्य उपासनेची प्राचीन परंपरा येथे आहे. कानबाई ही सूर्यपत्नी असल्याचे अनेक दंतकथांमधून समजते. काही ठिकाणी ती शिवपत्नी पार्वती, तर कृष्णाची सखी राधा असल्याचे सांगण्यात येते. कानबाई पूजेचा विधी थोड्याफार फरकाने सर्वत्र सारखा आहे. एका चौरंगावर पूर्वी घडविलेल्या मुखवट्याची अथवा परणलेल्या नारळाची विधिवत स्थापना होते. स्थानिक महिलांचा पेहराव व दागिन्यांच्या रीतीनुसार कानबाईला सजविण्यात येते. कलशावरूनच गळ्यातले हार, मणी मंगळसूत्र इत्यादी चढवले जाते. वरून शेवंतीची वेणी लावून ओढणी लावली जाते. मग आरती, नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे. देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट-लाटणं, तवा हे सगळं कणकेचंच केलं जातं (ही कणीक पण स्पेशली पिठात साजूक तूप घालून दुधात मळलेली असते) हे सर्व काशाच्या ताटात ठेवून देवीला ओवाळतात. इतर सणांसारखाच इथंही ज्येष्ठांना मान असतो.
कानबाईची अहिराणी भाषेतील गाणी ऐकण्याचा आनंद अवर्णनीय आहे. अहिराणी भाषेचा गोडवा जाणून घ्यायचा असेल तर आधी ही गाणी ऐकली पाहिजेत. केवळ श्रावणातच नव्हे तर लग्नसोहळ्यात नाचगाण्यांच्या वेळी ही गाणी हमखास वाजवली जातात.

कानबाईचे लग्न लावण्याचा एक विधी या वेळी होतो. पुढील चार दिवस कानबाईचे. या उत्सवात कुलाचार रीतीप्रमाणे कानबाईचे रोट केले जातात. त्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे कानबाई आणि रोट हे कौटुंबिक, सामाजिक एकतेचे प्रतीक आहे.

तिसºया अथवा चौथ्या दिवशी सकाळी लवकर उठून कानबाईच्या विसर्जनाची तयारी होते. कानबाईची आरती करून अंगणात चौरंग नेऊन ठेवतात. गल्लीतल्या सगळ्या कानबाया एकाच वेळेस निघतात. ढोल-ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर घेऊन बायका नदीवर निघतात. कानबाईला नि त्या स्त्रीला नमस्कार करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होते. कानबाईपुढं मुलं, मुली फुगड्या खेळतात. नदीवर पुन्हा एकदा आरती होऊन कानबाईच्या नारळाव्यतिरिक्त सगळ्याचं विसर्जन होतं. कानबाईची अहिराणी भाषेतील गाणी ऐकण्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यातील काही गाणी अशी....

‘‘कानबाई माय, तुन्हा करसू वं ‘रोट’...
खपी चालनी हयाती, पिकू देवं, मन्हं पोट’’
‘‘कानबाई मायनी जतरा दाट.
माय... जतरा दाट..., हे दर्शन माले, मिये ना वाट.
माय.... मिये ना वाट’

कानबाईची अहिराणी भाषेतील गाणी ऐकण्याचा आनंद अवर्णनीय आहे. अहिराणी भाषेचा गोडवा जाणून घ्यायचा असेल तर आधी ही गाणी ऐकली पाहिजेत. केवळ श्रावणातच नव्हे तर लग्नसोहळ्यात नाचगाण्यांच्या वेळी ही गाणी हमखास वाजविली जातात. खान्देशी सातपुड्याचा ब्रँड उत्सव असलेल्या कानबाई उत्सवाबद्दल लिखित साहित्य मात्र फारसे उपलब्ध नाही. मालेगावचे डॉ. सयाजी निंबाजी पगार, अमळनेरचे कृष्णा पाटील, प्रा. डॉ. पुष्पलता करनकाळ यांसारख्या काही मोजक्या मंडळींचे कानबाईकडे लक्ष गेलेले दिसते. कानबाई हा सातपुड्यातील खान्देशचे मूळ रहिवासी असलेल्या अहिरांचा मुख्य उत्सव आहे. या भूमीवर अहिरांचे आगमन नेमके कधी झाले? यदुवंशीय कृष्णाचे नेतृत्व मानणाºया अहिरांचा या भागातील सत्ताकालखंड कोणता? आणि फारुकी राजवटीचा खान्देशवर प्रदीर्घ काळ अंमल असूनही येथील सांस्कृतिक परंपरांचा गाभा कायम राहण्याचे रहस्य कोणते? या अंगाने इतिहास जाणून घेण्यासाठी कानबाई उत्सव हे प्रभावी साधन ठरू शकते.
ranjitrajput5555@gmail.com