आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुविधा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मितालीचा प्रस्ताव आई-बाबांनी लगेच मान्य केला. त्यांना तो आवडलाही. मुलीची जवळची मैत्रीण घरी राहायला येणार, किमान काही दिवस तरी तिला तरुण कंपनी मिळणार... रोज तेच रूटीन. दिवसभर आपण कामानिमित्त बाहेर. मितालीचे कॉलेज, प्रॅक्टिकल्स, तिलादेखील स्वत:चा म्हणून वेळ मिळायचा नाही. घर मोठे, प्रत्येकाची वेगळी, स्वतंत्र रूम. दोघी करतील थोडी मजा...

मितालीची मैत्रीण आली. साधी बुजरी वाटावी अशी. त्या दोघांशी जुजबी बोलत तडक रूममध्येच गेली. दोघी सतत बंद खोलीत राहायच्या. मिताली कामे करण्यासाठी आईपाशी यायची, पण मैत्रीण मात्र रूममध्येच. काही कारणांनी रजा घेतलेल्या आईला अनेक गोष्टी खटकल्या. मितालीची ही मैत्रीण लाजरी वाटलेली, पण कॉलेजला जाताना अत्यंत विचित्र कपडे ती घाले, बर्‍यापैकी भडक मेकअप. कानाला कायम मोबाइल... घरात इतर माणसे आहेत, त्यांच्याशी आपण बोलले पाहिजे, याची तिला जाणीव नव्हती. प्रश्नाचे उत्तर देण्यापुरता तिचा संवाद.

ही मैत्रीण त्याच शहरातील. कॉलेज थोडे लांब पडते म्हणून मितालीकडे राहायला आलेली. अगदी स्वत:च्या घरी राहावे, इतक्या मोकळेपणाने ती इथे राहत होती. पण तिच्या आजूबाजूस फक्त मिताली आणि एक मोबाइल, याव्यतिरिक्त वेगळे जग नव्हते. मितालीला खूपदा विचारल्यावर मोठ्या नाखुशीने तिने ‘बोलते ती तिच्या मित्राशी, सध्या त्यांच्यात वाद झालेले. घरातून काहीही बोलणे शक्य नसल्याने आपल्याकडे ती आली.’ असे सांगून टाकले...
‘प्लीज आता, ती कशी वाया गेली, वगैरे म्हणू नको. माझी जवळची मैत्रीण आहे ती. त्यांच्याकडे असे चालत नाही.’
‘असे म्हणजे कसे?’
‘म्हणजे मुलांशी बोलणे’-
‘मला वाटत नाही, मुलांशी बोलण्याला विरोध असेल. दिवस-रात्र बोलण्याला विरोध असावा...’
मिताली गप्प बसली.
‘तिचे कपडे, मेकअप... काय म्हणशील?’
‘तसा सेन्स नाही तिला.’
‘भडक कपड्यांबद्दल किंवा नटण्याबद्दल नाही म्हणत मी. हे सर्व तिच्या घरी न करता आपल्याकडे ती करते. काल दिवसभर एकटीच ती बाहेर गेली होती. तू लवकर आलीस, ती रात्री उशिरा आली. तेव्हा त्या मित्राला भेटायला गेली असणार ती. होय नं?’
‘मला माहीत नाही..’
‘तू आता खरे सांगणार नाहीस. पण आपल्याकडे ज्या विश्वासाने तिच्या आई-वडलांनी पाठवलंय काही दिवसांसाठी, त्यांना काय वाटेल? आपल्या घरी तिला पूर्ण मोकळीक मिळावी म्हणून तू आणलेस. आम्हा कोणाशी न बोलता तिचे फोनवर बोलणे योग्य वाटते तुला?’
‘तिने काय करावे? हवे तसे जगता येत नाही तिला.’
‘म्हणून ती तिच्या घरच्यांना व्हिलन ठरवणार. तुला तिच्या आई-वडलांची मते काय आहेत, हे ठाऊकही नाही. त्यांना जुनाट-बुरसटलेले अशी विशेषणे ती लावणार. कदाचित ते पुरोगामी असतील, फक्त त्यांना दिवस-रात्र बंद खोली करून तासन्तास मुलीचे लाडे लाडे बोलणे सहन होत नसेल. अभ्यास करत मैत्री जपावी, असे त्यांनी सुचवले नसेल कशावरून? सोयीसोयीने आपण शब्दांचे अर्थ घेतो. मैत्री, प्रेमाच्या आड कुणी आले की ती व्यक्ती बाद करायची. आपले घर चांगले, का तर निर्बंध घालणारे कोणी नाही... असे तिला वाटते. आम्ही तिला आपल्याकडे राहण्याची का परवानगी दिली असावी?... कारण ती तुझी मैत्रीण आहे. तिला मित्र असले, ती नटत-मुरडत असली तरी बिघडत नाही. पण तिने जे घडले, घडतंय, ते तिच्या घरी सांगायला नको? तू हे सहज सांगत आलीस...’
‘याचं कारण तुम्ही समजून घेतलंत. तिचं कॉलेज बंद करतील, त्यांना हे सगळं कळलं तर...?’
‘तू भेटलीस तिच्या घरच्यांना?’
‘हो, गेलेय घरी. पण एका भेटीत कसे कळणार?’
‘एका भेटीत मित्र-मैत्रीण कळते... कोणाचे आई-बाबा नाही समजत?’
‘हे खरंय. आई-बाबा जुनाट विचारांचे असणार, हा पक्का समज होतोच. ते विरोध करतात, याचा मनस्वी राग तिला आल्यामुळे मी मदत केली.’
‘कोणत्याही ‘डे’जला तू तिला आपल्याकडे आणणार, हव्या त्या फॅशनचे कपडे घाल म्हणणार, जसे वाटेल तसे जग म्हणणार... पण तिच्या आई-बाबांशी बोलणार मात्र नाही. तिला खोटे वागण्यास प्रोत्साहन की तिच्या घरच्यांशी प्रतारणा?... पर्याय तूच निवड.’
bhargavevrinda9@gmail.com